हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

उठा

उठा गडयांनो नशीबातला आपल्या अंधार हटायला हवा।
या जंगलांत, या डोंगरांत आता क्रान्तीचा दिवा पेटायला हवा।।

या भुमीचे पहीले मालक तुम्ही, इथले मूळ वारस तुम्ही.!
तुमच्याच या घरात सांगा कसे, आज झालात बेवारस तुम्ही.?
दाबला गेलेला तुमच्या रक्ताचा लाव्हारस विद्रोह बनून फुटायला हवा।
या जंगलांत, या डोंगरांत आता क्रान्तीचा दिवा पेटायला हवा।।

अजोड पराक्रमांनी या देशाचा रंगविलाय इतिहास तुम्ही,
उपेक्षेचा मग का सांगा आज भोगता उपहास तुम्ही?
तुमच्या हक्कांचा, जाणिवांचा आक्रोश थेट गगनास खेटायला हवा।
या जंगलांत, या डोंगरांत आता क्रान्तीचा दिवा पेटायला हवा।।

गिधाडे टपलीत अस्तित्वावर तुमच्या घालावयास घाले
निर्णायक लढाई होणार, विरोधाचे परजून ठेवा भाले.!!
सह्याद्रीच्या वाघांनो, कडेकपारींतून डरकाळ्यांचा आवाज उठायला हवा।
या जंगलांत, या डोंगरांत आता क्रान्तीचा दिवा पेटायला हवा।

शिक्षणाची, परिवर्तनाची धरुनी कास तुम्ही
अन्यायाचे, अज्ञानाचे आता तोडा पाश तुम्ही.!!
प्रगतीस लागलेल्या ग्रहणातुन आपला सूर्य सुटायला हवा।
या जंगलांत, या डोंगरांत आता क्रान्तीचा दिवा पेटायला हवा।।