हा ब्लॉग शोधा

ललित चित्रण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ललित चित्रण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ३० जुलै, २०२१

व्हायरस

काही लाख करोड वर्षांपूर्वी, शुक्र आणि मंगळावर प्रचंड प्रगत सजीवांची वस्ती होती. आपल्या अतुलनीय तांत्रिक प्रगतीच्या संभ्रमात ते इतके गुरंफटले होते की येणाऱ्या विनाशाची त्यांना कल्पनाच आली नाही. दोन्ही ग्रहांवरची खनिज इंधने प्रचंड वेगाने संपत चालली होती. मग त्यांनी त्यासाठी एक नवे गुरुत्वाकर्षणावर आधारित ऊर्जेचे तंत्रज्ञान शोधले. या तंत्रानुसार त्यांनी काही गुरुत्वीय लहरींचे ट्रान्स्पोण्डर तयार केले ज्यांच्यात पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण वापरून ऊर्जेचे निर्माण करता येणार होते. शुक्र आणि मंगळ या दोहोंच्या मध्ये वर्षाचा खूप मोठा काळ पृथ्वी येत असते. पृथ्वी अशी मध्ये आली असताना दोन्ही ग्रहांवर जो गुरुत्वाकर्षणीय ताण निर्माण होत असे त्याचा वापर करून ते वर्षभरासाठी पुरेल इतकी ऊर्जा बनवून साठवणार होते. पृथ्वी ही सदैव अशीच राहणार असल्याने अगदी अनंतकाळासाठी दोन्ही ग्रहांची ऊर्जेची गरज भागविणारे हे तंत्रज्ञान होते.
पण या तंत्रात एक अवघड अशी अडचण होती. पृथ्वीचा निळा रंग ट्रान्स्पोण्डरच्या रिसिव्हर्स समोर असताना त्यांचे ऊर्जास्रोत चार्ज होत असत मात्र पृथ्वीचा हिरवा भाग समोर आला की मग मात्र उलटे होऊन रिसिव्हर्स मधून चार्ज खूप वेगाने लीक होऊ लागे. पृथ्वीवर हिरव्यापेक्षा निळा भाग जास्त असल्याने त्यांना नेट ऊर्जा शिल्लक राहत तर असे, पण ती खूपच थोडी असल्याने त्यांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर आता ती ऊर्जा कमी पडू लागली होती. त्यामुळे या गुरुत्वउर्जिय संधारणात येणारा पृथ्वीवरच्या हिरव्या रंगाचा अडथळा हा त्यांच्या ग्रहांवरची जीवसृष्टीच संपवू शकणार होता. म्हणून मग पृथ्वीवरच्या या हिरव्या रंगाचा विनाश करण्यासाठी त्यांनी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याचे ठरविले.
तसे पृथ्वीवरील या हिरव्या सजीवांचा त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने अभ्यास केलेला होता, त्यामुळे ही हिरवी जीवसृष्टी संपविण्यासाठी पृथ्वीवर व्हायरसची निर्मिती करावी हा उपाय त्यांनी योजण्याचे ठरवले. आणि मग त्यांनी संयुक्तपणे मंगळावरील वुहान शहरात असा व्हायरस निर्माण करायला सुरुवात केली. 
आपण जाणतोच की व्हायरस हा होस्टच्याच शरीरातील सत्व वापरून आपली लोकसंख्या वाढवतो आणि मग होस्टलाच खल्लास करतो. 
प्रयोगशाळेत व्हायरस तयार झाला आणि मग त्याला पृथ्वीच्या हिरव्या जीवसृष्टीत सोडण्यात आले. पण लाखो वर्षे गेली तरी पृथ्वी त्या व्हायरसने इन्फेक्ट होऊनही पृथ्वीचा हिरवा रंग काही कमी होईना. मग एकामागून एक असे करोडो व्हायरस म्यूटेट करून पृथ्वीवर सोडण्यात आले पण तरीही हिरवी जीवसृष्टी काही कमी होईना व त्यामुळे शुक्र मंगळावरील ऊर्जेचा तुटवडा हा काही भरून निघेना. 

पुढे एकदा शुक्र ग्रहावर एक खूप मोठा म्हणजे 56 इंच आकाराचा निर्बुद्ध पण गरम डोक्याचा नेता जन्मास आला. त्याच्या बावळट कल्पनेनुसार मग झटपट इलाज म्हणून शुक्रवासीयांनी एक प्रचंड मोठा धूमकेतू पृथ्वीच्या हिरव्या भागावर आदळवला, मात्र त्यानेही फक्त काही काळ हिरवा रंग थोडासा कमी झाला, पण नंतर पुन्हा खूप वेगाने आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढून पुन्हा जैसे थे झाला. इतकेच नाही तर या गरम डोक्याच्या नेत्याने तज्ज्ञांशी मसलत न करता स्वतःच्याच हेकेखोरपणाने पृथ्वीवर धूमकेतू आदळविल्याने पृथ्वीवर जी कंपने निर्माण झाली त्यांच्यामुळे शुक्र आणि मंगळ या दोन्ही ग्रहांवरील ऊर्जेचे ट्रान्स्पोण्डर व रिसीवर मोठ्या प्रमाणात बिघडले. त्यामुळे असे प्रचंड नुकसान झाल्यावर शेवटी व्हायरस हाच योग्य उपाय आहे हे त्यांना कळले.

दरम्यान दोन्ही ग्रहांची खनिज इंधने संपून गेली, आणि पृथ्वीच्या हिरव्या रंगात घट न झाल्याने नव्या तंत्रज्ञानाची गुरुत्वीय ऊर्जाही त्यांस पुरेशी पडेना. त्यामुळे उलट शुक्र अन मंगळावरचीच जीवसृष्टी आता लोप पावू लागली. दोन्ही ग्रहांवरच्या प्रगत जीवसृष्टीपुढे स्वतःच्याच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहीला. आणि मग करोडो वर्षानंतर शेवटी त्यांना एक आशादायक व्हायरस बनविण्यात यश मिळाले. हा व्हायरस त्यांनी आजपर्यंत बनविल्यांपैकी सर्वात अधिक इन्फेक्शीयस तर होताच, पण हिरव्या जीवसृष्टीसाठी अतिशय प्राणघातक सुद्धा होता.
लवकरच या व्हायरसने हिरव्या जीवसृष्टीला इन्फेक्ट करून संपवायला सुरुवात केली. पण जरी हा अत्यंत प्रभावी व्हायरस असला तरी तो म्हणावा तितका परिणाम साधू शकला नाही. मग शुक्र मंगळाचे सायंटिस्ट या व्हायरसमध्ये  हळूहळू स्टेप बाय स्टेप म्युटेशन घडवून त्याला अधिकाधिक घातक बनवू लागले. त्यांनी या व्हायरसची अल्फा, बीटा, गॅमा अशी अनेक म्युटेशन्स आणली जी अधिकाधिक घातक होत गेली. शेवटी 1000 वर्षांपूर्वीच या व्हायरस मध्ये एक डेल्टा वेरीएशन नावाचे म्युटेशन झाले आणि हिरव्या जीवसृष्टीचा वेगाने विनाश व्हायला सुरूवात झाली. मात्र तरीही या व्हायरसवर संशोधन चालूच होते. आणि मग अगदी अलीकडे म्हणजे जस्ट 200 वर्षांपूर्वी या व्हायरसमध्ये डेल्टा प्लस हे नवे खतरनाक म्युटेशन झाले, आणि हे म्युटेशन इतके प्रचंड प्रभावी ठरले की मागच्या 200 कोटी वर्षांतील तमाम व्हायरसांना जे जमले नाही ते या व्हायरसने केवळ 200 वर्षांत करून दाखवले.
हा व्हायरस हिरव्या जीवसृष्टीत घुसला. आणि त्या सृष्टीच्याच शरीरातील सामग्री वापरून सगळ्या पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात फोफावला. प्रचंड इन्फेक्शस असण्याबरोबरच हा व्हायरस इतका अधिक घातक सुद्धा निघाला की या लास्ट 200 वर्षांतच पृथ्वीवरची अक्षरशः निम्मी हिरवी जीवसृष्टी त्याने खतमच करून टाकली. 
आता मंगळ आणि शुक्रावरची त्यांना उपयुक्त ठरणारी ऊर्जानिर्मिती वाढली आहे. त्यांची विलुप्त होणारी जीवसृष्टी आता पृथ्वीवरच्या या लेटेस्ट व्हायरसमुळे पुन्हा समृद्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. साधारण पुढच्या 100 वर्षांत हा व्हायरस पृथ्वीवरची 90 ते 95 टक्के हिरवाई कायमची नष्ट करेल असा अंदाज आहे.
शुक्र आणि मंगळवासीयांनी या पृथ्वीसाठी प्रचंड प्राणघातक असलेल्या व्हायरसला 'ह्युमिना व्हायरस' असे इंग्रजी नाव दिले आहे. मराठीत त्याला काय नाव देता येईल?


..

शुक्रवार, १ ऑगस्ट, २०१४

आठवणीतल्या दिवसाचे गाव

संपूर्ण जग आता एक खेडे, एक गाव बनले आहे असे आपण वारंवार ऐकतो. पण झपाट्याने जगाचे शहरीकरण होत असताना खरेखुरे गाव मात्र हरवत चालले आहे. इथे शहरात जिकडे तिकडे नुसती गर्दी, गोंगाट, घाई पसरलेली दिसते. सकाळी बाहेर पडण्यासाठी आणि रात्री आत येण्यासाठी असे दोनदाच घरांचे दरवाजे उघडतात. इथे डोंगर दिसत नाहीत, खळाळती नदी नाही, आणि कारखान्यांचा धूर व स्ट्रीट लाईट्सच्या प्रखरतेने रात्रीच्या आकाशातली चांदण्यांची चमचमती झालर तर अजिबात दिसत नाही. त्यामुळेच गावची नदी, डोंगर, आभाळ, झाडे, माती, गुरे, माणसे, देऊळ, शाळा या सगळ्यांशी जन्मत:च नाळ जोडली गेली असल्याने उपजीविकेसाठी शहरात यावे लागलेल्या आमच्यासारख्या कैकांना गाव आणि गावाची आठवण नेहमीच अंतर्मुख करून टाकते. 

अमुक अमुक शहर कधीच झोपत नाही असे अनेक शहरांबद्दल लोक कौतुकाने बोलतात, गावाला मात्र गाढ झोप यायची. दिवसभराच्या शेतातल्या कामावरून परतून, गुरे बांधून अन गायी म्हशी पाजून झाल्या की पारावर जमलेल्या  बाप्यांच्या गप्पांना रंग येई. चावडीपुढच्या अशा यार दोस्तांच्या गप्पा रंगलेल्या असतानाच थोड्या वेळाने एखादे पोरगे येऊन बापाला म्हणे की "दादा, सैपाक झालाय, आयेनं जेवाया बोलीवलंय" ते ऐकताच मग टोळक्यातल्या सगळ्यांना भूक लागे आणि मैफल लगेच बरखास्त होऊन जो तो आपल्या घरी जेवण्यासाठी रवाना होई. जेवल्यावर अर्ध्या एक तासाने पुन्हा निम्मेअधिक जण तिथेच एकत्र जमत. बिड्या, तंबाखूची देवाणघेवाण करीत आणि उरलेल्या गप्पा चघळीत बसत. लांब तिकडे देवळात भजन रंगलेले असे, आयाबायांनी अंगणात उजेडात भांडी घासायला काढलेली असत. एखाद्या मोठ्या खटल्याच्या घरात ओसरीवर म्हाताऱ्याची धुनी पेटलेली असे, आणि तिच्याभोवती कोंडाळे करून "आज्या गोष्ट सांग ना रे" असा नातवंडांचा धोशा चाललेला असे. मग धुनीतली राख बाजूला करून लाकडे लावता लावता आजोबाची राजाराणीची गोष्ट संपायला आली की पोरे तिथेच पेंगू लागत. सगळी नातवंडे झोपली हे पाहून आपल्या चार लेकांतल्या लग्न न झालेल्या धाकट्याला तो आजोबा पोरांना उचलून घरात अंथरुणावर नेउन ठेवायला सांगे. एव्हना चावडीवरची बैठक आणि देवळातले भजनही उरकलेले असे. "मला तांब्याभर पाणी आणून द्या अन कंदिलाची वात बारीक करा रे" असे न चुकता सांगून म्हातारा ओसरीवर झोपू लागे तेव्हा रातकिड्यांची किरकिर आणि मध्येच हुक्की आल्याने एकापाठोपाठ एक ओरडणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज वगळता सगळे गाव शांत होऊन जाई. 

पहाट मात्र गजबजलेली असे,  मंजुळ किलकिलाट करीत पाखरे घरट्यांतून कुठेशी उडून चाललेली असत. घराच्या एका कोपऱ्यात जात्याची घरघर चालू असे,  त्या तालावर जाते ओढता ओढता बायांच्या ओव्या चालू होत. स्वयंपाकघरात चूल पेटलेली असे, मधून मधून तिथूनही फुंकणीचा आवाज येई. न्हाणीकडे हंडे, कळश्या विसळल्या जात, मधेच एखाद्या हंड्याचा टण्ण असा आवाज येई. डोळे चोळीत उठावे आणि अंगणात यावे तर पूर्वेचे आकाश तांबडे होऊन गेलेले असे. पाणवठ्यावरून दुडी अन तीडीने हंडे भरून पानेरणी येताना दिसत. आपल्या किटल्यांमध्ये दुध घेऊन डेरीवर आलेला एखादाजण एका किटलीच्या दुधाला डिग्री बसत नाही म्हणून दुध नाकारणाऱ्या डेरीवाल्याशी हुज्जत घालीत बसलेला असे. पाहुण्या गावाला जायचे या आनंदात बाजूलाच रस्त्याच्या कडेला सकाळच्या एसटीची वाट बघत आई बापाबरोबर नवे कपडे घालून नवाजून गेलेली पोरे उभी असत. रस्त्यावर जाऊ नका म्हणून बाप उगीच त्या पोरांना दटावीत राही. 
हळूहळू सूर्य वर येई, गाव पिवळे होऊन जाई. पाठीवर दप्तर, खाकी चड्डी, पांढरा शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी असा लवाजमा घेऊन पोरे शाळेची वाट धरीत. गोठ्यातून बाहेर पडताच अंग शहारून आळस झटकणाऱ्या गुरांना हलकेसे दामटीत हातात काठी अन कमरेला बासरी खोचून गायखे रानात निघत. तिकडे शाळेत चालू असलेली प्रार्थना ऐकत बसायला शेतकऱ्यांना वेळ नसे. प्रात:सभा संपून पोरे वर्गात बसेतो भिवाजीचा एक पट नांगरुनही झालेला असे. घराघराच्या कौलारू छपरांतून चुलींचा धूर वाट काढून बाहेर पडत राही. रस्त्याने अनेकांचे रामराम घेत आणि काठी टेकीत टेकीत काही वयस्क धेंडे देवळापुढे, चावडीवर जमत व जुन्या आठवणींना उजाळा देत बसत. 
घरात कारभारणींना वेळ पुरत नसे. आंधणावर आंधणे ठेवली जात, चुलीवर भाकरी थापत असताना बाजूच्या औलावर कोरड्यास उकळून रटरटत असे. सांभाळायला दिलेली सगळी तान्हुली गोंधळ घालून, रडारड करून वैताग देऊ लागली की उशीर होतोय, धूर झालाय अशी कारणे काढून म्हातारी सासू तिच्या सुनांवर ओरडत राही. सगळी झाडलोट, सारवण उरकले की पोराटोरांना जेवू घालेपर्यंत सूर्य बराच वर आलेला असे. मग "औतकऱ्यांना न्याहारी घेऊन निघा की गं कोणीतरी, लेकरं भूकावली असतील माझी" असा सूचनावजा आदेश म्हातारी सुनांना देई. आणि मग एखादी सून पाटीत जेवण घेऊन रानात निघे. तिकडे दोन मोठी वावरे नांगरून झाल्यावर औते सोडत असताना न्याहरी येई, पण बैलांना सावलीत बांधून पेंढा खायला टाकल्याशिवाय कुणीही जेवायला घेत नसे. जेवायला बसले की सगळ्या ताटांत वाढून होईपर्यंत पाटीतला कांदा घेऊन बुक्कीने ठेचून होई.  जेवणाबरोबर त्या फोडलेल्या कांद्याला न्यारीच चव येई. मग सगळ्यांचे जेवण उरकून थोडा वेळ बसले की सगळे औतकरी पुन्हा जमीन उसवायला भिडत. 

गाव दुपारच्याला तसे ओसाड झाल्यासारखे दिसे, सुतारांची ठक ठक, आणि लोहाराच्या घणाचा आवाज तेवढा येत राही. दारावरून जाणाऱ्या एखाद्या पाहुण्याला मग तो अनोळखी का असेना, रामराम घालून, "ऊन लई झालंय, वाईच या सावलीला, पाणी घ्या" म्हणून घरात बोलावले जाई. पाणी दिल्यावर जेवणाचाही फार आग्रह होई. इकडची तिकडची विचारपुस्त होई. मग पाहुण्याच्या गावाच्या आपल्या मित्रा अथवा नातेवाईकांना राम राम सांगा असे म्हणून थोडा उन्हाचा कडाका कमी झाल्यावर पाहुण्याला निरोप देण्यात येई. शाळेतून आल्यावर जेवून खेळता खेळता खूप भांडून पोरे झोपून गेलेली असत. तर काही थोडी मोठी पोरे नदीवर पोहायला, विटीदांडू खेळायला निघून जात.                

सूर्य मावळतीला कलताना परत गावाची लगबग चालू होई. गावभराच्या घरांवर पुन्हा एकदा धुराची एक रुंद पट्टी पसरत जाई. अंगणांत पोरांचे खेळ रंगलेले असत. लांबवर बगळ्यांचा बाण आकाशातून झेपावतांना नजरेस पडे. थोड्याच वेळात आपल्या गळ्यातल्या घंटांची खणखण घेऊन एकामागून एक मोठमोठे गुरांचे कळप गावात शिरत. सकाळी घर सोडून रानात जातांना गुरे सावकाश चालत जात मात्र संध्याकाळी मागून धावणाऱ्या गुराख्याची तारांबळ उडवीत सगळी गुरे पळत पळतच गावात शिरत. एकामागून एक लोंढे गावात येत. वेशीपासूनच हंबरडे फोडून गायी गोठ्यांतल्या आपल्या वासरांना आपण आल्याची सूचना देत. त्याला प्रतिसाद म्हणून गोठ्यांतूनही दावणीला उगीच झटत वासरे हंबरडा फोडीत. प्रत्येक लोंढ्याबरोबर तो गुरांचा एक आल्हाददायी वास गावाला कवेत घेई, तो पायरव, घंटानाद यांनी कान भरून जात, आणि मातीच्या रस्त्यावर एकाच वेळी धावत चाललेल्या शेकडो खुरांच्या खालून उडणारी धूळ घरांवरच्या धुरात मिसळून गाव, आकाश, डोंगर हे सारे क्षणभर हरवून गेल्यासारखा भास होई.

आज प्रचंड गर्दीतून वाट काढीत, लोकलचा खडखडाट व वाहनांचे कर्कश हॉर्न कानात ओतून आणि कित्येक नळकांड्यानी हवेत सोडलेला धूर नाकात, डोळ्यात भरून कसाबसा घरात पोचतो ना, तेव्हा डोळ्यांपुढे दाटून आलेल्या विषण्णतेच्या शेकडो शून्यांच्या वर्तुळांत संध्याकाळच्या त्याच गाव हरवून जाण्याच्या विलोभनीय क्षणांना मन शोधत राहते. 

बुधवार, १२ मार्च, २०१४

उन्हाळा



घारीच्या सावलीवर पाय द्यायचा, आणि त्या जागेवर तीन दगड रचून ठेवायचे. मग पाच दिवसांनी तिथे खणले की पैसे सापडतात.
एक दिवस विटी दांडू खेळत असावे. दिवस डोक्यावर चढून रटरटत असावा. एकनाथ्याने विटी खूप उंच कोलावी आणि सूर्याने दिपून ती कुणास झेलताच येऊ नये. तेवढ्यात कुणीतरी वर घारीस घिरट्या घालतांना पहावे आणि तिची सावली कुठे पडली असेल याचा अंदाज घेऊन "चला रे तिकडं घारीच्या वसव्यावं पाय दियाला" अशी घोषणा द्यावी. एकनाथ्यासकट सगळ्यांनी मग क्षणार्धात विटीदांडूचा रंगलेला डाव मोडून घारीच्या सावलीमागे पळत सुटावे. दिन्याच्या फक्त हातभर लांबून सावली पळून जावी. भुऱ्याने तर अगदी बरोबर सावलीच्या जागी पाय द्यावा पण एक सेकंदाने वेळ चुकून सावली पुढे निघून जावी. गुणा सावलीवर पाय देण्याच्या नादात ठेचकाळून पडावा. घारीने हुलकावणी देत रहावी अन सावली कुणाच्याच पायाखाली येऊ नये. बऱ्याच वेळाने मग पोरे हटत नाहीत हे पाहून घारीनेच दमून कुठेतरी निघून जावे. पोरांनी जाम ओशाळून, घामावून बाजूच्या हिरडीखाली जमावे. मग नदीवर पोहायला जायचा ठराव मांडला जाताच मंजूर होऊन कारवाईत देखील यावा. सगळी नदी उड्या मारमारून ढवळून काढावी. तिकडून परतल्यावर लांब आकाशात एक उंच अशी धुळीची उभी रेघ दिसावी. मग हळू हळू एखादा कागद त्या रेघेच्या पुढे मागे हेलपाटे खाताना दिसावा. "गावातच येत्येय रे जणू वहाटुळ" असा पुकारा करताच मग ती पहायला पळत सुटावे. पोरे आणि वावटळीने सोबतच गाव गाठावे. "आररं बेम्बट्याच्या गवताच्या पेंढ्या पार उडाल्या रे" असे कुणी हळहळून म्हणावे. "पारूबाई त्वा कापडं धिवुन वाळत टाकली व्हती ना? ती पार तिकडं लांब उडून गेली" असे एकाने पारूबाईच्या घरी जाऊन सांगावे. गल्लीबोळातून वासुदेवासारखे वावटळीने गिरक्या घेत घेत नाचावे आणि प्रत्येक घरातून काही ना काही पदरात पाडून घ्यावे. उठलेल्या धुरळ्यात बराच वेळ गाव हरवून जावे. कागदे, कचरा, पाचोळा वरवर आभाळात भिरभिरत रहावा. आणि मग तो वाऱ्याचा भला थोरला भोवरा दूर निघून गेला की कचरा उडून गेल्याने गाव कसे स्वच्छ स्वच्छ दिसू लागावे.!
आता उन्हे पार कलतीला जाउन संध्याकाळ होत आलेली असावी, कापडाचा चेंडू घेऊन आबाधोबी किंवा लिंगोरच्याचा डाव सुरु असावा आणि मग अचानक कुणाला तरी आकाशात बगळ्यांची माळ पुढे पुढे सरकताना दिसावी. मग "बगळ्या बगळ्या कवडी दे,धामणगावची नवरी ने. धामणगाव जळाला, बगळा उठून पळाला" असे म्हणत सगळ्यांनी बगळ्यांकडे पाहत हात जोरजोरात हलवत बसावे. नखांवर मग कुणाला एक तर कुणाला दोन पांढऱ्या ठिपक्यांच्या कवड्या मिळाव्यात. किती सुख किती आनंद होता या सगळ्यात...
आता पैसा, प्रतिष्ठा, प्रगती, प्रेम अशा कितीतरी घारी उडत असतात आकाशात, पण आजही कितीही पळाले तरी एकीच्याही सावलीवर धड पाय ठेवता येत नाही. गाव झाडून नेणाऱ्या वावटळी तर येतच नाहीत, अन आलीच तर उलटे भोवताली कचरा आणून टाकणारी वादळेच येतात. स्वप्नांचा धामणगाव जाळून पळणारे बगळे महिनाअखेरीस बँकेत कुणासाठी एक तर कुणासाठी दोन कवड्या ठेवून जातात, पण या कवड्या कवडीमोलच... त्यांना त्या नखावरल्या कवड्यांच्या नखाचीही सर नाही.

रविवार, १ डिसेंबर, २०१३

डिसेंबर महिना आणि रविवारची सकाळ..

एव्हना गाव कडाक्याच्या थंडीत पार गोठून गेलेले असते. आपण आपले सकाळी सकाळी उठावे, ब्लॅंकेट पांघरावे आणि अंगणातून उगवणारा मोठ्ठा लालतांबडा सूर्य पहावा. घराच्या छतावरून मग कोवळी पिवळीलाल ऊन्हे हळूहळू रानभर पांगताना बघावी. त्या उन्हात डोक्यावर सकाळीच भरलेल्या दुडी अन तीडीच्या उतरंडी घेऊन चाललेल्या लेकीबाळी अन आयाबायांचे चकाकणारे हंडे पहावेत. ऊन सगळ्या परिसरावरचे धुक्याचे पांघरूण काढून घेते, पण भरलेली नदी ऊन्हाचे ऐकत नाही. धुक्याची दुलई ती घट्ट धरून ठेवते. आणि मग छतावरून मला दिसते नदीच्या पात्रावर एक लांबच लांब पसरलेली वाकडी तिकडी धुक्याची पट्टी. पण ऊनही ईरेला पेटलेले असते. ते थोड्याच वेळात नदीवरचे धुक्याचे पांघरूण काढून घेतेच.
              मात्र नदीपेक्षाही ऊन्हाला अजिबात दाद न देणारे अजून कुणीतरी असते. ती असते डोंगराची सावलीकडची बाजू..!! ती पूर्ण धुक्यात वेढलेली असते. जसे जसे ऊन वर येते आणि डोंगराच्या किनारीवरून खाली खाली डोकावू लागते तशी तशी मग सावलीतल्या धुक्याची तारांबळ उडते. ते सावलीतल्या सावलीत लपून राहण्याचा प्रयत्न करते. पण मिडासचा स्पर्श होऊन कशाचेही सोने व्हावे तसे जिथे जिथे ऊन पोचेल तिथे तिथे पिवळे सोने पसरू लागते. अगदी कवायतीला जमलेल्या शाळेच्या पोरांसारखी ऊन आणि धुक्याची जिथे भेट होते तिथे अशी एक सरळ रेष डोंगर माथ्यावरून ते थेट जिथे सावली जमिनीला टेकते तिथपर्यंत दिसते. सगळ्यात आधी मग उंच उंच झाडांचे शेंडे धुक्याच्या वर येऊन डोकावू लागतात. ऊन अजून चढू लागते तसे धुके अजून खाली खाली जाते. मग जवळ जवळ सगळी झाडे दिसू लागतात. आणि मग तो स्वर्गीय नजारा दिसतो... ...जवळजवळ सगळ्या रानावर उन्हाचे सोने विखुरलेले असताना या झाडांच्या बुंध्यांत मात्र थोडे थोडे धुके तसेच कितीतरी वेळ गुरंफटून पडलेले असते. प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी धुक्याचे छोटेसे आळे तयार झालेले असते. तान्ह्या बाळाला लोकरीचे शुभ्र पायमोजे घालावेत ना अगदी तसे.. जाग आलेली असूनही स्वप्नातच असल्याचा अनुभव येतो ते पाहताना..!!
               आपल्या तोंडातून आता हवा बाहेर सोडली की धुरासारखी वाफ बाहेर निघते. मग उगीचच आपली सिगरेट चिमटीत असल्यासारखी दोन बोटे ओठांवर टेकवावीत आणि झोकात तो वाफेचा धूर बाहेर सोडत बसावे. थोड्यावेळाने कुणीतरी हाळ घालतो, मग आपण छतावरून निघून थेट नदी गाठावी. नदी वाफाळत असते. कपडे काढून कुडकुडत नदीच्या कडेला बसावे. गारठ्यामुळे पाण्यात उतरायची हिम्मत होत नाही. मग कितीतरी वेळ नुसते पाय बुडवून बसावे. मग अंगाला पार गार वारे बोचू लागले की अंग पाण्यात झोकून द्यावे. नदीचे पाणी थंड नव्हे तर गरम उबदार असते. भिजण्याआधी पाण्यात जावेसे वाटत नाही आणि एकदा पाण्यात गेलो की बाहेर निघावेसे वाटत नाही. कडक थंडीत नदीच्या उबदार पाण्यात डुंबत राहण्याइतके दुसरे सुख नाही.
थोड्या वेळाने बाहेर यावे अंग पुसून कपडे घालावेत आणि मग गवतातून परत गावाकडे चालत निघावे. गुडघ्यापर्यंत वाढलेले गवत दवाने डवरून गेलेले असते. गावात पोचेतो गुडघ्यांपर्यंत पाय पार भिजून गेलेले असतात. पायाची बोटे एवढी गारठून जातात की त्यांना स्पर्श केलेला देखील जाणवत नाही. तसेच बांधावरल्या वाटेने चालत गावात पोचावे आणि मग कुणाच्यातरी शेकोटीभोवतीच्या कडबोळ्यात सामील व्हावे..
           ....गावच्या शेकोटीच्या त्या शेकाची आणि नदीच्या पहाटेच्या वाफाळत्या पाण्याची ती ऊब आता इथे मुंबईत फक्त एकाच गोष्टीला येते... गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंना..

सोमवार, १७ जून, २०१३

नदी

मुसळधार पाऊस होतो सुरु.
माती दरवळून जाते.. नव्या नवरीसारखी लाजून ओलीचिंब होते..
कोवळे हिरवे अंकुर धुमाऱ्यांसारखे फुटू लागतात कणाकणांतून..
कुणी जीवाभावाचे भेटल्यावर असंख्य आठवणी उमलून याव्यात तसे
कित्येक प्राणी, पक्षी, कीटक बाहेर येउन बागडू लागतात..
रात्रभर संसद भरलेली असते बेडकांची.
डोंगर टेकड्यांना पाझर फुटतात...
काळ्या डोंगरांवर झऱ्यांच्या पांढऱ्या रेघा दिसू लागतात.....

सखारामचे भाताचे रोप तरारून आलेले असते..
गजाबा सांगत असतो नातवंडांना चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या मोठ्ठ्या पुराची कहाणी..
कोथळ्याकडची पेरणी झाली का रे दादा? असे येणाऱ्या जाणाऱ्यास विचारून
लक्ष्मीबाई घेत असते माहेरचे क्षेम...
अगं गोवरी घाल ना चुलीत किती धूर झालाय? म्हणून दारकाबाई सुनेवर ओरडत असते..
अशात एक दिवस महादू जाता जाता हाळ घालतो..
नदी आलेय शिसवदपर्यंत.. दुपारपर्यंत येईल आपल्या पासानदहाडात..!!
(पासानदहाड हा आमच्या इथला नदीचा मोठा डोह)

आम्ही मग कशीबशी न्याहारी उरकून सुटायचे नदीकडे पळत...
जमेल तेवढे अधिक पश्चिमेकडे.
बऱ्याच वेळाने मग प्रचंड आवाज येऊ लागायचा..
आधी गुरगुरणाऱ्या वाघासारखा आणि मग ढगांच्या गडगडाटासारखा..!!!
आम्ही मग "बा-अदब बा-मुलाहिजा होशियार" व्हायचो..!!!
आणि मग वरचा काठवट नावाचा डोह भरून गढूळलेल्या पाण्याचा एक प्रचंड लोट लोळण घेत, रोरावत उतरायचा पासानदहाडात....

आधी वाळू, मग मोठे दगड आणि मग खडक एकापाठोपाठ एक गुडूप व्हायचे पाण्यात…
हळूहळू पासानदहाड भरू लागायचे. वरून वाहून आणलेले मोठमोठे ओंडके, फांद्या घेऊन बाणाच्या टोकासारखे मध्ये गढूळ पाणी आणि बाजूने जुने नितळ पाणी असा तो लवाजमा पुढे सरकायचा..
आम्ही नदीच्या काठावरून सुसाट पळत जायचो त्या प्रवाहाबरोबर शर्यत लावत...
हळूहळू सगळे पासानदहाड गढूळ होऊन जायचे, आणि मग काठोकाठ भरल्यावर पुन्हा ढोलताशे वाजवीत पाणी पुढच्या जाखुबाईच्या डोहात उडी घ्यायचे...
आठ महिने सासुरवास सोसून माहेरास निघालेल्या सवाष्णीसारखी आनंदी आणि उत्साही भासायची तेव्हा मुळा..
बराच वेळ ते वाहत जाणारे तांबडे पाणी पाहत बसल्यावर मग आम्ही गावात येणार आणि "नदी निघून गेली रे" असा गावभर डंका पिटून टाकणार...
...
...काल फोनवर कळले यंदाची नदी निघून गेल्याचे........
.... खरेच खूप दूर निघून गेली आहे नदी. नाही का?

शुक्रवार, १७ डिसेंबर, २०१०

एक हरवलेली आठवण..

आठवणी.. काही बऱ्या, काही वाईट, थोड्या ओल्या, थोड्या कोरड्या.. बऱ्याचदा अवखळ.. बऱ्याचदा स्थितप्रज्ञ.. काही वारंवार सापडणाऱ्या, काही वारंवार हरवणाऱ्या.. शब्दांनी बांधलेल्या, शब्दांनी तुटलेल्या तर काही नुसत्याच मुक्या अबोल भावनांत गोठलेल्या..!! एक अशीच हरवलेली आठवण शोधतोय.. स्मृतीपटलावर कुठेशी ऊन्हे झेलीत, वादळे सोशीत, असेल तग धरून अजुनही..कदाचित..!! काही भेटी, काही प्रसंग, काही माणसे असतात ना अशीच अस्पष्ट, धूसर, फिकट..!! एखादी मैफल.. एखादा सिनेमा.. त्यातले एखादे पात्र, एखादा प्रसंग, एखादा संवाद.. एखादा सूर.. अचानक आठवेनासा होतो.. ती अनुभूती आठवते पण त्याचा साक्षात्कार होत नाही.. म्हणजे बर्फाखालून पाणी वाहते आहे एवढेच कळावे, पाण्याचा स्पर्श मात्र होऊ नये असेच काहीसे.. एखादे खूप आवडते इतरांदा सहज ओठावर येणारे गाणे कधी कधी आजिबात आठवत नाही.. रात्री अमाप सुखावणारे वा दुखावणारे स्वप्न सकाळी थोडेही स्मरत नाही.. फक्त एक अनुभूती उरलेली असते त्या प्रसंगांदरम्यानच्या भावनांच्या उत्कटतेची.. तीही अस्पष्ट, पुसटशी.. मात्र प्रचंड बेचैन करून जातो यातला प्रत्येक अनुभव..!!
स्मृती एक अजोड वरदान आहे.. आणि विस्मृतीही..!! सुखकर स्मृतींच्या वारंवारीतेने जसे सुख मिळते तसेच दु:खद गोष्टींच्या विस्मृतींनी दु:ख हरते. म्हणूनच स्मृती आणि विस्मृती ही दोन्ही दैवी वरदाने आहेत.. पण सुख आठवावे आणि दुःख विसरावे एवढे सरळ साधे असेल तर ते मानवी मन कसले.!! हे मन मोठे विलक्षण आहे. ते दु:खद स्मृती सहजतेने विसरत नाही आणि आणि कित्येकदा सुखद स्मृती उगीच हरवून टाकते.. जे नकोसे त्यास जपून ठेवते आणि हवे हवेसे त्यास लपवून टाकते.. या मनाच्या स्मृती-विस्मृतींच्या खेळात फक्त रंगमंचासारखा प्रवेश आणि निकास एवढेच नसते.. या दोन्ही स्थितींच्या मध्येही एक स्थिती असते, अस्पष्ट आठवणींची.. अर्ध्या-मुर्ध्या विरलेल्या सुरावटींची.. फिकट पडलेल्या रंगांची, ढगाआड दडलेल्या सूर्याची.!! म्हणजे तिथे असलेल्या त्या स्मृतीची जाणीव असते, फक्त तिचे प्रारूप स्पष्ट होत नाही..
आठवतं तुला? असं म्हणून जेव्हा तू आपले जुने ते काही उलगडत जातेस ना तेव्हा मी पुन्हा कुठेतरी हरवत असतो.. तू मांडलेली असतेस एक जुनी संध्याकाळ उघडून समोर.. आणि माझे विश्व फक्त श्रुतींमय झालेले असते.. अजूनही तुझा स्वर तसाच कापरा होतो तेव्हाच्या दिवसांबद्दल बोलताना.. आणि आताही मी अंतर्मनात तसाच झंकारत असतो.. तुला ऐकताना कधी माझे मी पण अस्तित्वात नसतेच.. आणि नव्हतेही.. माझ्या तमाम जाणीवा फक्त श्रुतींत एकवटलेल्या असतात.. एखाद्या अनोळख्या भाषेतली सुंदर स्वर्गीय मेलडी मंत्रमुग्ध होऊन ऐकत रहावी तसेच.! तसा तुझा शब्द न शब्द पाझरलेला असतो कणाकणात.. मात्र त्याला अर्था-अनार्थांची मोजमापे लावली जात नाहीत.. फक्त एक अनुभूती.. एक गोड हुरहुरती जाणीव भरून राहते आसमंतात.. महिन्याभरातून कधीतरी पौर्णिमेच्या चंद्रासारखी तू भरून आलेली असतेस.. आणि मग मी फक्त त्या चांदण्यात न्हाऊन घेतो.. कित्येकदा हुंकारूनही मला प्रतिसाद द्यावासा वाटत नाही.. टिपेस लागलेल्या सुराला टाळी वाजवून दाद दिली तर रसभंग होतो ना तसेच काहीसे.. तुला हे पटत नाही.. आणि मग.. माझ्या अबोल्यास दुर्लक्ष समजून तू किती अबोल होतेस..
काल पहिल्या भेटीची आठवण काढलीस.. आणि विचारलेस शंभर प्रश्न मला निरुत्तर ठेवणारे.. त्या क्षणांचे हिशेब मांडून मी ते कधीच नोंदवून ठेवले नव्हते.. म्हणूनच पहिली, दुसरी आणि त्या तमाम भेटी मला एकसारख्याच वाटतात आजतागायत.. पण तुला प्रत्येक भेटीतला एकूण एक बारकावा मला आठवायला हवा असतो.. म्हणूनच आज म्हंटले.. मनाच्या तावदानावरचे धुके पुसून पहावे पलीकडचे काही दिसते का ते.. ही जाणीव आता नवी आहे.. अनुभूतींच्या पलीकडले काही आठवावेसे वाटेल असे कधीच वाटले नव्हते आजपर्यंत.. पण आता ते वाटते आहे..!तेव्हा पहिल्या भेटीत तू आधी बोललीस की मी? तुला मी ऐकविलेला पहिला शब्द कोणता होता? तू अनोळख्यासारखी बोलत होतीस की मीच जन्मांतरीची ओळख असल्यासारखे ऐकत होतो? एक भावनांच्या उत्कटतेची पातळी वगळली तर जगातल्या तमाम पहिल्या भेटींपेक्षा काय वेगळे घडले होते? आजही जेव्हा कधी आपण निवांतसे बसलेलो असतो तेव्हा जानविणारी घट्ट ओढ पहिल्या भेटीतही तेवढीच होती का? आज एकमेकांचे अनेक पैलू उलगडल्यावर जो विश्वास, जी दृढता जाणवते नात्यातली, त्यातली कितीशी तेव्हा जाणवली होती? हे सगळे तुला तरी आठवते का? एक फरक मात्र आहे पहिल्या अणि तद्नंतरच्या तमाम भेटींत.. पहिल्या भेटीत पूर्वीची कोणतीही आठवण नव्हती.. एवढे वगळता बाकी काय बदललेले होते? तू भरविलेला पहिला घास मी कितीवेळा चावला हे लक्षात ठेवले असते तर त्याचा आनंद पुरेसा कसा मिळाला असता? तुझ्या चेहऱ्यावरचे पहिले हसू आणि डोळ्यांतला पहिला आसू.. सगळ्या ब्रम्हांडातही साठवता येणार नाही एवढे विशाल आणि एवढे खोल होते.. मग ते सर्व स्मृतींत कसे साठवून ठेवता येतील? आणि तुझा आग्रहच असेल तर चल आज निवांत समुद्रकिनारी जाऊ दोघेच.. पुन्हा मावळत्या सूर्याच्या साथीने.. अगदी खात्रीने सांगतो.. आज जे काही घडेल ना.. त्याहून काहीही वेगळे घडलेले नसेल तेव्हाही..!! आणि खरेच विचारशील ना मला तर आजही माझ्या क्षमता त्या सगळ्या भावनांना यथावत साठवून नाहीच ठेवू शकणार..!!