हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०२५

वैज्ञानिक दृष्टीकोन

परीक्षेत प्रश्न विचारला होता की एक बॅरोमीटर (हवेचा दाब मोजण्याचे उपकरण) वापरून एका उंच बिल्डिंगची उंची कशी मोजाल? एका मुलाने उत्तर लिहीले की मी बॅरोमीटरच्या एका टोकाला एक दोरी बांधेल आणि बिल्डिंगच्या छतावरून ती दोरी खाली सोडेल. जेव्हा बॅरोमीटर जमिनीला टच करेल तेव्हाची त्या दोरीची लांबी आणि बॅरोमीटरची लांबी यांची बेरीज केली की बिल्डिंगची हाईट मिळेल. अर्थातच शिक्षकाने या मुलाचे उत्तर चूक ठरवून त्याला शून्य मार्क दिले. पण तो मुलगा मात्र इरेला पेटला. माझे उत्तर बरोबर आहे आणि त्या पद्धतीने बिल्डिंगची उंची परफेक्ट मोजता येईल हे टेक्निकली करेक्ट आहे त्यामुळे माझे उत्तर बरोबरच आहे मला मार्क द्या असे तो म्हणू लागला. ही गोष्ट मग प्रिन्सिपल पर्यंत गेली. मुलाने प्रिन्सिपललाही तेच सांगितले की माझे उत्तर बरोबरच आहे, कारण त्या उत्तराने बिल्डिंगची उंची हमखास मोजता येऊ शकते. मग प्रिन्सिपलने एका दुसऱ्या एक्सटर्नल फिजिक्स परीक्षकाला बोलावले आणि त्याला सांगितले की या मुलाची तोंडी परीक्षा घे आणि याला काही वैज्ञानिक ज्ञान आहे का ते बघ मग आपण त्याला मार्क द्यायचे की नाही ते ठरवू.

तोंडी परीक्षेच्या वेळी परीक्षक त्या मुलाला म्हणाला, तुझ्या मेथडने उंची मोजता येईल हे बरोबर आहे, पण तू अजून एखाद्या पद्धतीने बॅरोमीटरचा उपयोग करून बिल्डिंगची उंची कशी काढता येईल ते मला सांग. मुलगा म्हणाला, बिल्डिंगच्या मालकाला बॅरोमीटर भेट म्हणून द्यायचे आणि त्या बदल्यात त्याला बिल्डिंगची उंची विचारायची. परीक्षक म्हणाला हेही बरोबर आहे, पण मला वैज्ञानिक पद्धतीने बॅरोमीटर वापरून बिल्डिंगची उंची कशी मोजावी याचे उत्तर हवे आहे. मुलगा म्हणाला बऱ्याच वैज्ञानिक पद्धतींनी बिल्डिंगची उंची मोजता येईल. उदा. जर तुम्हाला बॅरोमीटर तुटले तरी हरकत नसेल तर एक बॅरोमीटर बिल्डिंगच्या छतावरून खाली टाकायचे आणि ते जमिनीवर पडेपर्यंतचा वेळ मोजायचा. जर तो वेळ t इतका असेल तर बिल्डिंगची उंची ही H=१/२(gt^२) इतकी असेल. परीक्षकाने विचारले अजून? मुलगा म्हणाला बॅरोमीटरला दोरी बांधून त्याचे एक पेंड्युलम (दोलक) बनवायचे आणि बिल्डिंगखाली तसेच बिल्डिंगच्या वर असे दोन्ही ठिकाणी ते हिंदकळवुन त्याचे ग्रॅव्हिटेशनल एक्सेलरेशन मोजायचे आणि त्यांच्यातील फरकावरून उंची कॅलक्युलेट करायची. किंवा बॅरोमीटर उन्हात ठेवायचे त्याची सावली किती लांब पडली आहे ते मोजायचे, त्यावरून सावलीचा अँगल sinθ ने काढायचा आणि त्याचवेळी बिल्डिंगची सावली किती लांब पडली आहे ते मोजायचे आणि त्यावरून बॅरोमीटरच्या सावलीचा अँगल घेऊन sinθ वापरून बिल्डिंगची उंची काढायची, किंवा बॅरोमीटरने एकदा जमिनीवर हवेचा दाब मोजायचा आणि एकदा बिल्डिंगच्या छतावर मोजायचा, मग दोन्हींच्या फरकातून H≈12.2×ΔhHg या फॉर्म्युल्याने बिल्डिंगची उंची कॅल्क्युलेट करायची. अशाप्रकारे त्या मुलाने खूप उत्तरे सांगितली आणि त्याने सांगितलेली सगळीच्या सगळी उत्तरे ही अगदी वैज्ञानिक दृष्टीनेसुद्धा बरोबरच होती.

परीक्षक त्याला म्हणाला, खरे सांग, तुझ्या शिक्षकाला नेमके कोणते उत्तर हवे होते (शेवटचे) ते तुला चांगलेच माहित होते, बरोबर ना? मग तू परीक्षेत ते उत्तर का सांगितले नाहीस?
मुलगा म्हणाला मला उत्तर माहित होते पण मला हे मान्य नाही की मला एक पठडीतलेच उत्तर द्यावे लागावे. ते एक साचेबद्ध उत्तर आहे, मला प्रत्येक प्रश्नावर साचेबद्ध रीतीने नव्हे तर वेगवेगळ्या दृष्टीने आणि कल्पकतेने विचार करायला आवडतो. मला आऊट ऑफ द बॉक्स विचार करायला लावेल असे प्रश्न आवडतात. साचेबद्ध आणि वेगळा विचार करायला न लावणारी तसेच पाठांतराने देता येऊ शकणारी उत्तरे देणे मला आवडत नाही, आणि कुणी माझ्याकडून तशा रटलेल्या उत्तराची अपेक्षा करावी हेही मला पसंत नाही. 
हा मुलगा होता नील्स बोहर आणि त्यानेच जगाला अगदी आजही शिकविले जाणारे ऍटमचे मॉडेल दिले. त्याला १९२२चा नोबेल पुरस्कार मिळाला. नील्स बोहर हा जगातल्या ऑल टाइम ग्रेट शास्त्रज्ञांत गणला जातो.

गुगलच्या इंटरव्यू मध्ये टेक्नॉलॉजीशी काही संबंध नसणारे आणि विचित्र प्रश्न विचारले जातात. उदा. तुला तुझ्या फ्रिजमध्ये पेंग्विन दिसला तर? किंवा एक बस पूर्ण भरायला किती गोल्फ बॉल्स लागतील, किंवा न्यूयॉर्कमध्ये किती लोक व्हायोलिन रिपेअरचे काम करतात वगैरे. खरेतर या प्रश्नांचे कोणतेही खरे उत्तर अपेक्षित नसते, तर फक्त ते उत्तर कशा प्रकारे दिले जाते, त्यावर उत्तर देणारा कसा आणि किती क्रिएटिव्ह उत्तर देऊ शकतो, कसा विचार करू शकतो हे त्यांना बघायचे असते. त्या उमेदवाराची चिकित्सक बुद्धी किंवा क्रिटिकल थिंकिंग कशी आहे ते बघायचे असते.

आपल्या देशात नेमकी असा कल्पक आणि तर्कसंगत विचार करण्याची कमतरता आहे. आपल्या शिक्षणसंस्थांत सुद्धा फक्त विद्यार्थ्यांना जे ऑलरेडी सिद्ध झालेले वैज्ञानिक मार्ग आणि तथ्ये आहेत त्यांतच पारंगत व्हायला शिकवले जाते. आपले मोठमोठे वैज्ञानिक सुद्धा फक्त चाकोरीबद्ध विचार करतात. त्यांच्याकडे त्यांच्या क्षेत्रातील कदाचित इतर कुणालाही माहीत नसेल इतकी प्रचंड माहिती आणि एक्स्पर्टीज असते, पण कल्पकतेची, आउट ऑफ द बॉक्स थिंकींगची आणि तर्कशील बुद्धीची मात्र त्यांच्यात प्रचंड वानवा असते. म्हणूनच आपल्याला नोबेल प्राइजेस मिळत नाहीत. आपण बुद्धिमत्तेत अजिबात कमी नाही, पण आपण दृष्टिकोनात कमी पडतो. आपण साचा आणि चाकोरी सोडण्यात कमी पडतो.

खरेतर विज्ञानात उत्तरांपेक्षा प्रश्न पडणे हे अधिक महत्वाचे आहे. आपल्याला सांगण्यात येणाऱ्या वा दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपल्या मनात तार्कीक प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. 'सफरचंद खाली का पडते' हा एक प्रश्न न्यूटनला पडला आणि त्यामुळे आज आपले मानवी यान दुसऱ्या ग्रहांवरच नाही तर अगदी सौरमालेच्याही बाहेर पोचू शकले. प्रश्न पडणे, त्यावर चिकित्सक, तर्कसंगत उत्तरे सुचणे वा सापडणे आणि त्या उत्तरांतून पुन्हा अजून प्रश्न निर्माण होणे हा विज्ञानाचा खरा मार्ग आहे. म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल प्रश्न पडले पाहीजेत. पृथ्वी गोल असण्याचे जे पुरावे दिले जातात ते खरे आहेत का? देव खरेच असेल का? अंघोळ केल्याने पापे कशी धुतली जातील? इलेक्ट्रॉन प्रोटॉन खरेच असतील का? ७२ हूर असू शकतात का? कुणी नुसती एक काठी मारून समुद्र तात्पुरता दोन भागांत विभागून पलीकडे जाण्यासाठी वाट बनवू शकतो का? पूजा करून वा दानपेटीत पैसे टाकून मला प्रमोशन मिळू शकेल का? एकवेळ धर्म गरजेचा आहे हे मान्य केले तरी अनेक प्रथा आणि परंपरा काही उपयोगाच्या आहेत का? ज्यासाठी त्या पाळल्या जातात ते होऊ तरी शकते का? असे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न पडण्याची वा विचारण्याची आपली प्रवृत्ती असली पाहीजे. ठीक आहे तुम्हाला इतर कुणाला प्रश्न विचारण्याची लाज वाटत असेल वा संकोच वाटत असेल तरी हरकत नाही. तसे असेल तर तुम्ही असे प्रश्न स्वतःलाच विचारा, आणि स्वतःच त्यांची तार्कीक उत्तरे शोधायचा प्रयत्न करा. स्वतःला विचारण्यात तर संकोच करण्याचे काही कारण नाही. मात्र त्यासाठी तर्क, चिकित्सा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे सर्वात महत्वाचे गुण आहेत.
 
आपण जे आजची कर्ती पिढी आहोत ते आपण स्वतःमध्ये चाकोरीबाहेरचा विचार करण्याची, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याची, कल्पकतेची, तर्कबुद्धी रुजवण्याची सुरुवात तर करू, म्हणजे मग आपल्या पुढच्या पिढ्या ते बघून पुढे अजून प्रगती करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून जास्तीत जास्त विचार करू लागतील. उलटपक्षी आपणच जर सदासर्वकाळ त्यांच्यापुढे वास्तुशास्त्र, ज्योतिष, पंचांग, तावीज बांधणे, चादर चढविणे, नवस करणे, तिलिस्म, मुहूर्त काढणे अशी अंधश्रद्ध कृत्ये करत बसलो तर उलट आपल्या पुढच्या पिढ्या नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून अजून जास्त अंधश्रद्धच होत जातील. बरोबर की नाही?
प्रत्येक गोष्टीवर मनात प्रश्न निर्माण झाले पाहीजेत, काहीही स्विकारण्याआधी त्याची चिकित्सा करण्याची सवय लागली पाहीजे. अगदी या पोस्टमध्ये मी जे म्हंटले आहे तेही तुम्ही त्यावर काहीही विचार न करता माझ्यावर विश्वास ठेवून स्वीकाराल तर मला वाईटच वाटेल, उलट तुमच्या मनात यावर प्रश्न किंवा चिकित्सक विचार निर्माण झाले तर मला चांगले वाटेल. माझी फार अपेक्षा नाही, पण किमान कुणा एका दोघांत तरी यानिमित्ताने थेट वैज्ञानिक दृष्टिकोन येणे सोडा पण "योग्य" प्रश्न पडण्याची वृत्ती जरी उगवली तर आजच्या विज्ञानदिनाची ही पोस्ट सार्थकी लागली असे मी समजेल. 

....