यष्टीच्या स्टॅंडजवळ दौल्याचे शेत आहे. ऐन गावात असल्याने मोकाट गायी,
गाढवे, डुकरे यांची तिथे रेलचेल असते. तेव्हा शेतराखणीला दौल्याची ड्युटी
लागे. आता आम्ही दोघे लंगोटीयार असल्याने दौल्याबरोबर मी ही राखणीला जायचो.
आमचा एकच कार्यक्रम असे, कुणाची गाय, गाढव दिसले की जाम जोरात झोडपीत
झोडपीत पिटाळून गावच्या कोंडवाड्यात नेउन कोंडायचे आणि मग आत कोंडल्यावर
देखील त्यांस मनसोक्त चोपायचे. असे चोपल्यावर ते जनावर निदान चार दिवस
शेताकडे पुन्हा फिरकत नाही हा आमचा समज.!! वरून त्याच्या मालकाला
ग्रामपंचायतीकडे जो काय दंड भरावा लागे त्यामुळे आम्हाला अजूनच आनंद
मिळायचा. रोज निदान ७-८ गायी/गाढवे बदडून, कोंडून, आम्ही आमच्या असुरी
आनंदात व ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर टाकीत असू. ही झाली गायी आणि
गाढवांची बात, पण गावात लय डुकरं आहेत. म्हणजे यत्र तत्र जिथे जिथे मलमुत्र
त्या सर्वत्र डुकरं. आणि प्रत्येक गावात असते तसे नेमके यष्टीच्या
स्टॅंडजवळ आमच्या गावातले सर्वात मोठे गटार आहे, त्यामुळे डुकरांचे
दिनस्नान, नाश्ता, लंच आणि डिनर हे सगळे तिथेच चालू असायचे. थोडी गम्मत
म्हणून मग डुकरे टाईमपास करण्यासाठी बाजूला दौल्याच्या शेतात जाऊन धुडगूस
घालायची. शेतातला भात पार चिखलात बुडून जायचा. गायी आणि गाढवे हुडकायला आणि
हाकलायला सोपी, पण डुकरे? ती कोंडवाड्यातही कोंडता यायची नाहीत. आणि सगळी
सारखीच दिसत असल्याने त्यांच्या मालकाकडे तक्रार केली तरी ही डुकरे माझी
नाहीत असे म्हणून तो सपशेल कानावर हात ठेवायचा. या डुकरांची अख्खीच्या
अख्खी टोळी शेतात घुसायची, आणि लक्षात येईपर्यंत पार हैदोस घालून टाकायची.
आम्ही मग लक्षात आल्यावर बाहेरून दगड मारू मारू त्यांना बाहेर हाकालायचो.
ती अजून अजून आत घुसायची आणि आम्ही अजून दगड मारायचो, दर आठवड्याचे आम्ही
डुकरांना मारलेले दगड गोळा केले असते तर सात रांजण सहज भरले असते. (पण
आम्ही काही रांजण भरून ठेवले नाहीत आणि कोण्या नारदाने येउन आमचे पापक्षालन
देखील केले नाही) असो, तर येन केन प्रकारेण आम्ही डुकरांना बाहेर काढायचो
आणि मग असे जीव खाऊन त्यांना पीटाळायाचो की विचारू नका, कपड्यांना लागलेला
चिखल, गाळात रुतून कुठेतरी निघून गेलेल्या चपला, मेहनतीने घामेजलेला चेहरा,
हातात लांब काठ्या अशा अवतारात आम्ही डुकरांची ससेहोलपट करायचो.
एक
दिवस डुकरांना फारच ऊत आला होता आम्ही दोन तीनदा डुकरे पिटाळली पण ती
पुन्हा आली. मग मी दौल्यास म्हंटले, आता डुकरे लय झोडपायची आणि पार
गावाच्या दुसऱ्या टोकापर्यंत हाकलायची. मग आम्ही हळू हळू दोन्ही टोकांनी
मध्ये कोंडीत पकडून डुकरे शेताबाहेर हाकलली आणि मग एका बाजूने दौल्या व
दुसऱ्या बाजूने मी गर्जना करीत त्यांवर तुटून पडलो, बऱ्याच डुकरांच्या
पेकाटात काठ्या हाणल्या. डुकरे तशीच यष्टीच्या स्टॅंडमध्ये घुसली. मी
दौल्याला म्हंटले, आता मस्त कोंडीत सापडली आहेत. अजून पुढे हाकलण्यापूर्वी
मनसोक्त बदडून घेऊ. मग आम्ही सगळ्या स्टॅंडभर बदडू बदडू डुकरे पिटाळली, याच
उद्योगात मी चिखलात पडल्याने आणि दौल्याची पळता पळता चप्पल तुटल्याने
आम्ही दोघेही तापलेलो होतो, आमच्याकडून डुकरांची अशी जाम धुलाई चालू
असतानाच दोन जण बराच वेळ लांबून आम्हाला पाहत होते. आमच्या एकंदर
अवतारावरून त्यांनी आमच्या विषयी मनात काही कयास बांधले. मग एका कोपऱ्यात
आम्ही एका डुकरास टोलवत असताना ते आमच्याकडे आले आणि म्हणाले, "ए
डुक्करधऱ्यांनो लय मेहनत करता राव तुम्ही. आम्ही मघापासून तुम्हाला बघतोय.
तुमच्या दोघांचा मेळ सुद्धा छान जमतो, तुमच्याकडून एकही डुक्कर वाचले नाही.
अहो आमच्या आळीत सुद्धा लय डुकरे झालीत, इथली पकडून झाली की मग तिकडे याल
का पकडायला?"
आम्हाला काय उत्तर द्यावे ते कळेना, मग थोडावेळ अगदी
शांत राहून अचानक आम्ही दोघेही इतके जोर जोरात हसू लागलो की ते दोघे
आमच्याकडे फार विचित्र नजरेने पाहत निघून गेले. एक जण जाता जाता दुसऱ्याला
म्हणाला, येडेच दिसतात, जाऊ दे, त्यांची भाषा वेगळी असते, कदाचित त्यांना
मराठी समजत नसेल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा