"डॉक्टर म्हणाला होता की सायनाईड प्राशन करून डोक्यात गोळी मारणे हा सर्वात विश्वसनीय मार्ग आहे मरण्याचा.! ही हिमलरने दिलेली सायनाईडची कॅप्सूल आणि हे माझे भरलेले पिस्तूल.. पाचदहा सेकंदांचा खेळ फक्त.!! मग सगळेच संपेल.. सगळे संपेल? सगळे संपवावे? इतक्या सहज? एवढ्या पराक्रमाने जिंकलेला संपूर्ण युरोप!! जगावर राज्य करायला तयार असलेले माझे सैन्य...!! पण आता सगळे कसे पालटले आहे. युरोप तर ताब्यातून गेलाच पण खुद्द माझ्याच देशात हे रशियन शत्रूसैन्य इथे या माझ्या बंकरपासून केवळ एका किलोमीटरपर्यंत येउन ठेपले आहे. जिंकलेले प्रदेश एकेक करून निखळले. या प्रदेशांचे काय? आज गेले उद्या परत येतील. पण माझी माणसे? त्यांचे निखळणे हे अधिक वेदनादायक आहे. माझा सर्वात विश्वसनीय हिमलर मलाच फितूर व्हावा? आणि गोअरींग सुद्धा? छे.. हे सारे असहनीय आहे."
"सगळे म्हणतात की बर्लीन सोडून जा, कुठेही अज्ञातवासात जा, वा दुसऱ्या देशात आश्रीत म्हणून रहा. त्यांना त्यांचा फ्युरर जिवंत हवा आहे. मात्र मी माझ्या सगळ्या जनरल्सना स्पष्ट सांगितले होते की मी बर्लिन सोडून जाणार नाही. भले तर जीव देईन पण माझा देश सोडणार नाही.
आणि एक मात्र नक्की की मी एवढ्या सहजासहजी पराभव आणि मृत्यु स्वीकारणार नाही. जगाच्या इतिहासातून माझे, या फ्युररचे नाव अशा ओंगळवाण्या रीतीने कदापि पुसले जाणार नाही."
....
"समोर ही ईव्हा कशी निवांत झोपली आहे. ती चेहऱ्यावर काळजीचा, चिंतेचा लवलेशही दिसू देत नाही. तिला म्हंटले इथून तिच्या जाण्याची व्यवस्था करतो पण ती मला सोडून जायला तयार नाही. किती उत्साही आणि अवखळ स्त्री आहे ही. अगदी विजययात्रांत डौलाने फडकणाऱ्या माझ्या स्वस्तिक झेंड्यासारखी..!! मी सोडून तिला जगात काहीच नको आहे. कालच मी तिच्याशी लग्न केले आणि ती बिचारी माझ्याशी नव्हे तर दुर्दैवाशी विवाहबद्ध झाली.. ईव्हा माझी प्रिय ईव्हा..!! हिला मृत्युच्या स्वाधीन कसा करू? नाही. माझी हिम्मत नाही असे करण्याची. होय या जगात असेही काही आहे जे करण्याची हिम्मत साक्षात या फ्युरर मध्येही नाही."
"या इथे एक गुप्त दरवाजा आहे. तिथून एक भुयारी रस्ता बाहेर जातो... थेट रशियन सैन्यवेढ्याच्याही कितीतरी बाहेरपर्यंत.. ईव्हाला घेऊन त्यातून निघून जाऊ? पण मग जग मला पळपुटा म्हणून हसणार नाही काय? पण असे हसे होऊ नये याचीही तजवीज करता येईल. माझा प्रिय गोबेल्स त्यातूनही काहीतरी मार्ग नक्की काढेल. माझ्या मृत्यूची अफवा उडवून देईल अथवा मी भूमिगत राहून लढणार आहे अशी द्वाही फिरवेल.. या गोष्टीत त्याचा हातखंडा आहे.. किंवा असे केले तर…. छे.. विचार, विचार, विचार... नुसतेच विचार.. विचार हा ही एक त्रासदायक विकार आहे, नाही काय? मी थकलो आहे. गेले कित्येक दिवस फक्त पराभव, फितुरी आणि विद्रोहांच्या बातम्या ऐकून ऐकून मला प्रचंड शीण आला आहे. थोडे पहुडावे म्हणतो, पण झोप ती कशी कित्येक दिवसांत आलीच नाहीये.. तरीही आता या क्षणी या सर्वांच्या परोक्ष काहीतरी आनंददायी करावे म्हणतोय. माझे आवडते राष्ट्रगीत "हॉस्ट व्हेसल लीड" गुणगुणले की नेहमीच किती प्रसन्न वाटते..!!
"आम्ही आगेकूच करीतच राहू
सर्वकाही का विच्छिन्न होईना मग,
आज जर्मनी आमची आहे अन
उद्या आमचेच असेल सारे जग"
तेच हॉस्ट व्हेसल लीड गुणगुणत बसून थोडावेळ डोळे मिटून पडूयात तर खरे.. "
...
"अरे तू कोण आहेस? आणि तू आत कसा आलास? तू रशियन तर नाहीस ना? तुला मी कधी पाहिल्याचे स्मरत नाही. तुझा पेहराव देखील किती निराळा आहे. काही दगाफटका करायला आला असशील तर याद राख. चल निघ बाहेर इथून. नाहीतर थांब मी माझ्या सुरक्षारक्षकांस बोलावतो."
"थांब थांब.. फ्युरर थांब.!! कुणालाही बोलावण्याची गरज नाही. कारण त्याचा काहीएक उपयोग होणार नाही. मी माझ्या मर्जीने आलो आहे आणि मर्जीनेच जाणार. तुझे सुरक्षारक्षक मला पाहूदेखील शकणार नाहीत. मी तुला दगाफटका करायला नव्हे तर तुझी मदत करायलाच आलो आहे."
"माझी मदत करायला तू आहेस कोण? एखादा देवदूत तर नाहीस ना? आणि मला मदत करायला आला आहेस म्हणजे नेमके काय करणार आहेस तू? युद्धाचे पारडे फिरवणार आहेस? पुन्हा माझ्या देशाला उभारी देणार आहेस? की मला येथून सपत्निक सुरक्षित बाहेर नेणार आहेस?"
"नाही, मी असे काहीही करणार नाहीये. फक्त थोड्या गप्पा मारणार आहे तुझ्याशी."
"निव्वळ गप्पा मारल्याने माझी काय मदत होणार आहे? मला वाटते की एकतर तू वेडा असशील अथवा मला वेडा ठरविण्यासाठी सोंग घेऊन आला असशील. थांब मी ईव्हास उठवितो आणि तुला बाहेर घालवून देतो."
"नको नको वीर पुरुषा, तिला निद्रीस्तच राहू देत. मी सांगतो तुला मी कोण आहे ते... मी देखील तुझ्यासारखाच एक महायुद्ध घडवून आणलेला आणि त्यात पराभूत झालेला दुर्दैवी योद्धा आहे. माझ्यासाठी देखील युद्धात लक्षावधी वीरांनी प्राणाहुती दिली आहे. मी देखील एक मोठे साम्राज्य गमावून बसलेलो आहे. खरेतर मी आधीच तुला भेटावयास यायला हवे होते जेणेकरून हे युद्ध टाळता आले असते. पण या युद्धात एवढी हानी होईल याची मला कल्पना नव्हती, आणि जरी असती तरी तू माझे ऐकून युद्ध थांबविले नसतेस. युद्धज्वर ही मृत्युशिवाय कशानेही बरी न होणारी व्याधी आहे. युद्ध पुकारणारावर तो चढला की कुणीही त्यास उतरवू शकत नाही. मी कितीही समजावले असते तरी तू थांबला नसतास. मी तरी कुठे बधलो होतो कित्येक थोरा-मोठ्यांच्या सांगण्याला? तुझ्यासारखाच मलाही ठाम विश्वास होता, माझ्या सैन्य ताकदीवर आणि माझ्या शूर योद्ध्यांवर..! आणि तो अगदीच काही अनाठायी देखील नव्हता. त्यामुळे त्याच ताकदीच्या गर्वामुळे मला सामोपचाराचे सल्ले देणारांस, मग तो साक्षात देव का असेना, मी धुडकावून लावले होते."
"ते सगळे सोड. मला मरायचे नाहीये आणि पळपुटा देखील म्हणवून घ्यायचे नाहीये. तेव्हा आता मी कुठे दडी मारून बसू ते सांग, जेणेकरून शत्रू राष्ट्रे मला कधीच शोधू शकणार नाहीत?"
"अहो महाशय या जगात पराभूताचे मरण अटळ आहे, आणि जर तो पराभूत पुरुष मोठ्या नरसंहारास कारणीभूत असेल तर तो कधीच दडून राहू शकत नाही."
"असे कसे म्हणतोस तू? अरे एवढी मोठी ही पृथ्वी आहे, एवढी अब्जावधी माणसे आहेत, त्यात एक माणूस बेमालूम मिसळून जाऊ शकत नाही?"
"नाही.. जेत्यांच्या हातून जीताच्या प्राक्तनातला मृत्यू तो लपून बसल्याने टळत नाही. फार फार तर काही काळ तो लांबू शकतो, पण अपमानास्पद मरण त्याला टळू शकत नाही. इतिहासातही ते मृत्यू टळले नाहीत आणि भविष्यातही टळणार नाहीत. माझा स्वत:चा अनुभव आहे हा.! मी ही युद्ध समाप्तीच्या समयी नदीच्या एका निर्जन, खोल डोहात लपून बसलो होतो. मात्र त्यांनी मला शोधून काढलेच. तद्वत तुझेही मरण अटळ आहे."
"असे असेल तर मी निकराने लढेल आणि लढता लढता धारातीर्थी पडेल. हुतात्मा ठरेल. काही झाले तरी माझ्या राष्ट्रास मी न भूतो न भविष्यति अशा उत्कर्षास नेले होते.! माझ्या मृत्यूनंतरही माझ्या राष्ट्राच्या पुढील सगळ्या पिढ्या माझे गोडवे गातील, अभिमानाने माझे नाव घेतील. माझा मृत्यू राष्ट्रभक्तीचे एक आदर्श प्रतिमान ठरेल."
"खरे सांगू का? भविष्याच्या पिढ्यांपर्यंत आपला तोच इतिहास पोचतो, जो जेते त्यांना सांगतात. युद्ध हरणारे नेहमीच खलनायक ठरतात. जेते चांगले असोत वा वाईट, त्यांचे फक्त चांगले स्वरूप पुढच्या पिढ्यांपर्यंत पोचते आणि जीतांचे केवळ वाईट स्वरुप.!! मी काय, तू काय किंवा भविष्यात जन्मणारा अजून कुणी पराभूत पुरुष काय, आपला इतिहास एवढा विकृत केला जातो की कुणी आपल्या एखाद्या सद्गुणास वाखाणने हे देखील दुर्वर्तन समजले जाते. हा भोग मी भोगतो आहे आणि तुही भोगशील."
"आणि मला आपली चुक सुधारायची असेल तर? पश्चाताप करण्याची संधी प्रत्येकास मिळायलाच हवी. तेच न्याय्य आहे, नाही का?"
"आपल्या आत्यांतिक दुर्गर्व आणि तिरस्कारातून छेडल्या गेलेल्या युद्धाची चुक सुधारण्याची एकच वेळ असते.. ती चुक घडण्याआधीची.. एकदा ती घडली की तिला माफी नाही.. या पृथ्वीतलावर मृत्युही त्यातून आपली सुटका करीत नाही... आपले दोष, उणीवा येणाऱ्या हजारो पिढ्यांपर्यंत आपल्याला कुरतडत असतात.. हेच बघ ना, मृत्यूनंतर मलाही माझ्या शत्रूंप्रमाणे परलोकांत नरक न लाभता स्वर्गच लाभला.. पण इहलोकी मात्र हजारो वर्षांनंतरही मी एक खलनायकच आहे, आणि निर्भत्सनेच्या नरकातच खितपत पडलो आहे."
"पण माझे शत्रू दावा करतात की त्यांचे युद्ध मानवतेच्या हितासाठी आहे, मग ते मला माफ करणे सोड, पण किमानपक्षी सन्मानजनक मृत्यू देणार नाहीत कशावरून? शेवटी त्यांची बाजू मानवतावादी मुल्यांची आणि न्यायाची आहे..."
"हा हा हा.. !!! तुझ्या सहकारी मुसोलिनीचा मृत्यु विसरलास? त्याला नाही का अपमानास्पद रीतीने मारून त्याच्या मृतदेहाचे देखील धिंडवडे काढण्यात आले. त्याच्या मृतदेहाला त्यांनी लाथा मारल्या, त्यावर थुंकले, आणि तेवढ्याने समाधान झाले नाही म्हणून मृतदेह भर चौकात उलटे टांगून लोकांनी त्याला दगड फेकून मारले. मी हा जो तुझ्याशी बोलतो आहे, त्या मला कसे मरण लाभले माहीत आहे? स्वत:ला धर्माचे पालक समजणारे माझे शत्रू जे खरेतर माझेच बांधव होते, घायाळ मरणासन्न अवस्थेत रानात मला एकटेच सोडून गेले... आकाशात गिधाडे आणि आजूबाजूस हिंस्र श्वापदे आपल्या मरण्याची वाट पाहत घिरटया घालत आहेत आणि आपली प्राणज्योत मालवताच किंबहुना अगदी जिवंत असतानाच आपल्या शरीराचे लचके तोडले जाणार आहेत हे माहीत असलेल्या मन:स्थितीत मी मृत्युस सामोरा गेलोय.. इथे माझ्या जवळ ये आणि ही माझी विच्छिन्न झालेली मांडी बघ... बघ आर्यपुत्रा.. मी महाभारतीय महायुद्धाचा पराभूत योद्धा दुर्योधन आहे..!!!"
....
दुसऱ्या दिवशी जगभरातल्या वर्तमानपत्रांत मथळा झळकला......
"नाझी भस्मासुर हिटलरची डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा