हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ४ ऑगस्ट, २०२०

नाचरा मोर

रिक्त रिक्त वाटलं की अगदी काठोकाठ भरून यावं
आठवणींच्या गावातून जरा, अनवाणी फिरून घ्यावं

हवी तशी गुणगुणावी खुशाल, आपली आवडती धून
शब्दांमध्येच उगा शोधत बसू नये, आपुलकीची खूण

नुसतीच घालावी साद मोठ्याने, नाव कुणाचे घेऊ नये
हरवून जावे स्वतःतच इतके की भानावरतीच येऊ नये

नसावेत कोणते सोपस्कार नि नकोच कोणते रिवाज
धावून जावे सोबतीसाठी, जरी नसेल दिला आवाज

चेहऱ्यावरती नेहमी ल्यावी, एक मंद हसरी चंद्रकोर
अंतर पडले तरी नाचू द्यावा, अंतरातला नाचरा मोर

कितीही पळाले तरी सुखाचा कदापि सोडू नये पिच्छा
(ही ओळ पर्सनल आहे, बाकी तुमची इच्छा)






..