हा ब्लॉग शोधा

रविवार, १ डिसेंबर, २०१३

डिसेंबर महिना आणि रविवारची सकाळ..

एव्हना गाव कडाक्याच्या थंडीत पार गोठून गेलेले असते. आपण आपले सकाळी सकाळी उठावे, ब्लॅंकेट पांघरावे आणि अंगणातून उगवणारा मोठ्ठा लालतांबडा सूर्य पहावा. घराच्या छतावरून मग कोवळी पिवळीलाल ऊन्हे हळूहळू रानभर पांगताना बघावी. त्या उन्हात डोक्यावर सकाळीच भरलेल्या दुडी अन तीडीच्या उतरंडी घेऊन चाललेल्या लेकीबाळी अन आयाबायांचे चकाकणारे हंडे पहावेत. ऊन सगळ्या परिसरावरचे धुक्याचे पांघरूण काढून घेते, पण भरलेली नदी ऊन्हाचे ऐकत नाही. धुक्याची दुलई ती घट्ट धरून ठेवते. आणि मग छतावरून मला दिसते नदीच्या पात्रावर एक लांबच लांब पसरलेली वाकडी तिकडी धुक्याची पट्टी. पण ऊनही ईरेला पेटलेले असते. ते थोड्याच वेळात नदीवरचे धुक्याचे पांघरूण काढून घेतेच.
              मात्र नदीपेक्षाही ऊन्हाला अजिबात दाद न देणारे अजून कुणीतरी असते. ती असते डोंगराची सावलीकडची बाजू..!! ती पूर्ण धुक्यात वेढलेली असते. जसे जसे ऊन वर येते आणि डोंगराच्या किनारीवरून खाली खाली डोकावू लागते तशी तशी मग सावलीतल्या धुक्याची तारांबळ उडते. ते सावलीतल्या सावलीत लपून राहण्याचा प्रयत्न करते. पण मिडासचा स्पर्श होऊन कशाचेही सोने व्हावे तसे जिथे जिथे ऊन पोचेल तिथे तिथे पिवळे सोने पसरू लागते. अगदी कवायतीला जमलेल्या शाळेच्या पोरांसारखी ऊन आणि धुक्याची जिथे भेट होते तिथे अशी एक सरळ रेष डोंगर माथ्यावरून ते थेट जिथे सावली जमिनीला टेकते तिथपर्यंत दिसते. सगळ्यात आधी मग उंच उंच झाडांचे शेंडे धुक्याच्या वर येऊन डोकावू लागतात. ऊन अजून चढू लागते तसे धुके अजून खाली खाली जाते. मग जवळ जवळ सगळी झाडे दिसू लागतात. आणि मग तो स्वर्गीय नजारा दिसतो... ...जवळजवळ सगळ्या रानावर उन्हाचे सोने विखुरलेले असताना या झाडांच्या बुंध्यांत मात्र थोडे थोडे धुके तसेच कितीतरी वेळ गुरंफटून पडलेले असते. प्रत्येक झाडाच्या बुंध्याशी धुक्याचे छोटेसे आळे तयार झालेले असते. तान्ह्या बाळाला लोकरीचे शुभ्र पायमोजे घालावेत ना अगदी तसे.. जाग आलेली असूनही स्वप्नातच असल्याचा अनुभव येतो ते पाहताना..!!
               आपल्या तोंडातून आता हवा बाहेर सोडली की धुरासारखी वाफ बाहेर निघते. मग उगीचच आपली सिगरेट चिमटीत असल्यासारखी दोन बोटे ओठांवर टेकवावीत आणि झोकात तो वाफेचा धूर बाहेर सोडत बसावे. थोड्यावेळाने कुणीतरी हाळ घालतो, मग आपण छतावरून निघून थेट नदी गाठावी. नदी वाफाळत असते. कपडे काढून कुडकुडत नदीच्या कडेला बसावे. गारठ्यामुळे पाण्यात उतरायची हिम्मत होत नाही. मग कितीतरी वेळ नुसते पाय बुडवून बसावे. मग अंगाला पार गार वारे बोचू लागले की अंग पाण्यात झोकून द्यावे. नदीचे पाणी थंड नव्हे तर गरम उबदार असते. भिजण्याआधी पाण्यात जावेसे वाटत नाही आणि एकदा पाण्यात गेलो की बाहेर निघावेसे वाटत नाही. कडक थंडीत नदीच्या उबदार पाण्यात डुंबत राहण्याइतके दुसरे सुख नाही.
थोड्या वेळाने बाहेर यावे अंग पुसून कपडे घालावेत आणि मग गवतातून परत गावाकडे चालत निघावे. गुडघ्यापर्यंत वाढलेले गवत दवाने डवरून गेलेले असते. गावात पोचेतो गुडघ्यांपर्यंत पाय पार भिजून गेलेले असतात. पायाची बोटे एवढी गारठून जातात की त्यांना स्पर्श केलेला देखील जाणवत नाही. तसेच बांधावरल्या वाटेने चालत गावात पोचावे आणि मग कुणाच्यातरी शेकोटीभोवतीच्या कडबोळ्यात सामील व्हावे..
           ....गावच्या शेकोटीच्या त्या शेकाची आणि नदीच्या पहाटेच्या वाफाळत्या पाण्याची ती ऊब आता इथे मुंबईत फक्त एकाच गोष्टीला येते... गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंना..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा