संज्या, मोन्या, कोंड्या समदे जमले हायेत. पक्या शेकोटीसमोर मोकळी जागा पाहून बुड टेकवू लागलाय तोच त्याला थांबवले गेलेय. मोन्या म्हणतोय, ए पक्या तिथून उठ अन दुसरीकडं जागा धर आताच. ती शिवड्याची जागा हाये. त्यो आला तं लय भांडल. तसा शिवड्या हा पक्याच्या दोन थापडींतच गार पडंल, पण पक्या त्याचेवर काही हात उचलणार नाही आणि शिवड्यापुढं तसाच रेटून बसून राहिला तर समद्यांना बिनकामाची शिवड्याची नांष्टाप वचवच ऐकावी लागंल म्हणून पक्यानं गुमान उठून दुसरी जागा धरली हाये.
आजून इश्या कसा रं ब्वा येईना? कुणीतरी म्हणाला. आरं त्येचं सुटार आजून गुतल्यालं आसंल. आसं एकजणाने म्हणताच सगळ्यांनी जोरात हसून टाळ्या घेतल्या. सुटार गुतण्याची भानगड ही की इश्याचा थोरला नाना म्हमईला कामाला हाये. अन त्येनं तिकडून बापाला म्हंजी इश्याच्या आज्याला नवं स्वेटर पाठवलंय. अशी जाडजूड बंडी समद्या गावात फक्त इश्याच्या आज्याकडंच हाये. म्हतारं लय कवतिकानं दिस मावळू लागताच त्ये अंगात घालून, गावभरात हिंडताना येवडी थंडी पडल्याली आसुनबी सुटेरामुळं आपल्याला कसा आतमंदी घाम सुटलाय ह्ये सांगत फिरत आसतंय. इश्याला रातच्याला रानात राखणीला जावं लागतं. नदीच्या कडंला राखणीला बसल्यावर पार गारठायला व्हतं म्हणून म्हतारं झोपताना आपलं सुटार काढून त्येला देतं. इश्या अजून आला नाही म्हंजी म्हातारं आजून झोपलं नसावं हे सगळ्यांस्नी माहित हाये.
आता इश्या आलाय, शिवड्या आलाय. बाळूच्या चुलत्याचं प्वार आलंय पुण्याहून. बाळ्या त्याला बी घिऊन आलाय. अद्वैत नाव हाये त्येचं. पण त्येचं नाव पार जीभ वाकडी केली तरी कुणालाबी घेताच येत नाय. मायला आसं काय आडवट नाव ठिवलंय रं? आपली धोंड्या, कोंड्या, दगड्या, भिम्या आशी सोपी आन दणगट नावं ठिवायची ह्ये तुह्या बापाला कळंत न्हाई का? आसं समदीजणं अद्वैतला म्हणत्यात. अद्वैतने अशा घोशास वैतागून आपल्या बापास माझे असे नाव का ठेवले पप्पा तुम्ही? हे विचारल्यावर तुझे नाव किती छान आहे हे या येड्या गाववाल्यांना कसे कळणार? असे त्याने सांगितले. मग गावातली लोकं येडी असतात असा समज अद्वैताने करून घेतलाय.
बाळ्या संडा येऊ नको, तुझी आनं आडवाटची आशी दोगांची बी सासू घ्येउन ये. आसं मोन्या बाळ्यास म्हणालाय. अरे वेड्यांनो सासू कशी आणणार? अजूण आमची लग्णे कुठे झालींत? आशी 'न'स्वराचा अत्याधिक वापर असणाऱ्या पुणेरी सुद्द भाशेत आडवटने इचारणा केली. अद्वैत दर तिसऱ्या वाक्यात गावातल्यांना येडे आशेच म्हणतो. शिवड्याला म्हणूनच अद्वैत आज्याबात आवडत न्हाई. आधीच शिवड्या फाटक्या तोंडाचा, त्यात अद्वैत तेच्याच पुढं गावाला येडा म्हणाला मग शिवड्या जाम खवळलाय पुनेकरावं. आरं ये चिम्पाटा, शेरात राहणारी तुमी लोकं शिकेल तेवडी हुकेल हायित. मायला झोपडपट्टीत ऱ्हाता अन शेण्वारवाड्यात ऱ्हायचा आव आणता. जाय तुह्या बापाला इचारून ये सासू म्हंजी काय त्ये. न्हाईतर शेकोटीत घुसू देणार न्हाई. जा पळा तिकडी तुमची तुमची शेकोटी करा अन बस शेकत. इकडं इयाचं कारण न्हाय. मग बाळ्या चार लाकडं घिउन आला, तवाच शिवड्यानं दोगांस्नी शेकोटीत बसू धीलंय.
धुनी आता ढणाणा पेटलीय अन आधी लाकडांना चिकटून बसलेली सगळीजणं मागं सरकल्यात. येटुळं मोठं झालंय.
हाणम्याचं नागडं अन शेंबडं प्वार आलंय अन म्हणतंय हाणम्या तुला इमीनं बोलीवलंय. हाणम्यानं गावातलीच पोर केली. ती लग्नाआधीच पोटुशी ऱ्हायली व्हती. ती हाणम्याला हाणम्या आशीच हाक मारती. मग प्वार बी हाणम्याला हाणम्याच म्हंतं. मायला हाणम्या इमीला सांग आता तुला आवो जावो घालाया. चार चौगात आशी चव जाती. सुब्या म्हणाला.
चिमा त्वा तुजी सासू न्हाई आणली. ह्ये पटतं का? न्हाई म्हंजी पटत आसंल तर बसून ऱ्हा. न्हाई तर तुजी सासू घिउन ये. चिमा मग लाजं काजं उठलाय अन अंधारात गुडूप झालाय. थोड्या टायमानं चिमा आलाय. हातात साताठ लहानी लाकडं हायेत. आयला चिमा लय लवकर आलास? कुठशी डल्ला मारला? आरं त्या पायमोड्या नाम्याच्या म्हतारीनं काल मोळी आणल्याली म्या पाह्यली व्हती. तिनं मोळी घरामागं लावून ठिवली व्हती, तिथूनच आणली म्या. मायला चिम्या आरं तुला काही थोडी जनाची नय तं मनाची तरी हाय का न्हाय? गरीब बिचारी म्हातारी. पाय मोडल्यापासून नाम्या रानात जात न्हाई. म्हातारीला व्हत नाय तरीबी कशीही वाकत खुरडत लाकूड फाटा घिउन येती बिचारी. अन त्वा तिचीच लाकडं आणली? आरं तिच्या लाकडाला हात घालताना इचू कसा न्हाई डसला तुला भाड्या? जा लाकडं परत जिथल्या तिथं ठिउन ये.
दामूची गाभण असलेली गाय, चिंत्याने दिग्याच्या पोरीशी जमवल्यालं ढिंग्च्याक, मारत्याची दवाखान्यातून घरी आणलेली म्हतारी, गावामागच्या वळणात परवा संपत वाण्याच्या फटफटीला आडवा ग्येलेला वाघ अशा समद्या चर्चा घडून संपल्यात. हाळूहाळू एकेक जण जायाला लागलाय. यांनी त्येंनी आणल्याली समदी सासू बी संपली. मोठ्या खांडात फकस्त उलीशी धुगधुग बाकी हाय. एकटा संज्या मगापास्नं तोंडानं फुकू फुकू आग तगवू पाहतोय पण ती इझलीच. आता पेटवाया अजून सासू न्हाई म्हणून संज्या बी घराला निघालाय.
जो त्यो आपापलं समदं हासूरुसू, बाचाबाची, घालमेल, समाधान घेऊन घराला ग्येलाय. जाळायची सासू, लाकुडफाटा संपल्यानं शेकोटी इझली कवाची..!! पण येक आग मातुर पेटल्यालीच हाय. पोटाची आग, कष्टाची आग, उद्याच्या दाणापाण्याच्या काळजीची आग....!!! मायला ह्या आगीची सासू कधीच कशी संपत नाय कुणास ठावं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा