हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २ मे, २०२५

क्षत्रियतेचा भारतीय भ्रम



स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेणे ही भारतातली एक पॉप्युलर सामूहिक सणक आहे. क्षत्रिय म्हणवून घेणे हे उगाच एका श्रेष्ठतेच्या फुक्या किंवा फोल भावनेला खतपाणी घालते. मी नेहमी म्हणतो की ज्या लोकांना आपली वैयक्तिक लायकी कमी आहे हे जाणवत व जाचत असते तेच लोक मग सामूहिक ओळखीतून, वांशिक ओळखीतून ती वैयक्तीक नालायकी कम्पेन्सेट करू पाहतात. इतरांना कशाला नावे ठेवा, माझ्या जातीच्या नावाने सुद्धा इंटरनेटवर शेकड्यांनी स्वतःचा क्षत्रिय उल्लेख करणारी पेजेस, वेबसाईट अस्तित्वात आहेत, पण तो शुद्ध मूर्खपणा आहे हे माझे स्पष्ट मत आहे. तर चार वर्णांपैकी आज फक्त ब्राह्मण या नावाने ओळखले जाऊ शकतात असे लोक अस्तित्वात आहेत. बाकी वर्णांचे नामधारक लोक अस्तित्वातच नाहीत. फक्त ब्राह्मणांनी आपला वर्ण जपला आहे असे सकृतदर्शनी भासते, पण तेही खरे नाहीय. वांशिक ओळखीने तर नाहीच नाही. डीएनए अभ्यासावरून कळते की भारतात पूर्वी सरेआम आंतर्जातीय विवाह होत होते. त्यामुळे वांशिकदृष्ट्या तरी आपण कोणीही पृथक राहीलो नाहीय. गुप्त राजवटीच्या काळात म्हणजे साधारण दीड हजार वर्षांपूर्वी विक्रमादित्याच्या काळापासून आंतर्जातीय विवाह बंद झाले. विक्रमादित्यानेच जातीव्यवस्था (एंडोगामी) आणली असे म्हणता येईल. महाभारत वगैरे ग्रंथही याच्याच दोनेकशे वर्षे आधी लिहिले गेले असावेत आणि त्यात जे वर्णांवरून उल्लेख येतात ते याच काळात घुसवले गेले असणार अशी जास्त शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र अगदी ६०० वर्षांपूर्वीपर्यंत सर्रास आंतर्जातीय विवाह होत होते असे डीएनए अभ्यासातून कळले आहे, कारण आजच्या सगळ्या महाराष्ट्रीय जातींची कॉमन डीएनए अन्सेस्टरी (वांशिकता) ही ६०० वर्षांपर्यंतच मागे जाते. त्यांनतर मात्र ते इथेही बंद झाले. जाती आल्यावर ब्राह्मण वगळता इतर वर्णांच्या स्पष्ट ओळखी नष्ट झाल्या. आणि कुठेही लिखित स्वरूपात वांशिक ओळखीच्या नोंदी नसल्याने लोकांनी आपापल्या परीने आज स्वतःला बळेच कुठल्यातरी वर्णात बसवले आहे. काही स्वतःला क्षत्रिय म्हणतात, काही वैश्य तर काही शूद्र. पण खरेतर नावापुरती ब्राह्मण ही ओळख सोडता ब्राह्मणांसहीत कोणतेही वर्ण आज अस्तित्वात नाहीत. जिथे जन्मावरून जाती आल्या तिथेच वर्ण नष्ट झाले. मात्र पुराणकाळात वर्ण बनताना जी कर्मावरून व्याख्या केलेली आहे त्यावरून लोकांनी स्वतःला आज त्यांत बळेच फिट करून घेतले आहे. पण वर्णव्यवस्था बनली तेव्हाही तिची अगदी ठोस अशी वंशाधारित ओळख नव्हती. त्यातही माझ्यामते वैश्य हा वर्ण तर अगदीच अतर्क्य आहे. कोणत्या पुराणात कोण वैश्य होता, त्या एकातरी वैश्य व्यक्तीचा उल्लेख वा नाव सांगा. ना महाभारत ना रामायण, कोणत्याच कथेत कोणीही वैश्य व्यक्ती वैयक्तिकपणे अस्तित्वातच नाहीय. मग हा वर्ण बनला कसा? आणि आज जर 'आयएनजी वैश्य' ही बँक आहे तर ती बनवणारांनी ही वैश्य ओळख घेतली कशावरून? असे आहे की वर्णांच्या कर्माधारीत व्याख्येवरून आज सगळे लोक स्वतःला कुठेतरी बळेच फिट करून घेत आहेत. पण ते पूर्णतः चुकीचे आहे. ब्राह्मण ही सुद्धा एक जात नाहीय तर जातींचा एक समूह आहे. ब्राह्मणांतही अनेक जाती आहेत उदा. चतुर्वेदी, तिवारी, द्विवेदी, अग्निहोत्री वगैरे नुसती आडनावे नाहीत तर त्या वेगवेगळ्या जाती आहेत. विक्रमादित्य या गुप्त राजाने जाती आणल्या तिथेच वर्ण नष्ट झाले, परंतु कसे कुणास ठाऊक पण ब्राह्मण ही ओळख मात्र तशीच राहिली. अर्थातच त्यातील फायद्यांमुळे ती ओळख कृत्रिमपणे बनवून वा राखून ठेवण्यात आली असावी हे स्पष्ट आहे. 
असो तर आपला मुद्दा आहे क्षत्रियत्व. परशुराम जयंतीमुळे हे लिहायला सुचले. परशुरामाने २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली हे आपणाला माहीत आहे, पण आज जेवढे लोक स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेतात ते बघता असे करणे कोणालाही शक्य नाही. अगदी हिटलरसारखा क्रूरकर्मा त्याच्याकडे आधुनिक विनाशक साधने असूनही फक्त जर्मनीतल्या सुद्धा सगळ्या ज्यूंना जे जर्मनीच्या लोकसंख्येत फक्त ०.८% होते (एकूण सव्वापाच लाख), त्यांनाही पूर्ण संपवू शकला नाही तिथे नुसत्या कुऱ्हाडीच्या मदतीने परशुराम हे कसे काय करू शकेल? आणि जर महाभारतात १८ अक्षौहिणी लढलेले सैन्य असेल आणि हे सगळे क्षत्रिय असतील तर तेच ४० लाख ठरतात, प्रत्यक्ष तर त्याहून खूप जास्त क्षत्रिय असायला हवेत कारण महाभारत युद्धानंतरच्या अर्जुनाच्या अश्वमेधाला भारतभर विरोध झाला होता. तरीही सोयीसाठी ४० लाख इतकीच संख्या गृहीत धरून मी चॅटजीपीटीला विचारले की जर एक माणूस तलवार घेऊन, घोड्यावर बसून एकूण ४० लाख केळ्याची झाडे भारतभर तोडायला निघाला तर प्रवास, झोप, जेवण वगैरे धरून त्याला किती वेळ लागेल? तर ते म्हणते ३० ते ३५ वर्षे. तेही एक झाड ५ सेकंदात तोडले असे गृहीत धरून. म्हणजे जागेवरून पळू न शकणारी व विरोध करू न शकणारी केळी तोडून २१ वेळा भारताला नि:केळीय करायला सुद्धा ३५x२१ म्हणजे ७३५ वर्षे लागतील. म्हणजेच या कहाणीत काहीतरी गोम आहे. पण ही कहाणी लिहिणारा इतके ऑब्व्हियस ब्लंडर कसे करेल?  
याचाच अर्थ हा की लढणारे सगळेच लोक क्षत्रिय होते ही आजची आपली संकल्पनाच चुकीची आहे. मुळात त्या काळी क्षत्रिय हे संख्येने अगदीच कमी असणार, आणि म्हणून परशुरामाने असे केले हे लिहायला त्या कथाकाराला फार चुकीचे वाटले नसणार. कसे ते पुढे पाहू. 
महाभारतात जेव्हा कर्ण अर्जुनाला राजकुमारांच्या युद्धशाळेच्या परीक्षेत आव्हान देतो तेव्हा कर्ण स्वतः क्षत्रिय नाही म्हणून तो क्षत्रिय अर्जुनास आव्हान देऊ शकत नाही असे द्रोणाचार्य म्हणतात. कारण क्षत्रियासोबत फक्त ब्राह्मण वा क्षत्रियच लढू शकतो. त्यावर दुर्योधन काय करतो? तो तिथल्यातिथे कर्णाला अंग देशाचा राजा म्हणून राज्याभिषेक करवतो. का करवतो? तर त्यामुळे कर्ण क्षत्रिय व्हावा म्हणून. पण अर्थातच कुंती बेशुद्ध पडते, अधिरथ येऊन कर्णाला घेऊन जातो, व युद्धशाळेचा वेळही संपतो म्हणून कर्ण अर्जुन त्यावेळी एकमेकांशी लढत नाहीत. पण त्यांनतर मात्र दोघे एकमेकांशी आयुष्यात दोन वेळा लढले, एक विराटाच्या नगरीत अज्ञातवास संपताना आणि दुसरे कुरुक्षेत्रात. म्हणजेच काय की जन्माने असो की नसो, पण कर्ण राज्यभिषेकानंतर मात्र क्षत्रिय झाला होता. 
मला सगळ्या पुराणांत वा कथांत असा फक्त एक क्षत्रिय सांगा जो एकतर स्वतः राजा नव्हता वा राजवंशाचा नव्हता. असा एकही तुम्हाला सापडणार नाही. गंमत बघा, विदुराचा आणि धृतराष्ट्राचा बाप एकच असूनही धृतराष्ट्र क्षत्रिय होता पण विदुर क्षत्रिय नव्हता. का? तर विदुराची आई क्षत्रिय नव्हती. ब्राह्मण बाप आणि इतर वर्णाची आई असलेले अपत्य ब्राह्मण होऊ शकत होते किंवा आई ज्या वर्णाची आहे त्या वर्णाचे होत होते. क्षत्रिय बाप आणि इतर वर्णाची आई असेल तेव्हाही सेम होते. क्षत्रिय बाप आणि ब्राह्मण आई याचे मला फक्त एक उदाहरण आठवते आहे. ययाती आणि देवयानी. 
तर मुद्दा हा आहे की क्षत्रिय हा वर्ण फक्त राजा किंवा राजवंशात जन्मलेला याच लोकांना मिळत होता. सगळे लढाई करणारे लोक क्षत्रिय नव्हते. इतकेच नाही तर राज्य कायमचे गेले तर ती व्यक्ती क्षत्रिय राहत नव्हती. विश्वामित्राने राज्य सोडले आणि तो पुढे क्षत्रिय राहीला नाही. कृष्णाचे आई वडील क्षत्रिय होते (वासुदेवाचा पिता राजा होता) पण त्यांचे राज्य गेले. म्हणून युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्णाला अग्रपूजेचा मान देण्यास दुर्योधनाने विरोध केला होता. कारण हा मान श्रेष्ठ क्षत्रियांना द्यायचा असतो, एका गुराख्याला हा मान का देता असे त्याचे म्हणणे होते. म्हणजेच दुर्योधन कृष्णाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नव्हता. लक्षात घ्या की कृष्ण कधीही राजा झाला नाही आणि बलरामही झाला नाही. 
थोडक्यात काय की क्षत्रिय हा वर्ण फक्त राजा आणि त्याच्या वंशातील अपत्यांना मिळत होता. मात्र राज्य गेले की क्षत्रियत्व सुद्धा जात होते. म्हणजेच काय की तेव्हा क्षत्रियांची संख्या अगदीच अल्प असेल. अगदीच म्हंटले तर महाभारताच्या वेळी भारतवर्षात १५० ते २०० राजे असतील. इतक्या राजांना आणि त्यांच्या दोन तीन पुत्रांना मारणे परशुरामाला अवघड असले तरी अशक्य नाही. पण आपल्या समजुतीप्रमाणे सगळ्या लढणारांना क्षत्रिय मानले तर ४० लाख क्षत्रियांना मारणे मात्र नक्कीच कुणालाही अशक्य आहे. 
मग प्रश्न येतो की आज कुणी क्षत्रिय आहे का? त्याआधी माझा प्रश्न आहे की आज कुणी राजा आहे का? आणि दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच आहे. जिथे राजाचा नातू असूनही प्रत्यक्ष देव म्हणून मान्यता असलेल्या कृष्णालाही त्याचे राज्य गेल्यामुळे दुर्योधन क्षत्रिय मानायला तयार नव्हता तिथे फक्त एखाद्या राजाच्या जातीचे, आडनावाचे, प्रांताचे आहोत म्हणून आम्ही क्षत्रिय आहोत असे म्हणणारे लोक किती खुळ्या भ्रमात आहेत सांगा बरे. जरी तुम्ही एखाद्या राजवंशाचे थेट वारसदार असाल मात्र तुमचे राज्य अस्तित्वात नसेल तरीही तुम्ही क्षत्रिय नाहीत हे वर दाखवून दिले आहे. आणि त्यामुळे अर्थातच आज कोणीही राजा नसल्याने कोणीही क्षत्रिय नाहीय. उगाच छाती बडवून स्वतःला क्षत्रिय म्हणवून घेणारे वा तसा दावा करून ऊर बडवून घेणारे कोणीही लोक क्षत्रिय नाहीत हेच खरे आहे. लढाई करणारे सगळे क्षत्रिय असत हेच खोटे आहे. सगळे लढाई करणारे क्षत्रिय नव्हते तर फक्त राजे लोक आणि राज्य करणाऱ्या राजाचे पुत्र पुत्री हेच क्षत्रिय होते. आज भारतात क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे वर्णच नाहीत, वा आपल्याला यापैकी कोणत्याही एका वर्णाचे मानणारे सगळे लोकही पूर्णतः चूक आहेत. खरेतर वर्णच नष्ट झाल्याने ब्राह्मण हा वर्णही अस्तित्वात नाहीय, पण त्यातील फायद्यामुळे काहींनी ती ओळख बनवून ठेवलेली आहे. म्हणून मी वर म्हंटले आहे की लढणारे सगळे क्षत्रिय असतील तर कोणत्याही पुराणातील असे एकच नाव सांगा जे राजा वा राजवंशातील नव्हते मात्र तरीही क्षत्रिय होते. तुम्ही नाही सांगू शकत. 
आज बहुतांश मागास असलेल्या जाती स्वतःला शूद्र समजतात. अगदी बाबासाहेब आंबेडकरांनीही सगळे लढणारे क्षत्रियच असतात या समजुतीतूनच 'शूद्र कोण होते' हे पुस्तक लिहीले आहे. पण ते पुस्तक क्षत्रिय शब्दाच्या आजच्या चुकीच्या संकल्पनेवर आधारीत आहे असे म्हणावे लागेल. मी ते पुस्तक वाचले, त्यात बाबासाहेबांनी दिलेले दाखलेही अगदी समर्पक आहेत पण मूळ क्षत्रिय वा शूद्र या संकल्पनाच आजच्या परिप्रेक्ष्यात चूक आहेत. आज कोणीही क्षत्रिय वा शूद्र नाही. इतकेच नाही तर हेही अजिबात जरुरी नाही की आज जे स्वतःला शूद्र समजतात त्यांचे पूर्वज शुद्रच असतील. ते कोणत्याही वर्णाचे असू शकतात. ब्राह्मण, वैश्य वा अगदी अत्यल्प असलेले क्षत्रिय सुद्धा त्यांचे पूर्वज असू शकतात. मुळात पुरातन भारतात समाजात वर्णव्यवस्था असेल असेच मला वाटत नाही. मात्र असलीच तरी एकंदरीत आपली समाजरचना बघता मला वाटते की शूद्र हे फक्त राजदरबारात, व राजमहालातले सेवक वा सेवा करणारे असणारे लोक असतील. शेती करणारांना आज आपण शूद्र समजतो, पण ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसच्या लिखाणातून स्पष्ट होते की भारतात शेतकऱ्यांचा दर्जा त्या काळी खूप वरचा होता (विक्रमादित्याच्याही आधीच काळ). त्यामुळे कदाचित शेतकरी वर्ग आणि पर्यायाने सगळा समाज हा बहुतांशी असलाच तर वैश्य असेल. किंवा काय घ्या वर्ण हे कधी समाजात अस्तित्वातच नसतील. कारण मेगॅस्थेनिस हेही म्हणतो की भारतात तेव्हा फक्त दोनच जाती होत्या, ब्राह्मण आणि श्रमण. अस्पृश्यताही समाजात कधी घुसली माहित नाही. पण बाबासाहेब आंबेडकर हे स्पष्ट दाखवून देतात की जे क्षत्रिय राजे वेदांच्या व यज्ञांच्या विरोधात गेले त्यांनाच अस्पृश्य ठरवण्यात आले. 
असो तर नेमके कधी ते सांगता येणार नाही पण कधीतरी काहीतरी मोठे सामाजिक चर्नींग होऊन ब्राह्मण आणि श्रमण एकत्र झाले, त्यांनी एकमेकांच्या संकल्पना, समजुती व अगदी देवही शेअर केले. कारण महादेव वा शिव जो भारतातला सर्वात मोठा देव आहे, त्याचा साधा नामोल्लेखही ऋग्वेदात नाहीय. ऋग्वेदात रुद्र आहे. जो पुढे महादेवात मिसळला गेला. ऋग्वेदातील विष्णूही अगदी साधी देवता आहे. त्याचे अवतार आणि बाकी कार्ये ही खूप नंतरच्या काळात निर्माण झाली. असेच ब्रह्माचेही आहे. त्यामुळे फक्त वेदिक ग्रंथात (व कदाचित फक्त मेगॅस्थेनिसने सांगितलेल्या ब्राह्मण धर्मातच) असलेले मात्र प्रत्यक्ष समाजात नसलेले वर्ण बहुतेक याच चर्नींग काळात समाजात मिसळले गेले असतील. ते काय झाले कसे झाले हे आपल्याला कदाचित कळणार नाही कारण आपणा भारतीयांना काहीही लिहून ठेवण्याची सवय नव्हती हे मेगास्थेनीस आणि अल बिरुनी अशा दोघांनीही लिहून ठेवले आहे. 
मुद्दा हा आहे की आज भारतात कोणीही क्षत्रिय व शूद्र नाहीय. खरेतर ब्राह्मण वर्ण सुद्धा वर्ण म्हणून अस्तित्वात नाहीय पण कसेतरी एका ग्रुप ऑफ जातींनी ती ओळख कायम राखली आहे. आपण वेगवेगळ्या वर्णाचे नाही. आपण सगळे सेम आहोत, किंबहुना बहुतांश भारतीय हे मुळात वर्णव्यवस्थेच्या बाहेरचेच असण्याची शक्यता आहे. कधी अस्तित्वात असलीच तर वर्ण व्यवस्थेत असणारे लोक अगदी अल्पसंख्य असावेत. मात्र त्यांनी रचलेले ग्रंथ टिकून राहीले, इतरांनी एकतर ग्रंथ रचलेच नाहीत वा टिकवून ठेवले नाहीत. त्यामुळे जे टिकून राहिलेय तेच सगळ्या भारताला लागू होत असावे असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात वर्णव्यवस्था फारच कमी लोकसंख्येत लागू असावी, नाहीतर जाती बनण्याचा प्रश्नच आला नसता. मेगास्थेनिसने सुद्धा क्षत्रिय, वैश्य, शूद्र या कोणत्याही शब्दाचा उल्लेखसुद्धा केला नाहीय. जे ग्रंथ टिकले त्यांवरून केवळ ग्रंथप्रामाण्य या दुर्गुणामुळे आपण आजच्या आपल्या जातींच्या व्यवसायावरून वा कामावरून बळेच स्वतःला कोणत्यातरी वर्णात घुसवतो.



...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा