काही लाख करोड वर्षांपूर्वी, शुक्र आणि मंगळावर प्रचंड प्रगत सजीवांची वस्ती होती. आपल्या अतुलनीय तांत्रिक प्रगतीच्या संभ्रमात ते इतके गुरंफटले होते की येणाऱ्या विनाशाची त्यांना कल्पनाच आली नाही. दोन्ही ग्रहांवरची खनिज इंधने प्रचंड वेगाने संपत चालली होती. मग त्यांनी त्यासाठी एक नवे गुरुत्वाकर्षणावर आधारित ऊर्जेचे तंत्रज्ञान शोधले. या तंत्रानुसार त्यांनी काही गुरुत्वीय लहरींचे ट्रान्स्पोण्डर तयार केले ज्यांच्यात पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण वापरून ऊर्जेचे निर्माण करता येणार होते. शुक्र आणि मंगळ या दोहोंच्या मध्ये वर्षाचा खूप मोठा काळ पृथ्वी येत असते. पृथ्वी अशी मध्ये आली असताना दोन्ही ग्रहांवर जो गुरुत्वाकर्षणीय ताण निर्माण होत असे त्याचा वापर करून ते वर्षभरासाठी पुरेल इतकी ऊर्जा बनवून साठवणार होते. पृथ्वी ही सदैव अशीच राहणार असल्याने अगदी अनंतकाळासाठी दोन्ही ग्रहांची ऊर्जेची गरज भागविणारे हे तंत्रज्ञान होते.
पण या तंत्रात एक अवघड अशी अडचण होती. पृथ्वीचा निळा रंग ट्रान्स्पोण्डरच्या रिसिव्हर्स समोर असताना त्यांचे ऊर्जास्रोत चार्ज होत असत मात्र पृथ्वीचा हिरवा भाग समोर आला की मग मात्र उलटे होऊन रिसिव्हर्स मधून चार्ज खूप वेगाने लीक होऊ लागे. पृथ्वीवर हिरव्यापेक्षा निळा भाग जास्त असल्याने त्यांना नेट ऊर्जा शिल्लक राहत तर असे, पण ती खूपच थोडी असल्याने त्यांच्या वाढत्या लोकसंख्येबरोबर आता ती ऊर्जा कमी पडू लागली होती. त्यामुळे या गुरुत्वउर्जिय संधारणात येणारा पृथ्वीवरच्या हिरव्या रंगाचा अडथळा हा त्यांच्या ग्रहांवरची जीवसृष्टीच संपवू शकणार होता. म्हणून मग पृथ्वीवरच्या या हिरव्या रंगाचा विनाश करण्यासाठी त्यांनी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याचे ठरविले.
तसे पृथ्वीवरील या हिरव्या सजीवांचा त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने अभ्यास केलेला होता, त्यामुळे ही हिरवी जीवसृष्टी संपविण्यासाठी पृथ्वीवर व्हायरसची निर्मिती करावी हा उपाय त्यांनी योजण्याचे ठरवले. आणि मग त्यांनी संयुक्तपणे मंगळावरील वुहान शहरात असा व्हायरस निर्माण करायला सुरुवात केली.
आपण जाणतोच की व्हायरस हा होस्टच्याच शरीरातील सत्व वापरून आपली लोकसंख्या वाढवतो आणि मग होस्टलाच खल्लास करतो.
प्रयोगशाळेत व्हायरस तयार झाला आणि मग त्याला पृथ्वीच्या हिरव्या जीवसृष्टीत सोडण्यात आले. पण लाखो वर्षे गेली तरी पृथ्वी त्या व्हायरसने इन्फेक्ट होऊनही पृथ्वीचा हिरवा रंग काही कमी होईना. मग एकामागून एक असे करोडो व्हायरस म्यूटेट करून पृथ्वीवर सोडण्यात आले पण तरीही हिरवी जीवसृष्टी काही कमी होईना व त्यामुळे शुक्र मंगळावरील ऊर्जेचा तुटवडा हा काही भरून निघेना.
पुढे एकदा शुक्र ग्रहावर एक खूप मोठा म्हणजे 56 इंच आकाराचा निर्बुद्ध पण गरम डोक्याचा नेता जन्मास आला. त्याच्या बावळट कल्पनेनुसार मग झटपट इलाज म्हणून शुक्रवासीयांनी एक प्रचंड मोठा धूमकेतू पृथ्वीच्या हिरव्या भागावर आदळवला, मात्र त्यानेही फक्त काही काळ हिरवा रंग थोडासा कमी झाला, पण नंतर पुन्हा खूप वेगाने आणि खूप मोठ्या प्रमाणात वाढून पुन्हा जैसे थे झाला. इतकेच नाही तर या गरम डोक्याच्या नेत्याने तज्ज्ञांशी मसलत न करता स्वतःच्याच हेकेखोरपणाने पृथ्वीवर धूमकेतू आदळविल्याने पृथ्वीवर जी कंपने निर्माण झाली त्यांच्यामुळे शुक्र आणि मंगळ या दोन्ही ग्रहांवरील ऊर्जेचे ट्रान्स्पोण्डर व रिसीवर मोठ्या प्रमाणात बिघडले. त्यामुळे असे प्रचंड नुकसान झाल्यावर शेवटी व्हायरस हाच योग्य उपाय आहे हे त्यांना कळले.
दरम्यान दोन्ही ग्रहांची खनिज इंधने संपून गेली, आणि पृथ्वीच्या हिरव्या रंगात घट न झाल्याने नव्या तंत्रज्ञानाची गुरुत्वीय ऊर्जाही त्यांस पुरेशी पडेना. त्यामुळे उलट शुक्र अन मंगळावरचीच जीवसृष्टी आता लोप पावू लागली. दोन्ही ग्रहांवरच्या प्रगत जीवसृष्टीपुढे स्वतःच्याच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहीला. आणि मग करोडो वर्षानंतर शेवटी त्यांना एक आशादायक व्हायरस बनविण्यात यश मिळाले. हा व्हायरस त्यांनी आजपर्यंत बनविल्यांपैकी सर्वात अधिक इन्फेक्शीयस तर होताच, पण हिरव्या जीवसृष्टीसाठी अतिशय प्राणघातक सुद्धा होता.
लवकरच या व्हायरसने हिरव्या जीवसृष्टीला इन्फेक्ट करून संपवायला सुरुवात केली. पण जरी हा अत्यंत प्रभावी व्हायरस असला तरी तो म्हणावा तितका परिणाम साधू शकला नाही. मग शुक्र मंगळाचे सायंटिस्ट या व्हायरसमध्ये हळूहळू स्टेप बाय स्टेप म्युटेशन घडवून त्याला अधिकाधिक घातक बनवू लागले. त्यांनी या व्हायरसची अल्फा, बीटा, गॅमा अशी अनेक म्युटेशन्स आणली जी अधिकाधिक घातक होत गेली. शेवटी 1000 वर्षांपूर्वीच या व्हायरस मध्ये एक डेल्टा वेरीएशन नावाचे म्युटेशन झाले आणि हिरव्या जीवसृष्टीचा वेगाने विनाश व्हायला सुरूवात झाली. मात्र तरीही या व्हायरसवर संशोधन चालूच होते. आणि मग अगदी अलीकडे म्हणजे जस्ट 200 वर्षांपूर्वी या व्हायरसमध्ये डेल्टा प्लस हे नवे खतरनाक म्युटेशन झाले, आणि हे म्युटेशन इतके प्रचंड प्रभावी ठरले की मागच्या 200 कोटी वर्षांतील तमाम व्हायरसांना जे जमले नाही ते या व्हायरसने केवळ 200 वर्षांत करून दाखवले.
हा व्हायरस हिरव्या जीवसृष्टीत घुसला. आणि त्या सृष्टीच्याच शरीरातील सामग्री वापरून सगळ्या पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात फोफावला. प्रचंड इन्फेक्शस असण्याबरोबरच हा व्हायरस इतका अधिक घातक सुद्धा निघाला की या लास्ट 200 वर्षांतच पृथ्वीवरची अक्षरशः निम्मी हिरवी जीवसृष्टी त्याने खतमच करून टाकली.
आता मंगळ आणि शुक्रावरची त्यांना उपयुक्त ठरणारी ऊर्जानिर्मिती वाढली आहे. त्यांची विलुप्त होणारी जीवसृष्टी आता पृथ्वीवरच्या या लेटेस्ट व्हायरसमुळे पुन्हा समृद्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. साधारण पुढच्या 100 वर्षांत हा व्हायरस पृथ्वीवरची 90 ते 95 टक्के हिरवाई कायमची नष्ट करेल असा अंदाज आहे.
शुक्र आणि मंगळवासीयांनी या पृथ्वीसाठी प्रचंड प्राणघातक असलेल्या व्हायरसला 'ह्युमिना व्हायरस' असे इंग्रजी नाव दिले आहे. मराठीत त्याला काय नाव देता येईल?
..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा