हा ब्लॉग शोधा

बुधवार, १३ मे, २०१५

रामायण स्फुट १७






सगळे झोपी गेले होते. उत्तरेकडचा शंभर योजने समुद्र हजारो योजने लांबीच्या अंधारात गुडूप झाला होता. झोप येत नसल्याने दिव्याच्या मिणमिणत्या उजेडात सभोवताल थरथरता भासून अधिकच अस्वस्थता वाढत गेल्यामुळे अंथरुणावर नुसताच पडून असलेला राम उगीचच इकडून तिकडे सारखी कूस बदलत होता. लक्ष्मण बाजूच्या राहुटीत झोपला होता. तिथला दिवा मालवलेला होता म्हणजे तो गाढ झोपला असावा. सगळी लंकाच निद्रेच्या अधीन झाली होती. केवळ एकटा हनुमान बाहेर त्यानेच बांधलेल्या तटबंदीच्या दरवाजावर जागता पहारा देत उभा होता.

बराच वेळ असा अस्वस्थ अवस्थेत पहुडलेला राहील्यावर सगळे गाढ झोपले असावेत असा विचार करून राम उठून बसला. त्याच्या मनात विचारांचे थैमान चालू होते. अजब आहे ही लंका, आपल्या अयोध्येपेक्षा कितीतरी प्रगत आणि समृद्ध. किती नानाविध पद्धती वापरतात हे लोक जीवन अधिक सोपे सुसह्य करण्यासाठी. संपूर्ण भारतवर्षात कुठेच आपल्याला एवढी क्लिष्ट आणि तरीही अतिशय चपखल काम करणारी अवजारे किंवा पद्धती दिसल्या नाहीत. यांनी अजब तंत्रे विकसित केली आहेत. हिला सोन्याची लंका म्हणतात. आणि खरेच इथल्या नगराच्या मोठ्या गृहांवरचे घुमट सोन्याचे असल्याचे भासते. मात्र हे घुमट काही पूर्ण सोन्याचे नाहीत. तर ते फक्त दगडी घुमटांवर सोन्याचे पातळशे पत्रे मढविलेले आहेत. आणि मी एक अजब गोष्ट पाहिली आहे की या घुमटांच्या सुवर्णपत्रास जोडलेली एक ताम्रधातूची जाडशी तार भिंतीवरून खाली आणून घराजवळ जमिनीत पुरलेली असते. हे कशासाठी केले असेल यांनी? इथले मोठमोठ्या दालनांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि बंद होतात. माणसांनी हाताने धरून ते ओढून उघडावे अथवा बंद करावे लागत नाहीत. नुसते एवढेच नाही तर या रावणाने म्हणे वर्षभर फळे येणाऱ्या वृक्षांची एक वाटिका तयार केली आहे. वर्षभर आम्रफल खावे, वर्षभर जांभळे चाखावीत, सारेच अजब आहे इथे.

त्या इंद्रजिताचा रथ पाहून तर मी थक्कच झालो होतो. त्याला खरेखुरे घोडे जोडलेले नाहीत. नुसत्याच घोड्यांच्या प्रतिकृती आहेत आणि घोड्यांच्या पुढच्या पायांपाशी दिसणार नाहीत अशा रीतीने दोन छोटी छोटी चाके बसविलेली आहेत. रथाच्या छतावर एक मोठमोठ्या पात्यांचे चक्र बसविलेले आहे. त्याचा रथ किती कर्कश आवाज करत येतो. साध्या रथापेक्षा त्याच्या रथाचा वेग चौपट अधिक आहे. आणि तेव्हा तर मी क्षणभर स्तिमितच झालो होतो जेव्हा त्याच्या रथाच्या छतावरचे ते चक्र प्रचंड आवाज करत जोरजोरात फिरू लागले आणि मग अचानक प्रचंड धूळ उडवून त्याचा रथ हवेत उडू लागला. देवादिकांकडेच अशी अद्भुत साधने असतात असे ग्रंथांत वाचले होते. या रावणाकडे एक उडणारे यानदेखील आहे म्हणे. सगळे त्यास पुष्पक विमान म्हणतात. जटायू सांगत होता की त्या यानास पंख वगैरे काही नाही. आणि मी समजत होतो त्याप्रमाणे तो अश्वांऐवजी मोठ्या मोठ्या गरुडांनी ओढलेला रथ सुद्धा नाही. ते एक शंकूच्या आकाराचे यान असून या इंद्रजीताच्या उडणाऱ्या कर्कश रथाविपरित रावणाच्या त्या यानाचा य:किंचितही आवाज होत नाही.

अशाच विचारांत गढलेला असताना थोड्यावेळाने बाहेरून कुणीतरी येत असल्यासारखा आवाज झाला आणि राम उठून बसला. तो बिभीषण होता. तो रामाजवळ आला. "भगवन आपण अद्याप जागे कसे?" "झोप येत नव्हती बिभीषण, पण तू इकडे कसा? कुठून येतो आहेस?" "मी रावणाकडून येतो आहे प्रभू. आज इंद्रजीत धारातीर्थी पडला तेव्हा मी सांत्वनासाठी गेलो होतो त्याचेकडे. एवढा वेळ मी त्याचेच बरोबर होतो. त्याने मला थांबवून घेतले होते. पुत्रशोकाने तो पूर्ण खचला आहे. त्याला आपल्याशी बोलायचे आहे. म्हणून मी इथे आलो आहे. आपण त्याच्याशी चर्चा करावी अशी त्याची इच्छा आहे. कुणी सांगावे कदाचित त्यास युद्धबंदीचा प्रस्ताव मांडायचा असेल." "अरे पण रावण हा अतिशय चतुर मनुष्य आहे ना? त्याला खरेच चर्चा करायची आहे की चर्चेसाठी बोलावून अंगद, हनुमानास त्याने जसे मारण्याचे प्रयत्न केले होते तसे मलाही कपटाने मारायचे आहे?" रामाचे हे उद्गार हे ऐकून बिभीषण म्हणाला, "नाही नाही प्रभू असे काही असते तर मी आपणांस असा सल्ला कसा दिला असता? चर्चेसाठी रावणाकडे जाण्याची आवश्यकता नाही. आपणांस इथूनच चर्चा करता येईल." "काय? म्हणजे तू रावणालाच इकडे घेऊन आला आहेस? हनुमानाने तुम्हास आत कसे सोडले?" "नाही नाही श्रीराम, रावणदेखील इथे आलेला नाही आणि आपणांसही त्याचेकडे जाण्याची आवश्यकता नाही." असे म्हणून बिभीषणाने सोबत आणलेली एक अतिशय बारीक आकाराच्या तारेची गुंडाळी आणि सहा खुंटीसदृश कळा बाहेर काढल्या. नंतर त्याने पाकशाळेतून एक गोलाकार धातुपात्र आणले आणि त्या सहा कळा त्या पात्राच्या काठावर समानांतर सहा ठिकाणी बसविल्या. मग त्याने त्या सहाही कळांना सोबत आणलेल्या तारेने अशा रीतीने बांधले की एक कळ किमान तीन इतर कळांस जोडली गेली होती मात्र कुठल्याही दोन कळांमधील तारा एकमेकांस स्पर्श करत नव्हत्या. हे असे यंत्र तयार झाल्यावर मग त्याने दुसरा एक विशिष्ट प्रकारचा शंख रामाकडे दिला. हा शंख एका बाजूने निमुळता तर एका बाजून मोठे तोंड असलेला होता. तो केवळ नैसर्गिक अवस्थेतला समुद्री शंख नव्हता. तो आतून पूर्णत: पोकळ करून त्याचे आत काही धातूंच्या पट्ट्या आणि काही वृत्तचीत्तीकार धातूनलिका बसविलेल्या दिसत होत्या. बिभीषण म्हणाला की या यंत्राद्वारे आपणांस रावणाशी बोलता येईल. हे यंत्र रावणाने खास तयार करवून घेतलेले आहे ज्याकरवी तो लंकेत कुणाशीही कुठूनही बोलू शकतो. त्या शंखास बरोबर तारा बांधलेल्या यंत्रासमोर धरून त्याच्या मोठ्या तोंडाच्या बाजूकडून त्यातून बोलायचे असे. आणि जेव्हा पलीकडून आवाज ऐकावयाचा तेव्हा तो शंख तसाच त्या यंत्रासमोर ठेवून कानाशी धरावयाचा असे. संभाषणाचे वेळी त्या कळांस जोडलेल्या तारांत कंपने निर्माण होत. आणि मग त्या गोलाकार धातुपात्राच्या यंत्राच्या मध्यभागी असलेल्या पोकळीत त्या कंपनांच्या स्पंदनांनी ध्वनी निर्माण होई. बिभिषनाने ही सगळी पद्धत रामास समजावून सांगितली आणि मग तो बाहेर निघून गेला.

"प्रणाम दशरथपुत्र श्रीराम" यंत्रातून आवाज आला. पलीकडून रावण बोलत होता. "प्रणाम लंकानरेश." राम उत्तरला.
"आपण प्रथमच एकमेकांशी बोलत आहोत नाही का?"
"होय. आणि आजही आपण बोललो नसतोच, जर आपणांस पुत्रवियोग झालेला नसता.!! आपल्या पत्नीचे हरण करणाराशी कुणी चर्चा करेल काय?"
"होय बरोबर आहे आपले म्हणणे, पण मी आपल्या पत्नीचे हरण विनाकारण केले नव्हते. तो फक्त सूड होता माझी भगिनी शूर्पणखेच्या विटंबनेचा."
"शुर्पणखेची विटंबना केली नव्हती, तीस फक्त दंड दिला होता."
"असा काय गुन्हा केला होता शुर्पणखेने की तीस दंड दिला जावा? फक्त लक्ष्मणाकडे प्रेमाची याचनाच तर केली होती."
"नाही लंकापति ती प्रेमाची याचना नव्हती. तिला फक्त शारीरिक सुख हवे होते. प्रणयातदेखील प्रेम असते पण तिला फक्त मैथुन हवे होते आणि तेही काहीशा अनैसर्गिक राक्षसी पद्धतीचे. पहिल्याच भेटीत अशी मागणी करणाऱ्या स्त्रीस कोण स्वीकारेल? म्हणून लक्ष्मणाने तिला नकार दिला तर ती त्याच्या अंगचटीसच आली आणि माझ्या समक्ष तिने त्याचे वस्त्रास हात घातला. कोण सुसंस्कृत मनुष्य हे सहन करेल ते आपणच सांगा. लक्ष्मण तर या प्रकाराने हादरूनच गेला होता म्हणून मी त्यास तिला दंड करण्याची आज्ञा दिली. खरेतर अशा गुन्ह्यास मृत्युदंडच द्यावा, मात्र ती एक स्त्री असल्यामुळे मी फक्त तिचे नाक कापण्यास सांगितले."
"हे जरी आपले म्हणणे असले तरीही शुर्पणखेने इथे येऊन सांगितलेली हकीगत वेगळी होती. तिने सांगितले की तिने लक्ष्मणास एक फुलांची परडी देऊन प्रेमयाचना केली. मात्र शूर्पणखा ही रामाच्या पत्नीहून सुंदर असल्याने रामास ते रुचले नाही. लक्ष्मणास आपल्याहून अधिक रूपवान पत्नी मिळू नये असे त्याला वाटले. आणि तिच्या सौंदर्यावर भाळून तिच्या प्रेमयाचनेस तो बळी पडू नये म्हणून तीस विद्रूप करण्यासाठी त्याने लक्ष्मणास आज्ञा देऊन तिचे नाक कापण्यास सांगितले. एवढेच नाही तर तिची देहयष्टीदेखील रामपत्नी सीतेहून अधिक कमनीय आणि मोहक असल्यामुळे तिचे शरीरही विद्रूप करावे म्हणून त्याने त्यास तिची स्तनाग्रे देखील कापण्यास सांगितली. भर राजसभेत शुर्पणखेने तिची अशी व्यथा सांगितल्यावर संबंध राजसभा सुडाच्या भावनेने पेटून उठली. आणि त्वरीत आपल्यावर आणि आपल्या अयोध्या राज्यावर हल्ला करावा अशी मागणी राजसभेने केली. मात्र मी युद्धाऐवजी ज्या सीतेसाठी रामाने हे वाईट कर्म केले तिचेच अपहरण करून तिची विटंबना करण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा काहीशा नाराजगीने का होईना पण राजसभेने तो प्रस्ताव स्वीकारला."
"शुर्पणखेने केलेले कथन हे धादांत खोटे आहे. कुणाच्या कथनाची सत्यासत्यता न पडताळता एका राजाने असा निर्णय घेणे हे योग्य आहे का?"
"हे रघुकुलभूषण राम, राज्यकर्ते असले की सत्य काहीही असो, पण भडकलेल्या जनभावनेचा आदर ठेवत आपणांस काही कठोर पावले उचलावीच लागतात. सीताहरण हे तसेच एक पाऊल होते. शूर्पणखा ही खरे बोलत असेल याची मला खात्री नव्हती मात्र ती पीडित असल्याने तिच्यावर विश्वास न ठेवणेही योग्य नव्हते. तिच्या व्यथेची वार्ता संपूर्ण लंकेत वाऱ्यासारखी पसरली होती आणि आपण स्वर्गासह त्रिलोक जिंकणारे श्रेष्ठ मानव असूनही आपल्या राजकन्येची एका य:किंचित मानवाकडून अशी विटंबना व्हावी या वार्तेने सगळे लंकाजन अत्यंत प्रक्षोभित झाले होते. या प्रक्षोभास शमविण्यासाठी एक राजा म्हणून काही ठोस आणि कठोर पाउल उचलणे आवश्यक होते."
"पण आपण तपास करून जनतेपुढे सत्य मांडायास हवे होते. ती खरी न्यायनिष्ठ भूमिका ठरली असती. आपण तसे न केल्यामुळे हे युद्ध झाले आणि असुर कुल तसेच वानर कुलातील कित्येक मनुष्यांस प्राणास मुकावे लागले. स्वयं आपणांसही पुत्रशोक झाला."
"दशरथपुत्र राम, राज्यकर्त्याची अपरिहार्यता आपण अजून अनुभवली नाही म्हणून आपण असे म्हणत आहात. आपणावरही जर भविष्यात कधी असाच प्रसंग आला तर त्याच समयी आपल्यालाही माझ्या मनस्थितीची अनुभूती येईल."
"मग आता काय कारणास्तव आपण चर्चा करण्याची इच्छा जाहीर केलीत? आपणांस समेट करायचा आहे काय? आपण सन्मानपूर्वक पूर्ण शरणागती पत्करण्यास तयार असाल तर माझी काहीही हरकत नाही समेटास."
"माझी तर तीच इच्छा आहे श्रीराम, पण मी तसे करू शकत नाही. कारण तसे केल्यास ब्रम्हांडावर विजय मिळविणारे आम्ही असुरकुलीन मनुष्य एका सामान्य कुलातील मानवापुढे हरलो अशी जनभावना होईल. पराभवाचा हा अपमान सहन करण्यापेक्षा मी मरण पत्करणे पसंत करेल."
"मग या चर्चेचे प्रयोजन काय?"
"माझ्या महापराक्रमी मेघनादास गमावल्यानंतर मला माझा पराभव तर अटळ दिसतो आहे. त्यामुळे मला आपणांस एक गोष्ट सांगायची आहे. उद्या जर मी पराभूत झालो आणि मृत्यू पावलो तर तुम्ही लंकेचे अधिपती व्हाल म्हणून तुम्हास ही गोष्ट ठाऊक असणे आवश्यक आहे."
"अशी कोणती विशेष गोष्ट आहे जी आपण प्रत्यक्ष आपल्या शत्रूस सांगू इच्छित आहात?"
"श्रीराम आपण जाणता की आम्ही लंकाजन भौतिकज्ञान आणि तंत्रविद्येत अतिशय प्रवीण आहोत. हे ज्ञान आमच्या शेकडो पिढ्यांनी प्रयत्न आणि तपश्चर्या करून मिळविले आहे. या थोर ज्ञानाने संबंध मानवजातीचे कल्याण होऊ शकते. मात्र परंपरेनुसार एका पिढीकडून दुसरीकडे हस्तांतरित करताना त्याचा केवळ आमच्या कुळातील मनुष्यांनाच फायदा व्हावा म्हणून आम्ही हे ज्ञान सीमित ठेवले होते. आमच्या या धोरणामुळे आज संपूर्ण लंकेत हे ज्ञान फक्त माझ्याजवळ आहे आणि माझ्या पश्चात ते नष्ट होऊन जाईल. पुन्हा हेच ज्ञान मिळविण्यासाठी मानवाच्या शेकडो पिढ्यांस तपश्चर्या करावी लागेल. म्हणून मी आपणांस ते देऊ इच्छितो. मी माझ्या मेघनादास हे ज्ञान दिले होते. तो एक समर्थ पुरुष होता. त्याने या ज्ञानाची अजून भरभराट केली असती. मात्र आता त्याच्या मृत्युनंतर मला तरी संपूर्ण असुर कुळातील मनुष्यांत तेवढा सक्षम पुरुष दिसत नाही. आमच्या पितरांची ही शेकडो वर्षांची तपश्चर्या वाया जाऊ नये म्हणून मी हे ज्ञान, ही माहिती आणि इतर सारी तंत्रे यांचे स्वामित्व आपल्या सारख्या समर्थ पुरुषास देऊ इच्छितो."
"हो तुमच्या लंकानगरीत आल्यापासून मीही आपण वापरत असलेल्या विविध तंत्रांनी आश्चर्यचकित झालो आहे."
"श्रीराम, आपण जी पाहिली आहात ती विविध तंत्रे जसे कृषीतंत्र, गृहबांधणी इत्यादि आमच्या अनेक लोकांस अवगत आहेत. मी जे बोलतो आहे ते आमच्या सर्वात वैशिष्ट्यपूर्ण तंत्राबद्दल आहे."
"काय आहे आपले सर्वात वैशिष्ट्यपूर्ण तंत्र? विमान बनविण्याचे तंत्र हेच ना?"
"नाही विमानाचे तंत्र देखील आम्हा सर्व भावांस अवगत आहे. बिभीषण देखील ते जाणतो."
"मग विमानाहुन श्रेष्ठ असलेले असे कोणते तंत्रज्ञान आहे आपणाकडे?" रामाने आश्चर्यमिश्रित स्वरात विचारले.
"श्रीराम आमच्याकडे एक असे तंत्र आहे ज्यायोगे आम्ही मर्त्यलोकाच्याही पार जे स्वर्ग, नरक, पाताळ लोक आहेत तिथेदेखील प्रत्यक्ष जाऊ शकतो. सामान्य लोकांस ज्ञात असलेला मर्त्य लोकातून स्वर्गलोकी जाण्याचा एक मार्ग म्हणजे मृत्यू.!! पण मृत्यू हा केवळ एकदिशीय मार्ग आहे, म्हणजे त्यातून फक्त जाता येते, परतता येत नाही. मात्र असे अजून कित्येक मार्ग आहेत ज्याद्वारे तिन्ही लोकांत जाता येऊ शकते. आज त्यातला सर्वाधिक सक्षम जो मार्ग आहे त्याचा वापर देवलोक करतात. आणि देवलोक त्या मार्गाचे ज्ञान कधीही मानवांस देणार नाहीत. मी कैलासावर जाऊन महादेवाची याचना करून त्यांचेकडे या ज्ञानाचे तंत्र मागितले होते की जेणेकरून आम्हाला आमच्या तंत्रात अधिक सुसूत्रता आणि सहजता आणता येईल परंतु त्यांनीही मला हे दिले नाही. म्हणून मग ईर्ष्येने आम्ही लंकाजनांनीही आमचा स्वयंभू मार्ग अपार कष्टांपरांत अधिक सुसुत्रतापूर्ण केला. आज निदान संख्यात्मक क्षमतेच्या बाबतीत तरी आमचे तंत्र देवांपेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याच मार्गाने आमची संपूर्ण सेना नेऊन आम्ही स्वर्ग जिंकीला होता. मर्त्यलोकांत असा मार्ग माहित असलेले मानव केवळ आम्हीच आहोत. महर्षी नारद यांचेकडेही त्या मार्गाचे स्वयंभू तंत्र आहे. मात्र कुणीही इतरांस आपले तंत्र सांगत नाही. या देवलोकांस अमरत्वाचे तंत्रही अवगत असल्याने त्यांस त्यांचे हे ज्ञान विलुप्त होण्याची भीती नाही. मीही अमरत्वाचे तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात काही कच्चे दुवे आहेत. त्यामुळे माझा मृत्यू झाला तर आमचे हे ज्ञान लोप पावेल."
"असे आहे तर मी आपला प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहे. आपण मला आपले हे सर्वोत्तम तंत्रज्ञान द्यावे आणि आपण अमरत्वाची जेवढी सिद्धी प्राप्त केली आहे ती माझ्या प्रिय हनुमानास द्यावी. तो आत्यंतिक बुद्धिमान मनुष्य असून आपण त्यास आपले अमरत्वाचे मूळ तंत्र दिलेत तर त्यात सुधारणा करून तो त्यास अधिक उपयुक्त बनवेल."
"ठीक आहे मीही आपला प्रस्ताव स्वीकारतो. जर युद्धात मी पराभूत होऊन मज मृत्यू प्राप्त होत असेल तर मृत्युशय्येवर असताना मी आपणांस त्या ज्ञानाचे रहस्य सांगेन. तत्पूर्वी हवे असल्यास आपण माझ्या त्या यंत्राद्वारे पाताळलोकाची एक छोटीशी यात्रा करून येऊ शकता. पाताळावर अद्यापही आमचेच राज्य आहे. त्यामुळे तिथे मी आपणांस पाठवू शकतो. स्वर्गात मात्र देवांनी पुन:श्च आपले राज्य स्थापल्यामुळे आम्ही आता तिकडे जात नाही. आपणांस हवे असेल तर आपण याक्षणी तो यात्रानुभव घेऊ शकता. आपणांस काही अपकार होणार नाही असे मी वाचन देतो. हवेतर आपण बिभीषणाचा सल्ला घ्यावा."
"ठीक आहे. मी या यात्रेस तयार आहे मात्र त्या यंत्राच्या कार्यपद्धती विषयी आपण मला साधारण उपयुक्त माहिती द्यावी."
"ठीक आहे ऐकावे. आम्ही एक अनंत पायऱ्यांचा दादर बनविला आहे. म्हणजे खरेतर त्या ५२ पायऱ्या आहेत, पण त्या सातत्याने एकापाठोपाठ एक अशा वृत्तीय आवर्तनांत फिरत राहतात त्यामुळे त्या अनंत भासतात. या पायऱ्या कुठल्याही दूर अंतरावर आपणांस नेत नाहीत. त्या एकाच जागी वृत्ताकार फिरत असतात. या पायऱ्या वेगाने फिरायला लागतात आणि मग त्यांचा वाढता वेग आपणांस काळ, तेज, वायू आणि वस्तुमान या महाभूतांच्याही पार घेऊन जातो. याच वाढत जाणाऱ्या एका विशिष्ट वेगास आपले भौतिक अस्तित्व शून्य होते. तिथे काळही स्थितप्रज्ञ होतो. याही अवस्थेपेक्षा आपला वेग अधिक झाला की आपण आपली पृथ्वी, आकाश या महाभूतांच्या पार असलेल्या नव्या अवकाशात जाऊन पोचतो. ते या महाभूतांच्या पार असलेले अवकाश म्हणजेच स्वर्ग, पाताळ इत्यादि होत. आणि या आपल्या स्वर्ग पाताळादि इच्छित स्थळावरूनदेखील त्याच मार्गे परतही येता येते. या पायऱ्या सुरुवातीस फिरायला लागल्या की मग त्यावर उभे राहायचे असते. या दादरापर्यंत पोचण्यासाठी एक दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून आत येणाऱ्या मनुष्यांस अलगद उचलून एखाद्या फिरत्या पायरीवर ठेवले जाते. हा दादर निरंतर फिरता असल्याने त्याचेवर एकाच वेळी लाखो मनुष्य उभे राहू शकतात. आपण बिभीषणाच्या मदतीने दादरापर्यंत जाऊ शकता. मी तो सक्रिय अवस्थेत ठेवीन.

हा संवाद घडल्यावर रामाने बिभीषणास हाक मारली. लक्ष्मणही आला. राम बिभीषणास म्हणाला, "आम्ही दोघे भाऊ रावणाच्या स्वर्ग पाताळाच्या शिडीवरून पाताळात जात आहोत. मात्र हे कुणास कळता कामा नये. आम्ही हनुमानाच्या तटबंदीतून भिंतीजवळ एक छोटेसे भुयार खणून बाहेर जाऊ. शक्यतो आम्ही अरुणोदयापुर्वीच परतू मात्र काही कारणास्तव आम्हास विलंब झाला तर आम्ही परतून इकडे येईपर्यंत तू इथे सर्वांस सांभाळ. विशेषत: माझा प्रिय हनुमान मला न पाहून खूप अस्वस्थ होईल त्याची व्यवस्थित समजूत काढ. आम्ही केवळ पाताळ लोकाचे दर्शन घेऊन लागलीच परत येऊ."
असे म्हणून रामाने शशकास बोलावले. त्याने क्षणभरात भुयार खणून दिले व राम, लक्ष्मण आणि बिभीषण त्यातून बाहेर पडले. बिभीषणाने मग त्यांस रावणाच्या पाताळ मार्गाच्या दादरकडे नेले. व त्यांना तिथे सोडून तो परत युद्धभूमीवर त्याच्या राहुटीकडे झोपण्यासाठी निघून गेला.


त्या रावणाच्या दादराच्या दरवाजातून आत जाताच राम लक्ष्मण एका पायरीवर पोचले. मग पायऱ्या फिरू लागल्या. मात्र राम लक्ष्मण जागच्या जागी उभे होते. जसा जसा पायऱ्यांच्या फिरण्याचा वेग वाढला तसा तसा दोघांना आपण वजनशुन्य होऊन पाय टेकलेले असूनही अधांतरी असण्याचा भास होऊ लागला. थोड्या अधिक वेगानंतर एक प्रखर तेजाची शलाका त्यांच्या बरोबर माथ्यावर वर्तुळाकार फिरत असल्यासारखी भासु लागली. मग ते तेज अजून वाढले आणि दोघांनी डोळे मिटून घेतले. त्यांनी डोळे उघडले तेव्हा सभोवती दाट अंधार दाटलेला होता. बहुदा पायऱ्याही फिरायच्या थांबल्या होत्या. मग हळूहळू तो अंधार दूर झाला. पायऱ्या थांबल्या नसून फिरतच आहेत असे त्यांस जाणवले आणि मग अचानक एके क्षणी ते त्या दरवाजातून बाहेर आले.

आता ते पाताळात होते. बाहेरची सृष्टी अत्यंत विलक्षण होती. कोणत्याही दोन गोष्टींमधील अंतराचा अदमास येत नव्हता. सगळे भासमान वाटत होते. रामास लक्ष्मण खूप दूर दिसे मात्र तो अगदी खेटून उभा आहे असा भास होत राही. ते दोघे चालू लागले आणि एक विचित्र गोष्ट घडली. प्रत्येक पावलानिशी आपण खोल खोल पायऱ्या उतरल्यासारखे खाली खालीच जात आहोत हे त्यांच्या लक्षात आले. ही मोठी विचित्र स्थिती होती म्हणजे समतल दिसणारे पृष्ठभागसुद्धा खरेतर खोलगट होते. हे पाहून काहीसा विचार करून लक्ष्मणाने एक पाऊल मागे टाकून पाहीले. पण काय आश्चर्य! मागे पाऊल टाकल्यावर आधी होता त्याच जागी पोचूनही तो वर चढला नव्हता, तर खालीच उतरला होता. म्हणजे तिथे वर ही दिशाच नव्हती. अगदी वर वळून पाहिले तरी जमीन खाली दिसते अगदी तशीच समतल वरही दिसे. अगदी वर, खाली, सभोवताली असे सगळीकडे एकसमान पृष्ठभाग होते. जे एरवी आकाशासारखे डोक्यावर आहे असे वाटावे तिथेही सहजगत्या पावले टाकत उतरून सहज पोचता येत होते. म्हणजे संबंध सृष्टी ही केवळ उतरतीच होती. आपण मान इकडे तिकडे फिरवूनही वेगळ्या दिशेने पाहत आहोत अशी तिथे जाणीवच होत नसे. आजूबाजूला उद्यानासारखी कित्येक सुशोभित भूरूपे होती मात्र ती उद्याने नव्हती. समोर अनेक सुंदर सुंदर महाल होते. विविधरंगी वस्त्रे ल्यालेले स्त्री पुरुष होते. अतिशय चमकदार रंगाचे पशु होते. झाडांसारखी मात्र हिरवी नव्हे तर पिवळी पाने असलेल्या काही संरचना होत्या पण त्या झाडांसारख्या त्या एका जागी स्थिर नसून जमीनीतून सरकत सरकत इकडे तिकडे फिरत होत्या. त्या उद्यानसदृश भूरुपांत अनेको प्राणी होते. मृग होते. सोनेरी मृग.! पंचवटीत अगदी असाच एक मृग दिसल्यावर त्याला मारण्यासाठी राम अरण्यात एकटाच धावला होता. ते मृग पाहून उगीचच लक्ष्मण थोडा अस्वस्थ झाला. याच मृगांमुळे एवढ्या गोष्टी घडल्या होत्या. उगीच काहीशी दगाफटक्याची शंका मनी येऊन तो रामास म्हणाला, "हे ज्येष्ठ भ्राता आपण आता पाताळ लोक पाहिला आहे तेव्हा इथून त्वरित मृत्युलोकास परतलेले योग्य."
पण राम म्हणाला थांब आपण थोडे अजून या नगरात फिरून पाहू. मग ते थोडे अजून पुढे गेले. तेवढ्यात अचानक त्यांना खाली खोलवरून एक वाहन वेगाने येताना दिसले. खोल दरीतून जवळ येत असलेले दिसूनही ते वाहन अजून खोल उतरत असल्याचाच भास होत होता. मग क्षणार्धात कितीतरी मोठे अंतर दूर भासणारे ते वाहन दोघांच्या जवळ आले आणि सुसाट निघूनही गेले. त्या वाहनात एक अलौकिक लावण्यवती बसलेली होती. राम लक्ष्मण त्या सौंदर्यवतीस पाहून स्तिमित झाले. लक्ष्मणा ही कोण दैवी सौंदर्यवती होती याची चौकशी कर. नक्कीच ती कुणी श्रेष्ठकुलीन स्त्री असेल. तिच्याकरवी आपणांस पाताळाविषयी अधिक माहिती मिळू शकेल, असे तो लक्ष्मणास म्हणाला. ती वाहनात बसलेली स्त्री इतकी आत्यंतिक सुंदर होती की आपला एवढा संयमी आणि पापभिरू बंधू राम तिजवर भाळला तर नसावा अशी शंका उगीच लक्ष्मणाच्या मनास चाटून गेली. पण या शंकेस झटकून देत तो ज्येष्ठ भावाच्या आज्ञेस अनुसरून तिची चौकशी करण्यास गेला.

तिकडे लंकेत दोन प्रहर उलटून गेल्यावर राम लक्ष्मण एव्हाना परतले असतील तर त्यांस जाऊन भेटावे असा विचार करून जागा झालेला बिभीषण रामाच्या राहुटीकडे निघाला. बाहेर तटबंदीच्या दरवाजावर हनुमान जागा राहून पहारा देतच होता. बिभीषण जवळ येताच तो आश्चर्याने म्हणाला, बिभीषण महाराज आताच काही क्षणांपूर्वी मी आपणांस आत सोडले होते मग आपण बाहेर कसे आलात? मी तर तुम्हास बाहेर जाताना बघितले नाही. बिभीषणाच्या लक्षात आले की आपणही रामाबरोबरच भुयारातून बाहेर गेल्याने हनुमानास काही कळले नाही. मग आता अजून गोंधळ नको म्हणून तो हनुमानास म्हणाला की नाही महाबली मी तर आताच प्रथमत: येतो आहे. आपला काहीतरी गैरसमज झाला असावा. मात्र हनुमानास हे पटले नाही. तो म्हणाला मला खात्रीने आठवते की आपण काही क्षणांपूर्वी आला होतात आणि मीच आपल्याला आत सोडले होते. जर ते तुम्ही नव्हतात तर नक्कीच तो मायावी रावण अथवा त्याने पाठविलेला कुणी मायावी हेर असेल. रामप्रभूंस काही दगाफटका तर झाला नसेल म्हणून हनुमान त्वरित आत धावला. रामाच्या राहुटीत कुणीही नव्हते. एवढेच नव्हे तर लक्ष्मणाची राहुटी देखील रिकामी होती. हे पाहून हनुमान काळजीने व्याकुळ झाला. त्याने इकडे तिकडे फिरून पाहिले तर तटबंदीच्या भिंतीजवळ उकरलेली माती होती. त्याने जवळ जाउन पाहिले तर एक भुयार खणलेले होते. हनुमान ते पाहून क्रोधाने लालबुंद झाला. त्याने रावणाची मोठ्या शब्दांत निर्भत्सना करण्यास सुरुवात केली. रावणाने राम लक्ष्मणांचे अपहरण केले आहे आता मी त्याला जिवंत सोडणार नाही. असे म्हणून तो सुग्रीव, अंगदास हाका मारू लागला.
बिभीषणाने त्यास कसे बसे शांत बसण्यास सांगितले आणि म्हणाला, "शांत रहा उगीच इतरांस विनाकारण उठवून छावणीत घबराट पसरू देऊ नकोस. रावण राम लक्ष्मणांस घेऊन गेलेला नसून ते आपल्या मर्जीने त्याच्या यंत्रात बसून पाताळलोकी गेले आहेत थोड्या समयापरांत ते स्वत: परत येतील."
"काय? रामप्रभू स्वमर्जीने त्या लबाड रावणाकडे जातील यावर माझा विश्वास नाही."
"अरे मी स्वत: त्यांस रावणाकडे घेऊन गेलो होतो तू काळजी करू नकोस?"
"काय तू त्यांस रावणाकडे घेऊन गेला होतास? म्हणजे तू प्रतारणा केलीस आमच्या विश्वासाची. शेवटी तू आमचा विश्वासघात करून आपल्या भावाकडेच परत गेलास ना? मी तुलाही सोडणार नाही. राम लक्ष्मण मला सांगितल्याशिवाय कुठे जाणारच नाहीत." असे म्हणत बिभीषणास धरून ठेवून हनुमानाने सुग्रीव अंगदास बोलावले. ते आल्यावर हनुमानाने त्यांना सगळी वार्ता सांगितली आणि बिभीषणास तत्काळ दंड देण्याची आज्ञा करण्याची विनंती केली. पण सुग्रीव म्हणाला, "बिभीषण आपली प्रतारणा करेल असे वाटत नाही. मात्र तरीही तुला शंका असेल तर आपण त्यास दंड देऊ शकतो मात्र त्यामुळे राम लक्ष्मण परत येणार नाहीत. मला वाटते ते जिथे कुठे गेले असतील तिथून त्यांस परत आणण्यासाठी बिभीषण हाच एकमेव दुवा आपल्याकडे आहे. तेव्हा मी बिभीषणासच आज्ञा देतो की त्याने हनुमानास राम लक्ष्मण हे पाताळ वा अन्य जिथे कुठे गेले असतील तिथे घेऊन जावे. असे न केल्यास त्यास दंड देण्यात येईल."

मग बिभीषण हनुमानास घेऊन त्याच भुयारातून रावणाच्या त्या दादराकडे गेला व त्यास त्या यंत्राच्या दरवाजातून आत पाठविले.

इकडे पाताळात चौकशी करण्यास गेलेला लक्ष्मण परत रामाकडे आला. आणि त्याने रामास सांगितले की त्या स्त्रीचे नाव चंद्रसेना असून ती पाताळ लोकाचा राजा अहिरावण याची पत्नी आहे. मात्र ती विष्णूची भक्त असून त्यामुळे ती अहिरावणाशी पत्निधर्माने वागत नाही. पण तरीही अहिरावण तिला त्यागण्यास तयार नाही. आपण विष्णूपेक्षा अधिक श्रेष्ठ आहोत हे तो तिला पटवून देऊन तीस खऱ्या अर्थाने प्राप्त करण्याची संधी शोधत आहे. अहिरावण हा रावणाचा भ्राता असून रावणाने आपणांस कपटाने येथे पाठवून मारण्याचा डाव योजिला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
"अरे मग काही दगाफटका होण्यापूर्वी आपणच अहिरावणास ठार करूयात ना. आणि अशी आवई उठवून देऊ की मीच विष्णू किंवा विष्णूचा अवतार आहे आणि त्याच्या पत्नीची सुटका करण्यासाठी आलो आहे, म्हणजे आपणांस इथल्या जनतेकडूनही विरोध होणार नाही."

"भ्राता राम आपणाकडे कोणतीही शस्त्रे नाहीत त्यामुळे आपण अहिरावणाशी युद्ध करू शकत नाही. इथले लोक म्हणतात की अहिरावण एका देवीचा भक्त आहे आणि तो रोज तिची पूजा करतो. तिच्याद्वारे त्यास अनेक सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे त्याचा पराभव करणे अशक्य आहे."
राम हे ऐकून संतापला. तो लक्ष्मणास म्हणाला, "लक्ष्मणा माझ्या सामर्थ्यास शस्त्रांची आवश्यकता आहे असे तुला वाटते काय? तू जवळ शस्त्रे नसल्यामुळे घाबरलेला दिसतोस. पण तू अहिरावणाशी युद्धास तयार नसला तरी मी एकटा युद्ध करेल. तुला जर नि:शस्त्र असण्याची एवढी भीती वाटत असेल तर मी तुला आज्ञा देतो की तू जो स्वयं धर्म आणि समाज मर्यादा पाळण्यासाठी लौकिकास प्राप्त आहेस, स्वत:च इथे स्वत:साठी एक मर्यादा रेखा आख आणि माझ्या आज्ञेशिवाय ती ओलांडू नकोस. मी दशरथपुत्र राम आता पण करतो की मी अहिरावणाचा वध केल्याशिवाय परतणार नाही. लक्ष्मणाने मग ओशाळून रामाच्या आज्ञेनुसार स्वत:समोरच एक लक्ष्मणरेखा आखली आणि रामास सांगितले की काहीही झाले तरी तुझ्या आज्ञेशिवाय मी ही रेखा ओलांडणार नाही.

लक्ष्मणाशी वाद झाल्यावर राम आता अहिरावणास कसे मारावे या विचारांत गढलेला असतानाच हनुमान तिथे पोचला. हनुमानास पाहून राम अतिशय आनंदी झाला. आता रामाची शक्ती अनेक पटींनी वाढली होती. शस्त्रे नसली तरीही हनुमान आपल्या ताकदीच्या जोरावर कुणालाही ठार करू शकतो हे रामास ठाऊक होते. मग रामाने एक योजना बनविली. अहिरावण देवीची पूजा करत असताना देवळात एकटा असतो तेव्हा तिथे आधीच लपून बसून तो ध्यानस्थ असताना हनुमानाने त्याला गळा आवळून ठार करावे आणि मग पाताळ लोक विष्णूच्या अवताराने म्हणजेच रामाने जिंकल्याची आवई उठवून देऊन आपण सर्वांनी सुरक्षित परत जावे अशी योजना रामाने बनविली. 

त्यांनी आधी ते मंदिर शोधले. मग हनुमान ठरल्याप्रमाणे अहिरावणाच्या संध्यापूजेच्या वेळी गुपचूप मंदिरात जाऊन लपून बसला. अहिरावण येऊन पूजा करून ध्यानस्थ बसल्यावर हनुमानाने लगेच त्यास गळा आवळून ठार केले. मग तो थेट अहिरावणाच्या राजसभेत गेला आणि प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असलेल्या रामाने अहिरावणाची
त्याची धर्मपत्नी चंद्रसेना हिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन तिजबरोबरच समस्त पाताळ लोकांस बंधमुक्त केले आहे असे जाहीर केले. 
त्याने दरबारात असे जाहीर करताच दरबारात प्रचंड कल्लोळ माजला. थोड्याच वेळात राणीवशातून स्वत: चंद्रसेना दरबारासमोर आली आणि हनुमानास म्हणाली की अहिरावणास मारणारा पुरुष कोण आहे त्याचे दर्शनाचा लाभ आम्हास द्यावा. आता तोच पाताळनरेश आहे.  आणि जर तो विष्णूचा अवतार असेल तर मला अहिरावणापासून केवळ मुक्ती नको आहे, मुक्तीबरोबरच मी स्वत: विष्णूची अभिलाषी आहे हे त्यास ठाऊक असेलच. जसा तो पाताळाचा धनी आहे तसा आता माझ्या पतीचा वध केल्यानंतर तो माझाही धनी झाला आहे. तरी त्याने आता माझे पाणिग्रहण करावे. तिचे हे आवाहन ऐकून सबंध दरबारानेही तिचे म्हणणे उचलून धरले. या प्रस्तावावर हनुमानाचा अबोला पाहून दरबारातले वातावरण हळूहळू चिघळू लागले. यावर उपाय म्हणून हनुमानाने भगवान विष्णू हे आपल्या सर्व भक्तांवर प्रेम करतात, त्यामुळे मी भगवान विष्णुंस तुम्हास दर्शन देण्याची विनंती करेन मात्र जशी भगवंताची इच्छा असेल तेच होईल असे तीस सांगितले.
 
हनुमानाने मग रामास चंद्रसेनेची कामना सांगितली. रामाने यावर त्वरित तिला भेटण्यास संमती दाखवली. हे पाहून केवळ हनुमानच नव्हे तर लक्ष्मणही अचंबित झाला मात्र दोघेही काही बोलले नाहीत.   


हनुमान मग चंद्रसेनेकडे गेला विष्णू तीस भेटण्यास तयार आहे असे सांगितले. तिने त्यास रात्री आपल्या महालात भेटण्यासाठी बोलावले. रामाच्या मनात चंद्रसेनेसारख्या अलौकिक लावण्यवतीस पाहून विषयवासना तर उत्पन्न झाली नसावी ना या विचाराने हनुमान आणि लक्ष्मण असे दोघेही चिंतीत झाले होते. अहिरावण मेला असला तरीही अजूनही रामाने लक्ष्मणास त्याची मर्यादा रेखा ओलांडण्याची परवानगी दिली नव्हती. त्यामुळे जर रामाच्या मनात विषयविकार उत्पन्न झाला असेल तर हनुमानाने काही उपाय योजून रामास या अध:पतनापासून रोखलेच पाहिजे असे त्यांनी ठरविले. मग त्यांनी एक योजना बनविली. त्यानुसार रामाच्या अपरोक्ष भेटीच्या जागेची सुरक्षा पाहणी करण्याच्या बहाण्याने राम चंद्रसेनेकडे जाण्यापूर्वीच हनुमान तिथे गेला. त्याने पाहिले की तिथे केवळ भेटीची तयारी चाललेली नसून प्रियाराधनेची तयारी चालू होती. एका सुंदर महालात एक अत्यंत सुंदर असा मंचक सजविला गेला असून अत्यंत योजनाबद्ध रीतीने रामास कामभावनेत फसविण्याचा यत्न करण्यात येत आहे हे त्याने ओळखले. मग हनुमान त्या महालात गेला आणि त्याने त्या सजविलेल्या मंचकाचा एक पाय तोडून नुसताच तुटलेल्या तुकड्यावर वठवून ठेवला व स्वत: मंचकावरची चादर काहीशी खालपर्यंत ओढून मंचकाखालीच लपून बसला. जर राम चंद्रसेनेच्या काव्यास बळी पडलाच तर तो मंचकावर बसताच मंचक खाली पाडून त्याचा कामभंग करावा जेणेकरून तो कामविकाराच्या प्रभावातून बाहेर येईल, व अध:पतनापासून वाचेल असा त्याने मानस केला.

मग ठरल्या वेळी राम चंद्रसेनेच्या महाली आला. चंद्रसेना विष्णुच्या प्रेमात अक्षरश: हरवून गेलेली स्त्री होती. आपल्या सौंदर्याची तिला पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच आता मोठ्या भाग्याने भेटलेल्या विष्णूस आपल्या सौंदर्याच्या मोहपाशात गुंतवून आपल्या जवळच थांबवून ठेवावे असे तिला वाटत होते. त्यामुळे ती तिच्या मनमंदीरात वसलेल्या विष्णूस प्रथम भेटीतच प्रसन्न करण्यासाठी अत्यंत कामोत्तेजक पेहरावात मंचकावर पहुडली होती. रामाने त्या गृहाचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि त्याची नजर लगेच मंचकावर पहुडलेल्या चंद्रसेनेच्या श्रुंगारासक्त देहाकडे गेली. कित्येक दिवस रामाने स्त्रीसंग केला नव्हता. त्यामुळे आधीच अपार लावण्यवती असलेल्या चंद्रसेनेस तशा पेहरावात पाहून तो आत्यंतिक विषयोत्तेजीत झाला. त्या प्रखर विषयवेगाने त्याची मति क्षणभर भंग झाली. त्याचे मनात तीव्र विषयविकार उत्पन्न झाला. तिकडे मंचकावर दिवास्वप्नात गुंग असल्यामुळे रामाच्या येण्याची जाणीव न झालेल्या व डोळे मिटून विष्णूशी संगाची कल्पनेतच कामना करीत असलेल्या चंद्रसेनेने अचानक स्वत:शीच मंद हसून एका कुशीवर वळण घेतले तेव्हा पाठमोऱ्या तीस पाहून तर राम अधिकच प्रवर्धित झाला, इतका की त्या उत्तेजनेपायी त्याचे सत्वर शौर्य द्रवले. आणि मग मात्र अशा एकाएकी नि:तेज झालेल्या रामाच्या मनावरून 
विषयज्वरदेखील तत्पर उतरला आणि त्याची जागा लगेच खजीलपणाने घेतली. एका य:किंचित कामभावनेने आपण केवढ्या अध:पतनास तयार झालो या विचाराने तो प्रचंड लज्जित झाला. त्याने याही प्रसंगी डोळे मिटून विष्णुनामच पुटपुटणाऱ्या चंद्रसेनेच्या मुखाकडे पाहीले आणि त्यास अचानक सीतेची आठवण आली. तीही निरंतर असेच रामनाम जपत असते असे हनुमानाने त्यास सांगितल्याचे आठवले. आपण आपल्या धर्मपत्नीशी केवढी मोठी प्रतारणा करायला निघालो होतो या पापभावनेने राम वरमला, आणि तसाच आल्या पावली चंद्रसेनेस स्पर्शही न करता माघारी फिरला.

राम खिन्न अपराधी चेहऱ्याने बाहेर लक्ष्मणाकडे आला. हनुमानही मागाहून आला. आणि मग झाल्या प्रकाराबद्दल अवाक्षरही न काढता तिघेही लगबगीने तिथून इहलोकी  परतण्यास निघाले.

पृथ्वीवर पोचले तेव्हा सुग्रीवादिंनी बिभीषणास पाश बांधून बंदिस्त केलेले होते. पाताळ म्हणजे नेमके काय हे माहीत नसल्याने सगळे त्या भुयाराजवळ रामादिकांच्या येण्याची वाट पाहत उभेच होते. घडलेल्या घटनेचा गाजावाजा होऊ नये म्हणून रामाने हनुमानास त्या भूयारातूनच परत राहुटीत जाण्याचे सांगितले. भुयारातून राहुटीत तटबंदीच्या आत पोचल्यावर खालच्या खड्ड्यातून वर येण्यासाठी उंचपुऱ्या हनुमानाने राम आणि लक्ष्मणास खांद्यावर बसवून वरती उचलले. मग ते खड्ड्यातून बाहेर आले नंतर हनुमान उडी मारून स्वत: खड्ड्याच्या बाहेर आला. ते दृष्य पाहणाऱ्या काही वानर सैनिकांनी पाताळ हे जमिनीच्या खाली असते आणि तिथून हनुमान राम लक्ष्मणास खांद्यावर घेऊन त्या अनंत पोकळीतून वर उड्डाण करीत आला अशी वार्ता संपूर्ण वानरसेनेत पसरविली. आणि पुढे अशीच वदंता प्रचलित झाली. जवळजवळ अष्टप्रहरांपश्चात राम आणि लक्ष्मण परत आले होते. सेनेत त्यांच्या गैरहजेरीमुळे काही अनिष्ट प्रवाद पसरून खळबळ उडू नये म्हणून राम लंकेत नाही ही वार्ता कुणासही न लागू देता सेनापती सुग्रीवाने प्रत्यक्ष स्वत: त्या दिवशी नेतृत्व करून युद्ध चालू ठेवले होते. राम लक्ष्मणास सुरक्षित परत आलेले पाहील्यावर मग बिभीषणाची माफी मागून सुग्रीवाने त्यास मुक्त केले. यानंतर आपण सुरक्षित असल्याची हमी देत रामाने सर्वांस झोपण्यासाठी पाठवले.

काल ते बिभीषणाने बनविलेले संवाद यंत्र अजूनही तसेच होते. रामाने सहज तो शंख त्याचेपुढे धरला व त्यातून तो 'नमस्कार' असे हाक मारल्यासारखे मोठ्या आवाजात बोलला. त्याचा अंदाज खरा होता. पलीकडून रावणही त्याचा पुकारा येण्याचीच वाट पाहत होता. मग त्यांच्यात पुन्हा चर्चा सुरु झाली.
"कसा वाटला पाताळ?"
"पाताळ अतिशय अचंबित करणारा आहे. या आपल्या लंकेहूनही कितीतरी विलक्षण."
"आपणांस तिथल्या सृष्टीचा, मनुष्यांचा काही वेगळा अनुभव आला काय?"
"अर्थातच.! तिथली सृष्टी अपार विलक्षण होती. मात्र आम्ही कुणा मनुष्यांशी काही संपर्क अथवा संवाद वगैरे केला नाही त्यामुळे त्यांचे जीवन अथवा परंपरांचे बाबतीत काही विशेष अनुभव आला नाही."
रावण हे ऐकून हलकेच हसला आणि म्हणाला, "श्रीराम मी आपणांस एक गोष्ट सांगू इच्छितो. खरेतर मला हे कालच बोलायचे होते पण मला बोलता आले नाही. आज मात्र मी ते बोलू शकतो. आता आपल्या पत्नीच्या विरहाच्या दु:खात आणि युद्धाच्या गदारोळात कदाचित आपल्या मनात सर्वप्रथम आपल्या पत्नीस मुक्त करण्याव्यतिरिक्त अन्य विचार येणार नाहीत, मात्र युद्ध संपल्यावर आणि आपल्या पत्नीस प्रत्यक्ष भेटल्याच्या काही समयापरांत आपल्या मनात कलुषित विचार येऊ शकतात. म्हणून मी स्वयं आपणांस सांगू इच्छितो की आपली पत्नी ही एखाद्या देवीइतकीच पवित्र आहे. माझ्या मनात तिच्या अपहरणानंतर विषयविकार उत्पन्न झालाच नाही असे नाही, मात्र अशा विषयवासनेने जेव्हा जेव्हा मी तिजजवळ गेलो तेव्हा मला माझी प्रियपत्नी मंदोदरी हिचीच स्मृति होत असे. माझ्या पतिव्रता धर्मपत्नीच्या माझ्या स्मृतीतील या अस्तित्वाच्या जाणीवेने मला आपल्या धर्मपत्नीपासून दूर ठेवले. आपल्या पत्नीची आपल्यावरची निस्सीम श्रद्धा आणि विश्वास या गोष्टीदेखील मी पाहिल्या आहेत. अशा सती पतिव्रतेस स्पर्शण्याची त्यामुळेच माझी हिम्मत देखील झाली नाही. म्हणूनच माझी इच्छा आहे की मनात यत्किंचितही किंतु न धरिता युद्धानंतर आपण आपल्या धर्मपत्नीस शुद्ध अंत:करणाने स्वीकारावे."
"लंकानरेश, ज्या स्त्रीच्या स्वयंवरात आपण अभिलाषी म्हणून आला होतात आणि तीस मिळविण्यास असमर्थ ठरला होतात, तीस अपहृत केल्यावर विषयवासनेने बाधित असूनही आपण स्पर्श केला नाही यावर कुणी विश्वास ठेवेल काय?"
"इतर कुणी ठेवो ना ठेवो, पण आपण विश्वास ठेवा श्रीराम. एका पतिव्रतेचे अपहरण करण्याचे पातक माझ्या माथी आहेच पण ती गंगेच्या जलासारखी पवित्र असूनही माझ्यामुळे तिची निर्भत्सना व्हावी हा दंभ तरी किमानपक्षी मज नको."
"माझ्या पत्नीवर माझा विश्वास आहे, मात्र आपणावर माझा विश्वास बसणे अप्राप्य आहे. आणि आपण असमयोचीतपणे ही विषवल्ली माझ्या मनात पेरल्याने मी संभ्रमित झालो आहे. बहुदा माझे मानसिक खच्चीकरण करून हे युद्ध जिंकण्याचा आपला डाव आहे हे आता माझ्या लक्षात आले आहे."
"नाही नाही श्रीराम. मी त्रैलोक्याचे अधिराज्य भोगलेला रावण, माझ्या सर्वाधिक प्रिय स्वर्गवासी पुत्राची शपथ घेऊन सांगतो की मी जे बोललो ते त्रिकालाबाधित सत्य आहे आणि हे सांगण्यात माझा कोणताही मानसिक छल करण्याचा मानस नाही."
"लंकापती, विषयवासना माणसास कोणताही अधर्म करण्यास प्रवृत्त करते. मी हे जाणत असताना आपणावर कसा विश्वास ठेवेल?"
"रामचंद्र आपण मला माफ करणार असाल तर एक गोष्ट सांगतो. विषयवासना नक्कीच अत्यंत बलशाली असली तरीही ती प्रत्येकवेळी अधर्म घडवून आणण्यात यशस्वी होतेच असे नाही."
"हे फक्त योगायोगांवर आधारलेले एक गृहीतक आहे. आपण जिचे आत्यंतिक अभिलाषी आहोत अशी एक काहीही आधार नसलेली स्त्री आपल्या ताब्यात आहे आणि आपण तिला स्पर्शत नाही असे प्रत्यक्षात होऊ शकत नाही."
"होऊ शकते राम. जसे काही समयापुर्वी चंद्रसेनेच्या बाबतीत झाले होते."
हे ऐकून राम चपापला. "हे आपल्याला कसे कळले?"
"पाताळावर आजही माझेच राज्य आहे हे विसरू नका राम. तिथल्या कुठल्याही भागातली इत्यंभूत माहिती मी कधीही अनेको हेरगिरीच्या साधनांनी विनासायास मिळवू शकतो."
राम ओशाळून म्हणाला, "लंकानरेश आपण योग्य बोललात. विषयवासनेने मी काही क्षणांपूर्वी एका परस्त्रीची कामना केली होती. कुणासही ही वार्ता कळली तर मी त्या स्त्रीशी संग केला नाही यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. मात्र सत्य परिस्थिती ही नक्कीच निराळी असू शकते हे आपले म्हणणे आता मला पटले आहे. माझा माझ्या धर्मपत्नीवर विश्वास आहेच आणि आता आपल्यावर विश्वास न ठेवण्यात काहीही तथ्य नाही हेही मला उमजले आहे."
"आपला विश्वास आपल्या पत्नीवर असेलच याची मला खात्री होती रामचंद्र, पण जसे आपल्या मनात किल्मिष उत्पन्न होऊन ते नाहीसे देखील झाले तसे कदाचित आपल्या स्नेहीसंबंधी, इतर बंधू अथवा राज्यातील प्रजेबाबतीत होणार नाही. त्यांतल्या कुणी पुन्हा हा प्रश्न उपस्थित केला तरी आपण त्यास महत्व देऊ नये. मी कालच आपणांस म्हणालो नव्हतो का? की मला हे युद्ध थांबवायचे आहे मात्र लोकभावनेस्तव मी ते थांबवू शकत नाही. त्याचप्रमाणे कदाचित आपणही लोकभावनेस बळी पडून आपल्या धर्मपत्नीस पवित्रतेचे पुरावे मागू शकता. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. खरा श्रेष्ठ नृपति तोच जो लोकनिंदेने खचून न जाता योग्य तोच निर्णय घेण्याची क्षमता अंगी धारतो.

"मी आपले कथन नक्की स्मरणात ठेवेल. चला आता मी आपणांस निरोप देतो. परत आपण एकमेकांशी बोलणार नाही. आणि बोलूही नये."

"श्रीराम एक शेवटचे, कालच्या आपल्या पाताळयात्रेतील कोणतीही घटना मी कुणास सांगणार नाही याचे आपणांस वचन देतो. आपणांस मी आधी सांगितल्याप्रमाणे मी जर मृत्युशय्येवर पडलोच तर आमच्या तंत्रज्ञानाचे रहस्य ऐकण्यासाठी आपण यावे अथवा आपल्या बंधूस मजकडे पाठवावे. आणि याव्यतिरिक्त आपण माझी फक्त एक गोष्ट माझी मान्य करावी. काल चंद्रसेनेस बोलल्याप्रमाणे आपण विष्णूचे अवतार आहात ही वदंता मी माझ्या सेनेतही पसरविणार आहे. म्हणजे किमान माझा पराभव झाला तरी तो कुणा सामान्य कुळातील मनुष्याकडून झाला नसून एका दैवी अवतारी पुरुषाकडून झाला आहे असे माझ्या प्रजेस वाटेल. आपण या वदंतेस नाकारू नये ही विनंती. आता आपला निरोप घेतो."

1 टिप्पणी: