हा ब्लॉग शोधा

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

सर्वाधिपती

हिमालयाच्या डोंगररांगांतल्या निबीड अरण्यात एक निसर्गपूजक गणराज्य होते.! तिथला राजा राजमहालात नाही तर पर्णकुटीत राहत असे. तो लोकलज्जेस्तव आवश्यक तेवढीच वस्त्रे परिधान करत असे. त्याची राणीही अगदी त्याच्याचसारखी साधीसुधी राहणारी होती. दक्षिण हिमालयाकडील नागरी राज्यातील एका मोठ्या राजाची राजकन्या असूनही तिस कोणत्याही दागिन्याचा मोह नव्हता की साजशृंगाराची हौस नव्हती. ना राजमहाल ना राजदरबार. एका पठारावर एका मोठ्या सपाट पृष्ठभाग असलेल्या शिळेवर राजा आपल्या राणीसोबत बसे आणि समोरच्या माळावर मोकळ्या आभाळाखाली त्याचा दरबार भरे.! ती सपाट पृष्ठभागाची शिळा हेच त्याचे सिंहासन आणि तो मोकळा माळ हीच त्याची राजसभा.!! राजा आणि राणी अशा दोघांचीही आपापली अशी काही कार्यक्षेत्रे होती. त्यांचा कारभार ते दोघेही वैयक्तिकरीत्या पाहत असत. 
प्रामुख्याने दूर दक्षिणेकडील नद्यांच्या खोऱ्यांतील नागरी राज्यांमधून विविधोपयोगी कार्यांसाठी खूप मागणी असलेल्या हिमालयातील अतिशय दुर्मिळ वनस्पती, फलवृक्ष, पक्षी, पशु यांचे योग्य संवर्धन करून त्यांचे विविध प्रभागांत सुयोग्य असे प्रमाण राखणे हे राजाच्या जमातीचे मुख्य काम होते. पशु, पक्षी, वनस्पती, मानव अशा सर्वांची मोजणी करून नोंदी ठेवणे, विशिष्ट प्रमाणात हे वृक्ष व त्यांची उत्पादने, व विविध पशु पक्षी यांचा दक्षिणेतील मानवांच्या उपयोगासाठी पुरवठा करणे, एखादी पशु जमात वा एखादी वनस्पती एका विभागात प्रमाणाहून अधिक वाढली की ती जमात इतर प्रजातींस मारक ठरत असते अशा प्रजातींचे स्थलांतर अथवा क्षालन करून प्राकृतिक समतोल कायम ठेवणे, प्रमाण कमी होत चाललेल्या प्रजातीसाठी संवर्धन योजना राबविणे हे त्यांचे पारंपरिक काम होते.
ही कामे माणसांचे वेगवेगळ्या प्रांतांत वेगवेगळे गट बनवून विभागून देण्यात आलेली होती. या गटांना गण असे म्हणत. व्याघ्र गण वाघांचे नियोजन करी, सुरुची गण सुरुची वृक्षांचे, मेष गण मेष पशूंचे, वृषभ गण बैलांचे, हस्ती गण हत्तींचे नियोजन करत असे. सर्व गणांची आपापली प्रतिकचिन्हे होती. दोन शिंगांचा मुकुट हे वृषभ गणाचे प्रतीकचिन्ह होते तर मयूरपंखाचा शिरपेच हे मयूर गणाचे प्रतीकचिन्ह होते. अशाप्रकारे राज्यात विविध भागांत जिथे संबंधित प्रजातींचे नैसर्गिक वास्तव्य अधिक असेल त्या त्या विभागात गण प्रमुखांद्वारे पाच ते दशसहस्त्र स्त्री पुरुष गण सहकाऱ्यांच्या मदतीने सदर प्रजातीशी संबंधित कार्यभाग पार पडत असे. या सर्व गणांचे प्रमुख दर सहा महीन्यांनी राजापुढे येऊन कारभाराचा सर्व वृत्तांत सादर करीत व काही समस्या असल्यास राजाकडून त्याचे समाधान प्राप्त करीत. शेतीसाठी बैलांची, व काही धार्मिक विधींसाठी मयूरपंखांची मागणी नदी खोऱ्यांतील राज्यांतून सर्वात अधिक असल्याने वृषभ व मयूर गणाचे प्रस्थ राज्यात खूप मोठे होते. आणि वृषभ व मयूर गणाचे प्रमुख म्हणूनच नेहमी राजासमवेतच राहत असत. किंबहुना राजाचा एकमेव पुत्र हाच मयूर गणाचा प्रमुख होता.
जसा सजीव प्रजातींचा कारभार राजा बघत असे तसा विविध, धान्ये, खनिजे, मृदा, मीठ, घडीव पाषाण, धातू इत्यादी वस्तूंचे नियोजन राणी करत असे. या सर्व वस्तुंच्याही नियोजनासाठी विविध गणांचे विभाग निर्माण करण्यात आले होते, व या विभागांच्या नियोजनाचे काम हे स्त्री गणप्रमुखा पाहत असत. या स्त्री गणप्रमुखादेखील दर सहा महिन्यांनी येऊन राणीपुढे आपल्या कारभाराचा वृत्तांत सादर करत असत.
सहसा राजा राणी असा दोहोंचाही कारभार विनाव्यत्यय सुरळीतपणे चालत असे, मात्र कधी कधी उत्तर पश्चिमेकडून अश्व नावाच्या अनोळखी आणि वेगवान प्राण्यांवर आरूढ होऊन येणारे काही आक्रमक, कधीकधी उत्तर पूर्वेकडून हल्ले करणारे गोल चेहऱ्याचे गौरवर्णीय हल्लेखोर तर कधी कधी दक्षिणेकडील नद्यांच्या राज्यांतील काही विद्रोही उपद्रव देत असत. अशा वेळी मग राजा वृषभ व मयूर गणप्रमुखांच्या मदतीने युद्धकारवाई करून त्यांचे उपद्रव मोडून काढत असे.
अशाच एका वेळी सर्व स्त्री गणप्रमुखा सहा महिन्यांचा वृत्तांत सादरीकरणासाठी राणीकडे आल्या होत्या. त्याचवेळी उत्तर पश्चिमेकडून हिमालय गणराज्यावर अश्ववाहनी आक्रमकांनी मोठा हल्ला केलेला होता. त्यांच्या बंदोबस्तासाठी राजा दोन आठवड्यांपूर्वी स्वतः सैन्य घेऊन गेलेला होता. राणीच्या अर्धवार्षिक सभेच्या दिवशी राणीचा दरबारी कारभार संपल्यावर तिने नेहमीप्रमाणे इतर गणप्रमुखांना आपापल्या प्रांतात जाण्यासाठी निरोप देऊन, काहीसे दूरवरून येणाऱ्या आणि राणीची जवळची मैत्रीण असलेल्या मलत्वनी (आजचा उच्चार मुलतानी) मृदेच्या गणप्रमुखेस दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या कुटीविहारात भेटीस बोलावले. या मलत्वनी मृदेच्याच भूभागात अश्ववाहनी आक्रमकांनी हल्ला केलेला होता. आणि राजा त्यांच्या बंदोबस्तासाठी त्याच प्रांतात गेला होता. मलत्वनी मृदेत खूप औषधी गुणधर्म होते. त्या मृदेच्या लेपाने अनेक त्वचाविकार तर बरे होतच असत, पण त्वचाही अतिशय मऊशार व तेजस्वी बनत असे. मलत्वनी गणप्रमुखा 'मला' ही नेहमी येताना राणीसाठी सोबत ती मृदा घेऊन येत असे व राणीच्या पूर्ण अंगाला तिचा लेप लावून मृत्तिकोपचार करून देत असे. दुसऱ्या दिवशी सकाळी राणी आपल्या कुटीत 'मला'ची वाट पाहत होती पण ठरलेली वेळ निघून गेली तरीही 'मला' आली नाही. राणी मग थोडा वेळ अजून वाट पाहून स्वतःच गणप्रमुखांसाठी असलेल्या कुटीविहाराकडे 'मला'च्या चौकशीसाठी गेली. राणी मलत्वनी गणप्रमुखेच्या कुटीत गेली तेव्हा 'मला' एकटीच उदासपणे बसलेली होती. राणी तिच्याजवळ बसली व तिस उदास होण्याचे कारण विचारले. 'मला'ने जवळच बांधलेल्या झोळीकडे निर्देश केला. झोळीमध्ये एक बालक झोपलेले होते. 'मला'ने राणीस सांगितले की महिन्याभरापूर्वी झालेल्या अश्ववाहनी आक्रमकांच्या हल्ल्यात तिचा पती मारला गेला होता. अश्ववाहनी आक्रमक कधीही हल्ला करून समोर येतील त्या सर्वांचा शिरच्छेद करत असत. अशा हल्ल्यांच्या वेळी पतीसोबत असताना 'मला' सुरक्षित जागी पलायन करू शकत असे, मात्र आता पती नसताना आपल्या पुत्रासह असे करणे तिस शक्य नव्हते. म्हणून आपल्या मुलाच्या काळजीने ती अत्यंत दुःखात होती. यावर राणीने सांगितले की तू काहीही काळजी न करता तुझ्या बालकास माझ्या स्वाधीन कर. मी तुझ्या बालकास माझा पुत्र म्हणून दत्तक घेते आणि त्याला माझ्या पहील्या पुत्राप्रमाणेच माझ्या काळजाच्या तुकड्यासारखी सांभाळेल असे वचन देते. इथे वृषभ गणाचे मोठे वास्तव्य असल्याने त्यास या बालवयातही दूधदुभत्याचीही काही समस्या येणार नाही. त्यामुळे तू काळजी करू नकोस. इतकेच नाही तर पुढे तोही माझ्या थोरल्या पुत्राप्रमाणे पराक्रमी वीर होईल असे संगोपन आणि उच्च प्रतीचे शिक्षण त्यास मिळावे याचीही मी व्यवस्था करेन. राणीने असे म्हंटल्यावर 'मला'च्या मनावरचे दुःख हलके झाले. ती आपल्या पुत्रास राणीकडे सोपविण्यास त्यायार झाली. राणी लगेच 'मला' आणि तिच्या पुत्रास घेऊन आपल्या झोपडीकडे परत आली. झोपडीत ते बालक छान इकडे तिकडे रांगत मजेने खेळू लागले. बाहेर ओसरीवर मयूर पक्षांशी खेळण्यात रमू लागले. आपल्या मुलास इथे करमेल याची खात्री पटून मग 'मला' चांगली आनंदी झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी 'मला'ने राणीच्या अंगास तिने आणलेल्या मलत्वनी मृदेचा लेप लावून मृत्तिकोपचार सुरु केले. पहील्या प्रहरी राणीच्या अंगावर मृत्तिका लावून मग आपल्या बाळाचा निरोप घेऊन ती मलत्वन प्रांतात जाण्यास निघाली. मृत्तिकोपचारात अंगावर मलत्वनी मृत्तिकेचा लेप लावल्यानंतर दोन प्रहर होईपर्यंत तो तसाच ठेवावा लागत असे, तदनंतर तो लेप अंगावरून तुपाच्या साहाय्याने काढून टाकून मग आंघोळ करावयाची असे. 'मला' गेल्यावर मग राणी आपल्या झोपडीत स्नानगृहाजवळ तशाच अवस्थेत बसून राहिली. बाळ तिथेच ओसरीवर व बाहेरच्या भागात इकडे तिकडे रांगत खेळत होते. राणीचे बाळाकडे लक्ष होतेच, पण एकाच अवस्थेत खूप वेळ बसून राहिल्याने तिला कधी झोप लागली तेच कळले नाही.
तिकडे उत्तर पश्चिमेकडील अश्ववाहनी आक्रमकांचा मोठा बिमोड करून राजा परत आला. कुटीविहारात राजाची कुटी आणि राणीची कुटी यांची सामायिक ओसरी होती. ओसरीत आल्यावर त्याने पाहीले की राणी कुठे दिसत नाही. युद्ध मोहिमेनंतर रात्रभर वृषभवाहनांत प्रवास करून आल्यावर तोही दमला होता. त्यामुळे राणीस आत जाऊन न शोधता त्याने घाईघाईने त्याची शस्त्रे शस्त्रागारात ठेवण्याऐवजी तिथेच ओसरीत भिंतीला टेकवून ठेवली आणि तो त्याच्या कुटीत स्नानासाठी गेला. तो आपल्या कुटीत पोचला आणि स्नानासाठी पाणी तयार करून तो स्नानास बसणार तोच त्याला बाहेर ओसरीवरून आपले एक शस्त्र खाली पडल्याचा आवाज आला. आपण शस्त्रागारात शस्त्र ठेवण्यास विसरलो हे त्याच्या लक्षात आले आणि लगोलग तो शस्त्रे शस्त्रागारात ठेवून देण्यासाठी स्नान सुरु न करताच ओसरीकडे आला.
ओसरीवर येऊन बघतो तर काय.!! ते खाली पडलेले शस्त्र एका बालकाच्या मानेवर पडून त्या बालकाची मान धडावेगळी झाली होती व ते बालक रक्ताच्या थारोळ्यात तिथे मृत्युमुखी पडले होते. राजाने घाईघाईत केलेली एक साधी चूक त्या बालकाच्या जीवावर बेतली होती. शस्त्रागार जवळच असल्याने त्याच वेळी तिथे वृषभ आणि मयूर गणप्रमुखही आपली शस्त्रे ठेवण्यासाठी येऊन पोचले. त्या मृत बालकाचा देह त्यांनीही पाहिला. ते बालक रांगत रांगत त्या शस्त्रांजवळ गेले असणार आणि ती ओसरीला टेकवून ठेवलेली शस्त्रे पकडण्याच्या नादात एक शस्त्र नेमके त्याच्या अंगावर पडले असणार हे स्पष्ट दिसत होते. हे बालक कुणाचे आहे आणि आपल्या ओसरीत कसे आले हे राजास कळेना. तेवढ्यात शेजारच्या झोपडीतून वृषभ गणप्रमुखाची पत्नी बाहेर आली. तिने सांगितले की राणी 'मला'च्या मृत्तिकोपचारानुसार अंगावर मृत्तिकेचा लेप लावून बसलेली असून थोड्यावेळाने ती अंगावरून ती माती काढून आंघोळ करून तयार होऊन मगच आपल्या पुत्रास घेण्यासाठी बाहेर येईल. हा 'मला'चा पुत्र असून या बालकास राणीने त्याच्या जीवनाच्या रक्षणासाठी कालच दत्तक घेतले आहे. त्यामुळे मयत बालक हा राजाचा स्वतःचाच पुत्र आहे. राजा हे ऐकून अत्यंत चिंतातुर झाला. राणीने त्या बालकाच्या जीवित रक्षणाची हमी देऊन त्यास दत्तक घेतले होते आणि अपघाताने का होईना पण आईपासून दूर झाल्यानंतर काही क्षणांतच त्या बालकाचा मृत्यू ओढवला होता. ही बाब राणीच्या आणि पर्यायाने राजाच्याही वचनबद्धतेस आणि विश्वासार्हतेस कमीपणा आणणारी होती. राणी जेव्हा स्नानगृहातून बाहेर येईल तेव्हा तिला हे कळल्यास ती प्रचंड क्रोधीत होईल आणि मग क्रोधात ती कोणतेही पाऊल उचलू शकेल हे राजाला चांगले ठाऊक होते. अंगावर माती लावलेल्या राणीला बाहेर येण्यास अजून दीडेक प्रहर समय होता. ती बाहेर यायच्या आत काहीतरी केले पाहीजे हे त्याने ठरविले. मग त्याने तात्काळ 'मला'च्या पुत्राचा देह पुरण्याची व्यवस्था केली आणि वृषभ गणाच्या प्रमुखास सांगितले की त्वरीत आपल्या गणांतील सर्वात चपळ आणि हुशार गणांची एक तुकडी दक्षिणेस रवाना कर व समोर ज्यांची वस्ती भेटेल अशा कोणत्याही गणांतून जिथे एक सहा सात महिन्यांचे अनाथ बालक सर्वप्रथम मिळेल ते त्वरीत घेऊन या. हे काम राणी स्नानगृहातून बाहेर येण्याच्या आधी झाले पाहिजे अशी त्याने ताकीद दिली. आपण तेच बालक राणीने दत्तक घेतलेला 'मला'चा पुत्र म्हणून इथे वाढवू असे त्याने सांगितले. पाच सहा महिन्यांची सगळीच बालके समान दिसत असतात. त्यामुळे बालक बदलले गेले आहे हे राणीस आणि सहा महीन्यांनी येणाऱ्या 'मला'स देखील कळणार नाही हे राजास ठाऊक होते. त्यामुळे राणीवर वचनभंगाचे लांछन येणार नाही आणि ती क्रोधीत होऊन काही नुकसानदायी कृत्य करणार नाही यासाठी ही युक्ती करण्याचे त्याने ठरवले. राजाने उपस्थित सर्वांकडून राणीपुढे याची कुणीही वाच्यता करणार नाही याचे वचन घेतले. आणि मग क्षणाचाही विलंब न करता आपल्या सर्वोत्तम गणांची एक तुकडी घेऊन वृषभ गणप्रमुख दक्षिणेकडे निघाला.
जवळजवळ एक प्रहर उलटून गेल्यावर वृषभ गणप्रमुख आणि त्याची तुकडी एका बालकास घेऊन परत आले. हे बालक शरीरयष्टी आणि चेहऱ्याने अगदी त्या मृत बालकासारखेच दिसत होते. तिथे आणल्यावर त्या बालकास त्वरित मृत बालकाप्रमाणेच वस्त्रे आणि तसेच अलंकार परिधान करविण्यात आले आणि मग त्यास परत ओसरीवर खेळण्यासाठी सोडून दिले. वृषभ गणप्रमुखाने सांगितले की दूर दक्षिणेकडील हत्तीवनात हस्तीगणाचा प्रमुख दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या अश्ववाहनी आक्रमकांविरुद्ध केलेल्या मोहीमेदरम्यान मृत्युमुखी पावला होता. त्याचे हे बालक असून या बालकाच्या मातेचे प्रसूतीसमयीच निधन झाले होते. हस्ती गणप्रमुखाची बहीण त्याचा सांभाळ करत होती, तिने आनंदाने त्या बालकास वृषभ गणप्रमुखाच्या हवाली केले.
राणी बाहेर आल्यावर तिने आपल्याला परत एकदा पालकत्वाचे सुख दिले या आनंदाप्रीत्यर्थ राजाने त्या बालकास त्याच समयी या शिशुवयातच हस्ती गणाचा प्रमुख म्हणून घोषित केले. व हस्तीगणाचे चिन्ह असलेली चामड्याची बनवलेली छोटी हत्तीची सोंड हारात गुंफून त्याच्या गळ्यात घातली. त्या बालकाचा पुढे दोघा राजा राणींनी आपल्या थोरल्या मुलापेक्षा अधिक लाडाने सांभाळ केला. ते बालक अतिशय बुद्धिमान आणि पराक्रमी म्हणून लौकिकास पावले आणि मोठे झाल्यावर आपली हुशारी आणि पराक्रमाच्या जोरावर गणराज्यातील सर्व गणप्रमुखांचा पहीला नेता बनले. यापूर्वी सर्व गणप्रमुखांचा मिळून असा कोणीही अधिपती नव्हता. राजा आणि राणी या दोहोंच्या अधिकारात असलेल्या सर्व गणांचे अधिपत्य त्याला मिळाले आणि मग तो 'मला'चा पुत्र, हत्तीगणाचा प्रमुख बालक सर्व गणांचा सर्वाधिपती म्हणजेच गणपती म्हणून प्रसिद्ध झाला.

सोमवार, २३ जुलै, २०१८

दास्ताँ

बेबाक बारिश बरस रही है, कुछ परवाह है तुझे?
वो आये तो कैसे आये जिसकी चाह है तुझे।

रस्ते फुटपाथ सब डुब गये, कुछ लोग भी बह गये
तुझे मगर क्या फिक्र, घर की जो पनाह है तुझे।

ये रोशनदान जो झटपटाकर अब बुझे जा रहे हैं
क्या उनकी सिसकियोंमें सुनाई देती मेरी आह है तुझे?

लगाता क्यों नहीं इल्जाम मुझपर जुर्म ए इश्क का
ये बाग, ये रात, वो चाँद, सब ही तो गवाह है तुझे।

तू तो लिबासोंकी तरह रोज वफ़ाएँ बदलता रहा
क्या मेरी जफ़ा का भी, याद कोई गुनाह है तुझे?

जाने कब रोशनी चली गयी मेरे आँखों की रो रो कर
क्या अब भी कोई ख्वाब सर-ए-निगाह है तुझे।

उफ़क पे ठिठुरता सूरज, समंदर का लहराता पानी
जहाँ कभी हमकदम थे हम, क्या याद वो राह है तुझे

क्या तू जज्बातों की सच्ची दास्ताँ बयाँ करता है
या बस ऐसे नज्म लिखकर लेनी वाह वाह है तुझे।

गुरुवार, ३ मे, २०१८

आरक्षणावर बोलू काही : What is Reservation

वर्तमान स्थिती
नेमके आरक्षण म्हणजे काय हे आपण नंतर समजावून घेऊच मात्र आज भारतात आरक्षणाची काय स्थिती आहे याचा उहापोह करू. आज देशासमोर ज्या अनेक कठीण समस्या आहेत त्यांचेपैकी मुख्य म्हणजे बेरोजगारी. तशी बेरोजगारीची अनेक करणे आहेत. शिक्षणाचा अभाव हे मुख्य कारण असले तरी आरक्षण हे बेरोजगारीचे अजून एक प्रमूख कारण आहे. आरक्षणामुळे अनेकांच्या रोजगाराच्या संधी हिरावून घेतल्या जातात. पंच्याण्णव टक्के मिळविणारेही आरक्षणामुळे रोजगारापासून वंचित राहतात. आरक्षणामुळे भारतातील टॅलेंटला परदेशात जावे लागते. आरक्षण संपले तर ते सगळे त्यांचे परदेशातील इथल्यापेक्षा पाच ते दहापट जास्त उत्पन्न सोडून परत भारतात येतील. भारतात आज बेरोजगारांची जी प्रचंड संख्या आहे त्याचे कारण म्हणजे आरक्षणच होय. आरक्षण संपले की दरडोई उत्पन्न प्रचंड वाढून भारत महासत्ता होणार म्हणजे होणारच. हे सगळे मी हवेत बोलत नाहीय, पुरावा आहे. चला भारत सरकारच्या MINISTRY OF LABOUR AND EMPLOYMENT या मंत्रालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेला INDIAN LABOUR STATISTICS 2012 and 2013 या २०११ च्या जनगणनेवर आधारीत रिपोर्टमधील काही आकडे पाहू. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, रोजगार म्हणजे फक्त मजुरी नव्हे, रोजगार हमी योजनेमुळे आपण रोजगार म्हणजे फक्त मजुरी असे समजू लागलो आहोत. पण रोजगार म्हणजे employment याचा अर्थ मिळकतीचे कुठलेही साधन होय. म्हणजे मुकेश अंबानी रिलायन्सचे चेअरमन आहेत हा त्यांचा रोजगार आहे. विराट कोहली क्रिकेटर आहे हा त्याचा रोजगार आहे, नांगरे पाटील पोलीस अधिकारी आहेत हाही रोजगार आहे, एवढेच काय तर काही दिवसांपूर्वी भजे तळणे हाही एक रोजगार आहे हे आपल्याला तळले सॉरी कळले आहेच.
तर या रिपोर्टनुसार भारतात एकूण 481888868 म्हणजे जवळजवळ अट्ठेचाळीस कोटी एकोणीस लाख इतके रोजगार आहेत. यातील 118808780 म्हणजेच अकरा कोटी अट्ठयाऐंशी लाख हे भूधारक शेतकरी आहेत. तर 144333690 म्हणजेच चौदा कोटी त्रेचाळीस लाख हे शेतमजूर आहेत. म्हणजेच भारतातील एकूण रोजगारांपैकी जवळजवळ पंचावन्न टक्के रोजगार हे कृषी किंवा शेती या क्षेत्रात आहेत. भारतात विविध घरगुती उद्योगांत 18338168 म्हणजे एक कोटी त्र्याऐंशी लाख रोजगार आहेत (म्हणजे एकुणांपैकी ३.८० टक्के). भारतातील एकूण ८६ टक्के रोजगार हे असंघटित क्षेत्रात आहेत त्यापैकी हे झाले जवळजवळ साठ टक्के. बाकी सव्वीस टक्के हे इतर अनेको क्षेत्रांतील रोजगार आहेत.
आता आपण संघटित क्षेत्रातील रोजगार पाहू. भारतात खाजगी कारखान्यांतील एकूण रोजगारांची संख्या आहे 10430000 म्हणजे एक कोटी चार लाख. हे एकूण रोजगारांपैकी २.१६ टक्के आहेत, तर सरकारी कारखान्यांतील एकूण रोजगार आहेत 1148000 म्हणजे अकरा लाख अठ्ठेचाळीस हजार जे एकूण रोजगारांपैकी फक्त ०.२३ टक्के इतके आहेत. कारखान्यांव्यतिरिक्त असलेल्या एकूण सरकारी रोजगारांत मुख्य आहेत सरकारी नोकऱ्या ज्यांची संख्या आहे 17548000 म्हणजे एक कोटी पंच्याहत्तर लाख (एकुणांपैकी ३.६४ टक्के). तर कारखान्यांव्यतिरिक्त खाजगी क्षेत्रातील रोजगारांत प्रमुख आहेत खाजगी नोकऱ्या (विविध ऑफिसेस मधील) ज्यांची संख्या आहे 11452000 म्हणजेच एक कोटी चौदा लाख (एकुणांपैकी २.३७ टक्के). खाजगी क्षेत्रातच विविध दुकाने, शॉपिंग मॉल्स, थेटर्स अशा ठिकाणी असलेल्या एकूण रोजगारांची संख्या आहे 15232000 म्हणजे एक कोटी बावन्न लाख (एकुणांपैकी ३.१६ टक्के). याव्यतिरीक्त खाणी, मसाले, रबर, कॉफी चहा यांच्या बागा, वाहतूक आदि क्षेत्रांतही रोजगार उपलब्ध आहेत. अशाप्रकारे भारतात एकूण सरकारी रोजगार आहेत 19259750 म्हणजेच एक कोटी ब्याण्णव लाख इतके. म्हणजे भारतातील एकूण रोजगारांपैकी सरकारी क्षेत्रात ३.९९ टक्के इतकाच रोजगार आहे. हे झाले २०११ च्या जनगणनेवर आधारित आकडे. Ministry of statistics and programme implementation च्या २०१६ च्या रिपोर्टनुसार तर सरकारी रोजगारांची संख्या ही १७६०९००० एवढी म्हणजे एक कोटी शहात्तर लाख म्हणजे ३.६५ टक्के इतकीच आहे. तरीही आपण ती संख्या जास्तीची म्हणजे एक कोटी ब्याण्णव लाख इतकी आहे असेच पुढील calculations साठी घेऊ. भारतात केवळ सरकारी रोजगार क्षेत्रात आरक्षण आहे. त्यातही सरकारातील अनेक क्षेत्रे आहेत जिथे आरक्षण नाही. तरीही आपण सर्व सरकारी रोजगारांना आरक्षण लागू होते असे मानू. तर अशाप्रकारे भारतात जे आरक्षण आहे ते याच एकुणांपैकी ३.९९ टक्के सरकारी रोजगारांत आहे. उर्वरीत ९६ टक्के रोजगारांत कुठलेही आरक्षण नाही. आता प्रवर्गानुसार नेमके कुणाच्या वाट्याला किती आरक्षण येते ते पाहू. या एकुणातील ३.९९ टक्क्यांपैकीही पन्नास टक्के म्हणजे निम्म्याच जागांवर आरक्षण आहे. म्हणजे एकूण रोजगारांपैकी १.९९ टक्के इतक्या रोजगारांत प्रवर्गाधारीत आरक्षण आहे. त्यातही दिव्यांगांसाठी ३ टक्के तर एक्स सर्व्हिसमन्स साठी १ टक्का आरक्षण संमीलित आहे. OBC प्रवर्गासाठी जे २७ टक्के आरक्षण आहे त्यामुळे त्यांना भारतातील एकूण रोजगारांपैकी १ टक्के रोजगारांवर दावा मिळतो, SC प्रवर्गास जे १५ टक्के आरक्षण आहे त्यामुळे त्यांना भारतातील एकूण रोजगारांपैकी ०.५९ टक्के इतक्या तर ST प्रवर्गास जे ७.५ टक्के आरक्षण आहे त्यामुळे त्यांस भारतातील एकूण रोजगारांपैकी ०.२९ टक्के इतक्या रोजगारांवर दावा मिळतो. म्हणजे असे आहे की मुख्यत्वे देशातील बेरोजगारांची जी प्रचंड समस्या आहे ती या एकुणांपैकी अनुक्रमे १%, ०.५९% आणि ०.२९% रोजगारांमुळेच उत्पन्न झाली आहे. त्यातही या ०.५९% आणि ०.२९% मुळे तर देशाची प्रगती जरा जास्तच खुंटली आहे. आरक्षण संपवून या ०.५९% आणि ०.२९% जागांवर भारतातील समस्त बेरोजगार व्यक्ती समाविष्ट झाल्या की मग भारत महासत्ता बनणार म्हणजे बनणारच.
खरेतर पहिला परिच्छेद हा खूप नंतर यायला हवा होता, पण मी तो आधी यासाठीच लिहीला की दुसऱ्यांचे आरक्षण म्हणजे आपल्या रोजगारावर घाला असा एक नॅशनल गैरसमज आज प्रचंड फैलावला आहे. मात्र खरे पाहता आरक्षणाची तरतूद म्हणजे नेमके काय हे आरक्षणास विरोध करणारांना तर माहीत नाहीच, पण दुर्दैव म्हणजे आरक्षण घेणारांनांही ते माहीत नाही. आरक्षण तरतुदीतून नोकरी हाही एक घटक असल्याने आरक्षण म्हणजे नोकरीची संधी हा एक अपप्रचार सर्वमान्य झाला आहे. मग आरक्षण म्हणजे नेमके आहे तरी काय? एकूण आरक्षणाविषयीचे समज-गैरसमज, आक्षेप, आरक्षण संपविण्याचे पर्याय हे सर्व आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून समजून घेऊ. आरक्षणासंबंधी जे प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात त्यांचे स्पष्टीकरण देण्याचा अल्प प्रयत्न केला आहे.

प्र. आरक्षण म्हणजे नेमके काय?
उ. खरेतर 'आरक्षण' किंवा 'Reservation' हा शब्दच मुळात चुकीचा आहे. त्याऐवजी 'Provision for Representation' म्हणजेच 'प्रतिनिधित्वाची तरतूद' हा शब्द असायला हवा होता. आरक्षण या शब्दातून आरक्षित सोडून इतरांना मनाई हा अर्थ काढला जाऊ शकत असल्याने आरक्षणाविषयी विविध समज-गैरसमज पसरले आहेत. प्रतिनिधित्वाची तरतूद हाच शब्द योग्य असला तरीही सध्या आरक्षण हाच शब्द प्रचलित असल्याने आपण पुढील चर्चेसाठी तोच वापरू. आता हे आरक्षण म्हणजे नेमके काय ते पाहू. आरक्षणासाठी प्रतिनिधित्वाची तरतूद हा शब्द योग्य आहे हे मी म्हंटले त्यातूनच आरक्षण म्हणजे नेमके काय आहे हे बरेचसे स्पष्ट होते. आरक्षण ही एक तरतूद आहे सामाजिक न्यायाची. सामाजिक न्याय म्हणजे लोकशाहीच्या तत्वानुसार देशातील प्रत्येक सामाजिक घटकाला समान संधी आणि समान दर्जा यांची उपलब्धता होय. समाजाच्या प्रत्येक छोट्या आणि मोठ्या घटकाला लोकशाहीत प्रतिनिधित्वाची योग्य संधी मिळण्याची हमी म्हणजे सामाजिक न्याय. आरक्षण हे काही आर्थिक उत्थान अथवा आर्थिक उत्कर्षासाठी नाही. आरक्षण ही तरतूद आहे Representation म्हणजेच प्रतिनिधीत्वासाठी. म्हणूनच पर्यायाने आरक्षण ही तरतूद आहे सामाजिक न्यायासाठी.
Representation म्हणजेच प्रतिनिधित्व हा तर लोकशाहीचा पायाच आहे. म्हणूनच तर प्रत्येक लोकशाही देशात निवडणुका होतात. देशाच्या नियंत्रण/निर्णय प्रक्रीयेत आपला ही सहभाग असावा म्हणून आपण आपल्या मतदारसंघातून एकेक प्रतिनिधी संसदेत पाठवत असतो. निवडणूक ही आपल्या प्रत्येकाला देशाच्या शासनात प्रतिनिधित्व करता यावे म्हणून मिळालेली संधी आहे. आपण ज्यांना निवडून पाठवतो ते आजकाल बॅनर्स आणि पोस्टर्सवर सर्रास लिहिले जाते त्याप्रमाणे आपले भाग्यविधाते नसतात तर ते आपले प्रतिनिधी असतात. प्रत्येक तालुका किंवा जिल्हा ही भौगोलिक सीमा असलेल्या भारतातील प्रत्येक भागास अशाप्रकारे देशाच्या संसदेत आणि राज्याच्या विधानसभेत प्रतिनिधित्वाची संधी मिळते. जसे देशाच्या प्रत्येक भौगोलिक भागास प्रतिनिधित्व मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे तसेच देशातील प्रत्येक समाजघटकास देखील लोकशाहीत प्रतिनिधित्व मिळणे हे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या लोकशाहीचा मूलमंत्रच सर्वांच्या प्रतिनिधित्वात आहे. आपण देशाची अनेक प्रशासकीय विभागांत वाटणी करून प्रत्येक विभागास प्रतिनिधित्व दिले, तसेच आपण सामाजिक विभागांनाही प्रतिनिधित्व दिलेले आहे. आणि गम्मत म्हणजे ह्या दोन्ही प्रतिनिधित्वाच्या तरतुदी अगदी समान असूनही, आपण प्रशासकीय भौगोलिक विभागांना मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाला प्रतिनिधित्व असेच म्हणतो, मात्र सामाजिक विभागांना मिळणाऱ्या प्रतिनिधित्वाला आरक्षण म्हणतो.
आपल्या संसदेत निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी पाठवले जातात. मात्र जर केवळ ५४५ खासदार संसदेत पाठवणे हा निवडणुकीचा उद्देश असता, आणि विभागवार मतदारसंघ वगैरे वाटणी न करता जसे ओपन परीक्षा असतात तसे संपूर्ण देशातुन सर्व मतदारांनी एकाच वेळी सर्व उमेदवारांस मतदान करावे आणि ज्या ५४५ जणांना अशाप्रकारे केवळ एका मतदारसंघातून नव्हे तर पूर्ण देशातून सर्वाधिक मते मिळतील तेच खासदार बनतील अशी जर तरतूद असती तर काय झाले असते? असे झाले असते तर सगळेच्या सगळे खासदार उत्तरप्रदेश या एकाच राज्यातून निवडले गेले असते. कारण उत्तर प्रदेश या राज्याची लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे अर्थातच ते ज्या ५४५ जणांना मते देतील तेच देशात सर्वाधिक मते मिळविणारे खासदार ठरतील. यामध्ये कधीतरी महाराष्ट्र आणि बिहार या राज्यांनाही त्यांचीही लोकसंख्या जास्त असल्याने चुकून कधीतरी एखाद दोन उमेदवार निवडण्याची संधी मिळेल, मात्र या तीन राज्यांव्यतिरिक्त उर्वरीत भारतातून एकही उमेदवार निवडून जाऊ शकणार नाही. असे होऊ नये आणि सर्व राज्यांना आणि सर्व जिल्हा तालुक्यांना संसदेत समान प्रतिनिधित्व मिळावे म्हणून प्रत्येक राज्यासाठी विशिष्ट जागांचे आरक्षण (हा शब्द मुळातच चूक आहे पण मी मुद्दाम इथे वापरलाय) आहे. जसे की उत्तर प्रदेशाला ८० जागांचे आरक्षण मिळते तर गोव्याला २ जागांचे आरक्षण आहे. प्रत्येक राज्याला न्याय्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून प्रत्येक राज्याला मिळालेले ठराविक खासदारांच्या संख्येचे आरक्षण ही योग्य आणि आवश्यक तरतूद आहे की नाही? जर हे आरक्षण दिले नाही तर पहिली मोठी ३ ते ४ राज्ये वगळता इतर कोणत्याही राज्यातील प्रतिनिधी संसदेत जाऊ शकणार नाहीत. अशाच प्रकारे विविध सामाजिक प्रवर्गांना आरक्षण दिले नाही तर त्यांनाही कधीच लोकशाहीत प्रतिनिधित्व मिळणार नाही, त्यांचे दृष्टीकोन, त्यांच्या खऱ्या समस्या, त्यांचे ग्राउंड लेव्हलवरचे अनुभव आणि ज्ञान हे कधीच शासन प्रक्रीयेत अंतर्भूत होणार नाहीत, म्हणून आरक्षण ही एक आवश्यक तरतूद आहे.

प्र. ठीक आहे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून संसदेत विविध प्रवर्गांना आरक्षण दिले, पण जर आरक्षण हे आर्थिक उत्थानासाठी नसेल तर मग नोकरीत आरक्षण का?
उ. कोणत्याही राज्यव्यवस्थेची मग ती लोकशाही असो की हुकूमशाही, तीन महत्वाची कार्ये असतात; धोरण, नियोजन आणि सेवा. लिडर्स धोरणे ठरवतात, ब्युरोक्रेट धोरणांच्या अंमलबजावणीचे प्लॅनिंग / नियोजन करतात, आणि इतर शासकीय सेवक धोरणांची अंमलबजावणी म्हणजे प्रत्यक्ष सेवा करतात. या तीन मूलभूत कार्यांसाठी प्रत्येक राज्यव्यवस्था काही संस्था बनवते. तीनही कार्यांच्या संस्था या देशासाठी समान महत्वाच्या आणि आत्यंतिक गरजेच्या असतात. संसदेत सामाजिक प्रवर्गांसाठी राखीव जागा असणे हे झाले फक्त एका संस्थेत प्रतिनिधित्व. पण लोकशाही राज्यव्यवस्थेत वरील तीनही संस्था समान महत्वाच्या आहेत, मग फक्त एकाच संस्थेत प्रतिनिधित्व असून कसे चालेल? सामाजिक न्यायासाठी सर्व समाजघटकांस या तीनही संस्थांत प्रतिनिधित्व मिळायला हवे. म्हणूनच सरकारी नोकऱ्यांमध्येही प्रतिनिधित्व म्हणजेच आरक्षण आवश्यक आहे. नोकरीला सेवा असे म्हणतात. सेवा हे देशाविषयीचे कर्तव्य असते. ती सेवकाची देशाविषयीची एक महत्वाची जबाबदारी असते. सामाजिक प्रवर्गांना फक्त निर्णय किंवा धोरणे ठरवण्यात प्रतिनिधित्व द्यायचे आणि देशाची सेवा, कर्तव्य या जबाबदाऱ्या पार पाडण्यापासून सूट द्यायची हे तत्वतःच अयोग्य आहे. धोरण आणि निर्णय प्रक्रियेप्रमाणेच प्रतिनिधित्वाची तरतूद ही देशाविषयीच्या कर्तव्य आणि सेवांमधेही असली पाहीजे. म्हणून सरकारी नोकऱ्यांतही आरक्षण आवश्यक आहे.
सुदृढ लोकशाहीसाठी समाजातील सर्व घटकांना सरकारच्या कोणत्याही जबाबदारीत अथवा सेवेत अथवा धोरणात प्रतिनिधित्व मिळायलाच हवे. हे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून नोकऱ्यांत आरक्षण आहे. देशातील एकही सरकारी नोकरी ही लोकांस अर्थार्जन करण्याची संधी मिळावी अथवा लोकांचे आर्थिक उत्थान व्हावे म्हणून निर्माण करण्यात आलेली नाही. एकूण एक सरकारी नोकरी ही देशाचे कुठलेतरी कर्तव्य किंवा जबाबदारी पार पाडण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आहे. ती सेवा आहे. ती आर्थिक मिळकतीची तरतूद अजिबात नाही. ती सेवा जे करतील, त्यांना त्या कामाचा मोबदला म्हणून पगार दिला जातो म्हणून आपणांस ती अर्थार्जनाची व्यवस्था वाटते. आर्थिक आणीबाणी लागल्यास सरकारी नोकरांना शून्य पगारातही त्यांचे विहित काम करणे भाग असते. कारण ती सेवा आहे, अर्थार्जनाची व्यवस्था नव्हे. आर्थिक उत्थान किंवा अर्थार्जनासाठी सरकारच्या नोकऱ्या नव्हे तर इतर योजना असतात. रोजगार हमी योजना, मनरेगा, कर्जमाफी, दुष्काळ निवारण कामे हे उपक्रम सरकार जनतेच्या आर्थिक उत्थानासाठी किंवा अर्थार्जनासाठी राबवते. आणि अर्थार्जनासाठी असल्याने या योजनांत कोणत्याही समाजघटकासाठी कोणतेही आरक्षण नसते. उलट सरकारी नोकरी ही देशाच्या संविधानाद्वारा निहित कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्यासाठी असल्याने तिथे प्रत्येक सामाजिक प्रवर्गाचा दृष्टीकोन अंतर्भूत होण्यासाठी प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण आवश्यक आहे. संसदेत जेव्हा देशकल्याण वा इतर लोकोपयोगी धोरणे ठरवली जात असतात तेव्हा जर समाजातील सर्व घटकांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळाले नाही तर त्यांच्या काय समस्या आहेत, किंवा त्यांच्या काय प्रथा, काय संस्कृती आहे त्यानुसार धोरणात बदल केलाच जाणार नाही. म्हणून प्रतिनिधित्व गरजेचे आहे आणि त्यासाठी आरक्षण हवे.
प्रतिनिधित्व असले तर किती बदल होतो याचे उदाहरण पाहू. उदाहरणासाठी शिक्षण क्षेत्र घेऊ. शिक्षण क्षेत्राच्या नियोजनात आदिवासी समाजाच्या घटकांचा आधी काहीही समावेश वा त्यांस काहीही प्रतिनिधित्व नव्हते. मात्र आता शिक्षण क्षेत्रातील अनेक स्तरांवर, निर्णय घेणाऱ्या राजकीय स्तरावर अल्प का होईना मात्र आदिवासींना प्रतिनिधित्व मिळाले त्यामुळे, तुकाराम धांडे यांच्यासारख्या महान परंतु दुर्लक्षित कवीच्या कविता शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्या. अनेक समाजांतील विविध घटकांचा इतिहास जो आधी दुर्लक्षित होता तो आता अभ्यासक्रमात समाविष्ट झाला. जर आरक्षण नसते तर देशाला हे कळलेच नसते. ही उपेक्षितांची नोंद घेतली जाण्याची बाब इतरांसाठी विशेष नसली तरी त्या त्या समाजघटकांसाठी खूप मोठी गोष्ट आहे. अशाच प्रकारे न्यायदान, कायदे बनविणे, योजना आखणे अशा सर्व गोष्टींत प्रत्येक सामाजिक प्रवर्गाचा सहभाग असल्याशिवाय त्या परीपूर्ण होणार नाहीत. तसेही केवळ सेवा, कर्तव्य आणि धोरण ठरवणे ही तीन अंगे वगळता कुठेही आरक्षण नाही.

प्र. बढतीत आरक्षण असावे की नको?
उ. लोकशाहीत प्रतिनिधित्वाची गरजच यासाठी आहे की प्रत्येक शासकीय धोरण, योजना, निर्णय आणि कार्य यांत प्रत्येक सामाजिक घटकाचा दृष्टीकोण अंतर्भूत व्हायला हवा. याच अनुषंगाने मग कोणत्याही नोकरीतील क्रमाक्रमाने वरच्या पदावरही सर्व सामाजिक घटकांस प्रतिनिधित्व मिळायलाच हवे. मात्र यातही कुणी आरक्षित प्रवर्गाचा आहे म्हणून त्यास सरसकट बढती देता कामा नये, प्रत्येक वरिष्ठ पदाचा विचार करता, त्यात योग्य ते प्रतिनिधित्व राखण्याइतक्याच संख्येत बढती द्यावी. म्हणजे समजा महाराष्ट्रात एकूण दहा हजार API ही पदे आहेत. त्यात १५ टक्के म्हणजे दीड हजार जागांवर SC प्रवर्गाचे अधिकारी असायला हवेत. तर सरसकट सर्व SC प्रवर्गांतील PSI लोकांना बढती मिळता काम नये तर फक्त तितक्याच गुणवत्ताधारी लोकांना बढती देण्यात यावी जेणेकरून दीड हजार ही संख्या पूर्ण होईल. अशाच प्रकारे प्रत्येक क्षेत्रात वरिष्ठ पदांच्या एकूण संख्येच्या प्रमाणात असणाऱ्या आरक्षित पदसंख्येची आपूर्ति होईल तेवढ्याच उमेदवारांना तिथे बढती देण्यात यावी. जिथे एकूण पदांची संख्या ही फक्त एक किंवा दोन आहे तिथे प्रत्येक प्रवर्गास रोटेशन नुसार बढती देण्यात यावी. म्हणजे जसे की मुंबईचा कमिशनर हे मुंबई पोलीस खात्यातील सर्वोच्च पद तीन वर्षे जर एका प्रवर्गास मिळाले असेल तर पुढच्या वेळी ते अन्य प्रवर्गास अनुक्रमे मिळत जावे. आणि अशी व्यवस्था असावी की प्रत्येक प्रवर्गातील उमेदवाराला सर्वोच्च पदापर्यंत पोचण्यासाठी खालची सब्सिक्वेंट पदेही वेळेवर मिळत रहावी. असे व्हायला नको की एखाद्या प्रवर्गाचे कमिशनर पदाचे रोटेशन आले आणि त्यावेळी त्या प्रवर्गाचा जॉईंट कमिशनरच उपलब्ध नव्हता.

प्र. ठीक आहे नोकरीत देशाच्या विविध कर्तव्यांची जबाबदारी पार पाडण्यासाठी आरक्षण दिले, पण मग शिक्षणात आरक्षण का?
उ. हे समजून घेण्यासाठीही एक उदाहरण पाहू. आता समजा इरिगेशन डिपार्टमेंट घ्या, समजा तिथे काही इंजिनियर हवे आहेत. ते सरकारी काम आहे, त्यामुळे सर्व घटकांना फक्त सरकारी लाभांमध्येच नाही तर कर्तव्यांमध्येही सहभाग मिळाला पाहीजे. याच अनुषंगाने इरिगेशन डिपार्टमेंटच्या कामांतही वेगवेगळ्या समाजघटकांचे विविध दृष्टीकोन आणि गरजा अंतर्भूत व्हायलाच हव्यात म्हणून त्या इंजिनियर लोकांतही एक विशिष्ट संख्या ही काही घटकांच्या प्रतिनिधींसाठी ठेवावीच लागेल. आणि हे इंजिनियर समाजाच्या सर्व घटकांतुन मिळावेत म्हणून ते इंजिनियर बनण्यासाठी त्या घटकांना शिक्षणात सुद्धा राखीव जागा ठेवाव्या लागतील. अन्यथा असे होईल, किंबहुना असे आजही होते की एखाद्या प्रवर्गाच्या जागा आहेत पण उमेदवारच नाहीत. असे होऊ नये म्हणूनच शिक्षणात देखील राखीव जागा आहेत. शिक्षणातील राखीव जागा हे सुनिश्चित करतात की पुढे कर्तव्य, सेवा आणि नियोजनाच्या जबाबदारीसाठी सदरहू प्रवर्गांतून पात्र उमेदवार उपलब्ध होतील. फळ पाहीजे तर आधी बीज/रोप लावण्यासाठी थोडी जमीन राखावी तर लागेलच ना.

प्र. आरक्षणामुळे योग्यता नसलेले म्हणजे कमी मार्क असणारे लोक सेवेत येतात, त्याचे काय?
उ. सर्वात आधी म्हणजे हा प्रश्नच पूर्णतः चुकीचा आहे. योग्यता म्हणजे काय? खरेतर शैक्षणिक मार्क्स हे टॅलेंटचे निर्देशक आहेत हे मानणेच चूक आहे आणि कमी शिकलेले किंवा नापास झालेले लोकही पुढे सर्वात अवघड अशा विज्ञानातील नोबेल पुरस्कारांचे विजेते ठरले हे स्पष्टच आहे. कमी मार्क घेऊन शिकलेले मोदी तर थेट पंतप्रधान झाले, हे आपण जाणतो, गुण आणि गुणवत्ता यांचा काटेकोर संबंध नसतो, मात्र इथे मी तो तर्क देणार नाहीय.
प्रत्येक डिग्री वा इतर शैक्षणिक परीक्षांत एक पासिंग मार्कांचे लिमिट असते. उदा. युनिव्हर्सिटीज मध्ये 40 मार्क्स हे पासिंगसाठीचे लिमिट आहे. हे मिनिमम पासिंग मार्क का ठेवले जातात? जो विद्यार्थी वा जी विद्यार्थिनी शंभर पैकी शंभर टक्के मार्क मिळवेल तोच किंवा तीच पास असे का ठरवले नाही? चाळीस टक्के हा आकडा का ठरवला? आणि फक्त भारतातच नव्हे तर जगभरात याच टक्केवारीच्या आसपास पासिंग लिमिट असते, त्याचा अर्थ काय? समजा की एक मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री कोर्स आहे, तर कोणताही विद्यार्थी जो 40 टक्क्यांहून अधिक गुण मिळवेल, तो विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरची कामे करण्यास पात्र झाला असा त्याचा अर्थ आहे. कोणत्याही कोर्समध्ये पूर्ण शंभर टक्के मिळवून आजपर्यंत कुणीही उत्तीर्ण झाला नाहीय. जर 40 टक्के मिळवुन पास होणारा उमेदवार पात्र नाही तर अर्थातच 99 टक्के मिळविणाराही पात्र नाही. पासिंग मार्क ही अशी किमान पातळी आहे जितके मार्क मिळवले की कोणीही विद्यार्थी त्या क्षेत्राचे काम करण्यास पात्र होतो. कोणताही उमेदवार 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळविले की वकिली करण्यास पात्र होतो, शिक्षक बनण्यास पात्र होतो, डॉक्टर बनण्यास पात्र होतो, सीए बनण्यास पात्र होतो. आजपर्यंत एकदा तरी कुणी स्वतःचा इलाज करून घेण्यापूर्वी त्या डॉक्टरला त्याचे पासिंग मार्क विचारले आहेत का? आपण एखाद्या डॉक्टरची चौकशी करतानाही त्याचे मार्क विचारत नाही तर डिग्री विचारतो. का? कारण डिग्री मिळाली म्हणजे पासिंग मार्क्स मिळाले की तो डॉक्टर त्या डिग्रीने निर्दिष्ट केलेले काम करण्यास पात्र होतो. बारावीला 40 टक्के मिळाले की तो विद्यार्थी इंजिनियरिंग, मेडिकल अथवा डीएड अशा कोणत्याही शाखेत प्रवेश घ्यायला पात्र होतो. याचप्रमाणे 70 टक्के मिळविलेला इंजिनिअर पात्र नसतो आणि 90 वालाच पात्र असतो हे म्हणनेच पूर्णतः चूक आहे. आणि असे म्हणणे म्हणजे समस्त जगातील शिक्षणव्यवस्थेवर अविश्वास दाखवणे आहे. या जगात एकही माणूस एकाही विषयात परिपूर्ण नाही, पण म्हणून कुणीही कोणतेही काम करण्यास पात्र नाही असे आहे का? कोणीही परिपूर्ण असू शकत नाही, मात्र विहीत काम करण्यास तो कोणत्या निकषांच्या पुर्ततेनंतर पात्र ठरेल ते अभ्यास आणि अनुभवांती ठरविण्यात येऊन, समस्त जगात तो निकष हा पासिंग मार्क्स म्हणून ठरविण्यात आला आहे. तो निकष पूर्ण करणारा कोणीही ते काम करण्यास पात्र होतोच. आणि हे पासिंग मार्क जे अनारक्षित लोकांसाठी असतात, अगदी तंतोतंत तेवढेच आरक्षित लोकांसाठीही असतात. तिथे आरक्षित लोकांस सवलत नसते. त्यांनाही पास होण्यासाठी इतर सर्वांप्रमाणे 40 मार्क मिळवावे लागतातच. तेवढे गुण मिळवले की कोणत्याही घटकातील कोणीही माणूस निर्दिष्टीत काम करण्यास योग्य ठरतो. आरक्षणाने या पासिंग मार्कांतून काहीही सूट मिळत नाही, त्यामुळे आरक्षणामुळे पात्र नसलेले लोक सेवेत येतात हे धादांत चूक आहे. आणि साधारणतः आरक्षित प्रवर्गांचे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत तरी त्यांना पोस्ट मिळते असाही एक समज असतो. मात्र हे खरे नाही. आरक्षित प्रवर्गांतर्गतही अतिशय अटीतटीची स्पर्धा असते. त्यांचे मार्क तुलनेने कमी का असतात त्याची खूप कारणे आहेत, मात्र तो एक पूर्णतः वेगळा विषय आहे. अभ्यास न करता कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार सहज निवडला जात नाही. तिथे सुद्धा इतरांसारखीच जबरी स्पर्धा असते आणि दिवसेंदिवस ती स्पर्धाही अत्यंत जीवघेणी बनत चालली आहे.

प्र. आरक्षणामुळे जास्त मार्क असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, त्यांच्यापेक्षा कमी मार्क असलेल्यांना सीट मिळते त्याचे काय?
उ. खरेतर दर्जेदार शिक्षण हे सर्वांसाठी उपलब्ध असायला हवे, अगदी उच्च शिक्षणदेखील देशातील कोणत्याही विद्यार्थ्याला विनामूल्य उपलब्ध असायला हवे. पण दुर्दैवाने स्थिती तशी नाही. दुर्दैवाने आपल्या देशात विद्यार्थी जास्त आणि सीट कमी आहेत. त्यामुळे प्रवर्गानुसार जेव्हा सीट्स मध्ये प्रतिनिधित्व सुनिश्चित केले जाते, तेव्हा आरक्षित सीट इतरांस उपलब्ध नसतातच. आरक्षित सीटवर इतरांना जागा मिळणे शक्यच नसते. म्हणजे जर शंभर सीट असतील तर त्यातल्या ५० या अनारक्षित असतात. फक्त तेवढ्याच सीट आपल्यासाठी उपलब्ध आहेत असे मानले तर इतरांवर अन्याय होण्याचा प्रश्नच येत नाही. केवळ आपल्या जागा गेल्या ही भावना होऊ नये म्हणून कित्येक सरकारी शिक्षणसंस्थांत एकूण जागांची संख्या वाढवली गेली आहे की जेणेकरून आरक्षण नसते तर जितक्या जागा उपलब्ध असत्या तितक्या जागा आरक्षण असूनही खुल्या वर्गास उपलब्ध असाव्यात. पण प्रॉब्लेम येतो तो तुलनेमुळे. जे आपले नाहीच त्याच्याशीही तुलना केली की मग प्रॉब्लेम येतो. ही तुलना होते ती मेरीट लिस्टमुळे. खरेतर मेरीट लिस्ट लावताना प्रत्येक प्रवर्गाची वेगवेगळी आणि प्रत्येकाची सेपरेट पर्सेन्टाइल फॉर्म्युल्यानुसार लावायला हवी. म्हणजे मग सर्व मेरीट लिस्ट या समान होऊन कुणालाही आपल्यावर अन्याय झाला असे वाटणार नाही. पण हा असंतोष निर्माण व्हावा या उद्देशानेच बहुदा प्रवर्गानुरूप सेपरेट पर्सेन्टाइल न देता सरसकट एकच पर्सेंट बेस्ड लिस्ट दिली जाते किंवा सर्वांचे मिळून पर्सेन्टाइल काढले जाते त्यामुळे असंतोषाची भावना दृढ होते. प्रवर्गानुरूप सेपरेट पर्सेन्टाइल काढले तर हा प्रश्न येणारच नाही. असे असले तरीही जितके विद्यार्थी तितके सीट, म्हणजे प्रत्येकाला विनामूल्य दर्जेदार शिक्षण हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे.
आणि याही पुढे जाऊन मी म्हणेल की खरेतर अन्याय होतो तो आरक्षित घटकांवरच. जर शंभर सरकारी सीट असतील, तर अर्थातच त्या सर्व सीटवर समाजाच्या आरक्षित आणि अनारक्षित अशा दोन्ही घटकांना योग्य त्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळायलाच हवे. मात्र असे होत नाही. सर्व आरक्षणे ही लोकसंख्येच्या प्रमाणात मिळणे जरुरी असूनही ती त्याहून निम्म्याने कमी आहेत. OBC हे 55 टक्क्यांहून अधिक असूनही त्यांना 27%च आरक्षण आहे. सर्व सरकारी क्षेत्रे ही सर्व समाजघटकांचे योग्य प्रमाणात प्रतिनिधित्व करणारी असणे हेच खरे आदर्श धोरण असूनही 50 टक्के प्रतिनिधित्व ओपन म्हणजे मोघम दिले जाते. या ५० टक्के जागा अनारक्षित ठेवण्यामागे कोणताही लोकशाहीवादी तर्क नाही. खुली स्पर्धा हा बाजाराचा नियम असतो, शासनाचा नव्हे. या बाजाराच्या नियमानुसार असणाऱ्या ५० टक्के खुल्या जागा ही तरतूद केवळ आणि केवळ अल्पसंख्यांक परंतु प्रगत आणि म्हणूनच प्रभावी असलेल्या प्रवर्गाच्या तुष्टीकरणासाठी योजली गेली आहे. ज्याचा फायदा संख्येने अत्यंत कमी असलेले प्रगत समाजघटकच घेतात आणि त्यामुळे सर्व शासकीय संस्थांत त्यांचेच प्राबल्य वाढून देशाच्या सर्व धोरणांवर इतर प्रवर्गांपेक्षा त्यांच्याच दृष्टिकोणाचा प्रभाव दिसतो. तेच जर पूर्ण १०० टक्के आरक्षण ठेऊन आता खुल्या असलेल्या प्रवर्गांनाही त्यांच्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिले तर आरक्षितांस आणि त्यातही विशेषतः OBC प्रवर्गास आज जी न्याय्य टक्केवारीपेक्षा निम्म्याच टक्क्यांवर संधी मिळते तो अन्याय दूर होऊन, शासकीय धोरणांत देखील सर्व प्रवर्गांचे योग्य प्रमाणात प्रतिबिंब आणि प्रभाव पडेल. आजच्या स्थितीचे वास्तववादी विश्लेषण केल्यास खरा अन्याय कुणावर होतोय आणि कोण आपल्यावरच अन्याय झाला असे चुकून समजतात ते स्पष्ट होते.

प्र. खुल्या प्रवर्गातही खूप गरीब लोक असतात, मग जातीच्या आधारावर आरक्षण देण्यापेक्षा आर्थिक स्थितीच्या आधारावर का नाही?
उ. मी आधीच सांगितल्याप्रमाणे आरक्षण हे आर्थिक उत्थानासाठी किंवा गरीबी निर्मूलनासाठी नाही. ते सामाजिक प्रतिनिधित्वासाठी आहे. ते आर्थिक उत्थानासाठी नसल्यामुळे ते आर्थिक निकषांवर आधारित असण्याचा प्रश्नच येत नाही. भारतीय समाजाचे जे शाश्वत वैविधिकरण आहे ते आर्थिक नसून सामाजिक आहे. हे खरे आहे की सगळ्याच समाजात गरीब लोक आहेत. काही समाजांत त्यांचे प्रमाण अधिक तर काहींत कमी आहे. पण आपल्या समाजात करोडपती बापाचा मुलगा कफल्लक असू शकतो, मध्यमवर्गीयांची कन्या कोट्याधीश होऊ शकते, मात्र वंजाऱ्याचा मुलगा हा वंजारीच असतो, कोळ्याचा मुलगा हा कोळीच असतो. आर्थिक वर्गीकरण हे प्रचंड अशाश्वत आहे. जो आज गरीब आहे तो दुसऱ्या दिवशी श्रीमंत होऊ शकतो, किंवा जो आज कोट्याधीश आहे तो एका तासात कफल्लक होऊ शकतो. आर्थिक स्थिती ही कोणत्याही सामाजिक प्रवर्गाची असो, निरंतर बदलणारी असते, मात्र सामाजिक स्थिती शाश्वत असते, ती कधीही बदलत नाही. मराठा हा आजही मराठा असतो आणि शंभर पिढ्यांपूर्वीही मराठाच होता, व येणाऱ्या काळातही मराठाच राहणार आहे. आर्थिक स्थिती कधीही बदलते मात्र सामाजिक स्थिती ही अशी शाश्वत आहे, म्हणूनच आरक्षण हे आर्थिक नसून सामाजिक आहे. प्रतिनिधित्वाच्या हमीची गरज या सामाजिक विविधतेत मागे पडलेल्या लोकांना आहे. त्यामुळे फक्त विशिष्ट इन्कम असलेल्यांनाच आरक्षण मिळावे हे म्हणणे चुकीचे आहे. एवढेच नाही तर सुयोग्य सामाजिक प्रतिनिधित्वाद्वारे सामाजिक न्याय प्रस्थापित होण्यासाठी आरक्षण असल्यामुळे खरेतर तर क्रिमिलेयर ही अट सुद्धा आरक्षणाच्या मूळ उद्दिष्टाच्या विरुद्ध असली तरी ती आज सामाजिक मान्यता प्राप्त करती झालेली आहे म्हणून ती आज लागू आहे. आरक्षण आर्थिक उद्धारासाठी नसल्याने त्यात आर्थिक गोष्टींवर आधारित अट घालणे योग्य नाही. आर्थिक उत्थानासाठी मी आधी सांगितल्याप्रमाणे सरकारच्या वेगळ्या योजना असतात, आणि तिथे कोणतेही सामाजिक आरक्षण लागू नसते. त्याचे फायदे सर्वाना समान मिळतात.

प्र. खाजगी क्षेत्रात आरक्षण असावे ही मागणी मधून मधून जोर धरते, ती योग्य आहे का?
उ. आरक्षण ही एक सरकारी तरतूद असून ती सरकारच्या सर्व संस्थांत देशातील सर्व सामाजिक घटकांस प्रतिनिधित्व मिळावे म्हणून केलेली तरतूद आहे. खाजगी क्षेत्र ही एक पूर्णतः भिन्न संस्था आहे, ती बाजारावर आधारीत व्यवस्था आहे त्यामुळे तिथे कायद्याने आरक्षण लागू करावे ही मागणी चुकीची आहे. मात्र सरकार विविध मोठ्या खाजगी क्षेत्रांना सामाजिक जबाबदारी म्हणून मागास सामाजिक प्रवर्गातील लोकांना नोकरीची संधी द्या असा सल्ला देऊ शकते. परंतु तो सल्ला मानणे वा न मानणे हे पूर्णतः त्या खाजगी संस्थेच्या मर्जीवर अवलंबून असेल. सरकार त्यासाठी सक्ती करू शकत नाही. जर सरकारचा उपेक्षित प्रवर्गांस खाजगी क्षेत्रात रोजगार द्यावाच असा ठाम विचार असेल तर सरकार त्या खाजगी कंपनीस काही सवलती देऊन (जसे की करात सूट किंवा, कमी भावात जमीन देणे), त्याबदल्यात अमुक संख्येइतक्या नोकऱ्या सरकारने ठरविलेल्या लोकांस द्याव्या असा व्यावहारीक करार करू शकते. जर हा व्यवहार परवडला तर ठीक, अन्यथा ती खाजगी संस्था अशा व्यवहारास नकारही देऊ शकते. मात्र जर सरकारची कोणतीही सवलत नसेल तर मात्र खाजगी क्षेत्रास आरक्षण देण्याची सक्ती करणे हे चूक आहे.

प्र. एकदा आरक्षण घेतल्यावर त्या माणसास दुसऱ्यांदा आरक्षण मिळू नये, पण ते का मिळते?
उ. एकदा ज्याने आरक्षण घेतले आहे त्याला परत नको, म्हणजे शिक्षणात आरक्षण मिळाले तर त्यास नोकरीत नको, नोकरीत मिळाले तर बढतीत नको, असे अनेक लोक म्हणतात. मुळात शिक्षणात आरक्षणच यासाठी असते की त्यातून पुढील कर्तव्यांसाठी प्रशिक्षित उमेदवार मिळावेत, मग हे असे म्हणणे म्हणजे रेशनच्या लायनीत उभे राहण्याची संधी दिली मात्र रेशन घेताना तुला लायनीत रहायची संधी दिली म्हणून तुला आता रेशन मिळणार नाही असे म्हणण्यासारखे होईल. आपण असे तर म्हणू शकत नाही ना, की शरद पवारांना एकदा बारामतीचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आता परत द्यायला नको? ते जसे चूक आहे तसेच एकदा प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षण मिळाले की परत नको असे म्हणणे चूक आहे.

प्र. आरक्षण कधीच बंद होणार नाही का? आरक्षण किती काळापर्यंत असावे?
उ. या प्रश्नाबरोबर लोक असे म्हणतात की इतक्या दिवसात आरक्षण घेऊन त्या सामाजिक प्रवर्गांचा विकास झाला नाही का? मग जर त्यांचे उत्थान होतच नसेल तर आरक्षण कशाला? आणि जर विकास झाला असेल तर मग आता आरक्षण कशाला हवे? आता हे पहा, इतकी वर्षे संसदेत प्रतिनिधी पाठवूनही बिहारचा विकास झाला नाही म्हणून बिहारला प्रतिनिधित्व देणे बंद करायचे का? किंवा आता मुंबईचा भरपूर विकास झाला म्हणून मुंबईला संसदेत प्रतिनिधित्व देणे बंद करायचे का? बिहार आणि मुंबई मधून खासदार पाठवणे बंद करायचे का? नाही. कारण विकास होवो वा ऱ्हास होवो, प्रतिनिधित्व दिलेच गेले पाहिजे. आरक्षण हे विकासासाठी नाही तर प्रतिनिधित्वासाठी आहे. विकास हा प्रतिनिधित्वाचा एक परिणाम असू शकतो, मात्र ते त्याचे मूल्यांकन अथवा मापन नाही. एकदा पारंपारीक प्रतिगामी विचारांच्या चाकोरीतुन बाहेर पडून लोकशाही मूल्ये समाजात भिनली की प्रतिनिधित्व हे किती गरजेचे आहे हे कळेल आणि मग हा प्रश्न उपस्थित होणार नाही. आणि आरक्षण कधीच संपणार नाही असे नाही. आरक्षणास सक्षम पर्याय मिळाला की ते संपेल. मी आताच्या आरक्षणाचे काही पर्याय पुढे सांगणार आहेच. मात्र जोपर्यंत सामाजिक सीमा आहेत तोपर्यंत आरक्षण असणे गरजेचे आहे. जेव्हा लग्नात जात बघितली जाणार नाही, कोणत्याही कामासाठी धर्म वा जात बघितली जाणार नाही, जेव्हा सर्व समाजांचा शिक्षण आणि सामाजिक दर्जा समान होईल, तेव्हा आरक्षण कुणी मागणारही नाही आणि कुणी त्याचा विरोधही करणार नाही. जोपर्यंत असे होत नाही, जोपर्यंत सामाजिक विषमता नष्ट होत नाहीत, जोपर्यंत प्रवर्ग राहतील तोपर्यंत आरक्षण गरजेचे आहे. जेव्हा प्रवर्गांचे म्हणजे जातिव्यवस्थेचे पूर्ण उच्चाटन होईल, तेव्हा कुणाला आपली जात काय हेच माहीत नसेल, तेव्हा त्याला आरक्षण मिळण्याचा वा आरक्षण असण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. आरक्षणामुळे जात टिकून राहत नाहीये तर जातिव्यवस्थेमुळे आरक्षण ठेवावे लागत आहे.

प्र. आताचे आरक्षण संपविण्याचे उपाय आहेत का? आहेत तर ते काय आहेत?
उ. होय आरक्षणाचे संपविण्याचे पर्याय आहेत, कोणते ते आपण बघू.
पर्याय १: जसा धार्मिक आधारावर पाकीस्तान हा एक वेगळा देश बनला, तसा सामाजिक आधारावर प्रत्येक प्रवर्गासाठी एक देश बनवून द्यावा लागेल. एकाच प्रवर्गाचे लोक असल्याने तिथे आरक्षण असणार नाही, आणि उर्वरित भारतात त्या प्रवर्गांचे लोक मागे राहणार नसल्याने तिथेही कुणाला आरक्षणाचा पर्याय देण्याचा प्रश्न उरणार नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात ही देशाची विभागणी झाली तर जवळजवळ ८० टक्के भारत वेगळा होईल. किती घातक आहे ना हा पर्याय? आपल्या आसेतुहिमाचल देशाचे आधी दोन तुकडे झालेत (अफगाणिस्तान, म्यानमार वगैरे तुकडे मी गृहीत धरले नाहीयेत), तिथे अजून तुकडे होणे याची कल्पनाही करवत नाही. म्हणून हा पर्याय सक्षम असला तरी मुळातूनच बाद होय.
पर्याय २: विभक्त शासकीय रचना. म्हणजे काय तर बाबासाहेबांनी जो विभक्त मतदारसंघांचा पुरस्कार केला होता, मात्र गांधीजींच्या उपोषणामुळे त्यांनी तो राखीव मतदारसंघ या स्वरूपात स्वीकारला, तो पर्याय. विभक्त शासकीय रचना म्हणजे काय? तर देशाचे तुकडे होणार नाहीत, देश एकच राहील मात्र एकाच मतदारसंघातून दोन किंवा त्याहून अधिकही उमेदवार निवडले जातील. हे उमेदवार वेगवेगळ्या प्रवर्गांचे असतील. म्हणजे कसे तर शिर्डी या मतदारसंघात मराठा, OBC, SC आणि ST या सर्वांची मोठी संख्या आहे. मग शिर्डीतून या चार प्रवर्गांचे चार उमेदवार निवडले जातील, आणि या प्रत्येक प्रवर्गातील उमेदवारांना फक्त त्याच प्रवर्गातील लोक मतदान करतील, इतर लोक मतदान करू शकणार नाहीत. याचप्रमाणे, प्रत्येक जिल्ह्यात तीन ते चार जिल्हा परिषदा असतील, चार कलेक्टर असतील, प्रत्येक तालुक्यात चारपाच तहसीलदार असतील. प्रवर्गानिहाय शाळा, IIT, IIM, इंजिनियरिंग, मेडिकल कॉलेजेस काढून त्यात फक्त त्याच प्रवर्गांतील लोकांना एडमिशन द्यावे लागेल. प्रत्येक प्रवर्गासाठी वेगळे न्यायालय आणि वेगळे कायदे असतील. हाही पर्याय सक्षम असला तरी अव्यवहार्य आहे. म्हणून हाही पर्याय सपशेल बाद.
पर्याय ३: रोटेशन पद्धत. वरचे दोन्ही पर्याय पूर्वीपासून अस्तित्वात होते तर हा माझा पर्याय आहे. म्हणजे काय तर सहा सहा वर्षांची आवर्तने बनवावीत. पहिल्या सहा वर्षांत देशातील प्रत्येक नोकरीवर आणि प्रत्येक खासदार, आमदार, मंत्री, न्यायाधीश, पंतप्रधान, राष्ट्रपती अशा प्रत्येक पदावर केवळ एकाच प्रवर्गाचे उमेदवार नेमण्यात यावेत. सहा वर्षे झाली की सगळे बरखास्त आणि मग पुढच्या सहा वर्षांसाठी पुढचा प्रवर्ग. उच्च शिक्षणात, या प्रवर्गानंतर ज्या प्रवर्गाचे रोटेशन येणार आहे फक्त त्याच प्रवर्गातील उमेदवारांना कॉलेजात एडमिशन देण्यात यावे. म्हणजे त्या प्रवर्गाचे रोटेशन येईपर्यंत विविध पदांसाठी पात्र उमेदवार तयार होतील. असे करून साधारण १८ ते ३० वर्षांत परत पहील्या प्रवर्गाची संधी येईल. या सर्वांना नोकरीवरून किंवा पदावरून सहा वर्षातच जावे लागले म्हणून त्यांच्या आयुष्यात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी प्रत्येकास जीवनभर पेन्शन देण्यात यावी. हे जमेल का? नाही. याने तर प्रचंड अनागोंदी माजेल.

सध्यातरी या तीन व्यतिरिक्त एकमेव अन्य व्यवहार्य उपाय ज्यात समाजाच्या प्रत्येक प्रवर्गास न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल तो म्हणजे आताचा आरक्षित जागांचा पर्याय होय. पुढे कधी याव्यतिरिक्तही एखादा चांगला पर्याय येऊ शकला तर आताचा हा पर्यायही संपू शकतो.
सध्याच्या तरतुदीपेक्षा वेगळा कोणताही पर्याय ज्यात लोकशाही मूल्यांनुसार प्रत्येक सामाजिक घटकास लोकशाहीच्या प्रत्येक संस्थेत न्याय्य प्रतिनिधित्व मिळेल तो पर्याय आला की आरक्षण संपेल.

सोमवार, २३ एप्रिल, २०१८

राजूरचा जावजी बांबळे

इतिहास म्हंटले की आपल्या डोळ्यांसमोर नेहमी शिवाजी, बाजीराव, राणा प्रताप, अकबर, औरंगजेब, इंग्रज, गांधी, नेहरू हेच लोक येत असतात. मोठ्या देशपातळीवर प्रभाव टाकणाऱ्या अशा मोजक्या लोकांची माहिती म्हणजेच आपला इतिहास असे आपण समजतो. मग आपल्या अवतीभोवतीच्या परीसरात, आपल्या गाव तालुक्यात वा अगदी जिल्ह्यात कुणी महान पराक्रमी माणसे होऊन गेली नाहीत का? देश आणि राज्याचा इतिहास ठेवा बाजूला, आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला काही इतिहास नाही का? इथे कुणी शून्यातून राज्य निर्माण केले नाही का? शिवाजी राजांनी पराक्रमाने बलाढ्य सत्तेला शह देऊन नवे राज्य निर्मिले, पण तितक्याच पराक्रमाने तितक्याच बलाढ्य शक्तीशी लढलेला कुणी वीर आपल्या परीसरात नव्हता का? शिवाजी महाराज नसोत पण आपल्या गावातून किंवा पंचक्रोशीतून कुणी बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू देशपांडे हे निर्माण झालेच नाहीत का? असे तर नसणार. प्रत्येक गावाला, किंवा किमान एका प्रांताला तरी नक्कीच पराक्रमांचा मोठा इतिहास असणार, कुणी ना कुणी महान पराक्रमी वीर अथवा वीरांगना आपल्याही आजूबाजूस पूर्वी कधीतरी निर्माण झालेच असणार. फक्त त्यांचे प्रभावक्षेत्र छोटे असल्याने त्यांच्या कहाण्यांची नोंद ठेवली गेली नसेल आणि म्हणून त्यांचे कार्य इतिहास म्हणून आपल्या पुढे आले नसेल. आज आपण फक्त ज्यांची नोंद ठेवली गेली तेवढ्याच घटनांना आपला इतिहास समजतो. एवढेच नाही तर ज्यांची नोंद ठेवली गेली त्यातही अनेकदा असे होते की फक्त काहीच प्रकरणे पॉप्युलर झाल्याने तीच पुढे आली आणि त्यातच अधिक संशोधन झाले, काही अशाही घटना असतील ना की ज्यांची ओझरती नोंद झाली मात्र त्या नकळत वा मुद्दाम दुर्लक्षिल्या गेल्या वा अनुल्लेखल्या गेल्या आणि मग हळूहळू विस्मृतीत जाऊन नष्टच झाल्या? हो असेही नक्कीच झाले असणार. प्रत्येक गावात वा गडावर आपल्याला वीरगळ दिसते, प्रत्येक वीरगळ ही त्या त्या गावातील एकेका पराक्रमाची गाथा आहे, मात्र ती लिखित नव्हे तर चित्ररूपात असल्याने आपल्याला तिचे डिटेल्स कळत नाहीत. आपल्या गावाशेजारी असलेल्या त्या डोंगरावर जिथे आता फक्त काही भिंतीचे भग्नावशेष दिसतात, तिथे काय घ्या आपल्या गावाच्या चार वीरांनी असीम पराक्रम करून ४०० आक्रमकांना धूळ चाटवली असेल. आपण जो सांगतो तो म्हणजे फक्त शिवाजी महाराज एकदा इथे आले होते वा अहिल्याबाई होळकरांनी इथे येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला हा तर काही गावाचा मोठा अभिमानाचा इतिहास नव्हे. आपल्या गावातील माणसांनी केलेल्या काही ज्ञात, अज्ञात पराक्रमांची, त्यांच्या गोष्टींची माहीती हा खरा आपला इतिहास. आपल्या गावातील कुणीतरी शिवाजीराजांना, वा अगदी निजामाला का होईना अत्यंत पराक्रम करून मदत केली हा आपला अभिमानाचा इतिहास. असा प्रत्येक गावाचा इतिहास नक्की असणार, मात्र त्याची नोंद न झाल्याने वा असलेली नोंद दुर्लक्षिली गेल्याने आपल्याला तो इतिहास कळलाच नाही आणि मग दूर कुठेतरी झालेली सिराजुद्दौला आणि इंग्रजांमधली प्लासीची लढाई यासारख्या घटना हाच केवळ आपला इतिहास असे आपण मानू लागलो आणि मानतो. मग आपल्या लोकल पातळीवर इतिहास घडलाच नाही का? आपल्या परिसरात काहीच ऐतिहासिक महत्वाच्या घटना घडल्या नाहीत? याच जिज्ञासेतून आपल्या गावात, परीसरात कुणी हिरो निर्माण झाला असेल का याची माहिती काढण्याचा प्रयत्न केल्यावर मला जुन्या लोकांच्या बोलण्यांतून आणि काही पुस्तके व दस्तऐवजांतून माझ्या जन्मगावाचा एक हिरो, किंवा माझ्या जन्मगावाचा शिवाजी म्हणता येईल असा एक शूरवीर सापडला.
मावळात बोरघरचा हिरोजी बांबळे नाईक हा बिदरच्या सुल्तानशाहीने पूर्वी कधीतरी बहाल केलेल्या परंपरागत मनसबदारीचा शेवटचा वारस होता. त्याचा मृत्यू १७६०ला झाला. त्याला जावजी नावाचा एक मुलगा होता. जावजी हा तसा मध्यम उंचीचा शिडशिडीत अंगाचा आणि गोरापान रंग असलेला एक अत्यंत हुशार, शूर, धाडशी आणि महत्वाकांक्षी माणूस होता. असे म्हणतात की जावजी हा पायाळू होता. पायाळू असणे हा अपशकुन मानला जातो. म्हणून जावजी तान्हा असताना त्याला पायाळू असण्याच्या अपशकुनातून वाचवण्यासाठी नदीच्या कडेला उघड्या पडलेल्या उंबराच्या मुळ्याखालून तीनचार वेळा घालून काढण्यात आले. जावजी हा हिरोजीच्या मृत्यूच्या वेळी जुन्नर येथे नोकरीस (नाईक) होता. आपल्या पित्याच्या मृत्यूनंतर त्याने जुन्नरच्या सुभेदाराकडे अर्ज करून पेशव्यांकरवी आपल्या पित्याची मनसबदारी वारसा हक्काने आपल्याला मिळावी असा अर्ज केला.
जावजीला जुन्नरमधील अनेकजण नापसंत करत असत. असे म्हंटले जाई की जावजी त्याच्या अनेक मित्रांना देशावर वेगवेगळ्या ठिकाणी दरोडे आणि लूट करण्यास मदत करीत असे. विशेषतः जुन्नरचा सावंत आणि त्याचे कुटुंब यांना जावजी खूप खुपत असे. त्यांनी सुभेदाराला फूस लावून जावजीचा अर्ज फेटाळायला भाग पाडले. मग सुभेदारानेही जावजीचा अर्ज फेटाळला. या प्रकाराने जावजी नाराज झाला आणि नोकरी सोडून आपल्या गावी शेती करण्यासाठी निघून गेला. मात्र तीनेक वर्षे शेतीत राबूनही त्या कामात काही रस नसल्याने त्याला काही करता आले नाही. अगदी शेतसारा देण्याइतकेही उत्पन्न त्याला काढता आले नाही.
एकदा पेशवा शिपाई शेतसारा गोळा करण्यास गावात आले असता गावच्या पाटलाने त्यांना सांगितले की मी जावजीकडून सारा गोळा करू शकत नाही, तो माझे ऐकणार नाही, तेव्हा तुमचे तुम्हीच त्याचे काय करायचे ते करा. शिपाई म्हणाला की मी त्याचा बंदोबस्त करेल. मग पाटलाने शिपायाला एका चपराश्याबरोबर जावजीकडे पाठवले. शिपायाने जावजीला दमदाटी केली परंतु जावजीने त्याला कसेबसे समजावून माघारी धाडले. मात्र या प्रकारामुळे जावजीला पाटलाचा खूप राग आला. आपल्याला शेतीउत्पन्न कमी मिळालेले असूनही पाटलाने शिपाई घरी पाठवून आपला असा अपमान केल्याबद्दल पाटलाला याची किंमत चुकवावी लागेल अशी घोषणा करून तो जंगलांत निघून गेला. हे ऐकताच पाटलाची पाचावर धारण बसली. पाटील घाबरून थेट जुन्नरच्या सुभेदाराकडे गेला आणि त्याला सर्व वृत्तांत सांगितला. मग सुभेदाराने आपल्याकडील तीन नाईकांना जावजीस समजावून परत जुन्नरला घेऊन येऊन जुन्या नोकरीवर रुजू होण्यासाठी राजी करण्याची कामगिरी दिली. ते तिघे नाईक जावजीला भेटायला व समजवायला जावजीकडे आले आणि मग जावजी त्यांच्यावर विश्वास ठेऊन परत जुन्नरला आला. जावजी परत आल्यावर सुभेदाराने त्याला त्याची वारसाहक्काची मनसब पेशव्यांकडे मागणी करून परत देण्याचा विचार केला असतानाच परत एकदा जुन्नरचे काही सावंत आणि काही सिंधी सुभेदाराला भेटले आणि त्यांनी जावजीच्या चहाड्या केल्या. त्यांनी सांगितले की तेव्हा देशावर घडलेले सगळे दरोडे जावजीने घडवून आणले आहेत, आणि अशा माणसाला मनसब न देता उलटपक्षी त्याचा परस्पर काटा काढायला हवा. त्यांनी सुभेदाराला जावजीस कैद करून चांगला धडा शिकवण्याचा सल्ला दिला. मात्र जावजीच्या चार मित्रांना (त्यात एक ब्राह्मणही होता) हे कळल्यावर त्यांनी सुभेदाराला स्वतःच्या शपथेवर अशी हमी दिली की जावजी काहीही सरकारविरोधी काम करणार नाही. त्यांच्या या हमीवर सुभेदाराने जावजीस कैद वगैरे न करता नोकरीमध्ये आहे त्या स्थितीत ठेवण्याचे ठरविले.
जरी मित्रांच्या हमीवर जावजीने सुभेदाराचा विश्वास मिळविला असला तरी जावजीला पाण्यात पाहणारे जुन्नरातील इतरजण स्वस्थ बसलेले नव्हते. ते सदैव जावजीचा काटा काढण्याच्या प्रयत्नात होते. दरम्यान पेशव्यांनी जंजिऱ्याच्या सिद्धीविरुद्ध मोहीम सुरु केली होती. त्या मोहिमेत भाग घेण्यासाठी सुभेदाराचे दोन ब्राह्मण सैन्यअधिकारी आपल्या सैन्यटोळ्या घेऊन जंजिऱ्यास निघाले होते. त्या दोघांना जावजीचा कट्टर विरोधी असलेला एक ब्राह्मण जाऊन भेटला व त्याने त्यांच्याशी मिळून जावजीला मोहिमेवर घेऊन जाण्याचा व तिकडेच ठार मारण्याचा कट रचला. त्यानुसार त्यांनी ठरवले की बिनिवाल्याबरोबर जावजीला मोहिमेवर पाठवायचे व लढाईच्या वेळी जावजी आणि त्याचे कोळी साथीदार नावेत बसून समुद्रात गेले की मग ती नाव बुडवून त्या सर्वांना ठार करायचे. मात्र ते दोघे ब्राह्मण बिनिवाल्यास हा कट सांगत असताना जावजीच्या एका समर्थकाने ते ऐकले व त्याने लगोलग जावजीस ही खबर दिली. हे ऐकताच जावजी सावध होऊन लगोलग परत जुन्नर सोडून जंगलात पळून गेला. मात्र आता आपल्याविरुद्ध शिजविल्या जाणाऱ्या या सगळ्या कट कारस्थानांचा बदला घेण्यासाठी आणि आपला मनसबदारीचा वारसा हक्क मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न करण्याचे ठरवले. त्यासाठी त्याने लढाईसाठी आपली टोळी तयार करण्यास सुरुवात केली. आणि मग या कामासाठी पैसे मिळविण्यासाठी त्याने खंडणी गोळा करण्यास सुरुवात केली. सुभेदारास हे कळताच त्याने जावजीच्या कुटुंबीयांस कैद करून जुन्नर येथे डांबले आणि मग जावजीला पकडण्यासाठी सैन्याची एक तुकडी जंगलात रवाना केली. आता आपण सुभेदाराविरुद्ध लढल्यास तो त्याच्या कैदेत असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या जीवाचे काही बरेवाईट करेल हे ओळखून जावजीने काही काळ शांत राहण्याचे ठरवले व तो गुपचूप तिथून थेट खानदेशात निघून गेला.
खानदेशात गेल्यावर काही दिवसांनी आपल्या कुटुंबाची माहिती काढण्यासाठी जावजीने आपले दोन भाऊ दादाजी आणि सूर्याजी व एक पुतण्या यांच्यासह सात जणांना जुन्नरला पाठवले. मात्र योगायोगाने हे सातही जण फिरता फिरता चुकून जावजीला पकडण्यासाठी नियुक्त केलेल्या रावजी सावंत याच्या सैन्याच्या तुकडीला सापडले. सावंतने त्यांना पकडून जुन्नरला नेले. आणि भावांना वेगवेगळे करण्यासाठी दादोजीला जुन्नरमध्ये तर सूर्याजी आणि इतर पाच जणांना चावंड किल्ल्यावर कैदेत ठेवले. जावजीला ही खबर लागताच तो खानदेशातून निघून कोतुळमध्ये आला आणि मूळा नदीच्या किनाऱ्यावर कुठेतरी लपून बसून आपल्या भावांना सोडविण्याच्या संधीची वाट पाहू लागला. सावंतने दरम्यान सुभेदाराचे कान भरून जावजीचे भाऊ जिवंत राहील्यास ते काहीतरी युक्ती करून पसार होतील व अजून त्रास देतील म्हणून त्यांना चामड्याच्या पिशव्यांत बांधून कडेलोट करावी असे सुचवले. सुभेदारानेही असे करण्याची परवानगी दिली व त्यानुसार पाच जणांना चामड्याच्या पिशव्यांत भरून त्यांची डोंगरावरून कडेलोट करण्यात आली. मात्र सूर्याजी आणि जावजीचा पुतण्या यांनी विनंती केली की आम्ही लढवय्ये आहोत तेव्हा आम्हाला असे मरण देऊ नका. त्याऐवजी आम्हाला दोन तलवारी द्या आणि मग आम्ही त्या तलवारींनी एकमेकांशी लढू व लढून दमलो की मग स्वतःच कड्यावरून खाली उडी घेऊ. मात्र यांच्या हातात शस्त्र दिल्यास हे काहीही करू शकतात हे माहित असल्याने घाबरून त्यांना फक्त दोन काठ्या देण्यात आल्या आणि मग नाईलाजाने दोघांनी त्या काठयांनी एकमेकांशी लढून शेवटी दमल्यावर एकामागोमाग एक कड्यावरून उड्या घेऊन आपले प्राण दिले.
आपले भाऊ आणि पुतण्या व इतर साथीदारांच्या दुर्दैवी मृत्यूची ही खबर जावजीला मिळताच तो अत्यंत निराश आणि हताश होऊन गेला. आता आपल्या लढाईला वा लढ़ाई करून मिळणाऱ्या मनसबदारीला काही अर्थ नसेल, असे त्याला वाटू लागले. आता लढाई वगैरे करण्यात काहीही अर्थ राहीला नसल्याने आपण शांत राहून घ्यावे असे नैराश्यपूर्ण विचार त्याच्या मनात येऊ लागले. मात्र त्याचे जिवलग मित्र देवजी भांगरे आणि धारेराव साबळे यांनी त्याला धीर दिला आणि सांगितले की आता किमान कैदेत असलेल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी तरी असे हताश होऊन चालणार नाही. मग हे दोघे मित्र जुन्नरच्या सुभेदाराकडे गेले व स्वतःच्या हमीवर जावजी यापुढे शांत बसेल, जुन्नर प्रांतात फिरकणाराही नाही असा सुभेदारापुढे जामीन देऊन त्यांनी जावजीच्या कुटुंबीयांची सुटका करवून दिली. मात्र तरीही जावजी लपून छपून येतो आणि देवजी भांगरेला भेटतो याची कुणकुण सुभेदाराला लागली. त्याने जावजी आणि त्याच्या मित्रांच्या हालचालीवर नजर ठेवायची व्यवस्था केली. मात्र त्याने पाठविलेल्या सैन्याला काही जावजी आढळला नाही. मग त्याने देवजी भांगरेलाच कैद करून जुन्नर येथे तुरुंगात टाकले.
आपल्या मित्राला काहीही पुरावा नसताना कैद केले हे पाहून जावजी चवताळून उठला आणि मग त्याने कळंबईकडे कूच केले. मध्येच जावजीला खबर लागली की पोखरी आणि कळंबईच्या मध्ये सावंताच्या एका भावाने एक लाकडी वाडा बांधला असून तिथे तो एका गोसाव्यासोबत आपल्याला काही इजा होऊ नये म्हणून मंत्रपठण आणि अघोरी तांत्रिक पूजा करवतो आहे. जावजीला हे कळताच त्याने लगेच तिथे हल्ला केला आणि सावंत व तो गोसावी असे दोघांनाही ठार केले. जावजीने आपल्या भावाला ठार मारल्याचे कळताच राजा सावंत त्वरित पुण्यास पेशवा दरबारात गेला व त्याने जुन्नर प्रांताची घडी पूर्णपणे विस्कटली असून जावजीने पेशवे प्रशासन पूर्ण खिळखिळे करून टाकले आहे, असे खोटेनाटे आणि प्रक्षोभक आरोप करून पेशवे दरबाराने जावजीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली. हे ऐकल्यावर नाना फडणवीसाने संतप्त होऊन सहाशे सशस्त्र सैनिकांची एक तुकडी राजा सावंतला जावजीचा बंदोबस्त करण्यासाठी दिली.
सावंत जावजीला मारण्यासाठी पेशव्यांची एवढी मोठी सशस्त्र फौज घेऊन जुन्नरला आला असला तरी जावजीही काही कच्या गुरूचा चेला नव्हता. त्याला ही खबर लागताच त्याने अत्यंत चलाखीने आपल्या सर्व सहकाऱ्यांना वेगवेगळे होण्याच्या सूचना दिल्या. एवढे मोठे सैन्य घेऊन आपल्या मागावर असलेल्या राजा सावंताला हुलकावणी देण्यासाठी मग जावजीचे सगळे साथीदार इकडे तिकडे पांगले. जावजीने आपल्याबरोबर फक्त बारा अत्यंत विश्वासू साथीदार ठेवले. आता जावजी आणि त्याचे साथीदार असे वेगवेगळ्या ठिकाणी पांगल्यामुळे राजा सावंताला कोणत्याही एका ठिकाणी आणि एका दिशेने आपली कारवाई करता येईना. अशाप्रकारे सैन्याला गुंगारा देण्यात यशस्वी झाल्यावर मग उलटे राजा सावंतलाच धडा शिकविण्यासाठी जावजीने एक योजना आखली. त्यानुसार आधी त्याने स्वतःबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवायला सुरुवात केली जेणेकरून सावंत अजून गोंधळून जाईल. कधी तो जुन्नरच्या जवळ असल्याची अफवा पसरवे, तर कधी तो घाबरून पळून गेल्याची अफवा पसरवे, तर कधी तो कोकणात गेल्याची आवई उठवे. जावजीच्या योजनेला बळी पडून मग राजा सावंतानेही आपले सैन्य अनेक तुकड्यांत विभागून त्यांना अफवांमध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जावजीचा माग काढण्यासाठी पाठवले. पण जावजी आपल्या ठावठिकाण्याच्या इतक्या अफवा उडवत असे की कोणत्याही टोळीला कधीही तो दिसला नाही. स्वतः राजा सावंतही सैनिकांच्या सर्वात मोठ्या तुकडीबरोबर जावजीच्या शोधमोहिमेत भाग घेत असे. एव्हढी सक्षम सैन्य तुकडी दिमतीला असूनही जावजीची प्रचंड भीती असल्यामुळे राजा सावंत जिथे जाईल तिथे आपल्या सुरक्षेचा अत्यंत चोख बंदोबस्त ठेवीत असे. अगदी रात्रीच्या वेळीही आपल्यावर हल्ला होऊ नये म्हणून पहारेकऱ्यांची मजबूत व्यवस्था त्याने केलेली होती. पण जावजीही अत्यंत धूर्त होता, त्याने आपल्या गुप्तहेरांकरवी राजा सावंताचे तळ कुठे असतात, सुरक्षा व्यवस्था कशी असते, त्यात काय त्रुटी आहेत याची खडानखडा खबर काढलेली होती.
राजा सावंत एकदा आंबेगाव पठारावर तळ ठोकून होता, त्याच्या सुरक्षेचा घेराही नेहमीप्रमाणे अत्यंत मजबूत होता. मात्र जावजीने आधीच त्याच्या सुरक्षा रचनेची पूर्ण खबर काढलेली असल्याने मजबूत शिबंदी असूनही त्याने राजा सावंतावर तिथेच हल्ला करायचे ठरवले. मग एक पक्की योजना बनवून जावजीने रात्री गुपचूप त्याच्या तळावर हल्ला केला. जावजीच्या हल्ल्याच्या जबर तडाख्याने राजा सावंताचे सैन्य हादरले आणि पळून जाऊन झाडाझुडपांत लपून बसले. मग जावजीने राजा सावंत व त्याच्या बारा वर्षाच्या मुलाला पकडले. जावजी आपल्याला माफ करणार नाही हे राजा सावंताला माहीत होते, तरीही किमान आपल्या बारा वर्षांच्या मुलाला जीवदान द्यावे अशी त्याने जावजीकडे विनंती केली, मात्र माझ्या भावांना आणि छोट्या पुतण्याला मारताना तू कशी दया दाखवली नाहीस असे त्यास उलट विचारून जावजीने दोघांनाही ठार मारले. राजा सावंत पकडला गेला आहे असे कळल्यावर त्याचे पळून गेलेले काही सैनिक परत लढायला आले, त्या सर्वांनाही जावजीने यमसदनी धाडले.
राजा सावंतला आणि पर्यायाने नाना फडणवीसाला अशी धूळ चारल्यावर मग जावजी बांबळे थेट हरिश्चंद्रगडावर सुरक्षित वास्तव्यास निघून गेला. राजा सावंत मारला गेला ही खबर त्याच्या कुटुंबियांना दुसऱ्या दिवशी लागली जेव्हा राजा सावंताचा घोडा रक्तबंबाळ आणि शेपटी तोडली गेल्याच्या अवस्थेत चालत त्याच्या घरी जुन्नरला पोचला. राजा सावंताचा मुलगा लगोलग पुण्याला पेशवे दरबारात हजर झाला आणि त्याने नाना फडणवीसला हा वृत्तांत कथन केला. फडणवीस आता अत्यंत बेचैन झाला, सहाशे सशस्त्र सैनिकांची टोळी पाठवूनही जावजीने उलट राजा सावंतालाच ठार केले हे पाहून आता जावजीला संपवण्यासाठी याहून मोठी कुमक आणि मोठ्या क्षमतेची कारवाई करावी लागेल हे त्याला कळले. मग फडणवीसने राजा सावंताच्या मुलाला थेट जुन्नरची सुभेदारी बहाल केली जेणेकरून त्याला जावजीच्या बंदोबस्तासाठी अधिक अधिकार मिळाले. त्याला नाना फडणविसाने सुभेदारीची सनद देतानाच आपल्या नव्या अधिकारांचा व फौजेचा पूर्ण वापर करून जावजी बांबळेस संपविण्याची सूचना केली. मात्र राजा सावंताच्या मुलाला सुभेदारी मिळाली हे पाहून त्याच्याच कुटुंबातील काहीजण नाराज झाले. त्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा आपण जावजीला जाऊन मिळू असे त्यांनी ठरवले. मग त्यानुसार एकजण जावजीला भेटायला गेला व त्याला नव्या सुभेदाराचा काटा काढण्यास सांगितले. त्यानुसार मग जावजीने आपली माणसे पाठवली. सावंताच्या फितूर भावाने त्यांना सुभेदार सावंताचे घर दाखवले. घराजवळच एक वरात पाहत उभा असताना जावजीच्या माणसांनी नव्या सुभेदारावर हल्ला करून त्याला ठार मारले.
याच दरम्यान जावजीने राघोबादादाशी संपर्क साधायला सुरुवात केली. नाना फडणवीस आपल्यावर प्रचंड चवताळलेला असल्याने राघोबादादाला पेशवा बनण्यासाठी मदत करावी असे त्याने ठरविले. मात्र नव्या सुभेदारालाही जावजीने ठार केल्याचे समजताच नाना फडणवीस प्रचंड क्रोधीत झाला. जावजीच्या बंदोबस्तासाठी मग त्याने कोळी नाईक देवजी कोकाटे या जुन्नरच्या मोकासदाराला बोलावून घेतले व त्याला जावजीचा बंदोबस्त करायला सांगितले. कोकाटेने नाना फडणवीसाला सांगितले की मला जावजीच्या बंदोबस्तासाठी हवी ती सैन्य व इतर कुमक पेशव्यांतर्फे देण्यात यावी, जावजीस पकडले तर त्यास ठार मारण्याची लेखी परवानगी द्यावी, आणि इतकेच नाही तर बावन्न मावळातील सर्व कोळी नाईकांचे तंटे व मसलती सोडविण्याचे अधिकार लेखी देण्यात यावेत. मग नाना फडणविसाने जावजीला पकडण्याचे व मारण्याचे आदेश, इतर सैन्य व रकमेचे अधिकार तसेच ५२ मावळांतील कोळी नाईकांच्या नियंत्रणाचे अधिकार कोकाटेला लेखी स्वरूपात दिले आणि जावजीचा बंदोबस्त करण्यासाठी परत पाठवले.
प्रत्यक्ष युद्ध व सैनिक कारवाई करून जावजीसारखा धडाडीचा वीर पुरुष हाती लागू शकत नाही हे माहीत असल्याने मग कोकाटेने कपटाने जावजीस पकडण्याची योजना बनवली. एकदा कोकाटे त्याच्या तीन मुलांसकट जंगलात फिरत असताना त्याची गाठ अचानक जावजीशी पडली. कोकाटे धूर्त होता, त्याने गोड बोलून जावजीला फसवले. त्याच्यावर कसा अन्याय झाला, आणि इतर कोळी नाईकांनी कशी त्याला साथ द्यायला हवी असूनही साथ दिली नाही याची त्याने हळहळ व्यक्त केली. मी आपल्या जातीशी इमान राखून तुला न्याय मिळवून देईल अशी हमी दिली. मी तुला जुन्नरला तुझा अधिकार मिळवून देईल, तू माझ्याबरोबर चल असे त्याने जावजीला सांगितले. जावजीही कोकाटेच्या भूलथापांना बळी पडला. त्याने कोकाटेबरोबर जाण्याची तयारी दाखवली. त्यांच्यात अशाप्रकारे वार्तालाप होत असताना चालता चालता वाटेत एक नदी लागली. नदी पाहून जावजी कोकाटेला म्हणाला की आपण नदीत आधी अंघोळ करून घेऊ आणि मग पुढे जाऊ. जावजीने असे म्हंटल्यावर कोकाटेने आपला झोळणा म्हणजे पिशवी तिथेच एका झाडावर टांगून ठेवली आणि तो जावजीबरोबर अंघोळीसाठी नदीत उतरला. जावजीच्या एका मराठा सैनिकाने सहज त्या झोळण्यात पाहीले तर त्याला पेशवाईची मोहोर उमटवलेली असलेले काही कागद दिसले. त्याने जावजीचा पुतण्या काळू बांबळे याला बोलावून ते दाखवले. दोघांनी ते कागद गुपचूप बाहेर काढून वाचले. त्यात फडणवीसाने जावजीला ठार मारण्यासाठी संमती दिल्याचा दस्तऐवज होता. ते वाचल्यावर कोकाटेच्या कटाची त्यांना कल्पना आली, मग त्यांनी ते कागद परत जसेच्या तसे ठेवून, गुपचूप जावजीच्या कानावर ही गोष्ट घातली. जावजी म्हणाला की मला ही शंका होतीच त्यामुळे आता आपण यांनाही तीच वागणूक देऊ जी ते आपल्याला देणार होते. मग रात्री सगळे झोपलेले असताना जावजीने त्या चौघांनाही ठार मारले.
नाना फडणवीसाने जावजीस संपविण्याच्या अशा दोन्ही योजना धुळीस मिळविल्यानंतर काही दिवसांनी मग जावजीला राघोबादादाचा एक खलिता मिळाला. त्या खलित्यात राघोबाने जावजीला सगळे डोंगरी किल्ले जिंकून घेण्याची सूचना केली होती. राघोबा हाच खरा पेशवा आहे आणि आपल्याला त्याचा पाठिंबा आहे हे या खलित्याने सिद्ध होते असा दावा जावजीने केला त्यामुळे त्याला इतर अनेक कोळी सरदारांची साथ मिळाली. मग जावजीने आधी कोकण मोहीम हाती घेऊन सिद्धगड भैरवगड आणि कोथळीगड हे पेशव्यांकडून जिंकून घेतले. भैरवगडाच्या किल्लेदाराकडे एक अत्यंत सुंदर असे सोन्याचे कडे होते ते जावजीने हस्तगत केले. लवकरच जावजीने कोथळीगडही काबीज केला. जावजीच्या यशाची ही खबर लागताच पेशव्यांनी सेनेची एक तुकडी जुन्नरवरून जावजीशी लढण्यासाठी खाली कोकणात पाठवली. जावजीला हे कळताच त्याने हल्ल्याची वाट न पाहता स्वतःच त्या सैन्यावर हल्ला करून त्यांना अक्षरशः पळवून लावले. त्यानंतर जावजीने गोरखगडही ताब्यात घेतला.
गोरखगड घेतल्यावर जावजीला कळले की देवाजी सावंताने त्याला मारण्याची सुपारी नऊ बेरडांना (दरोडे टाकणारे आणि सुपारी घेऊन हत्या करणारे) दिली आहे, आणि वरून त्यांना प्रत्येकी एक सोन्याची अंगठीदेखील वानगीदाखल दिली आहे. पण जावजी सावध होता, त्यामुळे बेरडांना जावजीला शोधता सुद्धा आले नाही, मारणे तर दूरच. कोकणात एकामागून एक किल्ले ताब्यात घेतल्यावर मग जावजीने आपला मोर्चा आता घाटावर वळवला. त्याने रतनगडाला वेढा घातला. गोविंद खाडे हा तेव्हा रतनगडाचा किल्लेदार होता. जावजीने खाडेला सहा हजार रुपयांत किल्ला सोडण्याचा प्रस्ताव दिला, आणि गोविंद खाडे याने तो मान्य करून किल्ला जावजीच्या स्वाधीन केला. त्यानंतर जावजीने अलंग जिंकून घेतला आणि मग मदनगड त्याला स्वतःहून शरण आला. जावजीने अशा प्रकारे एकामागून एक पेशवाईचे लचके तोडल्यावर नाना फडणवीस अत्यंत खवळला व त्याने जावजीला कशाही प्रकारे पकडून त्वरीत तोफेच्या तोंडी द्यावे असे फर्मान काढले. मग नाना फडणवीसाने जावजीने जिंकलेले किल्ले परत घेण्यासाठी एक मोठी फौज रवाना केली. जावजी त्यावेळी कोकणात होता. पण नानाने पाठविलेल्या फौजेची खबर ऐकताच तो त्वरित घाटावर आला आणि त्या फौजेवर हल्ला करून त्यांचे अपरिमित नुकसान केले.
मग पेशव्यांची दुसरी एक फौज गोडबोले याच्या नेतृत्वाखाली कोकणातून वर घाटावर जावजीवर चालून आली, मात्र जावजीने त्यांच्यावरही गनिमी काव्याने हल्ले केले. अशाप्रकारे विजयामागून विजय प्राप्त करीत असला तरी आता जावजी नाना फडणविसाने पाठविलेल्या अनेक फौजांमुळे चोहीकडून वेढला जाऊ लागला होता. त्यामुळे त्याने राघोबादादास पत्र लिहून आपण पेशवे आहात आणि माझ्याशी लढायला येणारी फौजही पेशव्यांचीच आहे मग अशा प्रसंगी मी पुढे काय करावे ते विचारले. मात्र राघोबादादाने सांगितले की इंग्रजांनी त्यास जी मदत करण्याचा वायदा केला होता तो त्यांनी तोडल्याने राघोबा एकटा पडला होता. त्याने जावजीस पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध लढून किल्ले राखून ठेवण्यास सांगितले. पुढे गोष्टी अनुकूल झाल्यावर मदत पाठवेल असे सांगितले. पण राघोबा स्वत:च इंग्रजांच्या नजरकैदेत आहे त्यामुळे राघोबाकडून काही अपेक्षा नाही हे कळल्यावर मात्र जावजी सावध झाला. जावजी हा फक्त वीर पुरुषच नव्हे तर अत्यंत चलाख मुत्सद्दी देखील होता. नाना फडणवीसाला आपण किती त्रास दिला आहे हे त्याला माहित होते त्यामुळे तो आपल्याला मारण्यासाठी सगळी शक्ती पणाला लावेल हेही त्याला माहित होते. म्हणूनच आता एवढ्या मोठ्या पेशवाईच्या शक्तीसमोर टिकाव धरायचा तर त्याला निर्बल झालेला राघोबा सोडून इतरांची साथ घेण्याची गरज होती. मग त्यानुसार त्याने हालचाली सुरु केल्या. धोंडू महादेव या त्याच्या मित्राला त्याने नाशिकच्या सुभेदाराकडे पाठवले तर मल्हारपूरचा पाटील भांगरे याच्याकरवी तुकोजी होळकर यांचेशी संपर्क साधला. भांगरे पाटील हा तुकोजी होळकराच्या सैन्यातला एक घोडेस्वार आणि तुकोजीचा अत्यंत विश्वासातला व जवळचा माणूस होता.
दरम्यानच्या काळात मधूनच गनिमी हल्ला करून पसार होणाऱ्या जावजीचा शोध घेण्याचे काम गोडबोलेने आपल्या फौजेसह सुरूच ठेवले होते. त्याला कळले की जावजी रतनगडावर असून तो खाली येणार आहे, तेव्हा त्याने आपल्या फौजेसह रतनगडाला वेढा दिला. कुणीही खाली जाताना दिसला की त्याला ठार मारा असे सांगून अत्यंत पक्की आणि मजबूत अशी वेढ्याची रचना त्याने केली. मात्र अंधार झाल्यावर जावजी स्वतः खाली उतरून गोडबोलेच्या फौजेला गुंगारा देऊन रातोरात रतनगडावरून पसार झाला. जावजी निघून गेल्यावर दोन दिवसांनी गोडबोलेला कळले की जावजी केव्हाच निघून गेला असून त्याने उत्तरेकडील पेशव्यांच्या गावांत खंडण्या वसूल करून जे विरोध करतील त्यांना मारण्याचा सपाटा लावला आहे.
गोडबोलेला एवढ्या मोठ्या फौजेनिशी असूनही जावजीच्या केसालाही धक्का लावता आला नाही आणि जावजी एकामागून एक किल्ले ताब्यात घेताच चालला होता हे पाहील्यावर मग नाना फडणविसाने शेवटी नाईलाजाने जावजीशी समेट करण्यासाठी संपर्क साधण्यात यावा असे आदेश देऊन आपल्या फौजा माघारी बोलावून घेतल्या. असे असले तरी जावजी आता सावध होता. जरी माघार घेतलेला दिसत असला तरी आपले प्राण घेण्यास नाना फडणवीस उतावीळ आहे हे जावजीस माहीत होते म्हणून मग तो धोंडू महादेवाने सांगितल्याप्रमाणे थेट तुकोजी होळकरास जाऊन मिळाला. तुकोजी होळकर हा पेशवाईचा अत्यंत महत्वाचा सरदार होता, आणि नाना फडणवीस त्याचा शब्द मोडू शकत नव्हता. मग तुकोजीने फडणविसास जावजीला पेशवे सरकारात सामील करून घेण्यास सांगितले, आणि त्या बदल्यात जावजीवर लोहगड ताब्यात घेण्याची मोहीम सोपवली. जावजी लोहगडावर कूच करून गेला. त्याने आपल्या तोफा लोहगडावर फिरवल्या. जावजीने एक मोक्याची जागा पाहून तिथे एक तोफ उभी केली व तिथून गडावर मारा करायला सांगितला. या तोफेचा एक गोळा नेमका किल्ल्यावरील दारुगोळ्याच्या गोदामावर पडला आणि त्याचा प्रचंड मोठा स्फोट होऊन किल्ला आरामात जावजीच्या ताब्यात आला. खुश होऊन जावजीने तोफेकऱ्यास आपल्या हातातील सोन्याचे कडे बक्षीस म्हणून दिले. दरम्यान जावजी तुकोजीचा अत्यंत जवळचा माणूस बनला. जेव्हा तुकोजी पुणे सोडून हिंदोस्थानात (उत्तरेत) गेला तेव्हा जावजीही त्याच्याबरोबर चांदूर येथे गेला. एव्हना धोंडू महादेव याने जावजीसाठी नाना फडणवीसाचे मन वळवून जावजीला विरोध करण्यात नुकसानच आहे त्याउलट त्याला आपल्यात घेतले तर त्याच्या वीरतेचा पेशवाईस फायदाच होईल असे सांगून जावजीस सरकारात सामील करून घेण्यास राजी केले होते. मग जावजीसाठी खास राजूर हा एक नवा सुभा तयार करण्यात आला. या सुभ्यात राजुरातील चाळीस गावे, महालदेशातील बावीस गावे, कोकणातील साकुर्ली जिल्ह्याची साठ गावे आणि कोकणातील इतर प्रांतातील अठ्ठावीस गावे अशी एकूण दीडशे गावे राजूर सुभ्यात आणि पर्यायाने जावजीच्या अंमलाखाली आली. सुभेदार हा पेशवाईत किंवा मध्ययुगीन भारतात, दरबारातील मंत्र्यांखालोखाल सर्वात मोठ्या दर्जाचा अधिकारी होता. आता ही सत्ता किती मोठी होती याची यावरून कल्पना यावी की त्याच वेळी जव्हारच्या गादीकडे केवळ ८३ गावे होती. म्हणजे जावजीच्या ताब्यात एका संस्थानाच्याही जवळ जवळ दुप्पट साम्राज्य आले होते. सुभ्यातील टाकेद हे गाव जावजीस त्याची वैयक्तिक जहागीर म्हणून देण्यात आले, तिथून त्याला दरवर्षी वैयक्तीक साडे आठशे रुपये मिळत. पेशवे दरबाराकडूनदेखील त्याला तनख्यात साडेतेराशे रुपये मिळत. प्रत्येक गावातूनही त्याला प्रत्येकी एक रुपया आणि तूप धान्य आदि मिळत असे. साकीरवाडीचा भांगरे आणि बारीचा खाडे हे दोघे नाईकही जावजीच्या हाताखाली नेमण्यात आले. याउपर सुभ्याच्या व्यवस्थेसाठी संगमनेर आणि सिन्नर सुभ्यांतूनही राजूरला चार ते पाच हजार रुपये वार्षिक मिळत असत.
आपल्या पराक्रमाच्या बळावर अशाप्रकारे भारतातील सर्वात मोठी शक्ती असलेल्या पेशवाईशी एकट्याने टक्कर घेऊन एकही लढाई न हरता अक्षरशः शून्यातून एखाद्या संस्थानापेक्षा मोठा सुभा मिळविणाऱ्या जावजीने अनेक वर्षे राजूर सुभ्याचा कारभार उत्तमरीतीने चालवला.
जुलै १७८९ मध्ये जव्हारच्या राणीचे म्हणणे पुणे दरबारात मांडण्यासाठी तीस घेऊन जात असताना कोतुळ येथे मुळा नदीच्या तीरावर जावजी थांबला. नदीला पूर आलेला होता, त्याच्यासोबत इष्टे नावाचा एक नाईक होता, त्या नाईकाने मुद्दाम जावजीला बहाण्याने नदीच्या खोल जागी नेले आणि तिथे त्याला पाठीमागून धक्का मारून दगडांवरून पाण्यात पाडले. पाण्यात पडल्यावरही जावजी पोहून वर निघण्याचा प्रयत्न करत असताना मग इष्टेने त्याच्या डोक्यावर प्रहार करून त्यास बेशुद्ध केले आणि अशाप्रकारे मग जावजीचा मूळेच्या पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. देशातील सर्वात बलाढ्य शत्रूशी एकट्याने लढून त्यालाच धूळ चारणाऱ्या पराक्रमी जावजीचा हा पराक्रम नक्कीच शिवाजी महाराजांसारखाच अभिमानास्पद होता. मात्र अशा अजोड पराक्रमी वीराचा त्याच्याच जवळच्या माणसाच्या फितुरीने दुर्दैवी मृत्यू झाला.
जवळ जवळ चाळीस वर्षे राजूर सुभा अस्तित्वात राहीला, त्यानंतर पेशवाई बुडाली आणि इंग्रजांनी हा सुभा आणि सुभेदारी बरखास्त करून पगारी पोलीस आणि कारकून आदि अधिकारी यांच्यातर्फे संपूर्ण प्रांताचा कारभार हाकायला सुरुवात केली. या परकीय इंग्रजांनी ठेवलेल्या नोंदींतूनच जावजी आणि त्याचा पराक्रम आज समजू शकतो. अन्यथा एतद्देशीय इतिहासकारांनी एकतर त्याला सपशेल टाळले किंवा केला तरी केवळ राघोबाचा बंडखोर साथीदार असा अल्प उल्लेख करून दुर्लक्षित ठेवले होते.

शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

घर आजा परदेसी

उस पुराने बरगद की जटाओंकी तरह अब तेरे बाप के चौडे कंधे भी झुके होंगे
एक नजर तुझे देखने की चाह में, माँ की बुढी आँखो में कितने बादल आ रुके होंगे

चिड़ियाँ कई बार मायूस होकर बिना दाना खाये आंगन से उडी होंगी
चौपाई पे सुबह बिछायी चादर पे, युंही कुछ उदास सी सिलवटे पडी होंगी

हर दुसरे रोज पुराने यार किसी बहाने तेरे दरवाजे तक आकर लौटे होंगे
आदतन कई बार खेल में किसी ना किसीने तेरे हिस्से के पत्ते भी बाँटे होंगे

मेथी की सब्जी बनाने से लेकर खाने तक कई बार घर में तेरा जिक्र हुआ होगा
अलमारी मे तेरा कोई पुराना मेडल देख हर बार माँ को कितना फक्र हुआ होगा

होली बीत गयी, गांव का मेला भी गुजर गया, शाखों पे आम पकने लगे होंगे
आज भी तुझे पहचानते है जो, नदी के वो छोटे बडे पोखर अब सूखने लगे होंगे

तपी दोपहरी में उठे छोटे बवंडर में कपडे का कोई टुकड़ा तिलमिलाता हुआ उड़ा होगा
अटारी पे जहाँ तुमने छोड़ा था, वो क्रिकेट बैट अभी तक वहीं चुपचाप पड़ा होगा

यही सितारे और ऐसेही पहाड़ वहाँ भी होंगे, नर्म ठंडी हवाएं वहाँ भी बहती होंगी
परिंदे वहाँ भी उड़ते होंगे, पत्तियों की सिसकियाँ अपनी दास्तानें वहाँ भी कहती होंगी

तेरा वहाँ बड़ा ओहदा होगा, यहाँ कोई सोच भी न सके इतना तेरा सरमाया होगा
बस कुछ दिन के लिए ही लौट आजा, अपनी मिट्टी से कीमती वहाँ तुने क्या कमाया होगा