हा ब्लॉग शोधा

कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कथा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०२०

खुदाई

पार्श्वभूमी 
आजची संस्कृती जगबुडीमुळे नष्ट झाली, आजचे बहुतांश लोक नष्ट झाले. जे थोडे वाचले त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मुंबईतील उत्खननात फक्त शाहरुख खानचा बंगला जमिनीत बऱ्यापैकी अवस्थेत टिकून असलेला सापडतो आणि त्यात काही LED TV आणि शाहरुखच्या काही फिल्म्सच्या हार्ड डिस्क सुस्थितीत सापडतात. त्यांना इलेक्ट्रिसिटीचाही शोध लागलेला असल्याने ते लोक हे LED TV आणि हार्ड डिस्क वापरायला सहज शिकतात.
योगायोग म्हणजे शाहरुख खानच्या प्रसिद्ध फिल्म्सच्या कहाण्या जगबुडीतून वाचलेल्या लोकांद्वारे लोककथा म्हणून या नव्या सभ्यतेपर्यंत आधीच पोचल्या होत्या, ज्यात नंतर कुणी अधिक आदर्शवादी आणि दैवी भर टाकून या कथा लिखित रुपात आणल्याने त्यांना धर्मग्रंथांचा दर्जा मिळाला आणि त्यात आता त्याच फिल्म्सच्या LED वर बघता येतील अशा हार्ड डिस्क उत्खननात सापडण्याची भर पडली.

वर्ष 4040
उत्खननांत काही लांबच लांब पसरलेल्या लोखंडी समांतर पट्ट्या सापडल्या आहेत. अशाच पट्ट्या देशाच्या इतर विविध भागांत सापडल्या असून या पट्ट्या त्या काळात कोणत्यातरी धार्मिक परंपरेचा भाग असणार असा अंदाज आहे. बऱ्याच ठिकाणी या पट्ट्या खंडित झालेल्या आढळल्या असल्या तरी जुन्या संस्कृतीच्या उत्कर्ष काळात पूर्ण देशात आढळणाऱ्या या सर्व पट्ट्या एकमेकांशी जोडलेल्या असतील असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
समुद्रात आणि किनाऱ्यावर काही खूप उंच आणि अनेकमजली इमारतींचे अवशेष सापडले असून, मुंबई नावाची नगरी एकेकाळी याठिकाणी अस्तित्वात होती या अनेक पुराणमतवादी लोकांच्या विश्वासाला यामुळे बळ मिळाले आहे.
मुंबई असल्याचा दावा केला जाणाऱ्या उत्खनन क्षेत्राच्या सेक्टर 23-S या उत्खनन साईटवर ज्या अनेक आयताकार चपट्या वस्तू मिळाल्या होत्या त्यांस एक विशिष्ट इलेक्ट्रिक व्होल्टेज दिले असता त्यातून हलती चित्रे दिसत असल्याचे आणि सोबतच काही आवाज येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सुरुवातीला एखाद्या लिपिसारखे दिसणारे पॅटर्न सुद्धा या चपट्या वस्तूंवर उमटत असल्याचे आढळून आले असून उत्तर भारतात सापडलेल्या मेमरी कॅप्सूल मधील लिपी आणि या हलत्या चित्रांतील लिपी व आवाज यांचा संबंध असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळेच मेमरी कॅप्सूलची लिपी डिकोड करणाऱ्या तज्ञास हे अभ्यासण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

वर्ष 4060
उत्तर भारतातील मेमरी कॅप्सूलची लिपी आणि सेक्टर 23-S मध्ये मिळालेल्या चलचित्रातील लिपी ही थोडी वेगळी भासत असली तरी दोन्ही एकच असल्याचे सिद्ध झाले असून या चलचित्रांच्या सुरुवातीला येणारी लिपी ही उत्तर भारतातील कॅप्सूलशी तंतोतंत जुळत असल्याचे आढळले आहे. ही लिपी पूर्वीच डिकोड झाली असल्याने आपल्याला लिखित शब्दांचे अर्थ कळत नसले तरी आता लिहिलेले सगळे उच्चाराप्रमाणे वाचता येऊ लागले आहे. पूर्वी मौखिक स्वरूपात असलेल्या मात्र 3300 साली लिखित स्वरूपात आणलेल्या बॉली धर्माच्या अनेक धर्मग्रंथांतील कहाण्यांचेच ही चलचित्रे हे पुरावे किंवा संदर्भ असू शकतात असे या हलत्या चित्रांच्या मालिकेवरून अंदाजे बोलले जात आहे. ही चलचित्रे म्हणजे या धर्मग्रंथांचेच एक प्रगत तंत्रातील मुद्रणीकरण असावे असे मानण्यात येते आहे. या चलचित्रांतील सुरुवातीला दिसणाऱ्या लिपीत लिहिलेल्या अक्षरांत 'शाहरुख खान' हे शब्द आणि अशा प्रत्येक चलचित्रात दिसणारा एक कॉमन चेहरा असणाऱ्या माणसाचा काहीतरी संबंध असेल असे वाटते. हे बहुतेक त्या व्यक्तीचे नाव असून प्रथमदर्शनी तरी हा 'शाहरुख खान' हाच बॉली धर्मातील प्रमुख देवता 'शारकान' असल्याचे मानले जात आहे. मात्र देव वगैरे विज्ञानाच्या कसोटीवर खोटे ठरत असल्याने हा केवळ नामसाधर्म्याचा योगायोग आहे असे अनेक विचारवंतांचे म्हणणे आहे. त्या काळच्या लोकांकडे आपले धर्मग्रंथ असे उच्च तंत्रज्ञान वापरून चलचित्र स्वरूपात जतन करून ठेवण्याचे तंत्र असल्यामुळेच त्यांनी तुलनेने कनिष्ठ तंत्र असलेल्या लिखित स्वरूपात ते जतन केले नसावेत, आणि म्हणूनच आज त्याचे सन 3300 च्या आधीचे लिखित पुरावे सापडत नाहीत असे पुरातत्ववेत्यांचे म्हणणे आहे.

वर्ष 4080
सेक्टर 23-S मध्ये मिळालेल्या अनेक चपट्या इलेक्ट्रिक वस्तू या एक विशिष्ट व्होल्टेज देऊन अगदी इफिशियंटली चल स्वरूपात आणण्यात आता यश मिळाले आहे. पूर्वी यातील अस्पष्ट असणारा ऑडिओ आता स्पष्ट करून त्यातून मानवी आवाज आणि इन्स्ट्रुमेंटल आवाज सेपरेट करून ऐकण्यात यश मिळाले आहे. या ऑडीओ मधील जवळजवळ अर्धी भाषा आजच्या काही आदिवासी जमातींत प्रचलित असलेल्या 'हिंग्लिश' या भाषेशी मॅच होत असल्याचे आढळून आल्याने त्या काळातील अनेक रहस्यांचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
वर्ष 4100
शाहरुख खान असलेली आजपर्यंत 12 चलचित्र उपकरणे त्यातल्या त्यात बऱ्या स्थितीत सापडली असून यातील 4 ही दिलवाले दुल्हनिया ले जाएंगेची तर दोन दोन ही प्रत्येकी दिल तो पागल है आणि चक दे इंडिया या नावाची आहेत. बाकी चलचित्रांपैकी फक्त एकच थोडेफार चालत असून ते चलचित्र कुछ कुछ होता है या प्रसिद्ध धर्मग्रंथाचे असावे असा अंदाज आहे. बॉली धर्मातील याच नावांच्या चार ग्रंथांत शारकान देवतेचे जे राज, राहुल आणि कबीर नावाचे पुत्रअवतार सांगण्यात आले आहेत तेच पुत्रअवतार या चलचित्रांत प्रत्यक्ष दिसत असल्याचा दावा कट्टर बॉली उत्थान(KBU) संघटनेतर्फे करण्यात आला आहे.
दुसरे म्हणजे दिलवाले दुल्हनिया मधे सांगितलेली ज़्यूरीच, लंडन ही शहरे खरेचच तिकडे युरोपात झालेल्या उत्खननात सापडली असून यामुळे शारकान देवतेचा पुत्रअवतार असलेला 'राज' ही फक्त एक कविकल्पना आहे असे म्हणनारांना ही मोठी चपराक आहे असे KBU तर्फे बोलले जात आहे. KBU नुसार दूर युरोपात सापडलेली ही शहरे हा 'राज' आणि 'दिलवाले दुल्हनिया' या धर्मग्रंथांच्या सत्यतेचा पुरावा नाही तर अन्य काय असू शकेल? 'राज' आणि 'दिलवाले दुल्हनिया' हे सत्य नसते तर आदिग्रंथप्रेषित आदरणीय 'आदित्य चोप्रा' हे भारतात राहून त्या पुरातन काळात इतक्या दूर असलेल्या लंडन आणि ज्यूरिक बद्दल इतके तंतोतंत कसे काय सांगू शकले असते? दुसरे म्हणजे 'चक दे इंडिया' या धर्मग्रंथांत लिहिलेल्या आणि त्या चलचित्रातही दिसणाऱ्या हॉकी खेळाच्या खेळण्याची जी एक वैशिष्ट्यपूर्ण काठी आहे तशा अनेक काठ्या पंजाबातील एका उत्खननात आढळून आल्या आहेत. त्यामुळे हा देखील शारकान देवतेचा 'कबीर' नावाचा पुत्रअवतार खरेच होऊन गेल्याचा पुरावा आहे असा KBU चा दावा आहे.

वर्ष 4120
कट्टर बॉली उत्थान संघटनेच्या दबावाखाली सेक्टर 23-S चे अधिकृत नाव आता 'मुंबई' करण्यात आले असून मुंबईत जिथे शारकान देवतेची चलचित्रे सापडली होती ते स्थान पुरातत्व संग्रहालय म्हणून न राखता त्याचा "पवित्र शारकान पुजास्थल" म्हणून विकास होईल असे जाहीर करण्यात आले आहे. दहाच वर्षांपूर्वी चक दे इंडिया मध्ये असलेल्या खेळ मैदानासारखे एक चहुबाजूंनी पायऱ्या असलेले गोलाकार खेळ मैदान पंजाब येथे उत्खननात सापडले असून याने कबीर या पुत्रअवताराच्या सत्यतेवर शिक्कामोर्तब झाले आहे असे KBU तर्फे सांगण्यात येत आहे. KBU संघटनेने इतके ऐतिहासिक पुरावे मिळाले असूनही राज, राहुल आणि कबीर हे या पृथ्वीतलावर होऊन गेलेले खरेखुरे पुत्रअवतार नसून मनोरंजनासाठी बनविलेल्या कथांची काल्पनिक पात्रे आहेत असे म्हणणाऱ्या, आणि त्यांच्या अस्तित्वाचे वैज्ञानिक पुरावे मागणाऱ्या लिबटार्ड फुर्रोघामी लोकांवर कायदा बनवून बॉलीद्रोहाच्या गुन्ह्याखाली कठोरातील कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

वर्ष 4150
राज अवतारातील लंडन आणि ज्यूरिच अशी शहरे सापडणे, हॉकी खेळाच्या कित्येक काठ्या आणि मैदान सापडणे, DTPH च्या राहुल अवतारातील छोटी चांदीची मूर्ती सापडणे हे सगळे याच गोष्टीचे पुरावे आहेत की राज, राहुल आणि कबीर हे केवळ मनोरंजक कथांची काल्पनिक पात्रे नसून, ते या पृथ्वीतलावर एकेकाळी अस्तित्वात असलेले ते दैवी पुत्रअवतार होते ज्यांनी जगाला DDLJ मधून दोन पुरुष एक स्त्री, तर DTPH व KKHH मधून एक पुरुष दोन स्त्रिया यांच्यामध्ये कशाप्रकारे पवित्र प्रेम झाले पाहीजे आणि चक दे मधून स्त्रियांना लढायला लावून कशी विजयश्री मिळवली पाहीजे हा दिव्य संदेश जगाला दिला. DDLJ, DTPH, चक दे हे केवळ कथाग्रंथ नसून ते आमच्या उज्ज्वल इतिहासाचे खरेखुरे दस्तावेज आहेत. ते आमचा देव शारकान आणि त्याचे दैवी पुत्रअवतार खरे असल्याचे भक्कम पुरावे आहेत.
जे आजच्या विज्ञानालाही अजूनही बनवायला जमले नाही ती चलचित्रे त्या काळी कुठलेही तंत्रज्ञान नसताना बनविणाऱ्या आमच्या जुन्या प्रगतिशील संस्कृतीची थोडीही बरोबरी आजचा कोणताही प्रगत म्हंटला जाणारा समाज करू शकत नाही. स्वतः शारकान देवाची चलचित्र स्वरूपातील प्रतिमा आजच्या लोकांना स्वतःच्या डोळ्याने पाहता येणे याहून देवाची कोणती मोठी थोरवी असू शकते? जरी अनेक वैज्ञानिक लोक हे उत्खननात सापडलेले सामान फक्त तीन ते चार हजार वर्षे जुने आहे असे म्हणत असले तरी त्यावर आमचा विश्वास नाही. आमची ही संस्कृती निश्चितच २० हजार वर्षांहून अधिक जुनी आहे हेच खरे आहे. मौखिक लोककथांमधून लिखित स्वरूपात आलेले आमचे धर्मग्रंथ, त्यांचे मुंबईत सापडलेल्या चलचित्रांशी होणारे तंतोतंत मॅचिंग हा दैवी चमत्कार नाही तर अन्य काय आहे? शारकानचे अस्तित्व सत्य असण्याचा अजून काय पुरावा पाहीजे? आमची श्रद्धा अशाप्रकारे आजच्या तकलादू वैज्ञानिक तर्कांना पुरून उरली असून आमची संस्कृती ही कित्येक वर्षांपासून चालत आलेली जगातील सर्वात जुनी आणि म्हणूनच सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे हेच सिद्ध झाले आहे. सर्वशक्तिमान शारकान देव आणि त्याच्या पुत्रअवतारांचे सत्य अस्तित्व आज शतप्रतिशत सिद्ध झालेले आहे.
विश्वनिर्मात्या शारकान देवतेचा विजय असो, राज, राहुल, कबीर या अवतारी देवांचा विजय असो, त्यांस काल्पनिक कथांची पात्रे म्हणणाऱ्या लिबरांडू बुध्दीवाद्यांचा धिक्कार असो. जगातील सर्वश्रेष्ठ बॉली धर्माचा विजय असो. करोडो लोकांच्या श्रद्धेने विज्ञान नावाच्या थोतांडावर मिळविलेल्या विजयाचा विजय असो.



..

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

सर्वाधिपती

हिमालयाच्या डोंगररांगांतल्या निबीड अरण्यात एक निसर्गपूजक गणराज्य होते.! तिथला राजा राजमहालात नाही तर पर्णकुटीत राहत असे. तो लोकलज्जेस्तव आवश्यक तेवढीच वस्त्रे परिधान करत असे. त्याची राणीही अगदी त्याच्याचसारखी साधीसुधी राहणारी होती. दक्षिण हिमालयाकडील नागरी राज्यातील एका मोठ्या राजाची राजकन्या असूनही तिस कोणत्याही दागिन्याचा मोह नव्हता की साजशृंगाराची हौस नव्हती. ना राजमहाल ना राजदरबार. एका पठारावर एका मोठ्या सपाट पृष्ठभाग असलेल्या शिळेवर राजा आपल्या राणीसोबत बसे आणि समोरच्या माळावर मोकळ्या आभाळाखाली त्याचा दरबार भरे.! ती सपाट पृष्ठभागाची शिळा हेच त्याचे सिंहासन आणि तो मोकळा माळ हीच त्याची राजसभा.!! राजा आणि राणी अशा दोघांचीही आपापली अशी काही कार्यक्षेत्रे होती. त्यांचा कारभार ते दोघेही वैयक्तिकरीत्या पाहत असत. 
प्रामुख्याने दूर दक्षिणेकडील नद्यांच्या खोऱ्यांतील नागरी राज्यांमधून विविधोपयोगी कार्यांसाठी खूप मागणी असलेल्या हिमालयातील अतिशय दुर्मिळ वनस्पती, फलवृक्ष, पक्षी, पशु यांचे योग्य संवर्धन करून त्यांचे विविध प्रभागांत सुयोग्य असे प्रमाण राखणे हे राजाच्या जमातीचे मुख्य काम होते. पशु, पक्षी, वनस्पती, मानव अशा सर्वांची मोजणी करून नोंदी ठेवणे, विशिष्ट प्रमाणात हे वृक्ष व त्यांची उत्पादने, व विविध पशु पक्षी यांचा दक्षिणेतील मानवांच्या उपयोगासाठी पुरवठा करणे, एखादी पशु जमात वा एखादी वनस्पती एका विभागात प्रमाणाहून अधिक वाढली की ती जमात इतर प्रजातींस मारक ठरत असते अशा प्रजातींचे स्थलांतर अथवा क्षालन करून प्राकृतिक समतोल कायम ठेवणे, प्रमाण कमी होत चाललेल्या प्रजातीसाठी संवर्धन योजना राबविणे हे त्यांचे पारंपरिक काम होते.
ही कामे माणसांचे वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळे गट बनवून विभागून देण्यात आलेली होती. या गटांना गण असे म्हणत. व्याघ्र गण वाघांचे नियोजन करी, सुरुची गण सुरुची वृक्षांचे, मेष गण मेष पशूंचे, वृषभ गण बैलांचे, हस्ती गण हत्तींचे नियोजन करत असे. सर्व गणांची आपापली प्रतिकचिन्हे होती. दोन शिंगांचा मुकुट हे वृषभ गणाचे प्रतीकचिन्ह होते तर मयूरपंखाचा शिरपेच हे मयूर गणाचे प्रतीकचिन्ह होते. अशाप्रकारे राज्यात विविध भागांत जिथे संबंधित प्रजातींचे नैसर्गिक वास्तव्य अधिक असेल त्या त्या विभागात गण प्रमुखांद्वारे पाच ते दशसहस्त्र स्त्री पुरुष गण सहकाऱ्यांच्या मदतीने सदर प्रजातीशी संबंधित कार्यभाग पार पडत असे. या सर्व गणांचे प्रमुख दर सहा महीन्यांनी राजापुढे येऊन कारभाराचा सर्व वृत्तांत सादर करीत व काही समस्या असल्यास राजाकडून त्याचे समाधान प्राप्त करीत. शेतीसाठी बैलांची, व काही धार्मिक विधींसाठी मयूरपंखांची मागणी नदी खोऱ्यांतील राज्यांतून सर्वात अधिक असल्याने वृषभ व मयूर गणाचे प्रस्थ राज्यात खूप मोठे होते. आणि वृषभ व मयूर गणाचे प्रमुख म्हणूनच नेहमी राजासमवेतच राहत असत. किंबहुना राजाचा एकमेव पुत्र हाच मयूर गणाचा प्रमुख होता.
जसा सजीव प्रजातींचा कारभार राजा बघत असे तसा विविध, धान्ये, खनिजे, मृदा, मीठ, घडीव पाषाण, धातू इत्यादी वस्तूंचे नियोजन राणी करत असे. या सर्व वस्तुंच्याही नियोजनासाठी विविध गणांचे विभाग निर्माण करण्यात आले होते, व या विभागांच्या नियोजनाचे काम हे स्त्री गणप्रमुखा पाहत असत. या स्त्री गणप्रमुखादेखील दर सहा महिन्यांनी येऊन राणीपुढे आपल्या कारभाराचा वृत्तांत सादर करत असत.
सहसा राजा राणी असा दोहोंचाही कारभार विनाव्यत्यय सुरळीतपणे चालत असे, मात्र कधी कधी उत्तर पश्चिमेकडून अश्व नावाच्या अनोळखी आणि वेगवान प्राण्यांवर आरूढ होऊन येणारे काही आक्रमक, कधीकधी उत्तर पूर्वेकडून हल्ले करणारे गोल चेहऱ्याचे गौरवर्णीय हल्लेखोर तर कधी कधी दक्षिणेकडील नद्यांच्या राज्यांतील काही विद्रोही उपद्रव देत असत. अशा वेळी मग राजा वृषभ व मयूर गणप्रमुखांच्या मदतीने युद्धकारवाई करून त्यांचे उपद्रव मोडून काढत असे.
अशाच एका वेळी सर्व स्त्री गणप्रमुखा सहा महिन्यांचा वृत्तांत सादरीकरणासाठी राणीकडे आल्या होत्या. त्याचवेळी उत्तर पश्चिमेकडून हिमालय गणराज्यावर अश्ववाहनी आक्रमकांनी मोठा हल्ला केलेला होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी राजा दोन आठवड्यांपूर्वी स्वतः सैन्य घेऊन गेलेला होता. राणीच्या अर्धवार्षिक सभेच्या दिवशी राणीचा दरबारी कारभार संपल्यावर तिने नेहमीप्रमाणे इतर गणप्रमुखांना आपापल्या प्रांतात जाण्यासाठी निरोप देऊन, काहीसे दूरवरून येणाऱ्या आणि राणीची जवळची मैत्रीण असलेल्या मलत्वनी (आजचा उच्चार मुलतानी) मृदेच्या गणप्रमुखेस दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कुटीविहारात भेटीस बोलावले. या मलत्वनी मृदेच्याच भूभागात अश्ववाहनी आक्रमकांनी हल्ला केलेला होता. आणि राजा त्यांच्या बंदोबस्तासाठी त्याच प्रांतात गेला होता. मलत्वनी मृदेत खूप औषधी गुणधर्म होते. त्या मृदेच्या लेपाने अनेक त्वचाविकार तर बरे होतच असत, पण त्वचाही अतिशय मऊशार व तेजस्वी बनत असे. मलत्वनी गणप्रमुखा 'मला' ही नेहमी येताना राणीसाठी सोबत ती मृदा घेऊन येत असे व राणीच्या पूर्ण अंगाला तिचा लेप लावून मृत्तिकोपचार करून देत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी आपल्या कुटीत 'मला'ची वाट पाहत होती पण ठरलेली वेळ निघून गेली तरीही 'मला' आली नाही. राणी मग थोडा वेळ अजून वाट पाहून स्वतःच गणप्रमुखांसाठी असलेल्या कुटीविहाराकडे 'मला'च्या चौकशीसाठी गेली. राणी मलत्वनी गणप्रमुखेच्या कुटीत गेली तेव्हा 'मला' एकटीच उदासपणे बसलेली होती. राणी तिच्याजवळ बसली व तिस उदास होण्याचे कारण विचारले. 'मला'ने जवळच बांधलेल्या झोळीकडे निर्देश केला. झोळीमध्ये एक बालक झोपलेले होते. 'मला'ने राणीस सांगितले की महिन्याभरापूर्वी झालेल्या अश्ववाहनी आक्रमकांच्या हल्ल्यात तिचा पती मारला गेला होता. अश्ववाहनी आक्रमक कधीही हल्ला करून समोर येतील त्या सर्वांचा शिरच्छेद करत असत. अशा हल्ल्यांच्या वेळी पतीसोबत असताना 'मला' सुरक्षित जागी पलायन करू शकत असे, मात्र आता पती नसताना आपल्या पुत्रासह असे करणे तिस शक्य नव्हते. म्हणून आपल्या मुलाच्या काळजीने ती अत्यंत दुःखात होती. यावर राणीने सांगितले की तू काहीही काळजी न करता तुझ्या बालकास माझ्या स्वाधीन कर. मी तुझ्या बालकास माझा पुत्र म्हणून दत्तक घेते आणि त्याला माझ्या पहील्या पुत्राप्रमाणेच माझ्या काळजाच्या तुकड्यासारखी सांभाळेल असे वचन देते. इथे वृषभ गणाचे मोठे वास्तव्य असल्याने त्यास या बालवयातही दूधदुभत्याचीही काही समस्या येणार नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. इतकेच नाही तर पुढे तोही माझ्या थोरल्या पुत्राप्रमाणे पराक्रमी वीर होईल असे संगोपन आणि उच्च प्रतीचे शिक्षण त्यास मिळावे याचीही मी व्यवस्था करेन. राणीने असे म्हंटल्यावर 'मला'च्या मनावरचे दुःख हलके झाले. ती आपल्या पुत्रास राणीकडे सोपविण्यास त्यायार झाली. राणी लगेच 'मला' आणि तिच्या पुत्रास घेऊन आपल्या झोपडीकडे परत आली. झोपडीत ते बालक छान इकडे तिकडे रांगत मजेने खेळू लागले. बाहेर ओसरीवर मयूर पक्षांशी खेळण्यात रमू लागले. आपल्या मुलास इथे करमेल याची खात्री पटून मग 'मला' चांगली आनंदी झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 'मला'ने राणीच्या अंगास तिने आणलेल्या मलत्वनी मृदेचा लेप लावून मृत्तिकोपचार सुरु केले. पहील्या प्रहरी राणीच्या अंगावर मृत्तिका लावून मग आपल्या बाळाचा निरोप घेऊन ती मलत्वन प्रांतात जाण्यास निघाली. मृत्तिकोपचारात अंगावर मलत्वनी मृत्तिकेचा लेप लावल्यानंतर दोन प्रहर होईपर्यंत तो तसाच ठेवावा लागत असे, तदनंतर तो लेप अंगावरून तुपाच्या साहाय्याने काढून टाकून मग आंघोळ करावयाची असे. 'मला' गेल्यावर मग राणी आपल्या झोपडीत स्नानगृहाजवळ तशाच अवस्थेत बसून राहिली. बाळ तिथेच ओसरीवर व बाहेरच्या भागात इकडे तिकडे रांगत खेळत होते. राणीचे बाळाकडे लक्ष होतेच, पण एकाच अवस्थेत खूप वेळ बसून राहिल्याने तिला कधी झोप लागली तेच कळले नाही.
तिकडे उत्तर पश्चिमेकडील अश्ववाहनी आक्रमकांचा मोठा बिमोड करून राजा परत आला. कुटीविहारात राजाची कुटी आणि राणीची कुटी यांची सामायिक ओसरी होती. ओसरीत आल्यावर त्याने पाहीले की राणी कुठे दिसत नाही. युद्ध मोहिमेनंतर रात्रभर वृषभवाहनांत प्रवास करून आल्यावर तोही दमला होता. त्यामुळे राणीस आत जाऊन न शोधता त्याने घाईघाईने त्याची शस्त्रे शस्त्रागारात ठेवण्याऐवजी तिथेच ओसरीत भिंतीला टेकवून ठेवली आणि तो त्याच्या कुटीत स्नानासाठी गेला. तो आपल्या कुटीत पोचला आणि स्नानासाठी पाणी तयार करून तो स्नानास बसणार तोच त्याला बाहेर ओसरीवरून आपले एक शस्त्र खाली पडल्याचा आवाज आला. आपण शस्त्रागारात शस्त्र ठेवण्यास विसरलो हे त्याच्या लक्षात आले आणि लगोलग तो शस्त्रे शस्त्रागारात ठेवून देण्यासाठी स्नान सुरु न करताच ओसरीकडे आला.
ओसरीवर येऊन बघतो तर काय.!! ते खाली पडलेले शस्त्र एका बालकाच्या मानेवर पडून त्या बालकाची मान धडावेगळी झाली होती व ते बालक रक्ताच्या थारोळ्यात तिथे मृत्युमुखी पडले होते. राजाने घाईघाईत केलेली एक साधी चूक त्या बालकाच्या जीवावर बेतली होती. शस्त्रागार जवळच असल्याने त्याच वेळी तिथे वृषभ आणि मयूर गणप्रमुखही आपली शस्त्रे ठेवण्यासाठी येऊन पोचले. त्या मृत बालकाचा देह त्यांनीही पाहिला. ते बालक रांगत रांगत त्या शस्त्रांजवळ गेले असणार आणि ती ओसरीला टेकवून ठेवलेली शस्त्रे पकडण्याच्या नादात एक शस्त्र नेमके त्याच्या अंगावर पडले असणार हे स्पष्ट दिसत होते. हे बालक कुणाचे आहे आणि आपल्या ओसरीत कसे आले हे राजास कळेना. तेवढ्यात शेजारच्या झोपडीतून वृषभ गणप्रमुखाची पत्नी बाहेर आली. तिने सांगितले की राणी 'मला'च्या मृत्तिकोपचारानुसार अंगावर मृत्तिकेचा लेप लावून बसलेली असून थोड्यावेळाने ती अंगावरून ती माती काढून आंघोळ करून तयार होऊन मगच आपल्या पुत्रास घेण्यासाठी बाहेर येईल. हा 'मला'चा पुत्र असून या बालकास राणीने त्याच्या जीवनाच्या रक्षणासाठी कालच दत्तक घेतले आहे. त्यामुळे मयत बालक हा राजाचा स्वतःचाच पुत्र आहे. राजा हे ऐकून अत्यंत चिंतातुर झाला. राणीने त्या बालकाच्या जीवित रक्षणाची हमी देऊन त्यास दत्तक घेतले होते आणि अपघाताने का होईना पण आईपासून दूर झाल्यानंतर काही क्षणांतच त्या बालकाचा मृत्यू ओढवला होता. ही बाब राणीच्या आणि पर्यायाने राजाच्याही वचनबद्धतेस आणि विश्वासार्हतेस कमीपणा आणणारी होती. राणी जेव्हा स्नानगृहातून बाहेर येईल तेव्हा तिला हे कळल्यास ती प्रचंड क्रोधीत होईल आणि मग क्रोधात ती कोणतेही पाऊल उचलू शकेल हे राजाला चांगले ठाऊक होते. अंगावर माती लावलेल्या राणीला बाहेर येण्यास अजून दीडेक प्रहर समय होता. ती बाहेर यायच्या आत काहीतरी केले पाहीजे हे त्याने ठरविले. मग त्याने तात्काळ 'मला'च्या पुत्राचा देह पुरण्याची व्यवस्था केली आणि वृषभ गणाच्या प्रमुखास सांगितले की त्वरीत आपल्या गणांतील सर्वात चपळ आणि हुशार गणांची एक तुकडी दक्षिणेस रवाना कर व समोर ज्यांची वस्ती भेटेल अशा कोणत्याही गणांतून जिथे एक सहा सात महिन्यांचे अनाथ बालक सर्वप्रथम मिळेल ते त्वरीत घेऊन या. हे काम राणी स्नानगृहातून बाहेर येण्याच्या आधी झाले पाहिजे अशी त्याने ताकीद दिली. आपण तेच बालक राणीने दत्तक घेतलेला 'मला'चा पुत्र म्हणून इथे वाढवू असे त्याने सांगितले. पाच सहा महिन्यांची सगळीच बालके समान दिसत असतात. त्यामुळे बालक बदलले गेले आहे हे राणीस आणि सहा महीन्यांनी येणाऱ्या 'मला'स देखील कळणार नाही हे राजास ठाऊक होते. त्यामुळे राणीवर वचनभंगाचे लांछन येणार नाही आणि ती क्रोधीत होऊन काही नुकसानदायी कृत्य करणार नाही यासाठी ही युक्ती करण्याचे त्याने ठरवले. राजाने उपस्थित सर्वांकडून राणीपुढे याची कुणीही वाच्यता करणार नाही याचे वचन घेतले. आणि मग क्षणाचाही विलंब न करता आपल्या सर्वोत्तम गणांची एक तुकडी घेऊन वृषभ गणप्रमुख दक्षिणेकडे निघाला.
जवळजवळ एक प्रहर उलटून गेल्यावर वृषभ गणप्रमुख आणि त्याची तुकडी एका बालकास घेऊन परत आले. हे बालक शरीरयष्टी आणि चेहऱ्याने अगदी त्या मृत बालकासारखेच दिसत होते. तिथे आणल्यावर त्या बालकास त्वरित मृत बालकाप्रमाणेच वस्त्रे आणि तसेच अलंकार परिधान करविण्यात आले आणि मग त्यास परत ओसरीवर खेळण्यासाठी सोडून दिले. वृषभ गणप्रमुखाने सांगितले की दूर दक्षिणेकडील हत्तीवनात हस्तीगणाचा प्रमुख दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या अश्ववाहनी आक्रमकांविरुद्ध केलेल्या मोहीमेदरम्यान मृत्युमुखी पावला होता. त्याचे हे बालक असून या बालकाच्या मातेचे प्रसूतीसमयीच निधन झाले होते. हस्ती गणप्रमुखाची बहीण त्याचा सांभाळ करत होती, तिने आनंदाने त्या बालकास वृषभ गणप्रमुखाच्या हवाली केले.
राणी बाहेर आल्यावर तिने आपल्याला परत एकदा पालकत्वाचे सुख दिले या आनंदाप्रीत्यर्थ राजाने त्या बालकास त्याच समयी या शिशुवयातच हस्ती गणाचा प्रमुख म्हणून घोषित केले. व हस्तीगणाचे चिन्ह असलेली चामड्याची बनवलेली छोटी हत्तीची सोंड हारात गुंफून त्याच्या गळ्यात घातली. त्या बालकाचा पुढे दोघा राजा राणींनी आपल्या थोरल्या मुलापेक्षा अधिक लाडाने सांभाळ केला. ते बालक अतिशय बुद्धिमान आणि पराक्रमी म्हणून लौकिकास पावले आणि मोठे झाल्यावर आपली हुशारी आणि पराक्रमाच्या जोरावर गणराज्यातील सर्व गणप्रमुखांचा पहीला नेता बनले. यापूर्वी सर्व गणप्रमुखांचा मिळून असा कोणीही अधिपती नव्हता. राजा आणि राणी या दोहोंच्या अधिकारात असलेल्या सर्व गणांचे अधिपत्य त्याला मिळाले आणि मग तो 'मला'चा पुत्र, हत्तीगणाचा प्रमुख बालक सर्व गणांचा सर्वाधिपती म्हणजेच गणपती म्हणून प्रसिद्ध झाला.

सोमवार, २३ एप्रिल, २०१८

राजूरचा जावजी बांबळे

इतिहास म्हंटले की आपल्या डोळ्यांसमोर नेहमी शिवाजी, बाजीराव, राणा प्रताप, अकबर, औरंगजेब, इंग्रज, गांधी, नेहरू हेच लोक येत असतात. मोठ्या देशपातळीवर प्रभाव टाकणाऱ्या अशा मोजक्या लोकांची माहिती म्हणजेच आपला इतिहास असे आपण समजतो. मग आपल्या अवतीभोवतीच्या परीसरात, आपल्या गाव तालुक्यात वा अगदी जिल्ह्यात कुणी महान पराक्रमी माणसे होऊन गेली नाहीत का? देश आणि राज्याचा इतिहास ठेवा बाजूला, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला काही इतिहास नाही का? इथे कुणी शून्यातून राज्य निर्माण केले नाही का? शिवाजी राजांनी पराक्रमाने बलाढ्य सत्तेला शह देऊन नवे राज्य निर्मिले, पण तितक्याच पराक्रमाने तितक्याच बलाढ्य शक्तीशी लढलेला कुणी वीर आपल्या परीसरात नव्हता का? शिवाजी महाराज नसोत पण आपल्या गावातून किंवा पंचक्रोशीतून कुणी बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे हे निर्माण झालेच नाहीत का? असे तर नसणार. प्रत्येक गावाला, किंवा किमान एका प्रांताला तरी नक्कीच पराक्रमांचा मोठा इतिहास असणार, कुणी ना कुणी महान पराक्रमी वीर अथवा वीरांगना आपल्याही आजूबाजूस पूर्वी कधीतरी निर्माण झालेच असणार. फक्त त्यांचे प्रभावक्षेत्र छोटे असल्याने त्यांच्या कहाण्यांची नोंद ठेवली गेली नसेल आणि म्हणून त्यांचे कार्य इतिहास म्हणून आपल्या पुढे आले नसेल. आज आपण फक्त ज्यांची नोंद ठेवली गेली तेवढ्याच घटनांना आपला इतिहास समजतो. एवढेच नाही तर ज्यांची नोंद ठेवली गेली त्यातही अनेकदा असे होते की फक्त काहीच प्रकरणे पॉप्युलर झाल्याने तीच पुढे आली आणि त्यातच अधिक संशोधन झाले, काही अशाही घटना असतील ना की ज्यांची ओझरती नोंद झाली मात्र त्या नकळत वा मुद्दाम दुर्लक्षिल्या गेल्या वा अनुल्लेखल्या गेल्या आणि मग हळूहळू विस्मृतीत जाऊन नष्टच झाल्या? हो असेही नक्कीच झाले असणार. प्रत्येक गावात वा गडावर आपल्याला वीरगळ दिसते, प्रत्येक वीरगळ ही त्या त्या गावातील एकेका पराक्रमाची गाथा आहे, मात्र ती लिखित नव्हे तर चित्ररूपात असल्याने आपल्याला तिचे डिटेल्स कळत नाहीत. आपल्या गावाशेजारी असलेल्या त्या डोंगरावर जिथे आता फक्त काही भिंतीचे भग्नावशेष दिसतात, तिथे काय घ्या आपल्या गावाच्या चार वीरांनी असीम पराक्रम करून ४०० आक्रमकांना धूळ चाटवली असेल. आपण जो सांगतो तो म्हणजे फक्त शिवाजी महाराज एकदा इथे आले होते वा अहिल्याबाई होळकरांनी इथे येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला हा तर काही गावाचा मोठा अभिमानाचा इतिहास नव्हे. आपल्या गावातील माणसांनी केलेल्या काही ज्ञात, अज्ञात पराक्रमांची, त्यांच्या गोष्टींची माहीती हा खरा आपला इतिहास. आपल्या गावातील कुणीतरी शिवाजीराजांना, वा अगदी निजामाला का होईना अत्यंत पराक्रम करून मदत केली हा आपला अभिमानाचा इतिहास. असा प्रत्येक गावाचा इतिहास नक्की असणार, मात्र त्याची नोंद न झाल्याने वा असलेली नोंद दुर्लक्षिली गेल्याने आपल्याला तो इतिहास कळलाच नाही आणि मग दूर कुठेतरी झालेली सिराजुद्दौला आणि इंग्रजांमधली प्लासीची लढाई यासारख्या घटना हाच केवळ आपला इतिहास असे आपण मानू लागलो आणि मानतो. मग आपल्या लोकल पातळीवर इतिहास घडलाच नाही का? आपल्या परिसरात काहीच ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्या नाहीत? याच जिज्ञासेतून आपल्या गावात, परीसरात कुणी हिरो निर्माण झाला असेल का याची माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यावर मला जुन्या लोकांच्या बोलण्यांतून आणि काही पुस्तके व दस्तऐवजांतून माझ्या जन्मगावाचा एक हिरो, किंवा माझ्या जन्मगावाचा शिवाजी म्हणता येईल असा एक शूरवीर सापडला.
मावळात बोरघरचा हिरोजी बांबळे नाईक हा बिदरच्या सुल्तानशाहीने पूर्वी कधीतरी बहाल केलेल्या परंपरागत मनसबदारीचा शेवटचा वारस होता. त्याचा मृत्यू १७६०ला झाला. त्याला जावजी नावाचा एक मुलगा होता. जावजी हा तसा मध्यम उंचीचा शिडशिडीत अंगाचा आणि गोरापान रंग असलेला एक अत्यंत हुशार, शूर, धाडशी आणि महत्वाकांक्षी माणूस होता. असे म्हणतात की जावजी हा पायाळू होता. पायाळू असणे हा अपशकुन मानला जातो. म्हणून जावजी तान्हा असताना त्याला पायाळू असण्याच्या अपशकुनातून वाचवण्यासाठी नदीच्या कडेला उघड्या पडलेल्या उंबराच्या मुळ्याखालून तीनचार वेळा घालून काढण्यात आले. जावजी हा हिरोजीच्या मृत्यूच्या वेळी जुन्नर येथे नोकरीस (नाईक) होता. आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर त्याने जुन्नरच्या सुभेदाराकडे अर्ज करून पेशव्यांकरवी आपल्या पित्याची मनसबदारी वारसा हक्काने आपल्याला मिळावी असा अर्ज केला.
जावजीला जुन्नरमधील अनेकजण नापसंत करत असत. असे म्हंटले जाई की जावजी त्याच्या अनेक मित्रांना देशावर वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे आणि लूट करण्यास मदत करीत असे. विशेषतः जुन्नरचा सावंत आणि त्याचे कुटुंब यांना जावजी खूप खुपत असे. त्यांनी सुभेदाराला फूस लावून जावजीचा अर्ज फेटाळायला भाग पाडले. मग सुभेदारानेही जावजीचा अर्ज फेटाळला. या प्रकाराने जावजी नाराज झाला आणि नोकरी सोडून आपल्या गावी शेती करण्यासाठी निघून गेला. मात्र तीनेक वर्षे शेतीत राबूनही त्या कामात काही रस नसल्याने त्याला काही करता आले नाही. अगदी शेतसारा देण्याइतकेही उत्पन्न त्याला काढता आले नाही.
एकदा पेशवा शिपाई शेतसारा गोळा करण्यास गावात आले असता गावच्या पाटलाने त्यांना सांगितले की मी जावजीकडून सारा गोळा करू शकत नाही, तो माझे ऐकणार नाही, तेव्हा तुमचे तुम्हीच त्याचे काय करायचे ते करा. शिपाई म्हणाला की मी त्याचा बंदोबस्त करेल. मग पाटलाने शिपायाला एका चपराश्याबरोबर जावजीकडे पाठवले. शिपायाने जावजीला दमदाटी केली परंतु जावजीने त्याला कसेबसे समजावून माघारी धाडले. मात्र या प्रकारामुळे जावजीला पाटलाचा खूप राग आला. आपल्याला शेतीउत्पन्न कमी मिळालेले असूनही पाटलाने शिपाई घरी पाठवून आपला असा अपमान केल्याबद्दल पाटलाला याची किंमत चुकवावी लागेल अशी घोषणा करून तो जंगलांत निघून गेला. हे ऐकताच पाटलाची पाचावर धारण बसली. पाटील घाबरून थेट जुन्नरच्या सुभेदाराकडे गेला आणि त्याला सर्व वृत्तांत सांगितला. मग सुभेदाराने आपल्याकडील तीन नाईकांना जावजीस समजावून परत जुन्नरला घेऊन येऊन जुन्या नोकरीवर रुजू होण्यासाठी राजी करण्याची कामगिरी दिली. ते तिघे नाईक जावजीला भेटायला व समजवायला जावजीकडे आले आणि मग जावजी त्यांच्यावर विश्वास ठेऊन परत जुन्नरला आला. जावजी परत आल्यावर सुभेदाराने त्याला त्याची वारसाहक्काची मनसब पेशव्यांकडे मागणी करून परत देण्याचा विचार केला असतानाच परत एकदा जुन्नरचे काही सावंत आणि काही सिंधी सुभेदाराला भेटले आणि त्यांनी जावजीच्या चहाड्या केल्या. त्यांनी सांगितले की तेव्हा देशावर घडलेले सगळे दरोडे जावजीने घडवून आणले आहेत, आणि अशा माणसाला मनसब न देता उलटपक्षी त्याचा परस्पर काटा काढायला हवा. त्यांनी सुभेदाराला जावजीस कैद करून चांगला धडा शिकवण्याचा सल्ला दिला. मात्र जावजीच्या चार मित्रांना (त्यात एक ब्राह्मणही होता) हे कळल्यावर त्यांनी सुभेदाराला स्वतःच्या शपथेवर अशी हमी दिली की जावजी काहीही सरकारविरोधी काम करणार नाही. त्यांच्या या हमीवर सुभेदाराने जावजीस कैद वगैरे न करता नोकरीमध्ये आहे त्या स्थितीत ठेवण्याचे ठरविले.
जरी मित्रांच्या हमीवर जावजीने सुभेदाराचा विश्वास मिळविला असला तरी जावजीला पाण्यात पाहणारे जुन्नरातील इतरजण स्वस्थ बसलेले नव्हते. ते सदैव जावजीचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान पेशव्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध मोहीम सुरु केली होती. त्या मोहिमेत भाग घेण्यासाठी सुभेदाराचे दोन ब्राह्मण सैन्यअधिकारी आपल्या सैन्यटोळ्या घेऊन जंजिऱ्यास निघाले होते. त्या दोघांना जावजीचा कट्टर विरोधी असलेला एक ब्राह्मण जाऊन भेटला व त्याने त्यांच्याशी मिळून जावजीला मोहिमेवर घेऊन जाण्याचा व तिकडेच ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार त्यांनी ठरवले की बिनिवाल्याबरोबर जावजीला मोहिमेवर पाठवायचे व लढाईच्या वेळी जावजी आणि त्याचे कोळी साथीदार नावेत बसून समुद्रात गेले की मग ती नाव बुडवून त्या सर्वांना ठार करायचे. मात्र ते दोघे ब्राह्मण बिनिवाल्यास हा कट सांगत असताना जावजीच्या एका समर्थकाने ते ऐकले व त्याने लगोलग जावजीस ही खबर दिली. हे ऐकताच जावजी सावध होऊन लगोलग परत जुन्नर सोडून जंगलात पळून गेला. मात्र आता आपल्याविरुद्ध शिजविल्या जाणाऱ्या या सगळ्या कट कारस्थानांचा बदला घेण्यासाठी आणि आपला मनसबदारीचा वारसा हक्क मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने लढाईसाठी आपली टोळी तयार करण्यास सुरुवात केली. आणि मग या कामासाठी पैसे मिळविण्यासाठी त्याने खंडणी गोळा करण्यास सुरुवात केली. सुभेदारास हे कळताच त्याने जावजीच्या कुटुंबीयांस कैद करून जुन्नर येथे डांबले आणि मग जावजीला पकडण्यासाठी सैन्याची एक तुकडी जंगलात रवाना केली. आता आपण सुभेदाराविरुद्ध लढल्यास तो त्याच्या कैदेत असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या जीवाचे काही बरेवाईट करेल हे ओळखून जावजीने काही काळ शांत राहण्याचे ठरवले व तो गुपचूप तिथून थेट खानदेशात निघून गेला.
खानदेशात गेल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबाची माहिती काढण्यासाठी जावजीने आपले दोन भाऊ दादाजी आणि सूर्याजी व एक पुतण्या यांच्यासह सात जणांना जुन्नरला पाठवले. मात्र योगायोगाने हे सातही जण फिरता फिरता चुकून जावजीला पकडण्यासाठी नियुक्त केलेल्या रावजी सावंत याच्या सैन्याच्या तुकडीला सापडले. सावंतने त्यांना पकडून जुन्नरला नेले. आणि भावांना वेगवेगळे करण्यासाठी दादोजीला जुन्नरमध्ये तर सूर्याजी आणि इतर पाच जणांना चावंड किल्ल्यावर कैदेत ठेवले. जावजीला ही खबर लागताच तो खानदेशातून निघून कोतुळमध्ये आला आणि मूळा नदीच्या किनाऱ्यावर कुठेतरी लपून बसून आपल्या भावांना सोडविण्याच्या संधीची वाट पाहू लागला. सावंतने दरम्यान सुभेदाराचे कान भरून जावजीचे भाऊ जिवंत राहील्यास ते काहीतरी युक्ती करून पसार होतील व अजून त्रास देतील म्हणून त्यांना चामड्याच्या पिशव्यांत बांधून कडेलोट करावी असे सुचवले. सुभेदारानेही असे करण्याची परवानगी दिली व त्यानुसार पाच जणांना चामड्याच्या पिशव्यांत भरून त्यांची डोंगरावरून कडेलोट करण्यात आली. मात्र सूर्याजी आणि जावजीचा पुतण्या यांनी विनंती केली की आम्ही लढवय्ये आहोत तेव्हा आम्हाला असे मरण देऊ नका. त्याऐवजी आम्हाला दोन तलवारी द्या आणि मग आम्ही त्या तलवारींनी एकमेकांशी लढू व लढून दमलो की मग स्वतःच कड्यावरून खाली उडी घेऊ. मात्र यांच्या हातात शस्त्र दिल्यास हे काहीही करू शकतात हे माहित असल्याने घाबरून त्यांना फक्त दोन काठ्या देण्यात आल्या आणि मग नाईलाजाने दोघांनी त्या काठयांनी एकमेकांशी लढून शेवटी दमल्यावर एकामागोमाग एक कड्यावरून उड्या घेऊन आपले प्राण दिले.
आपले भाऊ आणि पुतण्या व इतर साथीदारांच्या दुर्दैवी मृत्यूची ही खबर जावजीला मिळताच तो अत्यंत निराश आणि हताश होऊन गेला. आता आपल्या लढाईला वा लढ़ाई करून मिळणाऱ्या मनसबदारीला काही अर्थ नसेल, असे त्याला वाटू लागले. आता लढाई वगैरे करण्यात काहीही अर्थ राहीला नसल्याने आपण शांत राहून घ्यावे असे नैराश्यपूर्ण विचार त्याच्या मनात येऊ लागले. मात्र त्याचे जिवलग मित्र देवजी भांगरे आणि धारेराव साबळे यांनी त्याला धीर दिला आणि सांगितले की आता किमान कैदेत असलेल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी तरी असे हताश होऊन चालणार नाही. मग हे दोघे मित्र जुन्नरच्या सुभेदाराकडे गेले व स्वतःच्या हमीवर जावजी यापुढे शांत बसेल, जुन्नर प्रांतात फिरकणाराही नाही असा सुभेदारापुढे जामीन देऊन त्यांनी जावजीच्या कुटुंबीयांची सुटका करवून दिली. मात्र तरीही जावजी लपून छपून येतो आणि देवजी भांगरेला भेटतो याची कुणकुण सुभेदाराला लागली. त्याने जावजी आणि त्याच्या मित्रांच्या हालचालीवर नजर ठेवायची व्यवस्था केली. मात्र त्याने पाठविलेल्या सैन्याला काही जावजी आढळला नाही. मग त्याने देवजी भांगरेलाच कैद करून जुन्नर येथे तुरुंगात टाकले.
आपल्या मित्राला काहीही पुरावा नसताना कैद केले हे पाहून जावजी चवताळून उठला आणि मग त्याने कळंबईकडे कूच केले. मध्येच जावजीला खबर लागली की पोखरी आणि कळंबईच्या मध्ये सावंताच्या एका भावाने एक लाकडी वाडा बांधला असून तिथे तो एका गोसाव्यासोबत आपल्याला काही इजा होऊ नये म्हणून मंत्रपठण आणि अघोरी तांत्रिक पूजा करवतो आहे. जावजीला हे कळताच त्याने लगेच तिथे हल्ला केला आणि सावंत व तो गोसावी असे दोघांनाही ठार केले. जावजीने आपल्या भावाला ठार मारल्याचे कळताच राजा सावंत त्वरित पुण्यास पेशवा दरबारात गेला व त्याने जुन्नर प्रांताची घडी पूर्णपणे विस्कटली असून जावजीने पेशवे प्रशासन पूर्ण खिळखिळे करून टाकले आहे, असे खोटेनाटे आणि प्रक्षोभक आरोप करून पेशवे दरबाराने जावजीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. हे ऐकल्यावर नाना फडणवीसाने संतप्त होऊन सहाशे सशस्त्र सैनिकांची एक तुकडी राजा सावंतला जावजीचा बंदोबस्त करण्यासाठी दिली.
सावंत जावजीला मारण्यासाठी पेशव्यांची एवढी मोठी सशस्त्र फौज घेऊन जुन्नरला आला असला तरी जावजीही काही कच्या गुरूचा चेला नव्हता. त्याला ही खबर लागताच त्याने अत्यंत चलाखीने आपल्या सर्व सहकाऱ्यांना वेगवेगळे होण्याच्या सूचना दिल्या. एवढे मोठे सैन्य घेऊन आपल्या मागावर असलेल्या राजा सावंताला हुलकावणी देण्यासाठी मग जावजीचे सगळे साथीदार इकडे तिकडे पांगले. जावजीने आपल्याबरोबर फक्त बारा अत्यंत विश्वासू साथीदार ठेवले. आता जावजी आणि त्याचे साथीदार असे वेगवेगळ्या ठिकाणी पांगल्यामुळे राजा सावंताला कोणत्याही एका ठिकाणी आणि एका दिशेने आपली कारवाई करता येईना. अशाप्रकारे सैन्याला गुंगारा देण्यात यशस्वी झाल्यावर मग उलटे राजा सावंतलाच धडा शिकविण्यासाठी जावजीने एक योजना आखली. त्यानुसार आधी त्याने स्वतःबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवायला सुरुवात केली जेणेकरून सावंत अजून गोंधळून जाईल. कधी तो जुन्नरच्या जवळ असल्याची अफवा पसरवे, तर कधी तो घाबरून पळून गेल्याची अफवा पसरवे, तर कधी तो कोकणात गेल्याची आवई उठवे. जावजीच्या योजनेला बळी पडून मग राजा सावंतानेही आपले सैन्य अनेक तुकड्यांत विभागून त्यांना अफवांमध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जावजीचा माग काढण्यासाठी पाठवले. पण जावजी आपल्या ठावठिकाण्याच्या इतक्या अफवा उडवत असे की कोणत्याही टोळीला कधीही तो दिसला नाही. स्वतः राजा सावंतही सैनिकांच्या सर्वात मोठ्या तुकडीबरोबर जावजीच्या शोधमोहिमेत भाग घेत असे. एव्हढी सक्षम सैन्य तुकडी दिमतीला असूनही जावजीची प्रचंड भीती असल्यामुळे राजा सावंत जिथे जाईल तिथे आपल्या सुरक्षेचा अत्यंत चोख बंदोबस्त ठेवीत असे. अगदी रात्रीच्या वेळीही आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून पहारेकऱ्यांची मजबूत व्यवस्था त्याने केलेली होती. पण जावजीही अत्यंत धूर्त होता, त्याने आपल्या गुप्तहेरांकरवी राजा सावंताचे तळ कुठे असतात, सुरक्षा व्यवस्था कशी असते, त्यात काय त्रुटी आहेत याची खडानखडा खबर काढलेली होती.
राजा सावंत एकदा आंबेगाव पठारावर तळ ठोकून होता, त्याच्या सुरक्षेचा घेराही नेहमीप्रमाणे अत्यंत मजबूत होता. मात्र जावजीने आधीच त्याच्या सुरक्षा रचनेची पूर्ण खबर काढलेली असल्याने मजबूत शिबंदी असूनही त्याने राजा सावंतावर तिथेच हल्ला करायचे ठरवले. मग एक पक्की योजना बनवून जावजीने रात्री गुपचूप त्याच्या तळावर हल्ला केला. जावजीच्या हल्ल्याच्या जबर तडाख्याने राजा सावंताचे सैन्य हादरले आणि पळून जाऊन झाडाझुडपांत लपून बसले. मग जावजीने राजा सावंत व त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला पकडले. जावजी आपल्याला माफ करणार नाही हे राजा सावंताला माहीत होते, तरीही किमान आपल्या बारा वर्षांच्या मुलाला जीवदान द्यावे अशी त्याने जावजीकडे विनंती केली, मात्र माझ्या भावांना आणि छोट्या पुतण्याला मारताना तू कशी दया दाखवली नाहीस असे त्यास उलट विचारून जावजीने दोघांनाही ठार मारले. राजा सावंत पकडला गेला आहे असे कळल्यावर त्याचे पळून गेलेले काही सैनिक परत लढायला आले, त्या सर्वांनाही जावजीने यमसदनी धाडले.
राजा सावंतला आणि पर्यायाने नाना फडणवीसाला अशी धूळ चारल्यावर मग जावजी बांबळे थेट हरिश्चंद्रगडावर सुरक्षित वास्तव्यास निघून गेला. राजा सावंत मारला गेला ही खबर त्याच्या कुटुंबियांना दुसऱ्या दिवशी लागली जेव्हा राजा सावंताचा घोडा रक्तबंबाळ आणि शेपटी तोडली गेल्याच्या अवस्थेत चालत त्याच्या घरी जुन्नरला पोचला. राजा सावंताचा मुलगा लगोलग पुण्याला पेशवे दरबारात हजर झाला आणि त्याने नाना फडणवीसला हा वृत्तांत कथन केला. फडणवीस आता अत्यंत बेचैन झाला, सहाशे सशस्त्र सैनिकांची टोळी पाठवूनही जावजीने उलट राजा सावंतालाच ठार केले हे पाहून आता जावजीला संपवण्यासाठी याहून मोठी कुमक आणि मोठ्या क्षमतेची कारवाई करावी लागेल हे त्याला कळले. मग फडणवीसने राजा सावंताच्या मुलाला थेट जुन्नरची सुभेदारी बहाल केली जेणेकरून त्याला जावजीच्या बंदोबस्तासाठी अधिक अधिकार मिळाले. त्याला नाना फडणविसाने सुभेदारीची सनद देतानाच आपल्या नव्या अधिकारांचा व फौजेचा पूर्ण वापर करून जावजी बांबळेस संपविण्याची सूचना केली. मात्र राजा सावंताच्या मुलाला सुभेदारी मिळाली हे पाहून त्याच्याच कुटुंबातील काहीजण नाराज झाले. त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण जावजीला जाऊन मिळू असे त्यांनी ठरवले. मग त्यानुसार एकजण जावजीला भेटायला गेला व त्याला नव्या सुभेदाराचा काटा काढण्यास सांगितले. त्यानुसार मग जावजीने आपली माणसे पाठवली. सावंताच्या फितूर भावाने त्यांना सुभेदार सावंताचे घर दाखवले. घराजवळच एक वरात पाहत उभा असताना जावजीच्या माणसांनी नव्या सुभेदारावर हल्ला करून त्याला ठार मारले.
याच दरम्यान जावजीने राघोबादादाशी संपर्क साधायला सुरुवात केली. नाना फडणवीस आपल्यावर प्रचंड चवताळलेला असल्याने राघोबादादाला पेशवा बनण्यासाठी मदत करावी असे त्याने ठरविले. मात्र नव्या सुभेदारालाही जावजीने ठार केल्याचे समजताच नाना फडणवीस प्रचंड क्रोधीत झाला. जावजीच्या बंदोबस्तासाठी मग त्याने कोळी नाईक देवजी कोकाटे या जुन्नरच्या मोकासदाराला बोलावून घेतले व त्याला जावजीचा बंदोबस्त करायला सांगितले. कोकाटेने नाना फडणवीसाला सांगितले की मला जावजीच्या बंदोबस्तासाठी हवी ती सैन्य व इतर कुमक पेशव्यांतर्फे देण्यात यावी, जावजीस पकडले तर त्यास ठार मारण्याची लेखी परवानगी द्यावी, आणि इतकेच नाही तर बावन्न मावळातील सर्व कोळी नाईकांचे तंटे व मसलती सोडविण्याचे अधिकार लेखी देण्यात यावेत. मग नाना फडणविसाने जावजीला पकडण्याचे व मारण्याचे आदेश, इतर सैन्य व रकमेचे अधिकार तसेच ५२ मावळांतील कोळी नाईकांच्या नियंत्रणाचे अधिकार कोकाटेला लेखी स्वरूपात दिले आणि जावजीचा बंदोबस्त करण्यासाठी परत पाठवले.
प्रत्यक्ष युद्ध व सैनिक कारवाई करून जावजीसारखा धडाडीचा वीर पुरुष हाती लागू शकत नाही हे माहीत असल्याने मग कोकाटेने कपटाने जावजीस पकडण्याची योजना बनवली. एकदा कोकाटे त्याच्या तीन मुलांसकट जंगलात फिरत असताना त्याची गाठ अचानक जावजीशी पडली. कोकाटे धूर्त होता, त्याने गोड बोलून जावजीला फसवले. त्याच्यावर कसा अन्याय झाला, आणि इतर कोळी नाईकांनी कशी त्याला साथ द्यायला हवी असूनही साथ दिली नाही याची त्याने हळहळ व्यक्त केली. मी आपल्या जातीशी इमान राखून तुला न्याय मिळवून देईल अशी हमी दिली. मी तुला जुन्नरला तुझा अधिकार मिळवून देईल, तू माझ्याबरोबर चल असे त्याने जावजीला सांगितले. जावजीही कोकाटेच्या भूलथापांना बळी पडला. त्याने कोकाटेबरोबर जाण्याची तयारी दाखवली. त्यांच्यात अशाप्रकारे वार्तालाप होत असताना चालता चालता वाटेत एक नदी लागली. नदी पाहून जावजी कोकाटेला म्हणाला की आपण नदीत आधी अंघोळ करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. जावजीने असे म्हंटल्यावर कोकाटेने आपला झोळणा म्हणजे पिशवी तिथेच एका झाडावर टांगून ठेवली आणि तो जावजीबरोबर अंघोळीसाठी नदीत उतरला. जावजीच्या एका मराठा सैनिकाने सहज त्या झोळण्यात पाहीले तर त्याला पेशवाईची मोहोर उमटवलेली असलेले काही कागद दिसले. त्याने जावजीचा पुतण्या काळू बांबळे याला बोलावून ते दाखवले. दोघांनी ते कागद गुपचूप बाहेर काढून वाचले. त्यात फडणवीसाने जावजीला ठार मारण्यासाठी संमती दिल्याचा दस्तऐवज होता. ते वाचल्यावर कोकाटेच्या कटाची त्यांना कल्पना आली, मग त्यांनी ते कागद परत जसेच्या तसे ठेवून, गुपचूप जावजीच्या कानावर ही गोष्ट घातली. जावजी म्हणाला की मला ही शंका होतीच त्यामुळे आता आपण यांनाही तीच वागणूक देऊ जी ते आपल्याला देणार होते. मग रात्री सगळे झोपलेले असताना जावजीने त्या चौघांनाही ठार मारले.
नाना फडणवीसाने जावजीस संपविण्याच्या अशा दोन्ही योजना धुळीस मिळविल्यानंतर काही दिवसांनी मग जावजीला राघोबादादाचा एक खलिता मिळाला. त्या खलित्यात राघोबाने जावजीला सगळे डोंगरी किल्ले जिंकून घेण्याची सूचना केली होती. राघोबा हाच खरा पेशवा आहे आणि आपल्याला त्याचा पाठिंबा आहे हे या खलित्याने सिद्ध होते असा दावा जावजीने केला त्यामुळे त्याला इतर अनेक कोळी सरदारांची साथ मिळाली. मग जावजीने आधी कोकण मोहीम हाती घेऊन सिद्धगड भैरवगड आणि कोथळीगड हे पेशव्यांकडून जिंकून घेतले. भैरवगडाच्या किल्लेदाराकडे एक अत्यंत सुंदर असे सोन्याचे कडे होते ते जावजीने हस्तगत केले. लवकरच जावजीने कोथळीगडही काबीज केला. जावजीच्या यशाची ही खबर लागताच पेशव्यांनी सेनेची एक तुकडी जुन्नरवरून जावजीशी लढण्यासाठी खाली कोकणात पाठवली. जावजीला हे कळताच त्याने हल्ल्याची वाट न पाहता स्वतःच त्या सैन्यावर हल्ला करून त्यांना अक्षरशः पळवून लावले. त्यानंतर जावजीने गोरखगडही ताब्यात घेतला.
गोरखगड घेतल्यावर जावजीला कळले की देवाजी सावंताने त्याला मारण्याची सुपारी नऊ बेरडांना (दरोडे टाकणारे आणि सुपारी घेऊन हत्या करणारे) दिली आहे, आणि वरून त्यांना प्रत्येकी एक सोन्याची अंगठीदेखील वानगीदाखल दिली आहे. पण जावजी सावध होता, त्यामुळे बेरडांना जावजीला शोधता सुद्धा आले नाही, मारणे तर दूरच. कोकणात एकामागून एक किल्ले ताब्यात घेतल्यावर मग जावजीने आपला मोर्चा आता घाटावर वळवला. त्याने रतनगडाला वेढा घातला. गोविंद खाडे हा तेव्हा रतनगडाचा किल्लेदार होता. जावजीने खाडेला सहा हजार रुपयांत किल्ला सोडण्याचा प्रस्ताव दिला, आणि गोविंद खाडे याने तो मान्य करून किल्ला जावजीच्या स्वाधीन केला. त्यानंतर जावजीने अलंग जिंकून घेतला आणि मग मदनगड त्याला स्वतःहून शरण आला. जावजीने अशा प्रकारे एकामागून एक पेशवाईचे लचके तोडल्यावर नाना फडणवीस अत्यंत खवळला व त्याने जावजीला कशाही प्रकारे पकडून त्वरीत तोफेच्या तोंडी द्यावे असे फर्मान काढले. मग नाना फडणवीसाने जावजीने जिंकलेले किल्ले परत घेण्यासाठी एक मोठी फौज रवाना केली. जावजी त्यावेळी कोकणात होता. पण नानाने पाठविलेल्या फौजेची खबर ऐकताच तो त्वरित घाटावर आला आणि त्या फौजेवर हल्ला करून त्यांचे अपरिमित नुकसान केले.
मग पेशव्यांची दुसरी एक फौज गोडबोले याच्या नेतृत्वाखाली कोकणातून वर घाटावर जावजीवर चालून आली, मात्र जावजीने त्यांच्यावरही गनिमी काव्याने हल्ले केले. अशाप्रकारे विजयामागून विजय प्राप्त करीत असला तरी आता जावजी नाना फडणविसाने पाठविलेल्या अनेक फौजांमुळे चोहीकडून वेढला जाऊ लागला होता. त्यामुळे त्याने राघोबादादास पत्र लिहून आपण पेशवे आहात आणि माझ्याशी लढायला येणारी फौजही पेशव्यांचीच आहे मग अशा प्रसंगी मी पुढे काय करावे ते विचारले. मात्र राघोबादादाने सांगितले की इंग्रजांनी त्यास जी मदत करण्याचा वायदा केला होता तो त्यांनी तोडल्याने राघोबा एकटा पडला होता. त्याने जावजीस पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध लढून किल्ले राखून ठेवण्यास सांगितले. पुढे गोष्टी अनुकूल झाल्यावर मदत पाठवेल असे सांगितले. पण राघोबा स्वत:च इंग्रजांच्या नजरकैदेत आहे त्यामुळे राघोबाकडून काही अपेक्षा नाही हे कळल्यावर मात्र जावजी सावध झाला. जावजी हा फक्त वीर पुरुषच नव्हे तर अत्यंत चलाख मुत्सद्दी देखील होता. नाना फडणवीसाला आपण किती त्रास दिला आहे हे त्याला माहित होते त्यामुळे तो आपल्याला मारण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावेल हेही त्याला माहित होते. म्हणूनच आता एवढ्या मोठ्या पेशवाईच्या शक्तीसमोर टिकाव धरायचा तर त्याला निर्बल झालेला राघोबा सोडून इतरांची साथ घेण्याची गरज होती. मग त्यानुसार त्याने हालचाली सुरु केल्या. धोंडू महादेव या त्याच्या मित्राला त्याने नाशिकच्या सुभेदाराकडे पाठवले तर मल्हारपूरचा पाटील भांगरे याच्याकरवी तुकोजी होळकर यांचेशी संपर्क साधला. भांगरे पाटील हा तुकोजी होळकराच्या सैन्यातला एक घोडेस्वार आणि तुकोजीचा अत्यंत विश्वासातला व जवळचा माणूस होता.
दरम्यानच्या काळात मधूनच गनिमी हल्ला करून पसार होणाऱ्या जावजीचा शोध घेण्याचे काम गोडबोलेने आपल्या फौजेसह सुरूच ठेवले होते. त्याला कळले की जावजी रतनगडावर असून तो खाली येणार आहे, तेव्हा त्याने आपल्या फौजेसह रतनगडाला वेढा दिला. कुणीही खाली जाताना दिसला की त्याला ठार मारा असे सांगून अत्यंत पक्की आणि मजबूत अशी वेढ्याची रचना त्याने केली. मात्र अंधार झाल्यावर जावजी स्वतः खाली उतरून गोडबोलेच्या फौजेला गुंगारा देऊन रातोरात रतनगडावरून पसार झाला. जावजी निघून गेल्यावर दोन दिवसांनी गोडबोलेला कळले की जावजी केव्हाच निघून गेला असून त्याने उत्तरेकडील पेशव्यांच्या गावांत खंडण्या वसूल करून जे विरोध करतील त्यांना मारण्याचा सपाटा लावला आहे.
गोडबोलेला एवढ्या मोठ्या फौजेनिशी असूनही जावजीच्या केसालाही धक्का लावता आला नाही आणि जावजी एकामागून एक किल्ले ताब्यात घेताच चालला होता हे पाहील्यावर मग नाना फडणविसाने शेवटी नाईलाजाने जावजीशी समेट करण्यासाठी संपर्क साधण्यात यावा असे आदेश देऊन आपल्या फौजा माघारी बोलावून घेतल्या. असे असले तरी जावजी आता सावध होता. जरी माघार घेतलेला दिसत असला तरी आपले प्राण घेण्यास नाना फडणवीस उतावीळ आहे हे जावजीस माहीत होते म्हणून मग तो धोंडू महादेवाने सांगितल्याप्रमाणे थेट तुकोजी होळकरास जाऊन मिळाला. तुकोजी होळकर हा पेशवाईचा अत्यंत महत्वाचा सरदार होता, आणि नाना फडणवीस त्याचा शब्द मोडू शकत नव्हता. मग तुकोजीने फडणविसास जावजीला पेशवे सरकारात सामील करून घेण्यास सांगितले, आणि त्या बदल्यात जावजीवर लोहगड ताब्यात घेण्याची मोहीम सोपवली. जावजी लोहगडावर कूच करून गेला. त्याने आपल्या तोफा लोहगडावर फिरवल्या. जावजीने एक मोक्याची जागा पाहून तिथे एक तोफ उभी केली व तिथून गडावर मारा करायला सांगितला. या तोफेचा एक गोळा नेमका किल्ल्यावरील दारुगोळ्याच्या गोदामावर पडला आणि त्याचा प्रचंड मोठा स्फोट होऊन किल्ला आरामात जावजीच्या ताब्यात आला. खुश होऊन जावजीने तोफेकऱ्यास आपल्या हातातील सोन्याचे कडे बक्षीस म्हणून दिले. दरम्यान जावजी तुकोजीचा अत्यंत जवळचा माणूस बनला. जेव्हा तुकोजी पुणे सोडून हिंदोस्थानात (उत्तरेत) गेला तेव्हा जावजीही त्याच्याबरोबर चांदूर येथे गेला. एव्हना धोंडू महादेव याने जावजीसाठी नाना फडणवीसाचे मन वळवून जावजीला विरोध करण्यात नुकसानच आहे त्याउलट त्याला आपल्यात घेतले तर त्याच्या वीरतेचा पेशवाईस फायदाच होईल असे सांगून जावजीस सरकारात सामील करून घेण्यास राजी केले होते. मग जावजीसाठी खास राजूर हा एक नवा सुभा तयार करण्यात आला. या सुभ्यात राजुरातील चाळीस गावे, महालदेशातील बावीस गावे, कोकणातील साकुर्ली जिल्ह्याची साठ गावे आणि कोकणातील इतर प्रांतातील अठ्ठावीस गावे अशी एकूण दीडशे गावे राजूर सुभ्यात आणि पर्यायाने जावजीच्या अंमलाखाली आली. सुभेदार हा पेशवाईत किंवा मध्ययुगीन भारतात, दरबारातील मंत्र्यांखालोखाल सर्वात मोठ्या दर्जाचा अधिकारी होता. आता ही सत्ता किती मोठी होती याची यावरून कल्पना यावी की त्याच वेळी जव्हारच्या गादीकडे केवळ ८३ गावे होती. म्हणजे जावजीच्या ताब्यात एका संस्थानाच्याही जवळ जवळ दुप्पट साम्राज्य आले होते. सुभ्यातील टाकेद हे गाव जावजीस त्याची वैयक्तिक जहागीर म्हणून देण्यात आले, तिथून त्याला दरवर्षी वैयक्तीक साडे आठशे रुपये मिळत. पेशवे दरबाराकडूनदेखील त्याला तनख्यात साडेतेराशे रुपये मिळत. प्रत्येक गावातूनही त्याला प्रत्येकी एक रुपया आणि तूप धान्य आदि मिळत असे. साकीरवाडीचा भांगरे आणि बारीचा खाडे हे दोघे नाईकही जावजीच्या हाताखाली नेमण्यात आले. याउपर सुभ्याच्या व्यवस्थेसाठी संगमनेर आणि सिन्नर सुभ्यांतूनही राजूरला चार ते पाच हजार रुपये वार्षिक मिळत असत.
आपल्या पराक्रमाच्या बळावर अशाप्रकारे भारतातील सर्वात मोठी शक्ती असलेल्या पेशवाईशी एकट्याने टक्कर घेऊन एकही लढाई न हरता अक्षरशः शून्यातून एखाद्या संस्थानापेक्षा मोठा सुभा मिळविणाऱ्या जावजीने अनेक वर्षे राजूर सुभ्याचा कारभार उत्तमरीतीने चालवला.
जुलै १७८९ मध्ये जव्हारच्या राणीचे म्हणणे पुणे दरबारात मांडण्यासाठी तीस घेऊन जात असताना कोतुळ येथे मुळा नदीच्या तीरावर जावजी थांबला. नदीला पूर आलेला होता, त्याच्यासोबत इष्टे नावाचा एक नाईक होता, त्या नाईकाने मुद्दाम जावजीला बहाण्याने नदीच्या खोल जागी नेले आणि तिथे त्याला पाठीमागून धक्का मारून दगडांवरून पाण्यात पाडले. पाण्यात पडल्यावरही जावजी पोहून वर निघण्याचा प्रयत्न करत असताना मग इष्टेने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्यास बेशुद्ध केले आणि अशाप्रकारे मग जावजीचा मूळेच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. देशातील सर्वात बलाढ्य शत्रूशी एकट्याने लढून त्यालाच धूळ चारणाऱ्या पराक्रमी जावजीचा हा पराक्रम नक्कीच शिवाजी महाराजांसारखाच अभिमानास्पद होता. मात्र अशा अजोड पराक्रमी वीराचा त्याच्याच जवळच्या माणसाच्या फितुरीने दुर्दैवी मृत्यू झाला.
जवळ जवळ चाळीस वर्षे राजूर सुभा अस्तित्वात राहीला, त्यानंतर पेशवाई बुडाली आणि इंग्रजांनी हा सुभा आणि सुभेदारी बरखास्त करून पगारी पोलीस आणि कारकून आदि अधिकारी यांच्यातर्फे संपूर्ण प्रांताचा कारभार हाकायला सुरुवात केली. या परकीय इंग्रजांनी ठेवलेल्या नोंदींतूनच जावजी आणि त्याचा पराक्रम आज समजू शकतो. अन्यथा एतद्देशीय इतिहासकारांनी एकतर त्याला सपशेल टाळले किंवा केला तरी केवळ राघोबाचा बंडखोर साथीदार असा अल्प उल्लेख करून दुर्लक्षित ठेवले होते.

मंगळवार, २१ जून, २०१६

कमला आणि अमला (खरेखुरे रियल लाईफ जंगल बुक)

जंगल बुकचे जे कार्टून लहानपणी यायचे ते आता आलेल्या चित्रपटापेक्षा लय भारी होते. मी टारझनची गोष्ट सुद्धा खूप लहानपणी वाचली होती त्यामुळे लहानपणापासून मी कधी एखाद्या जंगलात गेलो की मला वाटायचे काय घ्यावे इथेही कोणी मोगली किंवा टारझन सापडेल. नंतर थोडे मोठे झाल्यावर असे होणे शक्य नाही हे कळू लागले. कोणीही प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या मुलाला पाळू शकत नाही.
कोकीळ आणि कावळ्याची गोष्ट मला कळल्यावर मला पुन्हा उत्सुकता जागृत झाली. जशी कोकीळ आपली अंडी कावळीच्या घरट्यात घालते आणि कावळी कोकिळेची पिल्ले स्वतः:ची समजून वाढवते तसे माणसालाही प्राणी वाढवू शकतील? मग वाटले असे होऊ शकेल पण केवळ साधर्म्य असलेल्या प्राण्यांत म्हणजे एखाद्या कुत्र्याला कोल्हे किंवा लांडगे वाढवू शकतील कारण ते सारखे दिसतात, पण कुणी माणसाला वाढविणे शक्य नाही. अगदी माकडांनी सुद्धा माणसांना वाढवणे अवघड आहे कारण एनाटॉमी बहुतांशी सारखी असली तरी माणसाच्या अंगावर केस नसणे व माणसाला शेपटी नसणे हे फार मोठे फरक आहेत.
एकदा डिस्कव्हरीवर मी दोन डॉक्युमेंटरी पाहील्या, एके डॉक्युमेंटरीत एक चित्ता एका हरीणाच्या पिलाचे रक्षण करत होता, तर दुसरीत एक सिंहीण देखील एका हरिणाच्या पिल्लाला पाळीत होती. सिंहीणीची गोष्ट तर अतिशय हृदयस्पर्शी होती. त्या पिलासाठी तिने तिची टोळी सोडली कारण दुसऱ्या सिंहांनी त्या पिलाला मारले असते. तिने १५ दिवस शिकार सुद्धा केली नाही कारण त्यासाठी त्या पिलाला एकटे सोडावे लागले असते. शेवटी एका मोठ्या सिंहाने तिला गाठून त्या पिल्लावर झेप घेतली. तिने मुकाबला केला पण शेवटी तो राजा सिंह होता त्याने त्या पिलाला क्षणार्धात फाडून टाकले. डिस्कव्हरीवाले ग्रेट आहेत त्यांनी हे सगळे कॅमेऱ्यात कैद केले होते.
आता मी पुढे सांगणार आहे ती सत्य घटना १९२०ची आहे. बंगालातल्या मिदनापूरची.!!
मिदनापूरच्या जंगलातील एक गावाच्या लोकांनी दोन विचित्र प्राणी पाहीले. ते दोन प्राणी एका लांडग्यांच्या टोळीत होते. डोक्यावर लांब केस, अंगावर खवले असल्यासारखी त्वचा असे काहीसे ते प्राणी होते. गावकरी त्यांना भुते समजले. कारण ते प्राणी ऐन रात्रीच्या वेळीच त्या लांडग्यांच्या टोळीबरोबर धावताना, फिरताना नजरेस पडले होते. या प्राण्यांची बातमी मग पोचली ती रेव्हरँड सिंग यांचेपर्यंत. तेही उत्सुकतेपोटी या दोन प्राण्यांना पहायला मिदनापूरला आले. त्या विचित्र प्राण्यांना ठार करण्यासाठी म्हणून जंगलात जिथे ते प्राणी अनेकदा दिसले होते तिथल्या जलाशयाभोवती लख्ख चांदण्या रात्री एक मचाण बांधून ते दबा धरून बसले. अपेक्षेप्रमाणे ती लांडग्यांची टोळी आली त्यात ते दोन प्राणीही होते. सिंग यांनी बंदुकीचा नेम लावला, आणि मग ते अचानक थांबले. कारण त्यांना दिसले की ते कोणतेही विचित्र प्राणी अथवा भुते नसून त्या दोन मानवी मुली होत्या. डोक्यावर अत्यंत गुंता झालेले आणि मळके विस्फारलेले केस आणि अंगावर मळाची पुटावर पुटे चढलेली असल्याने त्यांची त्वचा खवल्यांसारखी दिसत होती.
मग सिंग यांनी गावकऱ्यांना हे सांगून त्या दोन मुलींना त्या लांडग्यांच्या तावडीतून सोडवायचा निर्धार केला. मग त्यांनी त्या लांडग्यांच्या गुहा शोधून काढल्या. त्यांना दिसले की एका गुहेत त्या दोन मुली एका मादी लांडग्याबरोबर तिच्या पिल्लांसह राहत होत्या. त्यातली एक मुलगी फक्त २ वर्षांची तर एक ८ वर्षांची होती. जेव्हा माणसांनी त्या लांडग्यांना हाकलून देऊन त्या मुलींना पकडायचा प्रयत्न केला तेव्हा आधी तर लांडगे आणि त्यांचेबरोबर त्या मुलीही पळून गेल्या. नंतर त्यांना कोंडीत पकडल्यावर जेव्हा त्या लांडग्यांना कळले की माणसे त्या दोन मुलींना पकडू पाहत आहेत तेव्हा त्यांनी जोरजोरात हल्ले करून माणसांना त्यांच्याजवळ येण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न केला. ते लांडगे त्यांना आपल्यातलेच समजत होते. विशेषतः: त्या दोन्ही मुलींची आईच झालेली जी मादी लांडगा होती ती तर काही केल्या माणसांना त्यांच्या जवळ येऊच देईना. जखमी होऊनही ती पूर्ण शक्तीनिशी त्यांचे रक्षण करतच राहीली. इतर लांडगे पळून गेले पण तिने त्या मुलींना सोडले नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल पण जंगल बुकमध्ये शेरखान माणसांबद्दल जे बोलतो ना ते अगदी शंभर टक्के खरे आहे. कारण शेवटी सिंग यांनी त्या मुलींच्या त्या लांडगा आईला गोळी घालून ठार केले आणि मगच ते त्या दोन मुलींना घेऊन जाऊ शकले. मरताना त्या आईला काय वाटले असेल, त्या दोन मुलींना त्यांची रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई पाहून काय वाटले असेल आणि त्या आईच्या बाकी पिलांचे पुढे काय झाले असेल हे प्रश्न आपण स्वतः:ला विचारायचे नाहीत, कारण या पृथ्वीवर काय योग्य आणि काय अयोग्य हे आपण आपल्या सोयीप्रमाणे ठरवायचे असते, हे प्रश्न स्वतः:स विचारणे आपणांस गैरसोयीचे आहे. ती लांडगा आई ज्या भीतीपोटी मुलींना माणसांच्या ताब्यात जाण्यापासून रोखत होती तिची ती भीती खरी ठरली असेल का? त्या मुलींचे माणसांत येऊन भले झाले असेल?
श्री सिंग हे त्या मुलींना ते स्वतः: चालवत असलेल्या अनाथाश्रमात घेऊन गेले. त्या दोन मुली एकमेकींच्या खऱ्या बहीणी नव्हत्या. लांडगे गावातील मुलांना पळवून नेऊन मारून खाण्याच्या घटना तेव्हा कित्येकदा घडत. कसे कुणास ठाऊक पण या दोन वेगवेगळ्या वेळी आणि बहुदा वेगवेगळ्या ठिकाणांहून पळवून नेलेल्या मुलींना लांडग्यांनी ठार न मारता सांभाळले होते. सिंग यांनी त्या दोघींना कमला आणि अमला अशी नावे दिली. त्या मुली चार पायावरच चालत (दोन हातांना त्या पुढचे पायच समजत). त्यांना दोन पायांवर उभे राहताच येत नसे चालणे तर दूरच. त्या घातलेले कपडे फाडून टाकत. भिंतीवर किंवा कुठेही नखांनी ओरखडून ठेवत. पाणी दिले की ते खाली ओतून चाटून पीत. त्यांची त्वचा अतिशय राट झालेली होती. त्यांना तूप लावून त्वचा मऊ करण्याचा सिंग यांनी प्रयत्न केला. त्या फक्त कच्चे मांस खात. त्यांची श्रवणशक्ती अतिशय तीक्ष्ण होती, अगदी दूरवरचे छोटे छोटे आवाजही त्यांना ऐकू येत. आणि त्यांची वास घेण्याची क्षमता तर अफाट होती. अगदी ५० ते ७० मीटर अंतरावर ठेवलेल्या कच्च्या मांसाचाही त्या बरोबर वास ओळखत. मध्यरात्रीनंतर त्या लांडग्यांसारख्या तोंड वर करून ओरडत. त्या दोघी नेहमी सोबतच राहत आणि जमिनीवरच मुटकुळे करून एकमेकींस बिलगून झोपत.
सिंग यांनी त्यांना अनेक मानवी गोष्टी, सवयी शिकविण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. त्यातच छोटी अमला काही दिवसांतच आजारी पडून मरण पावली. ती मेल्यावर कमला अजूनच प्रचंड निराशेत गेली. पुढील जवळ जवळ आठ नऊ वर्षात कमला जास्तीत जास्त २० ते ३० मानवी शब्द शिकू शकली. मानस शास्रज्ञांनी कमलाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या उपायांनी तिला शिकविण्याचा प्रयत्न केला पण ती काही शिकू शकली नाही. आमच्या बालपणी जवळ जवळ याच वयात म्हणजे पाचवीत आम्ही इंग्रजी आणि हिंदी अशा दोन भाषा शिकलो पण कमला काहीही शिकू शकली नाही. असे कसे काय झाले असेल? आठेक वर्षे लांडग्यांच्या सानिध्यात राहील्यावर भाषा शिकणे हा मानवी गुणधर्म ती मुळातूनच गमावून बसली होती काय? असे म्हणतात की कमलाला बघायला लोक येत तेव्हा सिंग कदाचित त्यांचेकडून पैसे घेत आणि या देशी परदेशी उच्चभ्रू पाहुण्यांसमोर सिंग यांना हवे तसे कमलाने वागावे म्हणून ते तिला मारहाण सुद्धा करीत. काही जण तर या एकंदर कहाणीवरच शंका घेतात. मात्र एका परदेशी बिशपने कमलाला दोन वर्षे पाहिल्याची नोंद करून ठेवलेली आहे. सिंग याने कमलाचे काही फोटोही काढलेले आहेत.
१९२०ला ही कहाणी सुरू झाली तेव्हा सगळ्या जगातच मोठी खळबळ माजली होती, मात्र अमलाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर मानवी गुणधर्म न शिकताच किंवा न स्वीकारताच म्हणा पण कमलासुद्धा अल्पकाळातच १९२९ साली मरण पावली. त्या लांडग्यांच्या टोळीबरोबरच त्या दोघी अधिक चांगल्या रीतीने राहू शकल्या असत्या का? त्यांना माणसात आणणे हे आपण सामाजिक आणि मानवीय दृष्ट्या योग्य मानू पण स्वतः: त्या दोघींसाठी ते योग्य होते का? अमेरिकेत एका मानसशास्त्रज्ञाने एका चिंपांझीस शंभर एक शब्द शिकवले होते तो चिंपांझी त्यांची साधी साधी तीन शब्दांची वाक्ये सुद्धा बनवू शकत होता. पण कमलाला हे का शक्य झाले नसेल? कमला आणि अमलाची ही कहाणी वाचल्यावर कळते की जीवन किंवा सुख जे आपण समजतो त्याहुनही कदाचित कितीतरी वेगळे काहीतरी असावे. आपण कोण असतो? आपण फक्त आपल्या आजूबाजूच्या वातावरणाच्या समाजाच्या प्रभावाने घडलेले जीव असतो का? लांडग्यांच्या समाजात राहून आपण माणूस असूनही सर्वार्थाने लांडगे होत असू तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांना आदर्श सुखी आणि समृद्ध बनविण्यासाठी त्यांचेसाठी त्याच दृष्टीने तसेच पोषक सामाजिक वातावरण आपण त्यांना द्यायला नको का? आपण हे असे भ्रष्ट, स्वार्थी, भेदभावाने, द्वेषाने आणि हिंसेने लिडबिडलेले सामाजिक वातावरण त्यांच्यासमोर ठेऊन ते पुढे शांतीने, सौहार्दाने व सुरक्षित राहतील अशी अपेक्षा ठेऊ शकतो का?

शुक्रवार, १८ डिसेंबर, २०१५

कोडे

कमळी ती तशी घामेजलेली, विस्कटलेले केस आणि कमरेभोवती पदराचा बांधलेला काचा अशा अवतारात घरात घुसली. सोताला देव माणूस म्हणवून घेतो पण कुत्रा आहे मेला कुत्रा. असे म्हणत तिने चुलीत लाकडे कोंबली आणि डब्यातून पीठ काढून तिथेच चूल फुंकता फुंकता रागारागात ते मळू लागली. बाहेर खेळत असलेल्या सुंदऱ्या आणि पिंट्याने आपल्या आईला घरात येताना पाहिले. दोघांपैकी धाकटा पिंट्या तसाच खेळणे सोडून पळत तिच्या मागोमाग घरात घुसून चुलीजवळ आला, आणि आये मला भूक लागलेय असे म्हणून कुरकुरू लागला. तिने त्याच्या पाठीत तशाच पिठाच्या हाताने एक गुद्दा घातला आणि म्हणाली दिसत नाही का मेल्या तुलाच गिळायला सैपाक करतेय ना आल्याआल्या.? त्या गुद्याबरोबर डोळ्यात पाणी आले पिंट्याच्या. पण निदान त्याचा कुरबुरीचा आवाज बंद झाला एवढेच कमळीला समाधान. आई घरात आल्याआल्या लगेच जे खायला मिळू शकते ते म्हणजे केवळ फटका हे सुंदऱ्याला थोरला असल्याने अनुभवातून कळून चुकले होते त्यामुळे तो काही भूक लागलेली असूनही पिंट्याबरोबर घरात गेला नाही.   
कमळी ही मंगळूची बायको. मंगळूला स्वत:चा असा फक्त एक बारीक जमिनीचा तुकडा वडिलोपार्जित संपत्ती म्हणून मिळालेला. त्यात फक्त एक पावसाळी पीक निघे. जेमतेम चार पोती भात व्हायचा म्हणजे पाच सहा मण तांदूळ. कितीही राबले तरी वर्षभरासाठी ती मायमाती फक्त एवढेच देऊ शकायची. मग मंगळूला चरितार्थासाठी दुसऱ्यांच्या शेतावर काम करावे लागे. गाव काही फार सधन शेतकऱ्यांचे नसल्याने कामही जेमतेमच मिळे. तेही त्या गावात शेतात काम करण्याच्या बदल्यात पैसे देण्याची पद्धतच नव्हती. कामाच्या बदल्यात डाळीडूळी मिळत, कधी बाजरी, ज्वारी, भुईमुगाच्या शेंगा अशा वस्तू मिळत, त्यातूनच रोजच्या भाकर अन कालवणाची तरतूद होई. पण दोन पोरे, बायको आणि एक म्हातारी जगवायची म्हणजे पैसा तर लागणारच. डॉक्टरचे पैसे नाहीत म्हणून कित्येक वर्षे अंगावरच खोकला काढलेल्या मंगळूच्या म्हातारीचा आवाजच बंद झाला होता. आणि आजकाल तिची तब्येत वरचेवर जरा जास्तच वेळा बिघडत असे. पैसाच नाही म्हणून डॉक्टरकडे जात नाही हे खरे कारण असले तरीही कुणी डॉक्टरकडे जा असे म्हंटले की मला तर बाई त्या डाक्टरच्या सुईची लय भीती वाटते असे म्हातारी म्हणायची आणि दुखणे अंगावरच काढायची. 
गावात कामाच्या बदल्यात पैसा मिळायचा तो फक्त गेनू पाटलाच्या इथे. तेही शेतीव्यतिरिक्त इतर काम असेल तरच. गेनू पाटील तसा बोलूनचालून बरा होता. अडीनडीला कोणालाही मदत करायचा. मंगळू त्याचेकडेच सिजनला कामाला जायचा, त्यातून  मिळणाऱ्या पैशानेच त्याला घरात मीठमिरची खरेदी करता यायची. आणि कसलाही नाद वा व्यसन नसल्याने गाठीला दोन पैसे जमवून लेकराबाळाला एखादा कपडालत्ता करता यायचा. मंगळू हा एक प्रामाणिक, निर्व्यसनी आणि अत्यंत कष्टाळू गडी म्हणूनच सगळ्या गावात ओळखला जायचा.

एके वर्षी दुष्काळ पडला. मंगळूच्या जमिनीच्या तुकड्यात भाताचा एक दाणाही उगवला नाही. पावसाचा थेंबही न पडल्याने डोंगर, गावाकुसाची जमीन हिरवी झालीच नाही. लांब कुठेतरी पडलेल्या पावसामुळे नदीला मात्र पाणी आले होते एवढाच काय तो पंचक्रोशीला दिलासा. स्वत:च्या शेतातही काही नाही आणि पाटलाकडेच काय तर गावात कुणाकडेही काही काम नाही त्यामुळे त्या वर्षी मंगळूवर उपासमारीने मारण्याची वेळ आली. पण नशिबाने अशा ऐन दुष्काळात पाटलीण बाळंत झाली तेव्हा मदतीला आणि घरकामाला म्हणून पाटलाने मंगळूला एखादी बाई पाहायला सांगितली. मंगळूने मग हीच संधी साधून कमळीला तिथे कामाला ठेवले. पण चौथ्याच दिवशी कमळी दुपारीच घाबऱ्याघुबऱ्या घरी आली आणि मंगळूला म्हणाली की उद्यापास्न मी पाटलाच्या घरी कामाला जाणार नाही. त्या पाटलाची नजर लय वंगाळ हाये. मंगळू म्हणाला येडी झाली का तू? घरात खायला एक दाणा अन खिशात एक दमडी उरल्याली न्हाई. समद्या तालुक्यात लोक उपाशी मरू लागल्यात, पाटील कसाबी आपल्याला जगण्यापुरता काहीतरी देईल. आपली म्हातारी बी हाथरुनाला पडलेय. तिला आज ना उद्या डाक्टर दाखवावाच लागेल. अन परत पुढच्या साली पेरणीचे दिवस येतील तवा गाठीला चार पैसे नकोत का? ते कोण दिल आपल्याला? आणि पाटलाचं म्हंशील तर देवमाणूस हाये त्यो, समद्या गावाला माहित हाये पाटील किती चांगला हाये ते. त्येच्यामुळं तर घरात पोरांच्या पोटाला दोन घास लागत्यात. तूला भरम झालाय. गप वाड्यावं जात जा.  मी हाये ना तोवर तसली कायबी काळजी करू नको. त्यानेच असे बोलल्यावर मग कमळी नाखुशीने का होईना, पाटलाकडे कामाला जात राहिली.
कमळीच्या कामाचे पैसे पाटील थेट मंगळूला देत असे. एरवी कोणत्याही कामाला पाटील मंगळूलाच बोलावीत असे. त्यामुळे तो नेहमी वाड्यावर असे. पण आता काही कामच नसल्याने मंगळूचे पाटलाच्या वाड्यावर जाणे बंदच झाले. फक्त कमळीचा पगार घ्यायला आठवड्यातून एकदा तो वाड्यावर जाई. अशात कमळी परत एके दिवशी मंगळूला म्हणाली की मला पाटलाकडे नाही जायचे, त्याचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे हायेत. तुम्हाला कळत कसं न्हाई? पण मंगळू ऐकला नाही, कारण दोनच दिवसांपूर्वी पाटलाने मंगळूला कमळीच्या कामाचे पैसे आता रोजचे तीन रुपये वाढवून देत जाईल असे सांगितले होते. कमळी आता रोजच मला कामाला पाठवू नको असा धोशा लावु लागली, मग वैतागून एकदिवस मंगळू तिच्यावर खूप ओरडला आणि परत पाटलाबद्दल आसं बोलून कामाला जाणार नाही असे म्हणाली तर बघ असा त्याने तिला दम दिला.
तीनेक महिने लोटले असतील. दुष्काळामुळे कुणाला कामच नसल्याने गावात गावकुटाळक्या ऐन भरात होत्या. गावात आता हलक्या आवाजात पाटील अन कमळीबद्दल कुरबुर होत होती. ती मंगळूला कळत नव्हती असे नाही. त्याला त्याचे फार वाईट वाटायचे पण पाटील असं करणार नाही हे त्याला पक्के माहित होते. त्यामुळे तो थोडा काळजीत असला तरी अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करीत होता. मात्र एक दिवस त्याने त्याचा मित्र गणपा आणि कुशाबाला बोलताना ऐकले. गणपा सांगत होता की आज त्यानं प्रत्यक्ष पाहीलं की पाटील कमळीला हातात उचलून घेऊन पाटलाच्या मळ्यातल्या घरात घेऊन गेला आणि आतून दाराची कडी लावून घेतली. वरून तो हेही म्हणाला की पाटील तसा वाटत नाही पण नक्कीच कमळीनं आपल्या देखण्या रूपाच्या जोरावर त्याच्या पैशाच्या लोभाने त्याला फसवलं असणार. गेले कित्येक दिवस दोघांचा हा उद्योग बिनबोभाट चालू आहे. पण आता हे मंगळूला तरी कंच्या तोंडानं सांगावं? गणपा निदान आपल्या बाबतीत तरी कधीच खोटे बोलणार नाही याची मंगळूला खात्री होती त्यामुळे त्याचे हे बोलणे ऐकून त्या दिवशी मात्र मंगळूचे माथेच फिरले. तो प्रचंड रागात घरी आला. कमळी आधीच घरात येउन रडत बसली होती. मंगळू बाहेरून आला तशी कमळी लगेच त्याच्या जवळ जाउन त्याच्या खांद्यावर डोके ठेऊन ओक्साबोक्षी रडू लागली. आज मला पाटलाने जबरदस्ती… एवढेच म्हणून ती अजूनच धाय मोकलून रडू लागली. मंगळूने तिला तशीच दूर ढकलली आणि ओरडला, पाटलाने? जबरदस्तीने की मर्जीने? मला सगळे कळलेत तुझे धंदे, चल हट बाजूला.  असे म्हणून मंगळूने तिला दूर लोटले. आणि अजून जोरात तिच्यावर खेकसला. त्याच्या खेकसन्यासरशी एक आंबटशा किळसवाण्या वासाचा भपकारा कमालीच्या नाकातोंडात गेला. 
तुमी दारू पिली? अवो पण का? घरात दोन वेळ दाणापाणी येत रहावे म्हणून मी काय काय सहन करतेय, इथं तुमची म्हतारी आजाराने मरायला टेकलीय आणि अशात ही थेरं कराया तुमाला लाज न्हाई वाटत?
तू मला शिकवती का गं? माझी लाज काढती? छीनाल साली. अशी शिवी हासडून मंगळूने आयुष्यात पहिल्यांदा कमळीवर हात उचलला. चल हट बाजूला असे म्हणून त्याने तिला लाथ मारून बाजूला ढकलली आणि घराबाहेर तनातना निघून गेला. कमळी कितीतरी वेळ रडत राहीली. दोन्ही पोरे एकमेकांना बिलगून रात्रीपर्यंत एका कोपऱ्यात घाबरीघुबरी होऊन गप्पगार बसून राहीली. यानंतर चार दिवस कमळी पाटलाच्या घरी गेली नाही. पण पाचव्या दिवशी पोरांच्या चेहऱ्यावरची भूक पाहून तिला राहवले नाही, आणि ती कामाला गेली. पोरांची भूक मंगळूलाही दिसत होतीच. तोही कमळीस जाताना पाहूनही काहीच बोलला नाही. 
या प्रसंगानंतर बरेच दिवस उलटून गेले. आता सगळ्या गावाला माहीत झालं होतं की गेनू पाटील कमळीवर कित्येक दिवसांपासून हात टाकतोय. गावभरात ही गोष्ट कुजबुजली जाऊ लागली होती. पाटील एवढा चांगला माणूस असूनही त्यानं असं कसं केलं याचं लोक नवल करीत. नक्कीच कमळीनेच पाटलाला जाळ्यात फसवले असणार असे लोक म्हणत. सगळ्या गावाला कळलेय ते मंगळूला कसे कळत नाही याचेही लोक नवल करीत. पण मंगळूला हे सगळं कळत होतं, फक्त ते थांबवणं त्याच्या शक्तीपलीकडे होतं. याच मनस्थितीमुळे मंगळू एव्हना दारूच्या पूर्ण आहारी गेला होता. सदानकदा दारू पिउन तो आधी निदान घरातच निपचित पडून राहायचा पण आता मात्र तो सरसकट गावात कुठेही लोळत पडलेला दिसू लागला होता. कमळीच्या दु:खाला तर पारावार नव्हता. मंगळू दारू प्यायचे सोडून दुसरे काहीच काम करीत नव्हता. त्यामुळे पाटलाकडे गेले नाही तर उपाशी मरावे लागेल हे तिला माहित होते. म्हणून कसेही मन मारून ती पाटलाकडे जातच राहिली. मंगळू आता घरात कशावरूनही तिला भांडायचा आणि मारायचा. दिलेला पैसा मंगळू दारूत उडवतो म्हणून एकदा कमळीने पाटलाकडून थेट आपल्याकडेच पगाराचे पैसे घेतले. त्यादिवशी मंगळूने तिला इतके मारले की दोन्ही पोरे मध्ये आली नसती तर तिचा जीवच गेला असता.

मंगळू कमळीशी काहीच बोलायचा नाही. तिला स्पर्श करणे तर दूरच. जे काही होत होते ते त्याच्या मनाला खूप कुरतडून काढायचे. पण पोरांच्या पोटाला पीळ बसू नये म्हणून मंगळू आपल्या मनाचा हा पीळ सहन करत होता. एक दिवस दारूच्या गुत्त्यातून मंगळू बाहेर पडला. झोकांड्या खात तो चालला होता तसा त्याची गाठ म्हैपतीशी पडली. मागे एकदा म्हैपती हा पाटलाच्या दुधाच्या हिशेबात घोटाळा करतो हे मंगळूने पाटलाला सांगितले होते आणि पाटलाने तपासल्यावर तो तसे करतो हे त्याच्या लक्षात आले होते. तेव्हापासून म्हैपतीला पाटलाच्या वाड्यावर बंदी होती, त्यामुळे तो मंगळूवर डूख धरूनच होता. मंगळूने त्याला येताना पाहिले आणि नशेत असूनही आपण त्याला टाळले पाहिजे हे त्याला लगेच कळले व तो दुसऱ्या दिशेने जाऊ लागला. आम्ही सगळे जवळच पारावर बसलेलो होतो. आम्हाला पाहून आता मंगळूचा आमच्यासमोर पाणउतारा करण्याची नामी संधी आहे हे म्हैपतीने लगेच हेरले आणि त्याने वाट बदलून कलटी मारून निघालेल्या मंगळूला मुद्दाम हाक मारून बोलावले. मंगळू म्हणाला नको घाई हाये जरा म्हणून घरी निघालोय. म्हैपती म्हणाला, आरं ल्येका तुझ्या घरात आता तुझं हाय तरी काय? जे हाय ते समदं गेनू पाटलाचं  हाय, ये वाइच इकडं. जरा चार माणसात येत जा की लेका.  तो असे बोलल्यावर आणि आम्हा सगळ्यांना पाहिल्यावर मग मंगळू नाइलाजाने हेलपाटत पाराजवळ आला. म्हैपती म्हणाला, काय मग मंगळू? वाड्यावरलं काम कसं चाललंय? कमळी वैनी म्हणे तिथं लय शेवा करतीया? पाटील म्हणे तुला शेपरेट अन कमळी वैनीला शेपरेट पगार देतुया? मजा हाये लेका तुजी. ऐन दुस्काळात दोन दोन पगार.!! आसं कंचं काम करती रं वैनी वाड्यावं? मंगळू काहीच न बोलता मान खाली घालून उभा होता. आरं सांग की ल्येका. असे म्हणून म्हैपतीने मंगळूची हनुवटी धरून बळजबरीने त्याचा चेहरा वर केला. मंगळूच्या कपाळावर उठलेली आठी मला स्पष्ट दिसत होती. तो म्हैपतीला म्हणाला, आसं काय बी न्हाई बगा म्हैपतराव. पाटलीनबाय बाळंत झाली म्हणून जाते ही वाड्यावं. आणि आवो फक्त माज्याकडंच देत्यात पगार पाटील. हिला न्हाई देत पैसे. तिला पैसे न्हाई देत? म्हणजी कमळी वैनी जे काम करती त्ये फुकाट करती काय? मायला मग आशी कामं जर ती फुकाट करीत आसंल तं एखाद्या टायमाला आमच्याकडं बी दे की पाठवून लेका तिला. म्हैपती असे बोलल्यावर मंगळूच्या कपाळावरची शीर तडातडा उडू लागली होती आणि डोळे लालबुंद झाले होते, हाताच्या मुठी त्याने करकचून आवळल्या होत्या. तशाच अवस्थेत त्याने पारावर बसलेल्या आमच्याकडे पाहीले आणि मग काहीसे विचीत्रसे हसत मला म्हणाला, पहा ना नामदेवराव, काही म्हणा म्हैपतरावाचा सोभाव लय मस्कऱ्या बगा. येंच्या नादाला कोणी लागू नये. जो लागला त्येचं  म्हैपतराव बोलून बोलून पार कातडं सोलून काढतील न्हाई का? असे म्हणून परत हा हा हा असे जोरात कृत्रिमपणे आणि अत्यंत भेसूर भकास हसत पुन्हा झोकांड्या खात मंगळू तिथून निघून गेला. खूप दारू पिल्यामुळे एवढे जिव्हारी लागलेले बाण, आणि अपमानाचे घोट गिळून मंगळू तो तसा भकास हसत होता की आजकाल वारंवार घडणाऱ्या अशा प्रसंगी तसे हसता यावे म्हणून एवढी दारू पीत होता हे मला न सुटलेले कोडे आहे. 








मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०१५

सुली

"सुलीबाय आली का नाही ओ काकू भाऊबीजेला? संप्या मुऱ्हाळी गेला का नाही?"
…….
(सुलोचना किंवा सुलीच नाव असेल तिचे. एकूण आम्हा सगळ्या पोरांपेक्षा साताठ वर्षे तरी मोठी असेल. म्हणून सगळे सुलीबाय किंवा सुलीताय म्हणायचे. मी आधी ताय म्हणायचो, आता बाय म्हणतो. गावात कधी होती नीटशी आठवत नाही. फक्त परकर झंपर आणि दोन लाल रिबीन बांधलेल्या वेण्या एवढेच आठवते तिच्या लग्नाआधीचे. कधीतरी फार पूर्वी आम्हाला काही कळू लागण्याच्या आधीच लग्न करून गेल्याने ना ती आमच्या ध्यानीमनी ना आम्ही तिच्या.
तिचे लग्न झाल्यावर कधीतरी आम्ही हायस्कुलात असताना एकदा भाऊबीजेला आल्यावर तिला पाहिली होती. ती तेव्हाची मात्र एकदम ठळक आठवते. तेव्हापासूनच दर दिवाळीत भाऊबीज हुरहूर लावायची. तेव्हापासूनच संप्या माझा जिवलग मित्र झाला. एक काहीतरी अपार आनंद होता ती दिवाळीचे ते दोन दिवस गावात असण्यात, आणि त्याच दोन दिवसांत मुद्दाम गावाच्या त्या टोकाला संप्याच्या घरी चार चकरा मारल्यावर ती एकदा दिसण्यात, तेवढ्यासाठी अठ्ठेचाळीस चकरा तिकडे मारण्यात. मी तिच्याशी त्यानंतरही बहुदा दहाएक वर्षे एक शब्दही बोललो नव्हतो. प्रेम म्हणणे मोठे धारिष्ट्य होईल पण ती जाम आवडायची हे शंभरांदा खरे आणि त्या दहा वर्षात वर्षागणिक ती आवडण्यात अपार भर पडतच राहीली हे ही खरेच.
घे ना रे अजून चिवडा गणू. असे एकदा कधीतरी ती मला म्हणाली होती. 'गणू' ही जिंदगीत कुणी मारलेली सर्वात प्रेमळ आणि गोड हाक.! एरवी नुसतेच गण्या किंवा गणप्या ऐकण्याची कानाला सवय. त्यानंतर जवळजवळ महिनाभर कितीदा एकटा असताना आरशात स्वत:ला गणू अशी हाक मारून स्वत:चा खुललेला चेहरा पाहण्यात किती वेळ घालवलाय ते काय सांगू.
ते मागच्या वर्षी सम्प्याच्या घरी एकदा सुरसुरीने पाऊस पेटवल्यावर तो बघताना पंधरा वीस सेकंद तिने माझ्या खांद्यावर नकळत ठेवलेला हात, आणि मग त्या स्पर्शाने अन त्याच्या आठवणीने अजूनही अंगावर उठणारा शहारा आणि एक अनामिकसा थरकाप.…
मोबाइलमध्ये गेल्यावर्षी गुपचूप घेतलेला तिचा फोटो अजूनही आहे, एपलॉकने हाईड करून ठेवलेला.)
….
"नाही रे गन्पा यंदा सुली येणार नाही."
"का बरे?"
"दुष्काळात कसली दिवाळी अन कसली भाऊबीज पोरा."

दिवाळीची दिवटी घेऊन तेल मागायला आलेल्या नव्या पोरांना यंदा दिवाळीची सगळी गाणी येत नव्हती. एकच दिन दिन दिवाळी हे गाणे येत होते.
त्यादिवशी माझे सगळे फटाके मी शेतातल्या वाटेकऱ्याला देऊन टाकले. म्हणालो तू वाजव नाहीतर पुढे पिकात घुसणारी वानरे पळवून लावण्यासाठी जपून ठेव.

सुलीच्या गावी दुष्काळ आहे. मी न पाहीलेल्या सुलीच्या नवऱ्याने काहीही करून निदान ती भाऊबीजेला येईल एवढी तरी तजवीज करावी ना. आळशी लेकाचा. आणि संप्याला तर बहिणभावाच्या प्रेमाची आर्तता कळतच नाही.

भाऊबिजेच्या दिवशी संध्याकाळी संप्या माझ्याकडे आला. आणि फोन मागीतला सुलीला फोन करण्यासाठी. म्हणाला माझा बेलेंस संपलाय, सुलीताई आली नाही निदान फोन तरी करतो. अर्धा तास डायल करूनही फोन लागला नाही. संप्या निघून गेला.
….
सुलीचा नंबर मिळाला. आता फोन, मग व्हाट्सप, भारी भारी प्रेमाचे मेसेज आणि मग काय काय.! मी खुशीत एक रॉकेट उडवायला अंगणात घेऊन आलो. तेवढ्यात माझा फोन वाजला म्हणून मी रॉकेट शेजारच्या हऱ्याकडे दिले आणि फोन उचलला. सुलीचा आवाज नुसत्या हेलोने ओळखला नसता तर जन्म वाया गेला असता म्हणा की माझा.
"हेल्लो हा कुणाचा नंबर आहे? मला मिसकॉल आले होते या नंबर वरून."
"सुलीबाय अगं मी गणू. ओळखलं नाही का? धारेवाडीहुन बोलतोय."
"गणू? कोण गणू? मी कोणा गणूला ओळखत नाही. असे अनोळखी नंबरावर इतके मिसकॉल द्यायला लाज नाही वाटत का?"
….
तिकडे हऱ्याने रॉकेट पेटवले होते ते भुर्रकन वर उंच आकाशात गेले आणि फाट्टदीशी आवाज करून फुटले. खेळ खल्लास. फोन कट, पत्ता कट.

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०१५

बूमरॅंग

पाटील, गावात एक नवीन पाखरू आलंय. सुभान पाटलाकडून घेतलेली तंबाखू मळता मळता किसना म्हणाला.
कोण रं?
आवं त्या गडदुल्या भिवाजीची सून.
म्हणजे कोण त्या हारकुची नवरी काय रं?
व्हय व्हय तीच. गोरी गोरी पान हाये रंगानं, आक्शी पांढरी फटक. आगदी आंगावं चुना फासल्यागत दिसतीया बगा. कुटं ती येवडी ढवळी बाय आन कुटं त्ये काळंचिंद्र आन बैलावानी माजेल हारक्या.! पाटील तुमच्या सारक्या गोऱ्यापान मर्दानंच ठीवावी आशी बाई. येक लंबर कंडा माल हाये बगा.
आरं कशाचं काय. हारक्याच्या लग्नाला गेलू व्हतु की म्या. हालापूरला. आमच्या आईचं म्हायेर. आमच्या म्हाताऱ्याचं उभं वैर व्हतं सासूरवाडीवाल्यांबरुबर. म्हणून जिवंत व्हता तोवर सोता बी कदी ग्येला न्हाई आणि आमाला बी जाऊ धिलं न्हाई आमच्या आजोळी. त्या लग्नाला पयल्यांदा हालापुराला गेलू व्हतु म्या. पण आजोळी तरी बी ग्येलोच न्हाई.  म्हणलं कशाला म्हाताऱ्याच्या आत्म्याला दुखवा? न्हाई का? म्या पाह्यली हाय तिला. माल बिल काय न्हाई, निस्तीच पांढरी पाल हाये बस. मला काय नगं. तुला येवडी पसंत हाये तर जाय की तूच घ्ये तिला. पण लक्षात ठीव किसना, मायला त्यो हारक्या म्हंजी खरंच बैल हाये. त्येला कळालं आन त्येचं डोस्क फिरलं तर तुला आशी काही ढुशी मारील का परत तू काय ताठ उबा ऱ्हाणार न्हाईस.
सुभान पाटील म्हंजी पंचक्रोशीताला सगळ्यात रंगेल गडी. त्येनं गावातच न्हाई तर आजूबाजूच्या गावांत बी किती अन कुटं कुटं श्यान खाल्लं आसंल अन किती पोरी अन बायांचा नास केला आसंल त्येला गणती न्हाय. या नादापायी त्येनं दोन चार जणांचं खून बी पाडलं आसल्याचं गावात बोललं जातंया. त्येचा बाप आर्जून पाटील मातुर चांगला व्हता. आधीच पाटीलकी आन वरून कामाची आवड असल्यानं त्येनं कष्ट करून रग्गड पैका कमावला व्हता. पण पोराचे आसले धंदे पाहून बिचारा साठीच्या आदीच कळवळून म्येला. ऐन तरनाईत येवडा पैका अन पाटीलकी मिळाल्यावर तर सुभानराव मोकाट सुटला. नको नको ते घाणेरडे धंदे त्येनं केले. फुकटे गावगुंड पोसले आसल्यानं कुणी त्येच्या इरुद येक सबुद बी काढीत नसंत.
किसना त्येच्यापेक्षा बराच मोठा असूनबी त्येचा मैतूर व्हता, मैतूर म्हणण्यापरीच त्येचं बांडगुळंच म्हणाना. पाटलाच्या परतेक धंद्यात हाच त्येला जोडी आसे. पाटलाच्या उष्ट्या खरकट्यावर ताव मारायचा येक बी चानस त्यो सोडीत नसं. आपली थुकी जरी पडली तं लगोलग झेलणारा आसल्यानं पाटील बी त्येला नेहमी जवळ करी.  
ग्येली कित्येक वरसं दोगांच धंदं बिनबोभाट चालू व्हतं.

येक दिवस असाच किसना वाडयावं आला, आन आल्या आल्या म्हणाला, काय पाटील? ती हारक्याची पांढरी पाल मला नगं म्हंतालात ना तवा? आन मला सांगल्याबिगर गपचिप डाव बी क्येलात व्हय?
आरं काय बोलतुयास? त्वांड हाय का xxx? बोलातुयास की हागतुयास रं सुक्काळीच्या.? कोण पाल? अन कंचा डाव? 
आवं ती भिवाजीची सून, हारक्याची बायकू म्हणतुया मी .
हा मंग तिचं काय झालं?
तिचं काय न्हाई झालं मालक, तिला झालंय, एक प्वार तीन वर्सापूर्वी. आता त्ये गावात फिरतंय. आन आक्षी तुमचाच मुखडा घेतलाय पोरानं. कोणी बी जुनं जाणतं माणूस ज्येनं तुमास्नी ल्हानपणी पाहिलंय ते सपस्ट सांगल की ही तुमचीच निपज हाय म्हणून.जसं तुमी दिसायचा ल्हानपणी आगदी तसंच दिसतया ते प्वार. 
काय सांगतूस? आरं लग्नात दिसली व्हती तवापासून म्या तिला परत पाह्यली सुदीक न्हाई. प्वार काडायचं तं लांबच राह्यलं.
काय सांगता मालक? मग पोरानं तुमचा तोंडावळा कसा घ्येतला म्हणावा?
नक्की प्वार माज्यावानीच दिसतंय म्हन्तूस?
म्हणजे काय मालक? आवो येक्शे अन येक टक्के तुमीच.
किसना आरं आता माज्या ध्यानात आलं. आमचा म्हतारा नव्हं तर आमची मायच आमास्नी मायेरी न्येत नव्हती, येकटीच जात व्हती. नक्कीच आमच्या म्हताऱ्यानं सासुरवाडीला झ्येंगाट जमिवलं आसणार. म्हणूनच माय आमास्नी तिकडं  न्येत नव्हती. तरी म्हणलं म्हातारं तर सरळ सादं व्हतं आशीच सगळी गावातली लोकं म्हणत्यात मग आमच्यातच हा रंगेलपणा कुठून आला. आज कळलं. म्हंजी म्हातारं थेट सासुरवाडीतच रंग उधळीत व्हतं तर. मायला मानला बरका आमच्या आबाला. मजा केली पर पण ह्या कानाची त्या कानाला खबर लागू धीली न्हाई भादरानं.
 म्हंजी प्वार तुमच्या नव्हं तर थोरल्या मालकाच्या उद्योगामुळं तुमच्यावानी दिसतंय म्हणा की.
आरं व्हय की रं खरंच. आसं म्हणून हसून दोगांनी टाळ्या घेतल्या.
 म्हंजी आता हारकु तुमचा दाजी झाला की मालक. हा हा हा.! पर मालक कावणार नसाल तं येक गोष्ट सांगायची व्हती
बोल
तुम्ही नगं म्हणालात तवा मी तुमास्नी न सांगता येकदा तिकडं चानस माराया गेलू होतु. पर हारक्यानं मला वाटंतच हाडकला. म्या म्हनालू सुबान पाटलानं पाठीवलंय तुज्या म्हताऱ्याकडं काही रक्कम निगतीया ती घ्यायला चाललोय. तर त्यो मला म्हणतो की माज्या बा नं कदी कोणती रक्कम घ्येतली न्हाय. आमाला तुमची गरज न्हाय. माझा म्हतारा कष्टकरी व्हता. कदी कुणापुडं हात न्हाई पसरलं त्येनं. काहीबी सांगू नको. म्या चांगला वळीकतो तुला. जर परत तू न्हाई तर तुजा सुबान पाटील इकडं वाकडी नजर टाकाया परत आलात तर शपथ घेऊन सांगतो की तुमचं डोळं न्हाई फोडलं त भिवाजीचं नाव सांगणार न्हाई. आमची खाण तुमच्या पाटलावाणी गावजानी न्हाई. तवा गप मापात ऱ्हावा. गावची चार लोकं आजूबाजूला व्हती पाटील तरीबी तेन्च्यासमोर तुम्हाला त्यो आसं घालून पाडून बोलला रांडीचा.  
काय? आमची खान गावजानी हाय आसं म्हणाला त्यो?
आरं मग त्वा मुस्काड कसं फोडलं न्हाई त्या भोसडीच्याचं?
 मालक अवो आजून लोकात तमाशा झाला आसता म्हणूनशान गप बसलो. आणि तसाबी गडी आडदांड हाये त्यो. अन मला म्हाईत व्हतं की आपल्याला बी नक्की वखुत मिळंल त्येचं नाक ठेचाया. आता त्यो वाखुत आलाय पाटील. तुमच्या अपमानाचा सूड घ्याया हीच येळ हाये. तुमाला गावजाना म्हनतुया ना, चला आता त्येलाच जाऊन सांगू की कसा त्येचाच ल्योक एका गावजानीच्या पोरीच्या पोटी जल्माला आलाय त्ये.!
"व्हय व्हय नुसतं त्येलाच का? समद्या गावाम्होरं तमाशा करून आबरू काडू भूसनळ्याची, चालच तू." आसं म्हणून दोगं तडक हारक्याच्या घरी निगालं.     
हारक्याच्या घराजवळ त्ये पोचले तवा दारात एक पोरटं मातीत काहीबाही चिवडीत बसलं व्हतं. मायला ह्येच का रं त्ये गाभडू किसना? आरं खरंच की आगदी माझ्यावानीच तोंडावळा हाये की रं रांडीच्याचा. आमच्या ल्हानपणीच्या फोटूत आम्ही आगदी आसंच दिसतुया की रं.!!
आसं म्हणून पाटलानं त्या पोराला जवळ बोलीवलं व इचारलं तुवं नाव काय रं पोरा? पण प्वार काही न बोलता टिंगराला पाय लावून थेट घरात पळून ग्येलं. मग पाटील अन किसना अंगणात आलं. सुभान पाटील घराच्या दाराकडं त्वांड करून जोरात वरडला. 
"हारक्या आरं ये हारक्या, तुह्या मायला भायेर निग सुक्काळीच्या."  आसं म्हणून पाटील हारक्याला आजून घाणेरड्या शिव्या देत वरडू लागला
सुभान पाटलाच्या वरड्यानं गर्दी जमा व्हाया लागली. तसा हाराकू लगबगीनं घराभायेर आला अन पाटलाला म्हणाला काय झालं पाटील? ह्ये बगा तुमचं ज्ये काय म्हणणं आसंल त्ये आपुन पुन्हा कधीतरी मिटवू, पर आज नगं. आज माज्या घरी पाव्हणं आल्यालं हायती.
आरं तुझा पावणा कोण मोठा गोपाळशेट हाये का रं?. पावणा हाये तं बोलीव त्या मायचोद्याला बी भायेर. मायला दोगांचीबी आयमाय लावून टाकतो हिथल्या हिथं. मला गावजाना म्हन्तुस काय रं घाणघाल्या?
पाटील म्या तुमास्नी हात जोडतो. सासरा अन त्येच्या सोबत दुसरी सासुरवाडीची मंडळी आल्याली हाये. त्येंच्याफुडं तमाशा नगं. म्या उद्या सोता तुमच्या वाड्यावं येतो तिथं काय झालं आसंल ते पाहू. पण आता इथून जा.
आरं हाड. मला गावजाना म्हन्तुस व्हय रं? आज म्या समद्या गावाला दावून देणार हाय कोणाची खाण गावजानी हाये ती. तुजा सासरा हिथं हाये ह्ये ब्येसच झालं. बोलीव तुज्या कार्ट्याला अन सासऱ्याला बी भायेर. गावकऱ्यानू आज म्या तुमास्नी दावतो या हारकुच्या वंशाच्या दिव्यात कंचं त्याल पडलंय त्ये.!! गावकऱ्यानो, आरं ह्या हारक्याचा सासरा म्हंजी त्या पांढऱ्या पालीचा बाप नामर्द हाये नामर्द. आरं ये की नामर्दा भायेर. का बांगड्या भरून बसलाइस आतच? असे सुभान पाटील ओरडू लागला. किसना बी शिव्या देऊन त्येला साथ करीत व्हताच. भायेर गावाची लोकं जमल्याली अन घरात सासरची मंडळी त्यामुळं हारक्याला काय करावं त्ये सुधरंना. त्यो भांबावून पाटलाला शांत व्हा पाटील म्हणून इनवित राह्यला.  
तेवढ्यात भायेर ह्यो समदा गडबड गोंधळ चालू आसतानाच घरातून हारकुचा सासरा काय भानगड हाय त्ये पहाया भायेर आला.
सासरा भायेर येउन दरवाज्यात उभा ऱ्हायला. सुभान पाटलाचं त्येच्याकडं लक्ष ग्येलं, आणि त्याला पाहताच ओरडणारा पाटील एकदम गप्पगार झाला. त्याचा रागाने लालबुंद झालेला चेहरा अचानक पांढरा फटक पडला. किसन्याच्या तोंडातून बी सबूत फुटंना. त्याला पुढं येताना पाहून पाटलानं लागलीच मान खाली घातली आणि उलटा फिरून काहीही न बोलता तो अन किसना आशे दोगंबी तडक माघारी निघून ग्येले.
तमाशा नको म्हणून दारातून भायेर येणाऱ्या सासऱ्याला तसेच मागच्या मागे घरात वळवून हारकु आत घेऊन गेला. नेमकं काय झालं अन येवढा रागावलेला सुभान पाटील अचानक पाहुण्याला पाहून का घाबरला याचं नवल करीत जमल्याली गर्दी बी हळूहळू पांगून गेली. 
कोणाच्या ध्यानात आलं व्हतं की न्हाई कुणास ठाऊक पण पाटील हारक्याच्या सासऱ्याला बगून लगोलग माघारी फिरला त्याला एक कारण व्हतं. त्या माणसाला बगताच पाटलाचा सारा माज खर्रकन गळून पडला व्हता कारण, जवा त्यो माणूस दारात आला अन पाटलानं त्येच्याकडं पाह्यलं तवा त्येला आसं वाटलं की जणू त्यो दरवाजा नसून मोठा आरसाच हाये, अन पाटील त्या आरश्यात सोतालाच पाहतोय. त्या माणसाचा चेहरा आगदी शेमटू शेम सुभान पाटलावानीच व्हता. त्ये पाहताच सुभान पाटलाच्या लगेच लक्षात आलं की जे हारक्याचं प्वार हे आपल्या बापाच्या रंगरेलीची निपज म्हणून जल्माला आलंय आसं सिद्ध करून त्यो हारक्याची इज्जत काढणार व्हता त्ये प्वार पाटलाच्या बापाच्या बीजाची निपज नसून उलट सोता पाटील हाच हारक्याच्या सासऱ्याची निपज व्हता. ह्यो हारक्याचा सासरा नक्कीच सुभान पाटलाच्या आईच्या म्हायेराचा यार असणार अन म्हणूनच त्येचा बाप आर्जून पाटील त्यास्नी कदीच आजोळास जाऊ द्येत नव्हता. आणि हारक्याचा सासरा न्हवं तर बहुतेक सोता आर्जून पाटीलच नामर्द व्हता अन म्हणूनच सुभान पाटलाला दुसरं कंचच भावंड न्हवतं.

मंगळवार, १४ जुलै, २०१५

लिविंग इज समथिंग डीफरंट द्यान स्टेयिंग अलाइव


रविवारी कसारा ट्रेनमध्ये भेटला एक अवलीया. पायात एक तुटकी पण दोऱ्याने शिवून जोडलेली ती ब्लू व्हाईट स्लीपर जी आजकाल दिसतही नाही ती घातली होती त्याने. तीही नावापुरतीच. जमीन आणि पायातले अंतर जेमतेम चार मिलीमिटरचे ठेवेल एवढी घासलेली. शरीरयष्टी बऱ्यापैकी जाडीजुडी म्हणावी अशी. हाफ शर्ट आणि पॅंट घातलेली होती आणि दुसऱ्याच्या हातातला पेपर डोकावून वाचत होता म्हणजे किमान हायस्कुलपर्यंत शाळा शिकलेला असावा. वय पन्नाशीच्या आसपास असावे. गळ्यावर, उघड्या छातीवर फाटलेली त्वचा, हातावरही नायटासदृश विकारांच्या खुणा असा काहीसा अवतार होता त्याचा.
मी आजपर्यंत धम्मक पिवळे दात असलेली माणसेही पाहिली आहेत, पण याचे दात अक्षरश: काळेकभिन्न होते. त्यांची ठेवणसुद्धा वाडग्याच्या कडेला फुटक्या वेगवेगळ्या आकाराच्या फरश्या कंपाउंड म्हणून वाकड्या तिकड्या रोवून ठेवाव्यात तशीच होती. मात्र तरीही तो ओंगळवाणा नव्हता. कपडे मळके नव्हते.
खिडकीच्या शेजारी माझ्या समोरच बसला होता तो. कुणीही विचारले नसूनही आजूबाजूच्यांना ट्रेन कधी सुटेल आणि कधी कुठे पोचेल हे अविरत बडबड करून सांगत होता. माझा मित्र एक पाण्याची बाटली घेऊन आला. आम्ही त्यातून घोट घोटभर पाणी प्यालो. तेवढ्यात डब्यात पाणी बॉटल विकणारा आला. त्याने त्याचेकडून एक बाटली घेतली आणि म्हणाला ही मला अशीच दे. विक्रेता म्हणाला अशीच म्हणजे? तो म्हणाला म्हणजे मी पैसे नाही देणार. विक्रेता म्हणाला असे कसे? तो म्हणाला अरे माझे आशीर्वाद लाभतील तुला, धंद्याची भरभराट होईल. विकणारा म्हणे फुकट दिल्याने धंद्याची भरभराट कशी होईल? तेवढ्यात विक्रेत्याचा दुसरा जोडीदार लांबून ओरडला, अरे त्याचेकडून घे ती बाटली आधी. उगीच टाईमपास नको. मग त्याने ती बाटली परत केली. त्यानंतर डब्यात वडापाववाला येवो की भेळवाला, त्याने प्रत्येकाकडे त्याची वस्तू फुकटात मागीतली पण कुणीही दिली नाही. परत एक पाण्याच्या बाटलीवाला आला याने परत त्याचेकडेही बाटली मागीतली. त्याने दिली आणि वीस रुपये मागीतले. हा म्हणाला फुकट दे. बाटलीविक्याने त्याचे हातातून बाटली परत हिसकून घेतली. अशा प्रकारे प्रत्येक विक्रेत्याकडून नकार घेऊनही त्याच्या चेहऱ्यावर नाराजीचे, दु:खाचे अथवा क्रोधाचे इवलेसेही एक्स्प्रेशन उमटले नाही. तो भिकारी नव्हता पण मी तर कित्येक भिकाऱ्यांन्नाही भीक न दिल्यावर केविलवाणा चेहरा केलेले अथवा अगदी शिवी दिलेले पाहिले आहे. पण याचे रसायन काही वेगळेच होते. मग त्याने माझ्याकडे पाणी मागीतले मी त्याला माझी बाटली दिली. त्याने बाटलीला तोंड लावूनच पाणी पिले. त्याच्या काळ्या दातांचे दर्शन घेतल्यावर मी त्याने उष्टी केलेली बाटली परत घेणे शक्यच नव्हते. मी त्याला म्हंटले की ती बाटली तुम्हालाच राहू द्या.
त्याचेकडे एक भरलेली बाजाराची पिशवी होती. ती त्याने आम्ही समोरासमोर बसलेले असल्याने आमच्या दोघांच्याही पायाच्या मध्ये ठेवली होती. मग त्याने त्या पिशवीत हात घालून एका प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली दुसरी एक पिशवी काढली आणि तिच्यातून थोडी तंबाखू हातावर घेतली आणि मला चुना मागीतला. मी म्हणालो मी तंबाखू खात नाही. मग त्याने बसल्या जागेवरूनच इकडे तिकडे वळून ज्या कुणाचे त्याचेकडे लक्ष जाइल अशा प्रत्येकाकडे चुना मागितला. पण त्याला कुणीच चुना दिला नाही. मग तो उठला आणि त्याच्या जागेवर पिशवी ठेऊन दुसरीकडे चुना आणायला गेला. एकाच मिनिटात हातात चुन्याची डबी घेऊन तो परत आला. मी म्हणालो अहो कुणाची डबी आणलीत? त्याला चुना काढून परत करा की ? तो म्हणाला नाही नाही त्याने ती मलाच देऊन टाकली आहे. 
मग त्याने तंबाखूचा तोबरा भरला. आमच्या शेजारी एक ट्रेकर्स ग्रुप बसला होता ती पोरे याचे चाळे पाहून त्याचेवर जोक्स मारून हसत होती. पण त्याला त्याने काडीचाही फरक पडत नव्हता. त्याची अविरत बडबड चालूच होती. या पोरांनी काहीतरी खाऊ खायला काढला. याने त्यांना खाताना पाहीले. आणि म्हणाला खा खा तुम्ही बिनधास्त खा. त्याला ते काय खाताहेत ते खायचे असावे पण जसे विक्रेत्यांकडे तो सरळ सरळ वस्तू मागत होता तसे त्याने या पोरांकडे सरळ नाही मागीतले. पण त्या पोरांनी त्याचेकडे लक्षही दिले नाही उलट त्याचेवर काहीतरी कमेंट मारून त्यांनी एकमेकांच्या टाळ्या घेतल्या.
मी मित्राला म्हणालो की मला वाटते हे एक परफेक्ट स्टोरी मटेरीयल आहे आपण याची थोडी अजून माहिती काढू. मी मग त्याला विचारले की तुमचे गाव कोणते? त्याने आसनगावजवळचे कोणतेसे गाव सांगितले. तो आसनगावला उतरून तिथून एसटी किंवा जीप अथवा रिक्षा पकडून गावी जाणार होता. (याने ट्रेनचे तिकीट काढले असेल का? असा विचार माझ्या मनात आला. आणि ट्रेनमध्ये एकवेळ तो सुटेल पण एसटीवाले त्याला विनातिकीट प्रवास करू देतील?) मी म्हणालो इकडे कशाला आला होतात तुम्ही? तो म्हणाला बाजार करायला, ही काय बाजाराची पिशवी.! मी त्याला विचारले इथे बाजारात तुम्हाला पैसे न देता लोक वस्तू देतात? तो म्हणाला हो तर. म्हणजे वस्तूंच्या दुकानावाले वस्तू देत नाहीत पण भाजीवाले देतात थोडी थोडी भाजी. ही काय मी सगळी पिशवी भरून घेतली आहे. आणि एवढेच नाही तर हे बघा एका दुकानदाराने तर मला चिकनसुद्धा दिले आहे असे म्हणून त्याने त्याच्या पिशवीतली एक दीडेकशे ग्राम चिकन असलेली काळी पिशवी काढून दाखविली. मी या माणसाच्या या अंगभूत गुणाने अचंबित झालो होतो. मला तर माझी स्वत:ची दुसऱ्याला दिलेली एखादी वस्तू त्याला मी परत मागितल्याने वाईट तर वाटणार नाही ना अशा विचाराने परत मागण्याची लवकर हिम्मत होत नाही,  आणि हा मनुष्य या क्रूर व्यावहारिक जगात सहजपणे कुणाकडेही त्याला हव्या त्या वस्तू खुशाल आणि फुकट मागत होता. आणि त्यात आजतागायत यशस्वी देखील झालेला होता.
मला एकंदर त्याच्या जीवनशैलीबद्दल अंदाज आला होता. मग मी त्याला थोडे वेगळे प्रश्न विचारायचे ठरविले. मी विचारले तुम्हाला मोदी कोण आहेत हे माहित आहे का? तो म्हणाला हो माहित आहेत. मी म्हणालो कोण आहेत मोदी? तो म्हणाला "सरकार". त्याच्या या उत्तरावर ट्रेकर्स ग्रुप मधून हशा उसळला. त्या हसण्याने मात्र त्याला वाईट वाटले असावे. मी त्याच्याकडे पाहिले. त्याने एका विचित्र नजरेने माझ्याकडे पाहून तू मुद्दाम माझे हसे करण्यासाठीच तर हा प्रश्न विचारला नाहीस ना असे नजरेनेच मला विचारल्यासारखे वाटले. त्याचा चेहरा काहीसा उतरला असावा असे मला जाणवले. मला त्याचे फार वाईट वाटले. मी मग त्याला प्रश्न विचारणे बंद केले. मित्र म्हणाला अजून माहिती काढ ना त्याची. मी म्हणालो नको रे बाबा, काय घ्यावे पुन्हा लोक त्याला हसले तर तो माझ्या कानाखाली देखील खेचायचा. पण मित्र म्हणाला असे काही होणार नाही थांब मीच विचारतो तू नुसते ऐक. पण कथा भन्नाट झाली पाहीजे. मी म्हणालो अरे एवढे पुरेसे आहे यात मी माझ्या मनाने त्याच्या कॅरेक्टरला अजून कंगोरे जोडून लिहील रे. पण मित्र म्हणाला नाही आपण त्याला अजून विचारुच. मग आम्ही दोघांनीही परत त्याला थोडे प्रश्न विचारले. त्यातून त्याचेबद्दल मिळालेली माहिती अशी. तो कुठलेही काम, धंदा, नोकरी करत नाही. तो फक्त आठवड्यातून तीन वेगवेगळ्या गावच्या बाजारांत जातो. आणि तिथून असाच फुकट मागून बाजार करतो. त्याला घरचे कोणी नाही. लग्न झाले नाही. तो बहिणीकडे राहतो. पण फुकट कसे रहावे म्हणून असा बाजार करून आणतो. कधी कधी विनातिकीट प्रवास करता येत नाही, रिक्षा अथवा जीपवाले लोक मारायला धावतात मग अशावेळी त्यांना द्यायला पैसे असावेत म्हणून तो दर शनिवारी मारुतीच्या मंदिरात रुईच्या पानाच्या माळा बनवून विकतो. त्याने खिशातून एक डायरी काढून त्यात ठेवलेल्या दहा दहाच्या दोन नोटादेखील मला दाखविल्या.  खरेतर देवापुढे अशा वस्तू विकून धंदा करण्याच्या प्रथांचा मला अत्यंत तिटकारा आहे. असा कसा देव जो भक्तांना लुबाडायला इतर भामट्यांना मदत करतो असे मला वाटते. पण तो मारुतीच्या माळा विकतो हे ऐकल्यावर मी लौकिकार्थाने नास्तिक असलो तरीही माझी देवाप्रतीची ही तक्रार निदान आतापुरती तरी दूर झाली आहे. भलेही भक्तांना लुबाडणारे लाखो लोक असा धंदा करत असोत पण देव ते सगळे खपवून घेतो कारण देवाला अशा एखाद्या भणंग वेड्याला तिकिटाचे पैसे देत नाही म्हणून मार खाण्यापासून वाचवायचे असते. या अशा एकाला वाचविण्यासाठी देव इतर हजार लुबाडणारांनाही सहन करतो.
मी त्याला म्हणालो तुम्ही मुंबईला का जात नाही मग? तिथे काही काम मिळेल. कधी गेला आहात का मुंबईला? तो म्हणाला, नाही गेलो कधीच. आयुष्यभर कसारा-आसनगाव ट्रेन प्रवास करणारा माणूस कधीच मुंबईला गेला नाही हे एक आश्चर्यच नव्हे काय? मग तो म्हणाला एकदा गेलो होतो पण मुंबईला नव्हे तर ठाण्याला. मी म्हणालो कशाला? तर म्हणाला ते xy जातीचे अधिवेशन होते ना तेव्हा खूप गाड्या पाठविण्यात आल्या होत्या, त्यात बसवून मला घेऊन गेले होते अधिवेशनाला. खूप छान होते अधिवेशन कारण आम्हाला पैकेटमध्ये भरून जेवण देखील तिथे फुकट दिले आणि मग परत गावीही गाडीतच बसवून आणून सोडले. मी मनातच म्हणालो वाह रे जात.!! अधिवेशनासाठी उपस्थितांची संख्या एकाने वाढविणारा एवढीच जातीला त्याची किंमत. बाकी आयुष्याला जात नुसतीच बिनकामाची फरफटविलेल्या गोंदणासारखी कायमची माखलेली.
ते काही असो त्याच्या आयुष्यात प्रचंड वेदना होती पण चेहऱ्यावर निरंकार भाव होते. ही निर्विकारता त्यास बिकट परिस्थितीतून साकारली होती की अपघाताने साधली होती हे माहित नाही, पण याच निरपेक्ष निरंकार स्थितीला पोचण्यासाठी ज्ञानी लोक आपली अवघी आयुष्ये तपश्चर्येत घालवितात हे मला माहित आहे.

जीवन म्हणजे तरी काय असते? किती माणसे खऱ्या अर्थाने आयुष्य जगतात? आणि किती नुसतीच जिवंत असतात? नुसते बक्कळ पैसा कमाविणे, शरीरास भोग देणे आणि ऐषोरामात लोळणे म्हणजे जगणे काय? 
'द कृड्स' या चित्रपटात एक वाक्य आहे. अश्मयुगातील आपल्या कुटुंबाला अनेको हिंस्त्र पशुंपासून वाचविण्यासाठी नेहमी एका गुहेतच बंद करून ठेवणाऱ्या बापाला त्याची नुकतीच वयात आलेली मुलगी म्हणते,  "धिस इज नॉट लिविंग, धिस इज जस्ट नॉट डायींग." मी अजूनही हे ठरवू शकलो नाहीये की हा माणूस नुसताच जिवंत आहे की थोर आणि अत्यंत कठोर तपश्चर्येपश्चात प्राप्त होणाऱ्या स्थितीस सहजपणे पोचून खऱ्या अर्थाने आयुष्य जगतो आहे?

सोमवार, २२ जून, २०१५

टाइम वार्प- युद्ध


1.
तुम्ही कोण आहात?
मी तुझा पप्पा आहे बेटा
मग इतके दिवस तुम्ही कुठे होता?
मी ना खुप लांब गेलो होतो काम करण्यासाठी.
तुम्ही इथे जवळच काम का करत नाही डॅनियलच्या पप्पांसारखे? म्हणजे तुम्हीही रोज घरी याल.


2.
पप्पा तुमचा ड्रेस असा का आहे?
मी सोल्जर आहे ना बेटा म्हणून.
सोल्जर म्हणजे काय पप्पा?
म्हणजे जे लढाई करतात ते.
मग लढाई म्हणजे काय?
म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्या लोकांना मारणे.
तो डॅनियल मला खुप त्रास देतो पप्पा तुम्ही त्याला माराल?

3.
पप्पा तुम्ही लढलात ही लढाई?
हो बेटा.
वॉव.! तुम्ही किती दुश्मनांना मारले?
23 जणांना.
वॉव पप्पा तुम्ही किती ब्रेव आहात.! आय एम् प्राउड ऑफ यु.!!
वुई शुड बी प्राउड ऑफ अवर नेशन बेटा. एक अत्यंत अवघड आणि निर्णायक विजय मिळविला आहे आपल्या देशाने..

4.
पप्पा आता पुन्हा युद्ध होईल का हो?
माहीत नाही बेटा, त्या एशियन देशाशी चर्चेतून तोडगा निघाल्यास उत्तम.
पण युद्ध झालेतर तुम्ही जाणार?
हो जावेच लागेल.
देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे.

5.
पप्पा तुम्हाला 'बी' क्रॉस मिळाला ना?
हो. आपल्या देशाचा दूसरा सर्वोच्च मिलिटरी सन्मान आहे तो.
यावेळी तुम्ही किती जणांना मारले?
मला नक्की माहीत नाही बेटा. पण खुप लोक होते.
यु मस्ट बी वेरी प्राउड ना पप्पा.
कुणाही सैनिकासाठी ही खुप गौरवाची बाब आहे बेटा.!!

6.
पप्पा पहा तुमचे नाव टीव्हीवर किती वेळा घेतले जातेय आज. दुसऱ्या महायुद्धानंतरचे हे शत्रुदेशाच्या सर्वाधिक केज्युअल्टीज् झालेले युद्ध होते. यु आर अ हीरो पप्पा. नॉट जस्ट हीरो, यु आर द रियल लाइफ सुपरहीरो फॉर मी.!!
हीरो वगैरे काही नाही बेटा. आपण जिंकणारच होतो. एवढासा तो देश आपल्या अफाट सामर्थ्यापुढे काय टिकणार होता?

7.
पप्पा तुम्हाला 'ए' क्रॉस डिक्लेयर झालाय. आय एम सो हॅप्पी.!!
व्हाट्स देअर टू बी सो हॅप्पी डियर?
म्हणजे काय पप्पा? अशा कट्टर देशाबरोबर लढून तुम्ही हजारो दुष्मनांना मारले आहे. आपला मोठा विजय झाला आहे. तुम्हाला देशाचा सर्वोच्च सन्मान, 'ए' क्रॉस मिळाला आहे. बी आणि ए असे दोन्ही क्रॉस मिळविणारे तुम्ही आपल्या देशाच्या इतिहासातले केवळ चौथे वीर आहात. आणि जीवंतपणी तो मिळविणारे पहिलेच.!! इट्स अनडाउटेडली द मोस्ट प्लीजन्ट थिंग टू हॅप्पन इन एनिबडिज् लाइफ पप्पा.!!

8.
पप्पा आता कसे वाटतेय तुम्हाला? स्वत: प्रेसिडेंटनी तुम्हाला सेल्यूट केला 'ए' क्रॉस प्रदान करताना.!!
त्यात काय विशेष वाटायला हवे?.
विशेष कसे नाही पप्पा? अहो असे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालेय. यु आर ग्रेटर द्यान द ग्रेटेस्ट पप्पा.
पण याची खुप मोठी किंमत मोजली आहे मी बेटा. जेवढ्या शत्रुंना मी आजपर्यंत मारले त्याहुन अधिक सहकारी गमावले आहेत. आधी विजयाच्या उन्मादात मला हे जाणवत नसे पण आता जाणवते. अरे कित्येक वेळा आपल्या देशासाठी वेडे होऊन लढणाऱ्या तुझ्या वयाहून लहान मुलांना मी मारले आहे. या अशा लढण्यात काय पुरुषार्थ? आणि छोट्या मुलांना मारण्यात कोणती देशभक्ती?  बेटा कोणताही विजय अंतिम नसतो हे युद्धाचे सर्वात मोठे अपयश आहे.
पण पप्पा मी तर सेना जॉइन करुन देशासाठी तुम्हासारखे पराक्रम गाजविण्याचे स्वप्न बघतो आहे. तुम्ही असे काय बोलता आहात? मी मिलिटरी जॉइन करू की नको?
या प्रश्नाचे मला हवे असलेले उत्तर मी तुला देऊ शकत नाही.
पण का पप्पा?
कारण आज माझ्या छातीवर हे 'ए' आणि 'बी' असे दोन्ही क्रॉस आहेत बेटा.!

सोमवार, १८ मे, २०१५

विषवल्ली


जागतिक मंचापुढे एक ओघवते भाषण देऊन जगातला तो सर्वात बलाढ्य देशाचा प्रेसिडेंट स्टेजवरून खाली उतरला आणि थेट आपल्या कक्षाकडे निघून गेला. तो निघून गेल्यावरही कितीतरी वेळ सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत राहीला.

तिकडे प्रसिद्धी सचिवांस निरोप धाडून प्रेसिडेंटने अर्ध्या तासात अहवाल मागितला. सुरक्षा विभाग प्रमुखास समोर बोलावून एकंदरीत सर्व सुरक्षेचा आढावा घेतला. सुरक्षा आढाव्याच्या बाबतीत प्रेसिडेंट अतिशय काटेकोर असतात. किती गम्मत आहे ना, जगातला सर्वात सुरक्षित माणूस सुद्धा किती घाबरत असतो.!

'विकेंद्रीकरणातून लोकशाही सुदृढीकरण' या परीसंवादात आपली मते मांडली होती प्रेसिडेंट महाशयांनी. आजकाल जगभर वाढत चाललेल्या राजकीय क्षेत्रातील कौटुंबिक वर्चस्वाला छेद देण्याचे आव्हान करणाऱ्या त्या भाषणाने श्रोतेवृंद रोमांचित झाले होते. आजतागायत कुणीही जागतिक नेता एवढ्या स्पष्टपणे या विषयावर बोलला नव्हता. आणि तेव्हा तर संबंध सभागृह निस्तब्ध झाले होते जेव्हा अगदी स्वत:च्या देशातही आपल्याच कुटुंबियांना भावी नेते म्हणून रेटणाऱ्या प्रवृत्तीचा त्यांनी निषेध केला, तेही एका माजी प्रेसिडेंटच्या उपस्थितीत जे स्वत: एका माजी प्रेसिडेंटचे पुत्र होते. कुणीही एखाद्या विशिष्ट घराण्यात जन्मला म्हणून सुयोग्य नेता ठरू शकत नाही. कुणी महान अभिनेत्याचा मुलगा अथवा कुणी महान धावपटूची मुलगी तशीच महान अभिनेता अथवा धावपटू असेल असे नाही. नेता, अभिनेता वा खेळ विजेता कुणीही आपल्या संततीस आपल्यावर लादत असेल तर त्यांस झुगारून द्या असे आवाहन प्रेसिडेंटने सगळ्या जगातील जनतेस केले होते .

थोड्याच वेळात प्रसिद्धी सचिव आले. प्रेसिडेंटने त्यांस विचारले काय कसा काय प्रभाव?

साहेब ओवरव्हेल्मिंग प्रतिसाद येतोय जगभरातून. हे पहा चीन, रशियाच नव्हे तर अगदी उत्तर कोरियातही भाषण लाइव्ह दाखविले गेलेय. बीबीसी, सीएनएन, अल जजीरा, फॉक्स न्यूज आदि सर्व आघाडीच्या वाहिन्यांनी प्राइम टाईमला आपल्याच भाषणाची समीक्षा करणारे कार्यक्रम जाहीर केले आहेत. जगभरात या क्षणाला हरेक टीव्हीवर आपल्याच भाषणाचे रिपीट टेलिकास्ट चालू आहे. प्रेसिडेंट हे ऐकून आत्यंतिक आनंदी झाले. त्यांनी समोरच्या टीव्हीवर बीबीसीचे रिपीट टेलिकास्ट लावण्याचा आदेश दिला. रिपीट टेलिकास्टमध्ये प्रेसिडेंट आता चालत स्टेजवर येत होते. कोटावर पर्पल टाय लावण्याचा तुझा सल्ला छान होता हं एली. छान दिसतेय रंगसंगती. प्रेसिडेंटने त्यांची पर्सनल सेक्रेटरी एली हिस दाद दिली. एलीनेही मंद हसून ती स्वीकारली. आणि प्रेसिडेंट आपले पुढचे भाषण ऐकण्यात आणि बॉटमच्या रनिंग न्यूज लाइनवर जगभरातील प्रतिक्रिया वाचून आनंदी होण्यात दंग होऊन गेले.

थोड्या वेळाने एली हळूच प्रेसिडेंटच्या कानाशी झुकली, आणि मग प्रेसिडेंटने सांगितले की त्यांना आत बोलावून घ्या. मग लागलीच बाहेर उभे असलेले देशाच्या आणि पर्यायाने जगाच्या सर्वात श्रेष्ठ गुप्तहेर संस्थेचे प्रमुख आत येउन प्रेसिडेंटपुढे उभे राहिले. टीव्हीचा आवाज कमी झाला. प्रेसिडेंटने विचारले अशी काय महत्वाची बातमी आहे? "सर बातमी युरोपातून आली आहे." "काय ते सांगा." "सर जगावर विश्वयुद्ध लादणाऱ्या त्या क्रूरकर्म्याच्या वंशाचा एक तरुण समोर आला आहे. आणि तो वेगाने लोकप्रिय होतो आहे." "काय? पण आपण तर ही विषवल्ली तेव्हाच महायुद्ध जिंकल्यावर समूळ आणि सकुळ नष्ट केली होती ना? मग हा कुठून निपजला?"

"तेव्हाच्या त्या क्रूरकर्म्याच्या काही कट्टर समर्थकांनी अगदी गुप्तपणे त्या तरुणाचा पिता आणि त्याच्याशी संबंधित सर्व कागदपुरावे यशस्वीपणे आपणांपासून लपवून ठेवले होते. त्या क्रूरकर्म्याला असा कुणी मुलगा होता अशी कुणालाही तेव्हा नोंद देखील सापडली नव्हती अन्यथा तेव्हाच त्यांस संपविता आले असते."
"पण हा त्याचाच वंशज आहे हे कशावरून? तो थापाड्यासुद्धा असू शकतो." "सर दोन वर्षांपूर्वीच हा मुलगा राजकारणात आला आहे आणि प्रचंड लोकप्रिय झाला आहे. त्याने आपला एक स्वतंत्र पक्ष सुद्धा स्थापला आहे आणि वर्षभरात एका प्रांताची सत्ता देखील हस्तगत केली आहे. कालच एका कार्यक्रमात तो त्या क्रूरकर्म्याचा वंशज असल्याची माहिती देणारी कागदपत्रे उघड करण्यात आली आहेत. आणि एवढेच नाही तर त्याचा डीएनए रिपोर्टदेखील त्या कृरकर्म्याशी तंतोतंत जुळतो आहे अशी आम्हाला माहिती मिळाली आहे."
प्रेसिडेंट आता प्रचंड अस्वस्थ झाले. महायुद्धाची भीषणता, भय हे त्यांनी ऐन बालवयात स्वत: अनुभवले होते. त्यांच्यासमोर त्या क्रूरकर्म्याचा चेहरा उभा राहीला. ते फटदिशी आपल्या सोफ्यावरून उठून उभे राहिले आणि त्यांनी सांगितले की त्वरित एक एक्स्ट्रीम प्रायोरिटी मिशन आयोजित करा आणि त्यास संपवा. गुप्तहेर प्रमुख म्हणाले, "पण सर त्याचा पक्ष मवाळ तत्वांचा आहे. 'शांती सौहार्द संघ' असे त्याच्या पक्षाचे नाव आहे. 'अहिंसात्मक लोकशाही मार्गाने लोकोद्धार' हे त्याचे ब्रीद आहे. आम्ही त्याचे पक्षाच्या अगदी कोर ग्रुप मधून माहिती काढली आहे. त्याचेपासून धोका संभवत नाही."
"तुम्ही वेडे तर झाले नाहीत? हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. आता या क्षणी मी आपणांस आदेश देतो आहे की ही विषवल्ली फोफावण्यापूर्वीच समूळ नष्ट करण्यात यावी. मला अधिक काही ऐकायचे नाही. आपण आता निरोप घ्यावा."

गुप्तहेर खात्याचे प्रमुख तो आदेश ऐकून निमूटपणे बाहेर जायला निघाले. टीव्हीवर लावलेले प्रेसिडेंटचे भाषण आता संपायला आले होते. प्रेसिडेंट एक दीर्घ श्वास घेऊन परत खुर्चीवर बसले आणि त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवायला सांगितला.

टीव्हीवर प्रेसिडेंटचे ते शेवटचे वाक्य प्रसारित होत होते ज्या वाक्यावर सभागृह टाळ्यांनी निनादून गेले होते. प्रेसिडेंट म्हणत होते की, मी स्वत: असे जाहीर करतो की माझ्या कुटुंबातील पुढच्या किमान दोन पिढ्यांतील एकही सदस्य राजकीय क्षेत्रात येणार नाही. कोणतीही संतती आपल्या माता पित्याचे गुण अथवा अवगुण घेऊन जन्माला येत नाही. प्रत्येक जीव हा स्वयंभू आहे आणि त्याची योग्यायोग्यता ही त्याच्या अभिभावकांच्या कार्यावरून नव्हे तर त्याच्या स्वत:च्या कर्तृत्वावरून ठरविली पाहिजे.

भाषण संपले आणि सभागृहात टाळ्यांचा प्रचंड गडगडाट चालू झाला.


सोमवार, २ फेब्रुवारी, २०१५

सुदाम्याचे पोहे

~सुदाम्याचे पोहे~
स्वत:च्या घरापेक्षा माझा अधिक वेळ त्याच्याच घरात जायचा. त्याची आई त्याच्यापेक्षा माझेच अधिक लाड करायची. जरा याच्याकडून काहीतरी शिक असे त्याचे रागावालेले वडील माझ्याबद्दल आणि माझे वडील त्याच्याबद्दल बोलत. त्याच्या मामाचे गाव मला त्याच्याएवढेच आणि माझे आजोळ त्याला माझ्याएवढेच ओळखी.
गोट्या खेळताना कधी मी हरलो तर तो मला हरलेल्या गोट्या परत जिंकून वसूल करुन देई आणि मी त्याचे संपले की माझा चिंचोक्यांचा डबा सगळाच्या सगळा त्याला देऊन टाकी. जित्याशी माझे भांडण झाले म्हणून त्यानेही त्याच्याशी कट्टी घेतली. जो कुणी त्याला फेगड्या म्हणून चिडवी त्याला मी बुकलुन काढत असे.
गावकीच्या माळावर मोठा चिंच होता. त्याला खुप चिंचा पिकायच्या. मी झाडावर चढून आकडे पाडी आणि तो खाली वेचत राही. किती अमाप चिंचा लागतात त्या झाडाला. कितीही पाडले तरी आकडे संपत नसत.
~सुभद्राहरण~
मनीषा आज ना माझा आवडता ड्रेस घालून आलेय. किती सुंदर दिसते ना ती या ड्रेसमधे! तो असे म्हणे आणि मलाही त्या ड्रेसमधे मनीषा अत्यंत सुंदर दिसू लागे. एकतर्फी असले की प्रेम दिवसागणिक प्रचंड वाढू लागते.त्याचेही आभाळ भेदुन वाढत होते.
तो तिला पत्र लिही. मलाही ते वाचायला देई. पण तिला देऊ देत नसे. तिने नकार दिला तर? ही भिती. छान असत ती पत्रे. तो कविताही करी. एकजात साऱ्याच प्रेमकविता. मला त्याही आवडत. मनीषाला ती एकही वाचायला मिळाली नाही. मात्र एकदा नोटिस बोर्डावर ज्या कवितेत मनीषा हे नाव प्रत्येक ओळीत लपलेले होते ती कविता मनीषाने वाचलेली त्याने पाहिले होते. त्याच्या काव्यप्रतिभेचे सार्थक झाले असे तो म्हणाला.
दिवसभर अन रात्रभर तो नुसता मनीषा मनीषा करत राही. M या अक्षराने सुरु होणाऱ्या नावाची प्रत्येक गोष्ट त्याला आवडे. मैगी, माऊली जनरल स्टोअर, माळेगावची एसटी, आणि एकूण साऱ्याच गाड्या त्याला आवडत. का? तर प्रत्येकीचा नंबर MH ने सुरु होई म्हणून. डांबरी रोडवर, नदीच्या कातळांवर, बेंचवर, भिंतीवर, बाजूच्या डोंगरावरील किल्ल्याच्या तटबंदीवर असे कुठे कुठे मनीषा हे नाव अथवा बदामाच्या आकारात MH ही अक्षरे लिहिली गेली असतील याला गणती नाही.
~खांडववन~
हॅलो अरे आज मुंबईत आलोय. बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग आहे. अँड देन आय विल बी फ्री. बोल कुठे बसायचे?
अरे मग घरीच ये ना
का? वहिनी बाहेर गेलीय काय?
नाही
नको मग बाहेरच बसू.
एकदा गावी दिवाळीला बऱ्याच वर्षांनंतर तो आला होता.मग सगळे मित्र जमले. विज्या तर 15 वर्षांनी सगळ्यांना भेटत होता. कुठेतरी सगळे फिरायला जायचे ठरले. मी म्हणालो देवडीच्या वाडीत जाऊ. आपला जूना नेहमीचा स्पॉट.
नको नको, काय ती झाडी अन पडके देऊळ बघायचे? हजारदा पाहिलेय. तिकडे घेता पण येणार नाही. निम्मेजण जमणार नाही असे म्हणाले. अरे पण आपल्याला निवांत भेटायचे बोलायचे होते ना? प्यायलाच कशाला पाहीजे?
मग काय? च्यायला किती दिवसांनी भेटतोय आपण, मग सेलिब्रेट नको करायला? बोलतो तर आपण कधीही फोनवर. च्यायला बसायचे नसेल तर काय उपयोग भेटून? नुसते एकमेकांना बघायचे होते तर आता आपण बघतोच आहोत. मी त्याच्याकडे पाहिले, निदान तू तरी येशील का देवडीला? पण तोच म्हणाला, राव्हल्या तो साईप्रसाद बार अजुन चालु आहे ना? तिथेच जाऊ. निवांत कितीही वेळ बसता येईल.
~गीता~
चिंचोके गोट्या आधी मनीषाच्या नावामधे विरुन गेले आणि आता मनीषाही पेल्यात विरघळून गेलेली आहे.
मागच्या दहा वर्षांत आम्ही चार तास एकत्र आहोत आणि पिणे झाले नाही असा एकही प्रसंग नाही. तोच तो आहे अन तोच मी आहे. पण प्रायोरिटीज कश्या बदलल्यात.!
तेव्हा दोघेही सगळे चिंचोके, गोट्या हरलो तरीही मैत्री कमी व्हायची नाही. मनीषाचे लग्न दुसऱ्याशी झाले, तरीही आमची मैत्री अजुनच दृढ झाली. पण आता नको बसूयात म्हंटले की मग जाऊ दे नंतर भेटु किंवा यावेळी जमणार नाही या हुकमी वाक्यांवर मैत्री हेलकावे खात राहते.
चिंचांचे आकडे=सुदाम्याचे पोहे, मनीषा=सुभद्राहरण.!!
खांडववन जाळण्याआधी कृष्ण अन अर्जुनाने खुप दारु प्यायली. इतकी की एकमेकांस लाथा मारू लागले. त्याच नशेत त्यांनी खांडववन जाळले. आज आम्ही खांडववन जाळत आहोत. बहुतेक थोड्याच वर्षांनी मला गीता सांगावी लागणार.!!