हा ब्लॉग शोधा

सोमवार, १७ जून, २०१३

नदी

मुसळधार पाऊस होतो सुरु.
माती दरवळून जाते.. नव्या नवरीसारखी लाजून ओलीचिंब होते..
कोवळे हिरवे अंकुर धुमाऱ्यांसारखे फुटू लागतात कणाकणांतून..
कुणी जीवाभावाचे भेटल्यावर असंख्य आठवणी उमलून याव्यात तसे
कित्येक प्राणी, पक्षी, कीटक बाहेर येउन बागडू लागतात..
रात्रभर संसद भरलेली असते बेडकांची.
डोंगर टेकड्यांना पाझर फुटतात...
काळ्या डोंगरांवर झऱ्यांच्या पांढऱ्या रेघा दिसू लागतात.....

सखारामचे भाताचे रोप तरारून आलेले असते..
गजाबा सांगत असतो नातवंडांना चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या मोठ्ठ्या पुराची कहाणी..
कोथळ्याकडची पेरणी झाली का रे दादा? असे येणाऱ्या जाणाऱ्यास विचारून
लक्ष्मीबाई घेत असते माहेरचे क्षेम...
अगं गोवरी घाल ना चुलीत किती धूर झालाय? म्हणून दारकाबाई सुनेवर ओरडत असते..
अशात एक दिवस महादू जाता जाता हाळ घालतो..
नदी आलेय शिसवदपर्यंत.. दुपारपर्यंत येईल आपल्या पासानदहाडात..!!
(पासानदहाड हा आमच्या इथला नदीचा मोठा डोह)

आम्ही मग कशीबशी न्याहारी उरकून सुटायचे नदीकडे पळत...
जमेल तेवढे अधिक पश्चिमेकडे.
बऱ्याच वेळाने मग प्रचंड आवाज येऊ लागायचा..
आधी गुरगुरणाऱ्या वाघासारखा आणि मग ढगांच्या गडगडाटासारखा..!!!
आम्ही मग "बा-अदब बा-मुलाहिजा होशियार" व्हायचो..!!!
आणि मग वरचा काठवट नावाचा डोह भरून गढूळलेल्या पाण्याचा एक प्रचंड लोट लोळण घेत, रोरावत उतरायचा पासानदहाडात....

आधी वाळू, मग मोठे दगड आणि मग खडक एकापाठोपाठ एक गुडूप व्हायचे पाण्यात…
हळूहळू पासानदहाड भरू लागायचे. वरून वाहून आणलेले मोठमोठे ओंडके, फांद्या घेऊन बाणाच्या टोकासारखे मध्ये गढूळ पाणी आणि बाजूने जुने नितळ पाणी असा तो लवाजमा पुढे सरकायचा..
आम्ही नदीच्या काठावरून सुसाट पळत जायचो त्या प्रवाहाबरोबर शर्यत लावत...
हळूहळू सगळे पासानदहाड गढूळ होऊन जायचे, आणि मग काठोकाठ भरल्यावर पुन्हा ढोलताशे वाजवीत पाणी पुढच्या जाखुबाईच्या डोहात उडी घ्यायचे...
आठ महिने सासुरवास सोसून माहेरास निघालेल्या सवाष्णीसारखी आनंदी आणि उत्साही भासायची तेव्हा मुळा..
बराच वेळ ते वाहत जाणारे तांबडे पाणी पाहत बसल्यावर मग आम्ही गावात येणार आणि "नदी निघून गेली रे" असा गावभर डंका पिटून टाकणार...
...
...काल फोनवर कळले यंदाची नदी निघून गेल्याचे........
.... खरेच खूप दूर निघून गेली आहे नदी. नाही का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा