हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २७ फेब्रुवारी, २०१४

आमराई

सांगळे मास्तर पिंपळाच्या आळीतून पहाटे पहाटे नदीकडं लगबगीनं जाताना पवार मास्तराला दिसला. पवार मास्तर परसाकडनं परतत होता. मायला येवढ्या सकाळच्याला हे ब्येनं सांगळ्या हिकडं कुणिकडं निघालं? असा विचार करीत पवार मास्तरानं "अरे ए सांगळ्या" अशी जोरात हाक मारली. सांगळे मास्तराच्या कानावर हाक पडली आणि त्याने दचकुन इकडे तिकडे पाहिले. हाक नेमकी कुणी मारली आणि कुठून आली ते त्याला कळेना. पवार मास्तरने पुन्हा एकदा "अरे ए मास्तSSSSSर" अशी हाळी दिली. ती ऐकताच सांगळे मास्तरने एकदम जोरात धूम ठोकली, आणि मग नदी उताराला तो दिसेनासा झाला. पवार मास्तरानं मोबाईलवरून त्याचा नंबर लावला पण नदीकडे नेटवर्क येत नसल्याने फोन लागला नाही.

दुपारी मधल्या सुट्टीत पवार मास्तरने स्टाफरूममध्ये सांगळे मास्तरला गाठला. "काय रं लेका? सकाळी म्या तुला येवडा आवाज देतुया आनं तू पळूनच गेला?".
"मायला त्यो तू व्हता व्हय रं? म्या आपला उगाच भेऊन जोरात पळालो. बांधावरून उडी मारायच्या नादात मवा पाय मुरगाळला की लका".
"आरं पर म्या म्हणतु, तुवं घर तिकडं पार वरच्या आळीला असताना, तिकडून नदी यवडी जवळ असताना, मंग नदिवं जायासाठी पार गावाला येवडा वळसा घालून येयाची काय गरज व्हती? आण ते बी येवड्या फाटंचं?"
"आता तुला येवडं बी कळंना का लका? आरं रातच्याला पिपळाच्या आळीत थांबलू व्हतु म्या".
"पिपळाच्या आळीत? अन त्ये रं कह्याला? आनं कुणाच्या घरी?"
"अहो कोण कोणाच्या घरी गेला?" दिवटे मास्तरने आत पाय टाकता टाकता विचारले.
"काही नाही हो दिवटे सर, हा पवार आपलं उगीच काहीतरी बोलत असतो, तुम्हाला तर माहीतच आहे त्याचा स्वभाव. देव ना देव्हारा, आणि उगीच आपला चंदन उगाळीत बसतो." असे म्हणून गुपचूप सांगळे मास्तरने पवार मास्तरला गप्प राहण्याविषयी खुणावले. शाळा सुटल्यावर सांगळे मास्तराने पवार मास्तरास आपल्या फटफटीवर बसवले आणि जाता जाता म्हणाला, "च्यामायला पवार, त्या दिवट्यानं आपलं बोलणं ऐकलं आसंल काय? बेणीचं लय फाटक्या तोंडाचं हाये. समद्या गावात बोभाटा करून टाकील."
"आरं ऐकलं त्येनं तर काय फरक पडतुया? तू कंचा दरवडा टाकाया गेला व्हतास?"
"आरं तू येडा तो येडाच ऱ्हाणार बग. आरं रातच्याला पिपळाच्या आळीत म्या सुल्पीकडं गेलतु निजाया."
"आसं व्हय". पवार मास्तरच्या डोस्क्यात आताशी उजेड पडला.

सांगळे आणि पवार हे दोघेही बालपणापासूनचे अंडरवेअरस्ट्रीप फ्रेंड (म्हणजे लंगोटी यार). दोघे हायस्कुलापासून एकाच वर्गात शिकले, सोबतीने डीएड, आणि त्यानंतर ग्रज्युएशन केले व शेजारच्या गावी एकाच शाळेवर मास्तर झाले. म्हणजे गावातल्या लोकांनी दोघा मास्तरांना नवरा बायको म्हणावे एवढी दोघांची गट्टी. पवार हा बऱ्यापैकी हुशार, शांत, मितभाषी तर सांगळे कमालीचा खोडकर, भांडखोर आणि उपद्व्यापी. भिन्न स्वभावाचे असले तरीही दोघांची दोस्ती अगदी घट्ट होती. कधीतरीच मिळणारे सुख असो की दारिद्र्यामुळे पाचवीलाच पुजलेले दु:ख असो, दोघांनी त्या सुखदु:खात एकमेकांस नेहमीच साथ दिली होती.

हायस्कुलात पवारला वर्गातली शीला खूप आवडायची. मग सांगळ्याने स्वत: प्रयत्न करून शीलीच्या मैत्रिणींना गाठून, पवार आणि शीलीचे सुत जमवून दिले. सांगळ्याच्याही अर्थात तीन-चार मैत्रिणी होत्या, त्या त्याने स्वत:च्या हिकमतीवरच पटविलेल्या होत्या. पवारला चोवीस तास शीलीची आठवण बेचैन करी, तो सारखा तिच्याबद्दल बोले, विचार करीत राही. वेळी अवेळी उदास होई. मात्र सांगळे कधीही कोणत्याही पोरीबद्दल बोलत नसे. बेफिकीरपणे जाम मजा करीत असे. पवार विचारी, "काय रं तुला त्या गोपीची, राणीची, सुर्खीची, कंचीचीच आठवण येत न्हाई का?" मग सांगळे म्हणे, "आरं आठवण यीयाला त्या कुठं मम्बईला जाउन राह्यल्यात का काय? गावातच तर हायीत. जवा पायजेल तवा जाउन भेटायचं कंचीला बी. त्याचं काय येवडं?" 
सांगळे रोज एका तरी जणीला भेटे आणि कधी कधी आमराईत सुद्धा घेऊन जाई. तो नेहमी पवारला म्हणे की "आरं तू सुदिक जा की शीलीला घेऊन आमराईत". पण पवारला ते आवडत नसे. तो म्हणे, "नगं रे बाबा, अजून ती ल्हान हाये, आन ह्ये बरोबर बी न्हाई, म्या तिला कवाबी न्हेणार न्हाई आमराईत". तसेही पवार आणि शीलीला चार-पाच दिवसातून एकदाच भेटता येई. शीलीचा भाऊ सारखा शीलीवर नजर ठेऊन असे. एकदा त्याने पवारला दम सुद्धा भरला. मग सांगळ्याने त्याच दिवशी उगाच काहीतरी खुसपट काढून त्याला बेदम बुकलला. पवारला हे सुद्धा आवडले नाही. तो म्हणाला, "आरं कितीबी केलं तरी त्यो भाव हाय तिचा, मायला आपल्या भणीस कोणी नादाला लावतुया हे कुणाला आवडंल? त्याचा काय दोष नाय."

जेव्हा कधी पवार शीलीला एकांतात भेटे तेव्हा दोघे नुसतीच बसून राहत, काहीच बोलत नसत. शीलीच म्हणे अरे काहीतरी बोल की, पण पवार म्हणे "नुसती माह्या पुडं बसून ऱ्हा, आणं मला तुला डोळं भरून पाहून घेउंदे." शीली नुसतेच गप्प बसून रहायला वैतागायची. एके दिवशी शाळेच्या मागे पाटलाच्या शेतामध्ये बांधाच्या आड दोघे भेटली, तेव्हा शीलीनेच पवारचा हात पकडला, आणि त्याला जवळ ओढून मिठी मारली. मग हलकेच मान वर करून त्याच्या गालाचा मुका घेतला. पवारची कानशिले गरम झाली होती. छाती जोरजोरात धडधडत होती. त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. त्याला काय होते आहे हे काहीच कळेना, त्याने मग डोळे बंद करून शीलीला तसेच कितीतरी वेळ कवेत धरून ठेवले. बऱ्याच वेळाने शीली बाजूला झाली, आणि तिने पवारकडे पाहिले, तो पांढराफटक पडला होता आणि त्याने डोळे घट्ट बंद करून ठेवले होते. शीलीने त्याला जोरात हलवल्यावर त्याने डोळे उघडले आणि तिला म्हणाला "हे समदं चुकीचं हाये. मला माफ कर". शीली जोरजोरात हसली आणि म्हणाली, "तू येडाच हायेस रे बाबा, तुला काय बी कळत नाय." पवार म्हणाला "चल आता घरी जाया पायजे." मग ती दोघे तिथून निघाली. शीलीने त्याचा हात हातात घेतला आणि म्हणाली "चल आसंच हात धरून गावात न्ये मला". पवारने हात सोडवायची खटपट चालवली पण शीलीने तो घट्ट धरून ठेवला, आणि मग ती सारखी खांद्याने त्याला धक्का मारून त्याचा हात तसाच दाबून हसत हसत चालू लागली. बांधावरून दोघे पुढे आली तोच समोरून शीलीचा भाऊ येताना दिसला. त्याने या दोघांना हातात हात घालून चालताना पाहिले आणि तो तिथूनच जोरात ओरडला, "ये तुह्या मायला तुह्या. हरामखोरा थांब तुवा मुडदाच पाडतो". पवार त्याला पाहून गर्भगळीतच झाला. त्याने हिसका देऊन शीलीचा हात सोडवला आणि धूम ठोकून मागच्या मागून पसार झाला. शीलीच्या भावाने शीलीला तिथल्या तिथे तर कानफाडलीच पण घरी नेऊनही तिला बेदम मारली. शीलीची शाळा बंद झाली. त्यानंतर ती पवारला कधीच भेटली नाही. त्याच उन्हाळ्यात तिच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले. पवार वर्षभर अत्यंत दु:खात राहिला, आणि त्यानंतरही कोण्याही मुलीशी कधीही साधा बोलला देखील नाही.

नंतर बऱ्याच वर्षांनी एक वर्ष मागेपुढे दोघाही मास्तरांची लग्ने झाली. दोघांनाही दोन दोन पोरेदेखील झाली. सांगळे मास्तरची बायको दहावीपर्यंत शिकलेली होती, तर पवार मास्तरीण डी एड झालेली. ती पवार आणि सांगळे मास्तरांच्याच शाळेत मास्तरीण होती. तिथेच पवार मास्तर आणि तिचे सुत जमले. दोघांनी लग्न केले. तिचे माहेर त्याच गावातले. पहिले मुल होईपर्यंत तिने नोकरी केली. मात्र नंतर तिला हे सगळे व्याप पेलवेनात. दुसऱ्या गावाहून शाळेला येउन परत घरी जाउन मुले आणि घरची कामे बघणे हे तिला जमेना. ती मास्तरला म्हणू लागली की आपण आपली शाळा ज्या गावात आहे तिथेच राहू, म्हणजे ओढाताण कमी होईल. तशी पवार मास्तराच्या घरूनही काही अडचण नव्हती, पण आपण सासुरवाडीत रहावे ही कल्पना पवार मास्तरला आवडली नाही. तो तयार झाला नाही. दोघांची फार भांडणे झाली आणि शेवटी पवार मास्तरणीला नोकरी सोडावी लागली. तिला आपण नवऱ्याइतकेच शिकलेले असूनही घरी बसावे लागते याचा राग येऊ लागला. तिच्या कुरबुरी वाढल्या. हळूहळू सगळ्या कुरबुरी मोठ्या भांडणांत बदलू लागल्या. मास्तर आणि मास्तरणीचे अबोले लांबू लागले. दोन चार महिन्यांपर्यंत संवाद बंद होऊ लागले. बायको मास्तरला अंगाला हात लावू देणे सोडा, सरळ मार्गाने बोलत देखील नसे. पवार मास्तर हे सगळे सांगळे मास्तरला सांगे. तो पवार मास्तरलाच दोष देई. म्हणे "तूच तिला पयल्यापास्न लई डोक्यावर चढीवली. स्त्री पुरुष समानता म्हणं. आरं बाप्यानं बाप्या म्हणूनच ऱ्हावं गड्या. आजुनबी येळ गेल्याली न्हाई. च्यामायला दाखीव एकदा इंगा तिला, मंग आपाप सरळ होईल". पवार मास्तरला ते रागात पटेही आणि लगेच दुसऱ्या क्षणी वाटे की नाही, हे काही बरोबर नाही. त्याला नेहमी एक गोष्ट खटके की सांगळे मास्तर कायम आपल्या बायकोस तुसडेपणाने वागवी. तरीही त्याचा संसार अगदी आनंदात चाललेला दिसत होता. त्याची बायको कधीही काहीही तक्रार करीत नसे. वरून सांगळ्याने सुल्पीशी देखील सुत जमविले होते. अधून मधून तो रातच्याला तिच्याकडे जाई. शाळेतल्या कुळथे मास्तरणीशीही सांगळ्या जेव्हा तेव्हा अंगचटीला येई. एवढे असूनही सांगळ्याचे बायकोबरोबर मोठे भांडण झाले अथवा ती चार पाच दिवस रुसून बसली असे कधीही घडले नाही. पवार मास्तरला वाटे, 'साले आपण सरळमार्गी वागून देखील आपल्याच वाट्याला संसारात असे दु:ख, असा संघर्ष का? आणि सगळा फालतूपणा करूनही सांगळ्या एवढा मजेत का'? सांगळे मास्तर त्याला म्हणे, "साल्या तू येडा तो येडाच राहीला. तवा बी म्या येवडं सांगून बी शीलीला घेऊन आमराईत गेला न्हाईस, आन आता रांडच्या तुला लग्नाची बायकु बी पायजे तवा हात लावू द्येत न्हाय. थूत तुह्या मर्दानगीवं". पवार मास्तरचा जीव हे ऐकून कासावीस होई. "आरं बायकु न्हाय म्हणती ना? मग कर भाईर लफडं, च्यायला दोन मिनिटात त्या कुळथे बाईशी तुवा टाका भिडवून देतो". सांगळे मास्तराच्या या बोलण्यांनी पवार मास्तराच्या डोक्यात घण हाणल्यासारखे वाजे. पण तरीही तो अशा गोष्टी मुळापासून दुर्लक्षित असे. तो सांगळेला म्हणे, "अशे फालतू सल्ले मला न देशील तरच बरं हुईल". पण बायकोशी भांडणे, अबोला हे सहनशक्ती पलीकडे गेल्यावर त्याला आता सांगळ्याचे विचार थोडेफार पटू लागले होते. तशातच एके रात्री पवार मास्तर आणि बायकोचे फार कडाक्याचे भांडण झाले. दुसऱ्या दिवशी सकाळीच मास्तरीण पोरे घेऊन माहेरी निघून गेली.

आठवडाभर पवार मास्तर घराच्या बाहेर निघाला नाही, घरातच खूप दारू आणून तो सारखा पीत बसे. एक दिवस सांगळे मास्तर आला आणि शाळेत चल म्हणाला. पवार मास्तर तयार होईना. ज्या गावात बायको गेली आहे तिथे पायही टाकायची त्याची इच्छा नव्हती. पण सांगळे मास्तर बळे बळे त्याला घेऊन शाळेत गेला. शाळेत गेल्यावर सांगळे त्याला म्हणाला की "झालं ग्येलं समदं ईसरून जा, इचार करीत बसू नगंस, सम्द काही बराबर हुयील, बायकु गेली ना? मायला तिच्या नाकावं टिच्चून याच गावात गमजा मारू". मग पवार मास्तरला तिथे बसवून तो बाहेर गेला. पवार मास्तराच्या डोक्यात घण वाजत होते. बायको-भांडण, शीली-आमराई, सांगळे-गोपी,राणी,सुर्खी, सांगळे-त्याची बायको, सांगळे-सुल्पी, सांगळे-कुळथे.. पुन्हा बायको-भांडण, आमराई.. नाही नाही साला काय बी झाला तरी आमराईत जाणं वंगाळच..!! पवार मास्तरने एक दीर्घ निश्वास टाकला. सांगळे बाहेर गेल्यावर बरोबर पाच मिनिटांनी कुळथे मास्तरीण आत आली आणि पवार मास्तर शेजारी बसली. ती म्हणाली, "जाऊ द्या हो पवार सर, फार वाईट वाटून घेऊ नका. मी आहे ना. मला सांगळे सरांनी सगळे सांगितलेय". असे म्हणून बोलत बोलत तिने मास्तरचा हात धरला आणि त्याला जवळ ओढले. पवार मास्तराच्या डोक्यात घण वाजतच होते. सांगळे-सुल्पी, सांगळे-कुळथे-अंगचटीला येणे... मास्तरला सांगळे आणि कुळथेचे अंगचटीला येणे आठवून फार किळस आल्यासारखे झाले, आणि तो तिचा हात झटकून टाकून तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने सांगळे मास्तरकरवी रजा आणि बदलीसाठी अर्ज पाठवून दिला.

पवार मास्तरची बदली झाली भिमुर गावी. मास्तरला बऱ्याचदा वाटे की बायकोला, पोरांना आणायला जावे, पण तो गेला नाही. आता जरी तो सावरला असला तरी त्याचे पिणे आणि डोक्यात घण वाजणे वाढले होते. त्याला कधी कधी वाटे, च्यायला सांगळे सांगायचा तसे खरेच आमराईत जायला पाहिजे होते. आपण साले येडे होतो. आणि असे वाटले की त्याच्या डोक्यात अजून जोरजोरात घण बरसत. सांगळे मास्तर भिमुरपर्यंत त्याच्याबरोबर त्याला पोचवायला आला. खोली नीटशी लावून बाकी व्यवस्था लावून दोन दिवसांनी परतला. रोज पवार मास्तरला फोन करायचा. पवारही आता भिमुरात बऱ्यापैकी स्थिरावला.

एक दिवस पवार मास्तर शाळेतून परतत होता, येतायेता तो मंडईत भाजी घ्यायला गेला. त्याला त्याची आवडती भेंडीची भाजी मिळेना. त्याला एका भाजीवाल्याने सांगितले की तिकडे मंडईच्या कोपऱ्यावर एक भाजीवाली आहे तिच्याकडे कदाचित भेंड्या शिल्लक असतील तर बघा. पवार मास्तर तिकडे गेला. त्याने लांबून पाहिले की खरेच त्या भाजीवालीकडे एका छोट्या पाटीत भेंड्या ठेवलेल्या होत्या. पवार मास्तरला आनंद झाला. सगळ्या मंडईत फक्त एकच भेंडीवाली? काय म्हणावे या भिमुरला? त्याने तिच्याकडे नीट निरखून पाहिले. आणि तो जागच्या जागी थबकला. ती शीली होती. पवार मास्तर त्याच पावली माघारी फिरला, मघाच्या भाजीवाल्याने त्याला जाताना पाहून विचारले, काय मास्तर भेटली काय भेंडी? पवार मास्तरने त्याचेकडे लक्षच दिले नाही, तो घाईघाईने घरी आला. त्याचे हृदय आता जोर जोरात धडधडत होते. श्वास गरम झाले होते. त्याला काहीच सुचत नव्हते. त्याने भात लावला पण न जेवताच अंथरुणावर पडला. त्याचा डोळ्याला डोळा लागेना. बराच वेळ तो तसाच अंथरुणावर तळमळत राहिला. खूप वेळाने मग कधीतरी त्याचा डोळा लागला.

दुसऱ्या दिवशी पवार मास्तर भेंडी घ्यायला गेला. शीलीने भेंडी तराजूच्या पारड्यात भरली आणि पिशवीत टाकणार तोच पवारने तिचा हात धरला. शीलीने दचकुन वर पाहिले आणि पवारला पाहून आश्चर्याने म्हणाली, "अगं बाई, बारकू तू"? 
"व्हय शीले म्याच. बग तुह्यासाठी बदली घेऊन या गावात आलोय". 
शीली ते ऐकून अंमळ लाजली आणि खाली नजर करून खुदकन हसली. "कायतरीच तुझं". पवार मास्तर म्हणाला, "अगं खरंच. बरं त्ये जाऊ दे. तू माह्याबरुबर चल". ती म्हणाली कुठ? तो म्हणाला चल तर.   
"आणं माह्या भेंड्या"? 
"अगं बये त्या भेंड्या ऱ्हावू दे, तू चल". 
दोघे गावाबाहेरच्या घनदाट आमराईत गेले. पवार मास्तरने शीलीचा हात घट्ट धरला होता, मग एका ठिकाणी ते थांबले. पवार मास्तरने शीलीला घट्ट मिठी मारली. पवार मास्तर सुखाच्या ढगांवर उडत होता. थोड्या वेळाने मग शीलीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, "चल असंच हात धरून गावात न्ये मला". पवार मास्तर म्हणाला "आसंच? आनं कापडं"? शीली म्हणाली, "न्हाई असंच जायाचं दोगंबी". मग शीली पवार मास्तरचा हात धरून चालू देखील लागली. पवार मास्तर म्हणाला, येडी झाली काय तू? आसं कसं गावात जायाचं? पवारने हात सोडवायची खटपट चालवली पण शीलीने तो घट्ट धरून ठेवला, आणि मग ती सारखी खांद्याने त्याला धक्का मारून त्याचा हात तसाच दाबून हसत हसत चालू लागली. तेवढ्यात समोरून आवाज आला ""ये तुझ्या मायला तुझ्या. हरामखोरा थांब तुझा मुडदाच पाडतो". त्या आवाजासरशी पवार मास्तर खडबडून स्वप्नातून जागा झाला. त्याचे सगळे अंग घामाने भिजले होते. तो थरथर कापत होता. त्याच्या डोक्यात आता खूप जोरजोरात घण वाजू लागले. आता घण अधिकच कर्कश झाले होते. शीली-आमराई-बायको-भेंडी… पुढे सकाळपर्यंत मास्तरचा डोळा लागला नाही.

आज अगदी सकाळी सकाळीच पवार मास्तरने सांगळे मास्तरला फोन लावला. सांगळे मास्तरही आश्चर्यचकित झाला.
"काय रं? आज सकाळी सकाळीच फोन"?
"आरं येक बात सांगायची व्हती. काल मला भिमुरात शीली दिसली".
"काय म्हनतुस? पवाऱ्या नशीबवान हायेस लका. आता मांगच्यासारखं येड्यावानी करू नगंस, धर शीलीला अन सोड उपास."
जेव्हा आपल्याला हवा तो सल्ला ऐकायचा असतो तेव्हा आपण नेमक्या माणसालाच विचारतो. त्यामुळे धीर तर मिळतोच पण काही वाईट झाले तर सल्ला देणारास दोष देऊन आत्मवंचनेपासून वाचता येते. आणि सांगळे मास्तरने अपेक्षेप्रमाणे पवार मास्तरास हवा असलेलाच सल्ला दिला. काय असते की आपण जेव्हा द्विधेत असतो तेव्हा वाईट काम करण्यासाठी आपण नेहमी एक संधी शोधत असतो. त्याकामी मग एखाद्याचा सल्ला हीच पडत्या फळाची आज्ञा ठरते. पवार मास्तरला क्षणभर वाटले, की शीलीबद्दल असा विचार करणे योग्य आहे की नाही? पण असे वाटणे हे तर नैसर्गिकच आहे, अशी त्याने स्वत:ची समजूत घातली. एकदा पाप करायचेच असे मनाने घेतले की मग माणूस त्याचे समर्थनार्थ त्या वाईट कृत्यास 'नैसर्गिक प्रवृत्ती' अथवा 'जशास तसे' अशी कारणे अथवा बिरुदे लावून ते पाप करू धजतोच. गोष्ट चांगली असो की वाईट, ती करायचीच असे एकदा ठरवल्यावर तिच्या समर्थनासाठी शंभर कारणे शोधता येतात वा सापडतात. डोक्यात घण वाजत होते पण पवार मास्तर तिकडे दुर्लक्ष करीत होता. यात काही वाईट नाही. जर असते तर सांगळया एवढा सुखी कसा झाला असता? आपण तेव्हाच शीलीला आमराईत न नेऊन मोठी चूक केली असे त्याने मनाशी म्हंटले. आणि मग आता दैवयोगाने पुन्हा चालून आलेली ही संधी काही केल्या वाया जाता कामा नये असे ठरविले.

शाळा सुटेस्तोवर पवार मास्तरला दम निघेना. त्याला मंडई आणि तिथून पुढे आमराई खुणावीत होती. शेवटी हाफ डे टाकून तो निघालाच. भर उन्हाचा मंडईत आला. पाहतो तर काय, मंडईत शुकशुकाट.!! भाजीवाली मंडळी दुकाने बंद करून गेलेली. तिथून जाणाऱ्या एकाला मास्तरने विचारले, "मंडईला आज सुट्टी आहे काय"? त्याने सांगितले की दुपारी जेवणासाठी मंडई एक वाजेपासून चार वाजेपर्यंत रोजच बंद असते. पवार मास्तरचा खूप चरफडाट झाला. च्यायला लोकांची गैरसोय करून साले तीन तास सुट्टी घेतात म्हणजे काय? मास्तरला राग अनावर होत होता. आपल्या लागलेल्या भुकेसाठी लोकांना लागलेल्या भुकेचा राग करणारा माणूस कधी पाहिलाय का तुम्ही? नाही ? मग बंद मंडईत हात चोळीत फिरणाऱ्या पवार मास्तरला बघा की..!! च्यायला उगीच हाफ डे वाया गेला असा एक खास मास्तरी विचार पवारच्या डोक्यात उमटला आणि त्याची तगमग अजून वाढली.

चार वाजता मंडई उघडली खरी पण शीलीचे दुकान काही उघडले नाही. पवार मास्तरने चार वेळा त्या कालच्या भाजीवाल्याला विचारले की ते भेंडीवाले दुकान केव्हा उघडणार? भाजीवाला म्हणाला की आज मी सुद्धा आणली आहे भेंडी. बोला किती देऊ? नाही नको. च्यायला बोंबला, आता इथे उभा राहिलो तर हा भाजीवाला हजार प्रश्न विचारणार असा विचार करून पवार मास्तर तिथून थोडा बाजूला गेला आणि एका टपरीवरून तंबाखू मळीत मळीत शीलीच्या दुकानाकडे डोळे लावून उभा राहीला.

थोड्या वेळाने शीली आली आणि तिने दुकान उघडले. पवार मास्तरने लगबगीने तंबाखू थुंकून टाकली आणि तिकडे पळाला. शीली भाजी लावीत होती. पवार मास्तरने तिथे गेल्यावर तिला विचारले, "काय बरं हाये ना? हाये का वळख"? शीलीने चमकून मास्तराकडे पाहिले, त्याला थोडा वेळ निरखले आणि आश्चर्याने म्हणाली, "बाई गं बारकू तू? आरं मिश्यांमुळं म्या तुला वळीखलंच न्हाई बग. तू इकडं कसा काय"? 
मास्तर म्हणाला "माझी हिथंल्या शाळत बदली झालीया". 
"काय? मग तू इकडं कंदी आला"? 
"मला दोन आठवडं झालं हिथं. तू कशी हायेस"?
"म्या जाम मजेत हाये".
"आता तर तू लयीच सुंदर दिसाया लागलीस शीले". मास्तरने फासा टाकलाच. 
"चल, कायतरीच काय"?
"अगं खरंच. आयच्यान सांगतो".
मग गावाची, माणसांची विचारपूस झाली. पवारला गावच्या चौकशीने वैताग आला. त्याला फक्त आमराई दिसत होती. त्याने विचारले, "हिथं आमराई हाय काय"?
"काय? आमराई? अंन ती बी ह्या भिमुरात? आरं हे काय आपलं गाव हाये व्हय? तुला आंबं खायचं हायेत का? माह्या शेतात हायती चार आंब्याची झाडं, उद्या सकाळच्याला घरला ये, म्या थोडं आंबं काढून ठिवते".
"घर? घरी कोण कोण हाये तुह्या?
"सासू हाय, दोन प्वारं हायती आन मवा नवरा हाये"......
"नवरा?  पवार मास्तर चपापला. शीलीला नवरा आहे हे इतकावेळ त्याच्या ध्यानातच आले नव्हते. "त्यो काय करतो"?
"त्यो आमचं शेत बघतो. त्यो पिकवतो आन म्या हिथं विकते".
"कसा हाये त्यो"?
"त्यो लई चांगला हाये बग. मला लई जीव लावतो, अन माजा बी त्येच्यावर लय जीव हाय. दिवसभर कष्ट करतो. सोभावानं बी लई चांगला हाय. कदी कुणाला टाकून बोलणार नाय, कुणाला दुखावणार नाय की कुणाकडं बी वाईट नजरेनं बगणार न्हाई. अगदी तुझ्यासारखाच सरळमार्गी हाये बग".

पवार मास्तरच्या पायाला चप्पल घातलेली असूनही मातीचे चटके बसत होते, त्याचा चेहरा खर्रकन उतरला होता. एकतर शीलीचा नवरा असणार हाच विचार त्याच्या मनाला शिवला नव्हता, वरून शीलीचा त्याचेवर खूप जीव आहे हे तर त्यास अधिकच त्रासदायक वाटू लागले. शीलीने विचारले, "त्ये जाऊ द्ये, बोल तुला कंची भाजी देऊ? ही भेंडी देऊ काय? तुला आवडती ना"?
पवार मास्तर म्हणाला नको. शीली म्हणाली, "आसं कसं ? कायतरी घ्ये की". मास्तर म्हणाला ठीक हाये तर मग द्ये मला पावशेर कारलं.
"कारलं? तुला कवापास्न कारलं आवडाया लागलं"?
मास्तर म्हणाला, लगीन झाल्यापासून.
"काय तुजं लगीन झालं? काय गं बाई म्या बी येडीच हाये बग. तुला इचारलं बी न्हाई. बायकुला बी आणलंय काय भिमुरला"?
"न्हाई ती नंतर येणार हाये".
"मग ती आल्यावर तिला बी घेऊन घरी ये बरं का, ह्ये घे कारलं आन उद्या सकाळच्याला आंबं न्याया नक्की ये, म्या तुही माझ्या नवऱ्याची वळख करून देते".

कारलं घेऊन मास्तर खोलीवर आला. कुणीतरी खूप उंचावरून त्याला फेकून दिल्यासारखे वाटत होते.  कॅरमच्या खेळात राणीच्या मागे जोरात स्ट्रायकर मारावा, आणि राणीपासून चुकून तो समोरच्या बाजूवर आदळावा, तेव्हा तो जेवढ्या जोरात पुढे गेला होता तेवढ्याच जोरात विरुद्ध दिशेने मागे येतो. तसेच पवार मास्तराचे झाले. शीलीविषयी त्याचे एकमार्गी विचार अचानक विरुद्ध दिशेत बदलले. त्याला वाटले जर आपल्याला अध:पतनापासून अशी नियती वाचवीत असेल तर हे काम नक्की वाईटच असणार. तो विचार करू लागला की शीली असे का म्हंटली असेल की माझा नवरा अगदी तुझ्यासारखाच आहे? माझ्यासारखा म्हणजे कसा? बावळट? की खूप चांगला? मी चांगला आणि सरळमार्गी आहे? पण मी तर किती वाईट विचार करत असतो..!!  शीली मला सरळमार्गी का समजली? मला जर शीली मिळवायची असेल तर हा सरळमार्ग सोडावा लागेल. पण शीलीला आता आवडणारा तिचा नवरा असो की तेव्हा आवडणारा मी, तिला भावणारा पुरुष सरळमार्गीच हवा. मग अशा परिस्थितीत काहीही केल्या तिला मी  मिळवू शकणार नाही. पवार मास्तरला शीलीव्यतिरिक्त दुसरी कुणीही समोर दिसेना. मात्र त्याला आता काहीही करून एक स्त्री पाहिजे होतीच. आमराई त्याला खुणावत होती.  आता कुळथे मास्तरीण त्याच्या मनात गोंधळ घालू लागली. आपण शीलीला तेव्हा आमराईत न नेऊन चूक केली हे आता त्याने मनाशी पक्के केले होते. पण आपण कुळथे मास्तरणीला टाळण्यातही चूक केली की काय असे त्याला  वाटू लागले.  मात्र लगेच त्याला कुळथे मास्तरीण  आणि सांगळे यांचे अंगचटीला येणे आठवू लागले. तरीही आपण तिच्यासाठी प्रयत्न करून पहावाच काय? छे छे हा प्रकार किळसवाणाच आहे, साल्या सांगळ्याने निदान कुळथे मास्तरणीवर  तरी तोंड मारायला नको होते. पवार मास्तराच्या डोक्यात आता घण ढणाणा वाजत होते. हट साला, सांगळया म्हणतो तशी आपल्या मर्दानगीतच खोट आहे की काय?  आपले शरीर मर्दाचे आहे, त्याच्या गरजाही  मर्दाच्या आहेत पण मन मात्र बाईचे आहे. एकदम डरपोक.!! सरळमार्ग सोडून आपल्यात वाकड्यात जायची हिम्मत नाही आणि जर चुकून गेलोच तरी पुढे जाण्याची, आणि विपरीत परिस्थितीत निभावून नेण्याची आपली ददात नाही. आपण मनातल्या मनात वाईट, पापी असूनही बाहेर सरळमार्गी असल्याचा मुखवटा पांघरणाऱ्या आणि आपला तोच चेहरा इतरांना खरा वाटावा म्हणून मन मारून आततायी झटणाऱ्या अतिसामान्य प्रकारचे माणूस आहोत. आपण बदलू शकत नाही आणि म्हणूनच आपले नशीबदेखील बदलू शकत नाही.
याच विचारांच्या तंद्रीत असताना मोबाइलवर सांगळे मास्तरचा फोन आला, पण पवारने उचलला नाही. सांगळ्याने सात आठ कॉल केले पण पवार मास्तरने फोन उचललाच नाही. शेवटी रात्री जेवताना कारल्याच्या भाजीचा पहिला घास घेताच सांगळ्याचा परत फोन आला आणि पवार मास्तरने तो उचलला. उचलताच सांगळे मास्तर म्हणाला? "कारं लका, शीलीमदीच येवडा अडकून पडला की माजा फोन उचलाय बी येळ मिळंना काय"? कारल्याच्या घासाने पवार मास्तराचे तोंड आधीच कडू झाले होते, तो सांगळ्यावर ओरडलाच, " सांगळया ल्येका आसं काही बोलल्यालं मला आवडत न्हाई हे तुला माहित हाये ना? परत आसं काही बोलत जाऊ नगंस. म्या काय तुझ्यावानी फालतू न्हाय, समजला काय?
सांगळे मास्तर थोडा वरमला. बोलला, "का रं लका काय झालं"?
"काय नाय. फुडच्या आईतवारी म्या तिकडं येतुय".
"काय झालं? कशासाठी रं"?
"दुसरं काय नाय", सांगळे मास्तर उत्तरला. "बायकुची समजूत घालून तिला इकडं घेऊन यायची हाय".

२ टिप्पण्या:

  1. तुमची लिहायची भाषा लई भारी बघा . अमराई बद्दल विशेष प्रेम की जुन्या आठवणी हा मोठा प्रश्नच आहे .
    if possible change the backgorund colour to something soothing to eye and also thing about boldness of the font use . otherwise great. keep it up.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Thank u. The page templet I have designed long ago. Was gonna change and make it more soothing as u suggested, may be in a day or two will change it.
      :)

      हटवा