हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२

"मल्हारवारी"

येणाऱ्याशी गोड गोड संवाद सुरु करून
मल्हारवारी मोतियांनी घ्यावी भरून...


ढूम ढूम ढोलक्याचा, झुक झुक गाडीचा..
लागू देत लळा त्यास आजोळच्या माडीचा..
भुर्र उडणारे चिऊ काऊ, आणि म्यांव करणारी मनी माऊ..
मुंबईवाले काका आणणार तो चॉकलेटचा खाऊ..
आणि सांग खेळण्यांची सारी दुकाने ठेवलीत हेरून...
मल्हारवारी... मोतियांनी घ्यावी भरून...


सांगून ठेव त्याला कसा असतो.. मातीचा गंध आणि आकाशाचा रंग..
कसे शहारते पहिल्या पावसात भिजलेले अंग..
कसा घुमतो विठ्ठलाच्या भजनाचा टाळ..
आणि.. बांधावी कशी गळ्यात बगळ्यांची माळ...
ऐक होकार देईल हलकेच हुंकारून...
मल्हारवारी मोतियांनी घ्यावी भरून...


झपाटल्यासारखा काही वर्षे मागे काळ जातो..
बाप झाल्यावर आपणच पुन्हा बाळ होतो..
पंखांवाल्या पऱ्या आणि घोड्यावरचा राजपुत्र..
नात्यापलीकडचे आपणच जोडावे निखळ निर्बंध मैत्र
पुसलेले बालपण पुन्हा मनाजोगते ठेवावे सावरून..
मल्हारवारी मोतियांनी घ्यावी भरून...


असा फुटावा देहास धुमारा... की प्रतिकृती बनून साकार व्हावा....
अपुऱ्या अर्ध्या बोबड्या बोलांचा.. त्रैलोक्यव्यापी ओंकार व्हावा...
पिवळेजर्द उधाणलेले चातकाचे रान.. अन अवचित अलगद "मल्हार" यावा...

शनिवार, २१ जानेवारी, २०१२

संस्कृती


बुलडोझर आले, रोलर फिरले..
विटा, माती, पत्र्यांचे ढिगारे उरले..
.
झाडे कापली, फुटपाथ उसवला... टपरीसकट पानवाला पप्पू आणि राज्या उचलला..!!!
साऱ्या निगडित आठवणींसकट, पीएमटीचा स्टॉप सुद्धा मागे ढकलला..
ती चहापोह्यांची दुकाने, तो इस्त्रीवाला, ... ते सुनील भाऊंचे झेरॉक्स,तो आसिफ चा एसटीडी सारे काढले खणून..
अवाढव्य प्रगतीला आणि बेफाम गर्दीला जागा पुरत नाही म्हणून...
बुलडोझर आले, रोलर फिरले..
विटा, माती, पत्र्यांचे ढिगारे उरले..
.
लांबलेले निरोप.. शेअर केलेल्या सिगरेट्स, न्याहाळलेल्या पोरी..
दुकानांत आपल्या वटवर ठेवलेली.... दोन-चारशेची उधारी..
तो मंतरलेला काळ गेला... काळ्या डांबरात चिणून...
अवाढव्य प्रगतीला आणि बेफाम गर्दीला जागा पुरत नाही म्हणून...
बुलडोझर आले, रोलर फिरले..
विटा, माती, पत्र्यांचे ढिगारे उरले..
.
कट्टा जेव्हा कट्टी घेतो.. आणि आठवण जेव्हा अडचण होते..
तेव्हा विकासकांना काय ठाऊक.. एक संस्कृती लयास जाते...
त्यांनी एक रस्ता रुंदावला.... कित्येक जुन्या वाटा गाडून...
अवाढव्य प्रगतीला आणि बेफाम गर्दीला जागा पुरत नाही म्हणून...
बुलडोझर आले, रोलर फिरले..
विटा, माती, पत्र्यांचे ढिगारे उरले..
.
COEP HOSTEL footpath demolished for road broadening..!!!