अनेकदा आश्चर्य वाटते की लोकांनी त्यांच्या धर्मग्रंथांत एवढे चुकीचे लिहून ठेवले आहे ते सगळे खरे कसे मानले असेल? म्हणजे माणसे इतकी कशी बुद्धीहीन असू शकतात की कुणीतरी सूर्य बनवला म्हणून तो बनला, कुणीतरी प्राणी बनवले म्हणून ते बनले. हवेत उडणारी माणसे होती, उंदरावर बसणारा हत्ती होता, माणसाच्या भाषेत बोलणारे प्राणी होते, कुठूनतरी वेगळ्याच अवयवांतून माणसे जन्माला येत होती आणि एकंदरच जे काही जगातील तमाम धार्मिक पुस्तकांत लिहिले आहे ते बुद्धिमत्तेच्या कसोटीवर अजिबात टिकायला नको असूनही तब्बल तीन चार हजार वर्षे लोकांनी ते खरे म्हणून स्वीकारले?
इतका प्रदीर्घ काळ कोणतीही गोष्ट सत्य म्हणून तेव्हाच टिकते जेव्हा त्याला सामूहिकपणे सत्य म्हणून मान्यता मिळते. अर्थात मानव इतकेही मूर्ख नाहीत की कुणीही काहीही भंकस सांगितली तर ते सत्य म्हणून सहज स्वीकारतील. तर सामान्य माणसांना जी माणसे हुशार वाटतात, बुद्धिमान वाटतात, आपल्याहून स्पेशल वाटतात त्यांनी जर काही सांगितले असेल तरच माणसे गोष्टी स्वीकारतात. इब्राहिम, मोझेस असो की भारतातले ऋषीमुनी या लोकांना एक वेगळा आणि श्रेष्ठ दर्जा प्राप्त होता म्हणून यांनी जे सत्य म्हणून सांगितले ते सामान्य लोकांनी स्वीकारले. भारतातच बघा ना, ऋषी म्हणजे तप करणारे, ज्ञानी लोक अशी मान्यता आहे. मग अर्थातच ते जे सांगणार ते सत्यच असणार असे सामान्य लोक मानत होते.
बायबल हिब्रू मध्ये होते, युरोपात ते लॅटिनमध्ये होते, कुराण अरबी मध्ये आहे. वेद संस्कृत मध्ये होते. आणि आज हे धर्म एकमेकांचे कितीही विरोधक असले तरी या सगळ्यांत एक गोष्ट कॉमन आहे. सुरुवातीच्या काळात कदाचित बहुतांच्या असतीलही, पण त्यानंतरच्या हजारो वर्षांत या भाषा फक्त काही लोकांच्या भाषा होत्या. सामान्य लोकांच्या भाषा या भाषांहून वेगळ्या होत्या. अगदी इजिप्त असो की चीन, सगळीकडे विद्वानांची भाषा ही वेगळी होती आणि सामान्यांची वेगळी. आणि सगळे धर्मग्रंथ हे त्या विद्वानांच्या एलिट भाषेतच लिहिलेले होते जी भाषा सामान्यांना समजत नव्हती. त्यामुळे त्यात नेमके काय लिहिले आहे ते लोकांना कधी कळलेच नाही. लोकांपर्यंत आलेही काय तर त्या अनुषंगाने बनलेल्या काही मनोरंजक कथा. अनेकदा तर या कथा मूळ धर्मग्रंथांत अस्तित्वातच नसतात.
तर हे एक मॉडेल आहे. लोकांच्या गळी काहीतरी उतरवण्याचे. गाईड फिल्म मध्ये एक सिन आहे. काही पंडित देवानंदला चॅलेंज देतात की तू बोलतोय ते खोटे आहे. जर तू खरेच कोणी ज्ञानी असशील तर मी सांगतो त्या श्लोकाचा अर्थ सांग. मग तो पंडित एक श्लोक म्हणतो, देवानंदला अर्थातच तो कळत नाही. मग ते पंडित लोकांना म्हणतात, बघितले? याला काही कळले नाही, समझेगा कैसे, संस्कृत आती हो तब ना. मग देवानंद इंग्रजीत काही बोलून त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवतो पण मुद्दा हा आहे की हे जे मॉडेल आहे त्यात हे अपरिहार्य आहे की तथाकथित ज्ञान हे लोकांना कळेल अशा भाषेत असता कामा नये. ते लोकांना कळणार नाही, केवळ काही लोकांनाच कळेल अशा भाषेत असले पाहीजे. त्या भाषेत असेल तेच सत्य, इतर भाषांतील ते असत्य. लोकांनी एकदा या दाव्याला सत्य म्हणून मान्यता दिली तर त्या भाषेच्या नावाखाली जे काही सांगितले जाईल ते हजारो वर्षे सत्य म्हणूनच स्वीकारले जाईल.
आता कट टू विज्ञान
आज आपण खरे सत्य काय तर विज्ञानाने जे सिद्ध केले तेच सत्य होय असे मानतो. आपल्यातल्या कुणीही इलेक्ट्रॉन पाहिलेला नाही, ऑक्सिजन खरेच आहे का हे तपासलेले नाही, पृथ्वी गोल आहे हे आकाशातून स्वतः पाहिलेले नाही. पण आपण सगळे वैज्ञानिक लोकांवर विश्वास ठेवून हे सगळे सत्य आहे असे मानतो. कारण वर सांगितल्याप्रमाणे हुशार माणसांनी सांगितले तर ते खरे आहे असे मानण्याची आपली हजारो वर्षांची प्रवृत्ती आहे. ठीक आहे कोणीही आपल्या शरीरात आणि झाडांत कार्बन आहे हे तपासू शकते, पण खरेच जगातील किती लोक हे प्रत्यक्ष तपासतात? अगदी विज्ञानाच्याही किती विद्यार्थ्यांनी, वा अगदी वैज्ञानिकांनीही प्रकाशाचा वेग स्वतः मोजून पाहीला आहे? तरीही आपण हे सगळे काही सत्य म्हणून स्वीकारतो.
ही पोस्ट वाचणारांपैकी 90 ते 99 टक्के लोकांचा शाळेतील सर्वात नावडता विषय कोणता असेल तर तो म्हणजे गणित. तो नावडता का आहे? तर तो क्लिष्ट आहे, समजायला अवघड आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सोपे आहे पण एकदा का गणितात एबीसीडी वा थिटा घुसले की ते अत्यंत अवघड होऊन जाते.
जी वैज्ञानिक तथ्ये आज आपण सत्य म्हणून स्वीकारतो ना, ती सगळी तशी स्वीकारली गेलीत कारण ती गणिताने सिद्ध होतात. ही गणिते सगळ्यांसाठी उपलब्ध असल्याने कोणीही ती सोडवू शकतो. म्हणून त्याला सत्य म्हणून मान्यता आहे. आणि ते नक्कीच योग्यही आहे. कोणतेही वैज्ञानिक शोध हे गणिताच्या सूत्रात बसल्याशिवाय त्याला सत्य म्हणून मान्यता मिळत नाही. थोडक्यात काय की गणित ही विज्ञानाची भाषा आहे.
जसे धर्मग्रंथ हे अवघड वा सामान्य लोकांना न समजणाऱ्या भाषेत होते, तरीही त्यांना सत्य म्हणून मान्यता होती तसे आज 90 टक्के लोकांना गणित अवघड जाते वा कळत नाही तरीही गणिताने सिद्ध झालेल्या तथ्यांना 100 टक्के विज्ञानवादी लोक खरे मानतात.
धर्म म्हणजे तरी मूळात काय होते, तर विश्व कसे चालते त्याचे त्याकाळचे उत्तर. त्या उत्तराला मग परंपरा रूढी जोडल्या गेल्या आणि तो संघटित धर्म बनला. विज्ञान म्हणजे सुद्धा काय तर विश्व कसे चालते याचे आजचे उत्तर. याच उत्तराला अनुसरून मग आपल्या उपयोगी येतील अशी काही तंत्रे बनवली गेली आणि ते उपयुक्त वा सत्य म्हणून स्वीकार झाले.
तर हिब्रू, अरामाईक, लॅटिन संस्कृत यांसारखीच विज्ञानाची भाषा आहे गणित. खूप अवघड.! म्हंटले तर कोणीही वापरू शकतो, पण तरीही 99 टक्के लोकांना प्रत्यक्षात वापरता येणार नाही अशी ही भाषा आहे.
रिसेंटली मी स्टीफन हॉकिंग (Universe in a nutshell), रिचर्ड फिनमन (Six easy pieces), ब्रायन ग्रीन (The hidden reality) यांची ही पुस्तके वाचली. क्वांटम आणि स्ट्रिंग थिअरी या दोन थिअरी या पुस्तकांत विश्वाचे रहस्य कसे उलगडतात ते सांगितले आहे. त्यातही स्ट्रिंग थिअरी ही आज सगळ्यात हॉट आहे. अनेकांच्या दाव्यानुसार स्ट्रिंग थिअरी ही हे विश्व कसे चालते त्याचे परफेक्ट उत्तर आहे. आज जवळजवळ सगळ्याच मोठ्या सायंटिस्ट लोकांची स्ट्रिंग थिअरीला मान्यता आहे. स्ट्रिंग थिअरीनुसार हे विश्व व त्यातील एकुणएक अणूरेणू हे स्ट्रिंग म्हणजे एक प्रकारच्या तंतूंपासून बनलेले आहेत. हे क्लिष्ट आहे पण समजून घ्या की विश्वातील प्रत्येक वस्तू या अविरत हलत्या तंतूंपासूनच बनली आहे असे ही थिअरी सांगते. आणि या थिअरीचे सगळे निष्कर्ष हे गणिताने सिद्ध होतात. यांचे खूप अचाट दावे आहेत आणि त्या दाव्यांसाठी अगदी क्लिष्ट अशी गणिते आहेत. हॉकिंग, ब्रायन हेही मान्य करतात की यातील अनेक गणिते त्यांनाही सोडवता येत नाहीत. पण तरीही स्ट्रिंग थिअरी आज सगळ्यात अधिक ताकदवान मानली जाते.
पण गंमत सांगू का? ही फक्त आणि फक्त गणितावर आधारित थिअरी आहे. आजपर्यंत कुणीही कोणत्याही प्रयोगाने एकही स्ट्रिंग शोधू शकले नाहीय. तो लार्ज हॅड्रोन कोलायडर अविरतपणे शोधतो आहे पण अजूनही त्याला एकही स्ट्रिंग मिळाली नाहीय.
या स्ट्रिंग थिअरीनुसार जगात आपण अनुभवतो तशी फक्त तीन डायमेंशन (मिती) नाहीत तर तब्बल 10 डायमेंशन्स आहेत. बरे ही एवढी डायमेंशन्स आहेत याचा काय पुरावा? वा काय निरीक्षण आहे ज्यामुळे इतकी डायमेंशन्स आहेत असे ही थिअरी म्हणते? तर काहीही नाही. केवळ आणि केवळ त्यांची गणिते पूर्ण होण्यासाठी त्यांना 10 डायमेंशन्स गृहीत धरावी लागतात म्हणून विश्वात 10 डायमेंशन्स आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. एकूण 10 डायमेंशन्स गृहीत धरली की त्यांचे गणित सुटते म्हणून ती आहेत असे ते मानतात.
आज स्ट्रिंग थिअरी जगात इतकी पॉप्युलर आहे की मी वा कुणीही म्हंटले की स्ट्रिंग थिअरी बरोबर वाटत नाही तर मला मूर्ख मानण्यात येईल, का? कारण जे गणितात इतके चपखलपणे बसते आहे त्याला तू चूक कसे म्हणू शकतोस?
बरे यात इतकी एडवांसमेंट झाली आहे ना, की मुळात एका कल्पित संकल्पनेवर आधारित असलेले गणित घेऊन पुढे त्याभोवती अजून हजारो गणिते आणि हजारो गृहीतके मांडली गेलीत. या एकाही गृहितकाला काहीही प्रयोगाचा वा निरीक्षणाचा आधार नाही तर हा सगळा डोलारा म्हणजे फक्त आणि फक्त गणिताचा खेळ आहे. एकापाठोपाठ एक अत्यंत क्लिष्ट होत जाणारी गणिते मांडून या थिअरीचा विकास चालू आहे. पण जर मुळातच पायाभूत संकल्पना चूक असेल तर वरचे मजल्यावर मजले चढवण्यात काय अर्थ आहे? वर कितीही आकर्षक मजले चढवले तरीही पायाच बरोबर नसेल तर इमारत ढासळणारच. जसे ईश्वर या मूळ चुकीच्या संकल्पनेभोवती कित्येक वेगवेगळे धर्म आणि वेगवेगळ्या कथा निर्माण झाल्या तसे स्ट्रिंग थिअरी भोवती 5 थिअरी निर्माण झाल्यात. एक त्या सगळ्यांना जोडणारी थिअरीही तयार झालीय. या थिअरीनुसार प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन पेक्षाही छोट्या स्ट्रिंग आहेत आणि अगदी पृथ्वीला वेढा घालतील एवढ्या मोठ्या स्ट्रिंगही आहेत. काहींनी तर यातील ब्रेन (मेंदू नाही तर मेंब्रेन मधले ब्रेन. हे सतरंजी सारखे सपाट काल्पनिक प्रतल आहे) हे ब्रह्मांडाइतके मोठे आहेत असे गणित मांडले आहे. असे कसे असू शकेल ज्या स्ट्रिंगने मूळ कण म्हणजे इलेक्ट्रॉन वगैरे बनतात ते त्यांच्याहुन छोटे आणि त्यांच्यातून कोट्यवधीपट मोठेही असू शकतात? पण तरीही आज या एका थिअरीची हजारो गणिते आणि हजारो इंटरप्रिटेशन्स बनलेली आहेत.
मला वाटते आज जगात बेसिक रिसर्चसाठी जो पैसा खर्च केला जातो त्यातील अर्धा हा स्ट्रिंग थिअरीवर खर्च होतोय. पण जर मूळ संकल्पनाच चूक असेल तर ही सगळी संपत्ती आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात यात एंगेज असलेली सर्वोत्तम मानवी बुद्धी वाया जात नाहीय का? जर ही थिअरी चूक निघाली तर विज्ञानाची ऐन उमेदीची कमीतकमी लास्ट 50 वर्षे तरी वाया गेली असे म्हणावे लागेल.
असो, तर मुद्दा आहे की गणित ही नवी भाषा आहे. विज्ञान हे सत्य शोधण्याचे नवे साधन आहे, आणि जशी पूर्वी धर्मांची भाषा न समजणारी होती तशी आज गणिताची भाषाही सर्वांना न समजणारी आहे. आणि तरीही जे गणिताने सिद्ध होईल तेच सत्य, अशी आज जागतिक मान्यता आहे. जसे धर्मग्रंथात म्हणजेच एलिट भाषेत लिहिले ते सत्य होय अशी मान्यता होती. नक्कीच गणित महत्वाचे आहे पण ठोस पुरावा नसताना फक्त गणिताने सिद्ध होते म्हणून एखाद्या संकल्पनेला सत्य मानणे हे मात्र चूक आहे असे माझे म्हणणे आहे.
(नेहमी फक्त देव, धर्म, अंधश्रद्धा यांचेच काय उणेदुरे काढायचे? विज्ञानजगत जर चुकत आहे असे वाटले तर त्याचेही उणेदुरे काढले पाहीजेत. विज्ञान असो की अंधश्रद्धा, एखादी गोष्ट पटत नसेल तर आक्षेप नोंदवलेच पाहीजेत. कारण आपण विज्ञानाचे अभ्यासक आहोत, भक्त नाही)